यापुर्वी “नवबौद्ध ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात” असा आरोप केतकीने केला होता..
केतकी चितळे किती अपुऱ्या माहितीवर बोलते हे सांगण्यासाठीच हा लेख.
शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त टिकेनंतर केतकी चितळेला ठाणे पोलीसांनी ताब्यात घेतल्याची बातमी आली. वास्तविक केतकी चितळे सोशल मिडीयावरुन टिकेची धनी होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी तिने कित्येक टिका केलेल्या आहेत व त्या सवंग प्रसिद्धीसाठी केलेल्या आहेत हे कालांतराने सिद्ध देखील झालेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असो किंवा “बौद्ध समाज ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात” अस विधान केलं होतं.
तीचं हे विधान हे किती चुकीचं आहे हे सांगण्यासाठीचं हा बोलभिडूचा लेख पुर्नप्रकाशित करत आहोत.
अपुऱ्या ज्ञानावर उड्या मारण्याची कला मानवाच्या अंगी आजही टिकून आहे. या अपुऱ्या ज्ञानामुळे फक्त तोंडावर पडण्याची वेळ येते. सध्या याचाच अनुभव मराठी चित्रपट क्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री केतकी चितळे घेत आहे.
झालं अस की हिंदूत्वाच्या प्रचारासाठी केतकी चितळेनी एक फेसबुक पोस्ट टाकली. हिंदूत्वाचेच काय तर कोणत्याही धर्माचे, जातीचे समर्थन करणे हा गुन्हा नाही.
मात्र तिने हिंदूत्वाचे गोडवे गाण्यासाठी इतर धर्मावर टिका करण्याची पद्धत अवलंबली. ती नेमकी काय म्हणाली हे खालील पोस्ट मध्ये दिसत आहे.
ती म्हणते,
मुस्लीम समाजाने बुरघा घालणे, टोपी घालणे हे धर्मस्वातंत्र्य, शिख समाजाने किरपान ठेवणे. जैन समाजाने कंदमूळ खाणार नाही म्हणून वेगळा मेन्यू ठेवणे, अग्नी मंदिरात फक्त पारशी लोकांना प्रवेश असणे, ख्रिश्चन फादर यांनी सर्व धर्मांवर भाष्य करणे हे कसं चालतं या आशयाचं भाष्य केलं.
मात्र तिने या गोष्टी करत असताना,
नवबौद्ध ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात.
केतकी चितळेवर या विधानाबाबत गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती मिळते. मात्र केतकी चितळे किती अपुऱ्या माहितीवर बोलते हे सांगण्यासाठीच हा लेख.
मुंबईत ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर संपुर्ण भारतभरातून नवबौद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी येत असतात. या दिवशी मुंबईत मोठ्ठी गर्दी असते. विशेषत: दादर सारखा भाग गर्दीने ओसंडून वहात असतो. मात्र जेव्हा कधी दलित समाजाला टार्गेट करण्याची वेळ येते तेव्हा दोन गोष्टींवरुन हमखास टिका केली जाते.
१) दलित समाज या दिवशी या ठिकाणी फुकटात येतो.
२) दादर परिसर पुर्णपणे गलिच्छ करतो. ही घाण काढता येत नाही.
पैकी आपण पहिल्या विधानाकडे डोळे उघडून पाहू.
केतकी चितळेंच्या मांडणीनुसार जायचे झाल्यास व इतर गोष्टींसोबत तुलना करायची झाल्यास,
कोणत्याही धार्मिक उत्सवावेळी जसे की एखाद्या गावच्या यात्रेजत्रे पासून ते पंढरपूरची वारी, कुंभमेळा अशा ठिकाणी भेट देणाऱ्या लोकांची गर्दी वाढत असते. अशा वेळी प्रशासनावर सुरक्षतेतेचा मोठ्ठा ताण निर्माण होत असतो. अशा वेळी नेमके कोणी तिकट काढले आहे आणि कोणी नाही याची माहिती मिळू शकत नाही. लोक गर्दीत येतात म्हणजे फुकट येतात हे समीकरण मांडण्यात येते. कमीअधिक प्रमाणात हे सर्वच ठिकाणी आहे.
मात्र त्यासाठी खालील बातमी अवश्य वाचायला हवी,
या बातमीतून माहिती मिळते की एकाच दिवशी म्हणजे महापरिनिर्वाण दिनादिवशी रेल्वेचा महसूल सात कोटी रुपयांनी वाढला. चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखोंच्या गर्दीने काढलेल्या तिकीटाची ही आकडेवारी आहे.
भीमसैनिकांनी भरला रेल्वेचा खिसा; महापरिनिर्वाण दिनी रेल्वेला तब्बल 7 कोटींचा नफा
रेल्वे विभाग, प्रशासन देखील अधिकच्या गाड्यांची सोय करत असते. तुलनात्मक पहायचे झाल्यास कुंभमेळ्यासारख्या गोष्टींना केंद्रसरकार जे पॅकेज जाहीर करते त्याहून खूप कमी खर्च प्रशासनाला चैत्यभूमीवरील सुरक्षेसाठी येत असतो.
दूसरी गोष्ट म्हणजे,
दादर परिसरात होणारी घाण.
६ डिसेंबर रोजी दादर परिसरात मोठ्या प्रमाणात घाण होते. हे नवबौद्ध इथे येतात आणि घाण करतात. अशा आशयाची टिका हमखास चालू असते. पण आपण कधी विचार केला आहात का ही घाण कोण उचलतो, कोण साफ करतो.
मुंबई महानगपालिकचे स्वच्छता कर्मचारी ही घाण साफ करतात. मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा जातीचा आढावा घेतल्यास बहुतांश म्हणजे ९० % हून अधिक कर्मचारी हे नवबौद्ध, दलित समाजातून येतात. हेच लोकं त्याच रात्री कामाला सुरवात करुन सकाळपर्यन्त रस्ते चकाचक करता.
आणि हेच कर्मचारी गणपतीच्या मिरवणूकीपासून ते मोहरमच्या मिरवणूकीनंतर निर्माण झालेला कचरा साफ करतात.
मुंबईचा कचरा उचलण्यापासून गटारीत शिरून तुंबलेला मैला काढण्याचं काम वर्षांनुवर्षे दलित समाजील लोक करतात हे वास्तव आहे. यासाठी आपण हा व्हिडीओ जरूर पहावा.
मनुस्मृतीप्रमाणे,
दलिताहून अधिक खालचा वर्ग हा महिला आहेत.
केतकी चितळे ही एक महिला आहे. आपल्या फेसबुक पोस्टमधून हिंदूत्वाची मांडणी करत असताना ती चुकते. कारण मनुस्मृतीचा विचार करायचा झाला तर महिलांना शिक्षण घेण्याची सुद्धा शिक्षा देण्यात आली आहे. मात्र ती ज्या नवबौद्ध समाज व डॉ. बाबासाहेबांप्रती विखारी मानसिकतेतून बोलते त्यासाठी काही गोष्टी मुद्दामहून सांगाव्या लागतात,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांसाठीचे कार्य :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, मी कोणत्याही समाजाची उन्नती झाली हे तेव्हाच गृहीत धरु शकतो जेव्हा त्या समाजातील महिलांची उन्नती झाली. विकास झाला. १९१३ साली न्यूयार्क येथे झालेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आई वडिल मुलांना जन्म देता. आई मुलाच्या आयुष्याला योग्य वळण देवू शकते. पण आपण मुलांच्यासोबत मुलिंना शिक्षित करायला हवं.
महिलांच्या शिक्षणावर डॉ. बाबासाहेबांनी नेहमीच जोर दिला. १९१८ साली साऊथ बोरो समितीपुढे महिलांना छोट्या व लघुउद्योगात काम देण्यास सुरवात करावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्याच सोबत महिलांना प्रसुतीकाळात रजा देण्याची त्यांनीच केली होती व ब्रिटीश सरकारने त्या दृष्टीने हालचाल सुरू केली. संपत्तीचा अधिकार, स्वत:च्या इच्छेने विवाह, घटस्फोट, बहुपत्नित्त्व यांसारख्या गोष्टींवर हातोडा चालवला गेला तो हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून.
त्यामुळे मित्रांनो कोणत्याही जाती / धर्मावरून टिका करुन फूट पाडण्याची कामे करु नका. अपुऱ्या माहितीवर तर नकोच नको. त्यापेक्षा अभ्यास करा माहिती घ्या आणि समाज जोडण्याच काम करा. समाजाला एकमेकांपासून तोंडणारे अनेकजण आहेत पण फक्त भारतीय म्हणून एकत्र आणणारे खूप कमी आहेत.
हे ही वाच भिडू.
- शाहू महाराजांनी हॉटेल काढून दिलेल्या गंगाराम कांबळेच पुढं काय झालं?
- भारतातील पहिला हॉमिओपॅथीचा सार्वजनिक दवाखाना शाहू महाराजांमुळे सुरू झाला.
- आंबेडकर म्हणाले ,श्रीधर टिळक हाच खरा लोकमान्य.