शार्क टँकमध्ये आश्वासन देण्यात आलेल्या ६०% स्टार्टअप्सना फंडिंगच मिळालेलं नाही

शार्क टँक इंडिया हा शो त्याच्या पहिल्या सिझनच्या वेळेसच खूप चर्चेत आला होता. कारण या शोचा फॉर्मेट खूप वेगळा होता. त्यामुळे लोकांनी त्याला कमी वेळातच पसंती दिली. लोकांच्या स्टार्टअपच्या नवीन नवीन आणि युनिक आयडियाज आणि शार्क टँकचे जज कोणत्या व्यवसायात पैसे गुंतवतात हे सगळं खूप इंटरेस्टिंग होतं. त्यामुळे शोचा टीआरपी सुद्धा हाय होता. त्यामुळे लगोलग त्याचे दोन सिझन्स येऊन गेले आणि काही दिवसांपूर्वी त्याच्या तिसऱ्या सीझनची सुद्धा घोषणा झाली आहे.

पण आता शार्क टँकवर आरोप होत आहेत की, शार्क टँक सिझन वनच्या वेळेस जजेसने ६५ स्टार्टअप्सना गुंतवणुकीचं आश्वासन दिलं होतं.

पण त्यापैकी फक्त २७ स्टार्टअप्स मध्ये गुंतवणूक झाली आहे. एक वर्ष उलटूनसुद्धा ही गुंतवणूक पूर्ण झाली नाहीये. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आणि यावर शार्क टँकच्या जजेसचं काय म्हणन आहे हे जाणून घेऊ.

शार्क टँक हा एक रिअ‍ॅलिटी टेलिव्हिजन शो आहे जिथे उद्योजक त्यांची स्टार्ट अप आयडिया शार्क टँकच्या जजेस म्हणजे गुंतवणूकदारांच्या पॅनेलसमोर मांडतात आणि जर ते बिजनेस मॉडेल शार्क्स म्हणजे जजेसना आवडलं तर ते त्यात गुंतवणूक करण्याचं आश्वासन करतात. या सगळ्या गुंतवणुकीचं डेटा फाइलिंग कॉर्पोरेट अफेयर्सच्या मिनिस्ट्री मध्ये असतं. त्यात शार्क टँकच्या गुंतवणुकीचा सगळा डेटा १२ जुलै २०२३ पर्यंत अपडेटेड आहे. याच फाइलिंगचं विश्लेषण डेटा प्रायव्हेट सर्कल रिसर्च या खाजगी मार्केट इंटेलिजन्स फर्मने केलं आहे. 

या विश्लेषणानुसार एकंदरीत शार्क टँक सीझन वनमध्ये एकूण ११७ स्टार्टअप्सनी भाग घेतला होता त्यापैकी ६५ स्टार्टअप्सना डील कमिटमेंट मिळाल्या होत्या.

 प्रायव्हेट सर्कल रिसर्चने दिलेल्या अहवालानुसार एकूण ६५ स्टार्टअप्सना ४० कोटींची गुंतवणूक करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं पण फक्त २७ स्टार्टअप्स मध्ये १७ कोटींची गुंतवणूक झाली आहे. हा अहवाल आहे १२ जुलै २०२३ पर्यंतचा आणि शार्क टँकचा पहिला सिझन संपला होता ४ फेब्रुवारी २०२२ ला. म्हणजे १ वर्ष उलटूनसुद्धा आजवर ३८ स्टार्टअप्सना त्यांची गुंतवणूक मिळाली नाहीये.     

भारत पेचे संस्थापक अश्नीर ग्रोव्हर , लेन्सकार्टचे संस्थापक पीयूष बन्सल, शादी डॉट कॉमचे संस्थापक अनुपम मित्तल, boAt चे संस्थापक अमन गुप्ता , मामाअर्थच्या संस्थापक गझल अलघ, शुगर कॉस्मेटिक्सच्या संस्थापक विनीता सिंग आणि एमक्यूर फार्मास्युटिकल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमिता थापर हे पहिल्या सिझनचे गुंतवणूकदार होते. 

प्रायव्हेट सर्कल रिसर्चच्या अहवालानुसार शार्क टँकच्या सात गुंतवणूकदारांपैकी गुंतवणूक पूर्ण करणाऱ्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, नमिता थापर. 

नमिता थापर यांनी एकूण २२ कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं होतं, त्यापैकी १३ कंपन्यांची गुंवणूक नमिता थापर यांनी पूर्ण केली आहे. म्हणजे नमिता थापर यांनी त्यांच्या गुंतवणुकीपैकी ५९% गुंवणूक पूर्ण केली आहे त्यांच्या खालोखाल आहेत मामाअर्थच्या गझल अलघ. पण त्या फक्त काही एपिसोडसाठी शार्क टँकमध्ये आल्या होत्या. त्यांनीसुद्धा सात कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं आणि चार कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. म्हणजे एकूण ५७% गुंतवणूक निधी त्यांनी कंपन्यांना दिला आहे. 

तिसऱ्या क्रमांकावर असलेले अमन गुप्ता यांनी २८ कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं होतं, पण त्यापैकी १२ कंपन्यांमध्येच त्यांनी गुंतवणूक केली आहे. म्हणजे एकूण ४३% गुंतवणूक अमन गुप्ता यांनी केली आहे. त्यांच्या खालोखाल विनिता सिंग यांनी कबूल केलेल्या १५ पैकी ६ कंपन्यांना गुंतवणुकीचा निधी दिला आहे. 

तर अन्शीर ग्रोव्हरने कबूल केलेल्या २१ कंपन्यांपैकी ८ कंपन्यांना गुंतवणुकीचा निधी दिला आहे असं प्रायव्हेट सर्कल रिसर्चच्या अहवालात आहे. 

अन्शीर ग्रोव्हर नंतर नंबर लागतो तो पियुष बन्सल यांचा. पियुष बन्सल यांनी २७ कंपन्यांना गुंतवणूक देण्याचं कबूल केलं पण फक्त ९ कंपन्यांना त्यांचा निधी पोहोचला आहे. पण अनुपम मित्तल यांनी पूर्ण शोमध्ये सर्वात कमी गुंतवणूक केली होती. त्यांनी एकूण २४ कंपन्यांमध्ये गुंवणूक करणार असल्याचं सांगितलं होतं पण २४ कंपन्यांपैकी फक्त ७ कंपन्यांना त्यांची गुंतवणूक मिळाली आहे. यावरून हे लक्षात येतं की, पहिल्या सिझनमध्ये कोणीच वचनबद्ध गुंतवणूक पूर्ण केलेली नाही. यावरून हे लक्षात येतं की, शार्क टँकच्या तिसऱ्या सीझनची सुद्धा घोषणा झाली आहे तरी अजून पहिल्या सिझन्सच्या गुंतवणुकी पूर्ण झालेल्या नाहीत. 

या पूर्ण अहवालावरून प्रायव्हेट सर्कलचे प्रमुख आर्थिक विश्लेषक सुमंजक कुमार म्हणाले की, शार्क्सनी स्टार्टअप मध्ये केलेल्या कष्टावरून त्यांना गुंतवणूक कबूल केली असेलच पण त्याहून जास्त गुंतवणूक ही शार्क्सच्या आपापसातल्या चढाओढीसाठी झाली असावी. 

पण प्रायव्हेट सर्कल रिसर्चचा अहवाल अन्शीर ग्रोव्हर यांनी खोडून काढला आहे. त्यांनी ट्वीट करत सांगितलं आहे की, त्यांनी २१ पैकी ११ कंपन्यांना गुंतवणूक निधी दिला आहे. त्यामुळे नमिता थापर नंतर दुसऱ्या क्रमांकावर मीच आहे. या सोबत त्यांनी ११ कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा पुरावा सुद्धा जोडला आहे. सोबतच अन्शीर ग्रोव्हर बाकीच्या शार्क्सना असंही म्हणाले की, जर गुंतवणूक वेळेवर देता येत नाही तर त्यांनी स्वतःला शार्क नाही डॉल्फिन म्हणावं. कोणतीही गुंतवणूक ही स्पर्धक कंपन्यांना २-३ महिन्यांमध्ये मिळायला हवी असंही अन्शीर ग्रोव्हरने सांगितलं.

शार्क टँकच्या पहिल्या सिझनच्या एका स्पर्धकाने सांगितलं आहे की, गुंतवणुकीच्या निधीचा व्यवहार पूर्ण होण्यासाठी २ ते ३ महिने लागतात. 

पण काही शार्क्स यासाठी मुद्दामून वेळ लावतात. कधी यांची कायदेशीर टीम फोन उचलत नाही, तर कधी यांना अजून कागदपत्रांची गरज लागते. आणि कधी फोन उचलला तर सुट्टीवर आहोत किंवा इयर एंड चालू आहे अशी कारणं देतात. काही स्पर्धक सांगतात की, ते अजूनही शार्क्सच्या अंतिम उत्तराची वाट बघतायत तर काही स्पर्धकांनी आता शार्क्सच्या कंपनी मधून त्यांना काही गुंतवणूक मिळेल ही आशाच सोडली आहे. 

पण शार्क टँकचे एक जज म्हणजे बोट कंपनीचे को फाउंडर अमन गुप्ता यांनी तर स्पष्ट सांगितलं की, गुंतवणुकीचा निधी सहजा सहजी मिळत नाही. 

आम्ही हे पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत केली आहे त्यामुळे ते असेच देता येणार नाहीत. त्यासाठी काही प्रोसेस असतात त्या पूर्ण कराव्या लागतात आणि या प्रोसेस साठी एवढा वेळ लागू शकतो. तसच अनुपम मित्तल यांनी सुद्धा यासंदर्भात लिंक्डइन वर सांगितलं होतं की, शार्क टँकमध्ये मंजूर गुंतवणुकीचा करार पूर्ण होण्यासाठी तीन ते नऊ महिने लागू शकतात असं सांगितलं. पण आता नऊ महिन्यांपेक्षाही जास्त महिने झाले आहेत तरी ही परिस्थिती आहे 

थोडक्यात काय तर कोणताही रियालिटी शो असो त्यात थोडाफार ड्रामा हा झालाच पाहिजे. त्याशिवाय तो रियालिटी शो गाजत नाही. यावर तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या प्रकरणामुळे शार्क टँकचा तिसरा सिझन बाकीच्या दोन सिझनप्रमाणे यशस्वी होईल का?

हे ही वाच भिडू :

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.