फेमस सगळेच होतात ओ, ‘शार्क टॅंक’मधून खरी चांदी झाली ती या ५ जणांची…

बिझनेस करावा असं कुणाला वाटत नसतंय ओ ? लोकल किंवा बसमधून गर्दीच्या वेळी फिरा, ऑफिसला जाणारी पोरं ‘हा एवढाच महिना पुढच्या महिन्यात बिजनेस सुरु’ यावर बोलत असतात, तर थकून भागून येणारी लोकं ‘बिझनेस केला असता तर ?’ या चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवतात. बिझनेसचं गणित कुठं अडतं, तर डेरींग, शिस्त आणि फंडिंग.

फंडिंग वरुन विषय सरकतो, शार्क टॅंकवर.

याचा पहिला सिझन आला होता, तेव्हाच शो ची मजबूत हवा झाली होती. लय लोकांना फंडिंग मिळालं, लय भारी भारी स्टोऱ्या पुढं आल्या. काही फेल प्लॅनही बघायला मिळाले, पण पहिल्या सिझनमध्ये कुठली गोष्ट सगळ्यात जास्त चर्चेत राहिली तर ‘ये सब दोगलापन है’ असं म्हणणारा अशनीर ग्रोव्हर.

दुसऱ्या सिझनला अशनीर नाही याची बरीच चर्चा झाली, पण खुंखार आयडियांमुळं शार्क टॅंकचा हा सिझनही चर्चेत आला. पण चर्चा, मिम्स, गप्पा या पलीकडे प्रत्यक्षात त्या कार्यकर्त्यांसोबत काय घडतंय हे सुद्धा महत्त्वाचं असतंय. म्हणून म्हणलं शार्क टॅंक मुळं ज्यांच्या बिझनेसची चांदी झाली अशा ५ भिडूंबद्दल सांगावं.

पहिलं नाव येतंय, ब्रेनवायर्डचं

एकतर यांनी दणका उडवून दिला होता, तोच एका नाही तर चार शार्क्सला इम्प्रेस करुन. पियुष बन्सल, नमिता थापर, अमन गुप्ता आणि अशनीर ग्रोव्हर हे चौघ जण त्यांच्या कामामुळं इम्प्रेस झाले होते. श्रीशंकर नायर आणि रोमियो जेरार्ड या दोघांनी ब्रेनवायर्ड या ऍग्रोटेक कंपनीचं पिच दिलं होतं. प्राण्यांच्या आरोग्यावर, हालचालीवर देखरेख ठेवण्यासाठीची उपकरणं या कंपनीनं बनवली. तेही स्वस्तात. यांना शार्क टॅंकमधून फंडिंग मिळालं ६० लाख आणि त्याबदल्यात कंपनीत १० टक्के वाटा.

पण या गुंतवणुकीचा आणि शार्क टॅंक मधून मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा असा झाला की त्यांचा मंथली सेल ३५ लाखापर्यंत पोहोचलाय आणि आता परदेशात एक्स्पोर्ट करायलाही सुरुवात होतीये.

दुसरी कंपनी आहे, स्किपी आईस पॉप्स

कुठल्या मॉलमध्ये हा ब्रँड दिसला की, हमखास शार्क टॅंकची आठवण होते कारण हा ब्रँड ठिकठिकाणी पोहोचण्यात शार्क टॅंकचाच मोठा वाटा होता. आपण ज्यांना पेप्सी कोला म्हणायचो, तेच आईस पॉप्स या कंपनीनं थाटात ब्रॅण्डिंग करुन पुढं आणले. त्यात यांचा विषय असा होता की एक, दोन किंवा चार नाही तर सगळ्याच शार्क्सनं त्यांना फंडिंग केलं. १५ टक्के इक्विटीच्या बदल्यात त्यांना मिळाले, १.२ कोटी रुपये.

आजच्या घडीला त्यांचा सेल पोहोचलाय, महिन्याला २ कोटी रुपयांपर्यंत आणि ऑनलाईन ऑर्डर म्हणालात तर २० हजार.

त्यांची डिटेल स्टोरी वाचायची असेल, तर खाली लिंक देतोय.

अशनीरने पैसे लावलेली अजून एक कंपनी 40 पटीने वाढलीये…

तिसरं नाव येतं, गेट ए व्हे

आई आणि मुलाच्या जोडीनं शार्क टॅंकमध्ये यावंमी कौतुक आणि फंडिंग दोन्ही मिळवावं हे या सिझनला ‘पाटीलकाकी’ या ब्रँडमुळं पाहायला मिळालं. पण पहिल्या सिझनला जिमी आणि जश शहा या जोडीनं ती कमाल केली होती. जास्त प्रोटीन, कमी कॅलरीज आणि शून्य साखर अशी आईसस्क्रीम त्यांनी आणली.

अशनीर, विनिता आणि अमन या तिघांनी मिळून यात १ कोटी लावले, १५ टक्के इक्विटीच्या बदल्यात आणि आज गेट ए व्हेचा सेल १ कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय.

आणखी एका ब्रँडबद्दल बोलायला पाहिजे तो म्हणजे, ऍनि (Annie)

बोलणाऱ्याची माती पण विकली जाते असं म्हणतात, हेच बोलण्याचं स्किल दाखवून दिलं होतं ते ‘थिंकरबेल लॅब्स’च्या प्रथमेश सिन्हानं. विशेष मुलांच्या मदतीसाठी या कंपनीनं बनवलेलं ‘ऍनि’ उपकरण हिट ठरलं. अनुपम, पियुष, नमिता हे तीन शार्क्स एकत्र आले आणि त्यांनी ३ टक्के इक्विटीच्या बदल्यात, १.०५ कोटीचं फंडिंग केलं. विशेष म्हणजे ‘ऍनि’ चं ‘पॉली’ नावाचं अमेरिकन व्हर्जन आहे, ज्याला टाइम मॅगझीनचा वन ऑफ द बेस्ट इन्व्हेन्शन हा पुरस्कार मिळाला. सोबतच कित्येक विशेष मुलांनाही याची मदत झाली.

पाचवं नाव म्हणजे प्रचंड पॉप्युलर झालेला, जुगाडू कमलेश

बॉलिवूडच्या नादापायी सगळं सोडून मुंबई गाठलेलं पोरगं, त्यानं आत्महत्या करायचा प्रयत्न केला त्याची फसवणूकही झाली पण त्यानं कधी हार मानली नाही. शार्क टॅंकमधल्या त्याच्या पिचनं सगळ्यांचीच मनं जिंकली. त्याला पियुष बन्सलकडून १० लाख फन्डिंग आणि २० लाखाचं लोनही मिळालं. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे जुगाडू कमलेशच्या ‘KG ऍग्रोटेक’ कंपनीनं मोठी मजल मारलीये. त्यानं ‘राईज स्टार्ट अप टू युनिकॉर्न’ अवॉर्ड जिंकलं, लोकं त्याची सही घ्यायला गर्दी करतात.

इथं गोष्ट म्हणजे, त्याला पियुष बन्सलनं स्वतः आपल्या लेन्सकार्ट अकादमीमध्ये ट्रेनिंग दिलंय.

थोडक्यात काय, तर शार्क टॅंकच्या पहिल्या सिझनमुळं या पाच जणांची लाईफ चेंज झाली आणि एका रिऍलिटी शोचा सकारात्मक परिणामही दिसून आला.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.