RRR की Kashmir Files वाद नंतरचा, आधी भारतातून ऑस्करसाठी पिक्चर सिलेक्ट व्हायची प्रोसेस बघा

सध्या सोशल मीडियावर एक नवा मुद्दा चर्चेत आलाय, तो म्हणजे भारताकडून ऑस्करला कुठला पिक्चर जाणार ? आता २०२२ च्या आतापर्यंतच्या ८ महिन्यांचं गणित बघायचं म्हणलं, तर बॉलिवूडला बॅकफूटवर ढकलत साऊथच्या पिक्चर्सनं खतरनाक बिझनेस केलाय. आरआरआरनं ११३१ कोटी, केजीएफ-२ नं १२२८ कोटी आणि विक्रमनं ४२४ कोटी मिळवत बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली. यातल्या आरआरआर आणि विक्रमचं समीक्षकांकडून कौतुकही झालं.

दुसऱ्या बाजूला बॉलिवूडचं बॉक्स ऑफिस पाहिलं, तर द काश्मिर फाईल्स ३४० कोटी, भुलभुलैय्या-२ २४० कोटी आणि गंगुबाई काठियावाडी २०९ कोटी असे हिट सिनेमांच्या कमाईचे आकडे आहेत. 

मग भारताकडून ऑस्करला यातला कुठला पिक्चर जाणार ? असा प्रश्न पडतो. पण ऑस्करला जायचे निकष कमाईवरुन असते, तर बाहुबली पाठवला असता की, त्यामुळं प्रश्न पडतो की भारतातून ऑस्करसाठी पिक्चर कसा सिलेक्ट होतो ?

सगळी प्रोसेस उलगडून सांगतो, निवांत वाचा.

आधी हे माहीत करुन घेऊ की अजून ऑस्करला टाईमला असला तरी भारतात आत्ताच हा मुद्दा चर्चेत का आलाय ? तर त्याचं झालं असं, अनुराग कश्यपचा नवा पिक्चर येतोय. त्याच्या प्रमोशनच्या वेळेस त्यानं एक अंदाज लावला, भारताकडून कोणता पिक्चर ऑस्करसाठी सिलेक्ट होईल याबद्दलचा.

अनुराग म्हणाला, ‘भारताकडून ऑस्करसाठी आरआरआर सिलेक्ट झाला, तर मला खात्री आहे की अकादमी अवॉर्ड्सच्या टॉप फाईव्हमध्ये त्याला नॉमिनेशन मिळेल. आरआरआरला इतिहास रचण्याची संधी आहे कारण हॉलिवूडच्या फिल्ममेकर्समध्ये आणि अमेरिकेत आरआरआरनं क्रेझ निर्माण केली आहे. तिकडच्या लोकांसाठी हा पिक्चर, यातले ऍक्शन आणि डान्स सिक्वेन्स हे मार्वलच्या सिनेमासारखे आहेत. त्यामुळं जर भारताकडून ऑस्करसाठी निवड झाली, तर आरआरला नॉमिनेशन मिळण्याचे ९९ टक्के चान्सेस आहेत.’

इथवरच्या त्याच्या वक्तव्यामुळं राडा व्हायचा काहीच विषय नव्हता, पण त्यानंतर तो म्हणाला, ‘मला माहीत नाही की कोणता पिक्चर सिलेक्ट होईल, फक्त तो काश्मीर फाईल्स नसावा.’ 

झालं, ठिणगी पडली. काश्मीर फाईल्सच्या फॅन्सनं अनुरागला ट्रोल करायला सुरुवात केली, पण फक्त फॅन्सच नाही तर द काश्मीर फाईल्सचा डायरेक्टर विवेक अग्निहोत्रीनंही अनुरागवर टीका केली. 

‘बॉलिवूडच्या दृष्ट लोकांनी काश्मीर फाईल्स ऑस्करला जाऊ नये यासाठी लॉबी उघडली आहे, तेही दोबारा पिक्चर बनवणाऱ्याच्या नेतृत्वात.’ अशा आशयाचं ट्विट विवेक अग्निहोत्रीनं केलं.

या दोघांमध्ये वाद, कुणाचं तरी ट्रोलिंग या गोष्टी सुरुच राहतील आणि आरआरआर, काश्मीर फाईल्स किंवा वेगळाच कुठला तरी पिक्चर भारताकडून ऑस्करसाठी सिलेक्ट होईल. 

त्यामुळं हे माहिती असणं महत्त्वाचं आहे, की भारताकडून ऑस्करला पाठवला जाणारा पिक्चर कशाच्या आधारे सिलेक्ट होतो ? आणि सिलेक्ट करणारे कार्यकर्ते असतात तरी कोण ?

भारताकडून ऑस्करसाठी जे पिक्चर जातात ते येतात ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म’च्या अंतर्गत. त्यामुळं त्यांची स्पर्धा बऱ्याचदा साऊथ कोरिया, स्पेन, फ्रान्समधल्या पिक्चर्ससोबत असते. भारताचा कोणता पिक्चर ऑस्करला जाणार हे ठरवण्याची जबाबदारी फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एफएफआयवर असते.

आता समजा तुम्ही एखादा पिक्चर काढलाय आणि तुम्हाला वाटतंय की हा पिक्चर लई वांड झालाय फिक्स ऑस्कर मारेल, तर तुम्हीही सिलेक्शनसाठी हा पिक्चर एफएफआयकडे पाठवू शकताय. फक्त त्याच्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते.

एकतर ठरवून दिलेल्या तारखेआधी पिक्चर भारतात थिएटरमध्ये रिलीझ झालेला असायला हवा. सोबतच तो निदान आठवडाभर चाललेला असावा. जर पिक्चर भारतात रिलीझ झाला नसेल आणि तरी ऑस्करला पाठवायचा असेल तर पिक्चर लॉस एंजेलिसमध्ये रिलीझ करणं मस्ट असतंय. भारतात पिक्चर रिलीझ केलेला निर्माता एफएफआयला आपला पिक्चर पाठवू शकतो, मात्र त्यासाठी त्याला सेन्सॉर बोर्डचं सर्टिफिकेट, पिक्चरचा जीएसटी नंबर, कास्ट आणि क्रूची लिस्ट अशा सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजे ७० हजार अधिक १८ टक्के जीएसटी अशी जवळपास ८३ हजार रुपयांचं डिपॉझिट निर्मात्याला भरावं लागतं. तुमचा पिक्चर सिलेक्ट नाही झाला तरी हे पैसे काय परत मिळत नाहीत. 

त्यामुळं अनेक निर्माते बजेटच्या मुद्द्यामुळं आपला पिक्चर एफएफआयकडं पाठवत नाहीत, कुंभलंगी नाईट्स समीक्षकांनी गौरवला आणि भारी पिक्चर म्हणून नावाजालाही गेला, मात्र ऑस्करच्या शर्यतीत आला नाही कारण निर्मात्यांनी एफएफआयकडे हा पिक्चर पाठवलाच नव्हता.

देशभरातून साधारण २५ ते ३० पिक्चर एफएफआयकडे येतात, मग त्यांचं स्क्रीनिंग करण्यात येतं. हे स्क्रीनिंग बघण्यासाठी एफएफआय १५ जणांची कमिटी नेमते, यातली बहुतांश लोकं ही चित्रपटसृष्टीशी संबंधित असतात. म्हणजे काही अनुभवी डायरेक्टर्स, प्रोड्युसर्स असतात. 

मग हे कमिटी मेम्बर्स या २५ ते ३० पिक्चर्समधून एक पिक्चर सिलेक्ट करतात, जो भारताकडून ऑस्करला पाठवला जातो.

पण यात बॉक्स ऑफिसवरची कमाई, अभिनेत्याचं वलय या गोष्टी फारसा प्रभाव पडत नाहीत.

 एफएफआयच्या कमिटी मेम्बर्सकडून असं सांगण्यात येतं की, ‘अमेरिकेत जवळपास साडेसहा हजार ज्युरी मेम्बर्स हा पिक्चर बघतात आणि त्यानंतर पिक्चर नॉमिनेशनमध्ये येणार की नाही हे ठरतं. त्यामुळं अमेरिकेतल्या लोकांना आवडेल की नाही ? त्यांना पिक्चर रिलेट होईल का ? या गोष्टींचा विचार केला जातो. तिथं भारतातली झोपडपट्टी, गरिबी याबद्दल आकर्षण आहे. त्यामुळंच स्लमडॉग मिलेनिअर आणि गली बॉयला भारताकडून झुकतं माप मिळालं होतं.’

आता यंदा आणखी कुठले पिक्चर शर्यतीत येतात, कमिटीला नेमकं काय आवडतं यावरुनच भारताकडून बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्मसाठी आरआरआर जाणार, काश्मीर फाईल्स जाणार की दुसरा कुठला पिक्चर हे ठरणार आहे…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.