भीमसेनजी ते लतादीदींना एकत्र आणत, अशोक पत्कींनी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ गाणं असं बनवलं होतं…

राष्ट्रगीतानंतर ज्या गीताला अफाट लोकप्रियता लाभली ते गीत म्हणजे ‘मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा.’ १५ ऑगस्ट १९८८ रोजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण व भाषण केल्यावर लगेचच याचे प्रक्षेपण पहिल्यांदा दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून करण्यात आले आणि तमाम भारतीयांनी त्याचे उत्साहात स्वागत केले.

लोक सेवा संचार परीषद द्वारा निर्मित या गीताच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा होता संगीतकार अशोक पत्की यांचा! 

या गीताच्या निर्मितीची कथा त्यांनी आपल्या पुस्तकातून अतिशय सुरेलप्रमाणे मांडली आहे.पत्की जिंगल्सचे बादशहा आहेत. या गीताच्या सुरूवातीच्या दोनच ओळी त्यांच्याकडे आल्या. पत्कींच्या हातात कागद आला की, दुसर्‍या क्षणापासून त्यांच्या मनात चाल सुचायला सुरूवात होते. या दोन ओळींना त्यांनी पहिली चाल यमन रागात, दुसरी भीमपलासमध्ये आणि तिसरी भैरवीमध्ये लावली. 

या तिन्ही चाली त्यांनी टिममधील सर्वांना ऐकवल्या. भैरवीची चाल सर्वांना आवडली. या ओळींच्या पुढे बारा-तेरा भाषातल्या स्क्रिप्ट मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत या गीताचा प्रवास होणार होता. सुरूवातीच्या ओळी पंडीत भीमसेन जोशी गाणार होते. 

ध्वनीमुद्रणाच्या वेळी या ओळींकरीता दिलेल्या ४५ सेंकदात काही केल्या रेकोर्डिंगचे गणित जमत नव्हतं. गायला सुरूवात करा म्हटल्यावर पत्की पंडीतजींना खूण करायचे पंडीतजी तंबोरा वाजविणार्‍यांना खूण करायचे यामुळे वेळ वाढत होता. पंडीतजींचही बरोबर होतं सूर मिळाल्याशिवाय ते गाणार कसे? 

शेवटी पत्की रेकॉर्डीस्ट सूद यांना म्हणाले “त्यांना त्यांच्या पध्दतीने गाऊ दे आपण एडीट नंतर करूत.” हि मात्रा लागू पडली. पंडितजींचा भारदस्त आवाज, सुंदर चाल, नाना मुळेंचा तबला.. सगळं जमून आलं होतं.

त्यानंतर काश्मिरी भाषेचा सुपरवायझर आला. तोच लेखक आणि तोच गाणार होता. प्रोड्युसर मलिकचा एकच आग्रह होता- ‘मीटर बदललं तरी चालेल, पण ऐकताना ‘मिले सूर’ची ओरिजिनल सुरावट ऐकतोय असं वाटायला हवं.’

या वेळी एक अडचण आली कश्मीरी भाषेच्या रेकॉडींगच्या वेळी नेमकं संतूर हे वाद्य नव्हतं. साइड र्‍हिदम-प्लेअर दीपक बोरकर यांच्याकडील हार्पवरच संतूरचा इफेक्ट मिळविला! 

कविता कृष्णमूर्ती व पंकज मित्रा यांच्या आवाजात बंगालीतला पोर्शन केला. प्रत्येक भाषेसाठी ठराविक सेकंद मिळाले होते त्यात ते संपवण गरजेचं होतं. भारतातील विविध प्रांताच्या संस्कृतीचा फील तिथे येणं आवश्यक असल्याने पत्की विशेष मेहनत घेत होते. तामीळ, तेलगू, मल्याळम्, कन्नड, मराठी  भाषांतील गाण्यांसाठी आणि सुपरव्हायजर म्हणून ती-ती माणसं हजरच होती. रघू व कुरुविला अशी दोन गायक मंडळी व एम. पी. शर्मा, नानप्पन व बाकी भाषेवर प्रभुत्व असणारी मंडळी तिथे उपस्थित होती.

या गीताची सुरूवात भीमसेनजींच्या स्वरात झाली असल्याने शेवट देखील (सूर की नदीया) तितक्याच शाही स्वरात होण्यासाठी सूरश्री लता मंगेशकर यांच्याशी संपर्क साधला. लता दिदी नेमक्या त्याचवेळी परदेशात असल्याने कविता कृष्णमूर्तीच्या स्वरात रेकॉर्ड केलं गेलं. कारण या गीताच्या व्हीडीओ चित्रीकरणाच्या तारखा ठरल्या होत्या. काही दिवसांनी लताने त्या गीताचे डबींग केले. त्याच दिवशी दीदींचं शूटिंगही वेस्टर्न आऊटडोअरमध्ये केलं. लुईस बॅंक्स यांनी हे सारे सूरांचे तुकडे एकत्र गुंफले.

हा राष्ट्रीय एकात्मतेचा व्हिडीओ फार सुंदर बनला होता. आज तीस वर्षाचा कालावधी उलटला तरी या गीताची खुमारी काही कमी होत नाही. पत्की यांचे हे खऱ्या अर्थाने हिमालयन वर्क होतं.

अशोक पत्की यांनी  असंख्य चित्रपटांना दिलेल्या संगीत दिले आहे. काही चित्रपटांचा इथे उल्लेख करता येईल- आम्ही असो लाडके, आलिशा, अंतर्नाद, आनंदाचे झाड, धर्मांगी, बिंधास्त, चिंगी, चिनू, दे टाळी, देबू, धमाल बाबल्या गणप्याची, दुर्गे दुर्घट भारी, एक डाव संसाराचा, एक गाडी बाकी अनाडी, फॉरिनची पाटलीन, गलगले निघाले, गरम मसाला, गुलाम बेगम बादशहा, गोडी गुलाबी, गोष्ट धमाल नाम्याची, हल्लागुल्ला, हेच माझं माहेर, ही पोरगी कुणाची, जमलं रे जमलं, जनता जनार्दन, कथा दोन गणपतरावांची, खबरदार, खुर्चीसम्राट, कीस बाई कीस, कुणासाठी कुणीतरी, लावणी एक तमाशा, मामला पोरीचा, मधुचंद्राची रात, माझा मुलगा, मला एक चान्स हवा, मी सिंधूताई सपकाळ, मिशन चॅम्पियन, मुंबई आमची, नणंद भावजय, नवसाचा पोर, वन रूम किचन, पैजेचा विडा, प्रेम करू या खुल्लमखुल्ला, राणीने डाव जिंकला, आई शपथ, आई पाहिजे, राजाने वाजवला बाजा, रंगत संगत, रानी और जानी, रेशीमगाठ, सरदारी बेगम, सत्त्वपरीक्षा.

अलीकडच्या काळात गाजलेलं ‘ राधा हि बावरी हरीची’ हे स्वप्नील बांदोडकर च्या स्वरातील गीत पत्की काकांनी नुसतं स्वरबध्द केलं नाही तर लिहिलं देखील!

११५ मराठी चित्रपट, २५०च्यावर नाटके, आणि पाच हजारांवर जिंगल्स त्यांच्या नावावर आहेत. आभाळमाया, गोट्या, श्रीमान-श्रीमती, वादळवाट अशा टीव्ही मालिकांनाही त्यांनी संगीत दिले आहे. त्यांची जिंगल्स अतिशय लोकप्रिय झाली आहेत.

धारा धारा… शुद्ध धारा, झंडू बाम, झंडू बाम वेदनाहारी बाम ही आणि अशी काही त्यांची जिंगल्स चित्रपटांच्या गाण्यांसारखी आपल्या तोंडपाठ झाली आहेत. 

प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची गोष्ट’ मधील ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’चा गोडवा काय वर्णावा? राष्ट्रीय साक्षरता मिशन करीता त्यांनी बनवलेलं ‘पूरब से सूर्य उगा….’ अतिशय सुरेल झालं होतं.

जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा आज वाढदिवस. आज पत्की काका ८१ वर्षांचे झाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्ताने ‘बोल भिडू’ परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा आणि अभीष्टचिंतन.

  • भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.