मैदानावरचा इतिहास सांगतो, नागिन डान्स केल्यावर बांगलादेशची टीम फिक्स तोंडावर पडते…

चमिका करुणारत्ने हे नाव कदाचित ऐकलंही नसेल. हा गडी श्रीलंकेकडून खेळतो एवढीच जुजबी माहिती आपल्याला त्याच्यबद्दल असते. पण गुरुवारच्या मॅचनंतर एशिया कप बघणारा कुठलाच क्रिकेट फॅन चमिका करुणारत्नेला विसरु शकत नाही. मॅचमध्ये त्यानं २ विकेट्स आणि १६ रन्स एवढंच योगदान दिलं, कुठला आयकॉनिक शॉट वैगेरेही खेळला नाही.

तरीही करुणारत्ने हिट झाला कारण त्याचं सेलिब्रेशन.

भारत पाकिस्तानमध्ये झाला नसेल, तसला राडा श्रीलंका-बांगलादेशच्या मॅच आधी झाला. बांगलादेशच्या क्रिकेट डायरेक्टरनं श्रीलंकन टीमची थेट मापं काढली. ‘त्यांच्यात कुणी वर्ल्ड क्लास बॉलर्स नाहीत’ असलं स्टेटमेंट करत थेट त्यांच्या क्षमतेवरच बोट ठेवलं.

मग श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धनेनं कुणात किती ताकद आहे, हे मैदानात दाखवूयात असं स्टेटमेन्ट केलं. थोडक्यात परफेक्ट वातावरण तयार झालं  होतं.

मैदानाबाहेरचं वातावरण जसं तापलं होतं, मॅचही अगदी तशीच झाली. बांगलादेशनं पहिली बॅटिंग करत १८३ रन्स केले, श्रीलंकेच्या इनिंगमध्ये मॅच अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये गेली. ८ रन्स हवे असताना असिथा फर्नांड़ो आणि महिष तीक्षाना या जोडीनं तीन बॉलमध्येच विषय एन्ड करुन टाकला, त्यात तिसरा बॉल नेमका नो बॉल पडला होता.

जशी श्रीलंकेने मॅच जिंकली तसा ड्रेसिंग रुममधला चमिका करुणारत्ने उठला आणि भावानं नागीन डान्स करायला सुरुवात केली. हरलेल्या बांगलादेशला चिडवणारा त्याचा हा डान्स बघून, एकच गोष्ट आठवली ती म्हणजे जेव्हा जेव्हा बांगलादेशची टीम समोरच्या टीमला उचकवते तेव्हा तेव्हा फिक्स तोंडावर पडते.

या नागीन डान्सच्या परंपरेची सुरुवातच बांगलादेश विरुद्ध श्रीलंका मॅचपासून झाली होती.

पण त्याही आधी २०१६ मध्ये बांगलादेशचा स्पिनर नझमुल इस्लामनं बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये डॅरेन सॅमीची विकेट काढल्यानंतर नागीन डान्स केला होता. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध आपल्या पदार्पणाच्या मॅचमध्येही त्यानं विकेट मिळाल्यावर हाच डान्स रिपीट केला, बरं हा गडी एकटा नव्हता, त्याला विकेटकिपर मुशफिकूर रहीमनंही साथ दिली होती.

काहीच दिवसांनी जेव्हा याच दोन टीम्स आमनेसामने आल्या, तेव्हा श्रीलंकेनं १८ व्या ओव्हरमध्येच मॅच काढली आणि नागीन डान्सचं उत्तर पुंगी वाजवत दिलं. आता हे वाचायला वंगाळ वाटत असलं, तरी बांगलादेश आवडत नसेल तर बघताना फिक्स आनंद व्हायचा.

पण बांगलादेशला नागीन डान्सचा सगळ्यात मोठा पश्चाताप कधी झाला असेल, तर २०१८ च्या निदाहस ट्रॉफीमध्ये…

भारता विरुद्ध फायनल कोण खेळणार याच्या शर्यतीत श्रीलंका आणि बांगलादेश या दोन टीम्स होत्या. बांगलादेशनं त्यादिवशी बाजी मारली, होम ग्राऊंडवर खेळणारी श्रीलंका बाहेर पडली आणि त्यांना उचकवायला म्हणून बांगलादेशनं नागीण डान्स केला. श्रीलंकन खेळाडू आणि मोठ्या संख्येनं मैदानात उपस्थित असलेले श्रीलंकन चाहते दोघांच्याही माना खाली गेल्या.

फायनलला बांगलादेशची टीम भिडली भारताला. आता श्रीलंका फायनलला नसली तरी भारताला सपोर्ट करण्यासाठी म्हणून श्रीलंकन चाहत्यांनी स्टेडियममध्ये खच्चून गर्दी केली होती. भारत मॅच सहज मारेल असं वाटत होतं, मात्र शेवटच्या ओव्हर्समध्ये डाव जरा रंगला. मात्र दिनेश कार्तिकनं सुट्टी न देता बांगलादेशच्या घशातला घास ओढून काढला आणि भारतानं मॅच मारली.

बरं ही मॅच सुरू असताना कमेंट्री बॉक्समध्ये असणाऱ्या सुनील गावसकरनं नागीन डान्स केला होता, तर मॅचचा रिझल्ट लागल्यावर श्रीलंकन चाहत्यांनी आपला बदला पूर्ण केला.

तसं २०१६ च्या वर्ल्डकपमध्येही शेवटच्या ओव्हरला बांगलादेशनं मॅच जिंकायच्या आधी सेलिब्रेशन केलं होतं, त्यानंतर हार्दिक पंड्याची बॉलिंग आणि धोनीच्या किपींगपेक्षाही जास्त लक्षात हरलेल्या बांगलादेशी फॅन्सचे दुःखी चेहरे राहिलेत.

पण भारत आणि श्रीलंकेपेक्षा बांगलादेशला मोठा हिसका कुणी दिला असेल, तर अफगाणिस्ताननं…

२०१८ मध्येच बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान अशी ३ टी२० मॅचेसची सिरीज झाली. पहिल्या दोन्ही टी२० अफगाणिस्ताननं जिंकल्या, कुणाचीही अपेक्षा नसताना अफगाणिस्ताननं डायरेक्ट सिरीजही मारली. आता शेवटची मॅच जिंकून अफगाणिस्तान व्हाईट वॉशच्या तयारीत होती, तर बांगलादेशसमोर इज्जत वाचवायचा प्रश्न होता.

अफगाणी ओपनिंग बॅट्समन मोहम्मद शहझादनं हाणामारीला सुरुवात केली होती. नझमुल इस्लामनं त्याची विकेट काढल्यानंतर नागीन डान्स केला आणि ठिणगी पडली. ही मॅच सुद्धा भारी झाली, पार अगदी शेवटच्या बॉलपर्यंत गेली.

लास्ट बॉलला चार रन्स हवे असताना, बांगलादेशच्या अरिफुल हकनं जवळपास सिक्स मारलाच होता. पण शफिकउल्लाहनं बाउंड्रीलाईनवर खतरनाक फिल्डिंग करत बॉल अडवला. वर थ्रो इतक्या जोरात पोहोचला की बांगलादेशच्या बॅट्समनला तीन रन्सही करता आले नाहीत आणि अफगाणिस्ताननं मॅच मारली. आता नागीन डान्स केला, मोहम्मद शेहझाद आणि अफगाणिस्तानच्या सगळ्या टीमनं.

पुन्हा एकदा बांगलादेश तोंडावर पडलं होतं.

२०१८ च्या निदाहस ट्रॉफीवेळी फक्त श्रीलंका बाहेर पडलीये म्हणून बांगलादेशची सगळी टीम नाचत होती, आता चार वर्षांनंतर श्रीलंकेनं बांगलादेशला एशिया कपच्या बाहेर काढलंय आणि नागीन डान्स करत बदलाही घेतलाय.

थोडक्यात सांगायचं झालं तर चांगले प्लेअर्स, चांगले कोच आणि चांगल्या संधी मिळूनही बांगलादेश क्रिकेटचा एक साधा नियम विसरते आणि माती खाते…

“It’s not over till it’s over.”

जोवर शेवटच्या ओव्हरचा शेवटचा बॉल टाकला जात नाही, तोवर मॅच संपत नाही, हेच खरं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.