या सहा गोष्टींकडे बांगलादेशने लक्ष दिलं नाही तर लवकरच त्यांचा ‘श्रीलंका’ होऊ शकतोय

ताजी बातमीये… बांगलादेशमध्ये राहणारे लोक सध्या काळोखाचा सामना करत आहेत. कारण बांगलादेशवर इंधनाच्या वाढत्या दरांचं संकट कोसळलं आहे. बांगलादेशच्या सरकारनं ऑगस्टच्या सुरुवातीला इंधनाच्या किंमतीत तब्बल ५२ टक्क्यांनी वाढ केलीये. ही वाढ बांगलादेशला स्वातंत्र्य मिळल्यानंतरची सर्वाधिक वाढ समजली जातेय.

तर वीज संवर्धनासाठी बांगलादेश सरकारने शाळांच्या आठवड्याच्या सुट्टीत अजून एका दिवसाची भर घातली आहे आणि सरकारी कार्यालये आणि बँकांना त्यांच्या कामाच्या तासांमध्ये एक तास कमी करण्यास सांगितलं आहे.

कुठे तरी ऐकल्यासारखी, बघितल्यासारखी वाटते ना ही परिस्थिती? आत्ता काही दिवसांपूर्वी श्रीलंकेची ही परिस्थिती होती. तेव्हा श्रीलंकेची परिस्थिती बघून दक्षिण आशियातील अनेक देशांची परिस्थिती येत्या काही दिवसांत अशीच होणार, असं भाकीत तज्ज्ञांनी केलं होतं.

पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशही या लिस्टमध्ये येतो.

१९७१ मध्ये बांगलादेश पाकिस्तानपासून स्वातंत्र्य झाला होता तेव्हाच काळ आणि आजचा काळ बघितला तर बांगलादेशमध्ये खूप बदल झाला आहे. पिकाऊ जमीन, व्यापारी बंदरे आणि पुरेसा वर्कफोर्स असे तिन्ही घटक या देशात आहेत, ज्यांच्यामुळे बांगलादेश सशक्त झालाय. एक यशस्वी लोकशाही म्हणून तो उदयास आलाय.

जर इकॉनॉमीबद्दल सांगायचं तर भारतीय द्वीपकल्पात भारतानंतर बांगलादेशचा क्रमांक लागतो. परचेसिंग पावर पॅरिटिनुसार आज बांगलादेशची एकूण GDP १.१ ट्रिलीयन डॉलर इतकी आहे. भारतीय द्वीपसमूहातील सगळ्यात स्टेबल देशांमध्ये आज बांगलादेशचा समावेश झाला आहे.

मग असं सगळं असताना बांगलादेशची हालत श्रीलंकेसारखी होईल, असं तज्ज्ञ का म्हणत आहेत?

पहिलं कारण आहे महागाई

कोणत्याही देशाच्या माहागाईचा एक आयडियल निर्देशांक निश्चित केलेला असतो. भारताबद्दल सांगायचं तर २% ते ६% हा भारताचा आयडियल इन्फ्लेशन रेट आहे. हा आयडियल रेट पार करणं कोणत्याही देशाच्या विकासासाठी धोक्याची घंटी असते. बांगलादेशमध्ये नेमकं हेच होतंय, त्यांचा महागाई निर्देशांक वाढतंच जातोय.

२०२२ च्या बांगलादेश ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या एका रिपोर्टनुसार, जूनमध्ये बांगलादेशचा महागाई निर्देशांक ७.५६% होता. गेल्या ९ वर्षांतील हा सर्वोच्च दर आहे. रोज लागणाऱ्या गोष्टींच्या किमती वाढत आहे ज्याने मध्यम आणि त्याखालील वर्गातील घटकाला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मे २०२२ च्या आकडेवारीनुसार, बांगलादेशचे १८.५४% लोक दारिद्य रेषेखाली होते.

जर असंच चालत राहिलं तर श्रीलंकेत जसे लोक रस्त्यांवर उतरले होते तसे इथेही रस्त्यांवर उतरतील, असं तज्ज्ञ सांगतात.

दुसरं कारण म्हणजे फॉरेक्स रिझर्व्ह कमी होणं

कोणत्याही देशाच्या केंद्रीय बँकेकडे फॉरेक्स रिझर्व्ह किंवा फॉरेक्स एक्सचेंज रिझर्व्ह ठेवण्यात येत असतो. याचा वापर सरकार देशातील आंतरराष्ट्रीय व्यापार सुधारण्यासाठी करतं. सोनं आणि परकीय चलनाच्या रुपात हे ठेवलेलं असतं. आंतराष्ट्रीय स्तरावर देशाला काहीही विकत घ्यायचं असेल तर त्याचं पेमेंट फॉरेक्स रिझर्व्हद्वारे केलं जातं.

बांगलादेशचं हे फॉरेक्स रिझर्व्ह आता कमी होतंय. जुलैमध्ये समोर आलेल्या माहितीनुर, ३९ बिलियन डॉलर इतकं फॉरेक्स रिझर्व्ह बांगलादेशकडे असून फक्त ५ महिन्यांचं पेमेंट याद्वारे करता येईल. त्यानंतर त्यांना वर्ल्ड बँक आणि आयएमएफ सारख्या बँकांकडून कर्ज घ्यावं लागेल आणि ते कर्जबाजारी होऊन अजून परिस्थिती बिघडू शकते, असं तज्ज्ञ सांगतात.

तिसरा मुद्दा – आयात आणि निर्यात बिलामध्ये वाढणारं अंतर

देशाच्या इकॉनॉमीमध्ये हे दोन्ही घटक आवश्यक असतात. बांगलादेशच्या निर्यातीचा ८५% टक्के भाग टेक्सटाईल आणि कापड उदयोगाने व्यापलाय. फुटवेअर, व्हेजिटेबल ऑइल, ऍनिमल ऑइल, आर्टिफिशल फुलं आणि आर्टिफिशियल केसांचा देखील यात समावेश आहे. तर आयातीत कापूस, मशीन, क्रूड ऑइल, लोखंड यांचा भाग जास्त आहे. 

मग बांगलादेशचा मुद्दा गंडला कुठे? तर त्यांनी केवळ काही ठराविक गोष्टींचं देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर भर दिला आणि बाकीच्या गोष्टींच्या उत्पादनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, त्यासाठी ते मोठ्या प्रमाणात इतर देशांवर अवलंबून राहिले. 

परिणामी जेव्हा कोरोना आला आणि बांगलादेशचा टेक्सटाईल उद्योग धूळ खात पडला तेव्हा एक्स्पोर्ट बंद झाली आणि आयात वाढली. ज्यामुळे दोन्हींचं संतुलन बिघडलं. मार्च २०२२ मध्ये ही व्यापारी तूट १८ बिलियन डॉलर्स इतकी होती. अशाने आयातीवर जास्त खर्च होत जाईल आणि निर्यातीतूनही हवं तसं उत्पन्न मिळणार नाही तर सरकारचा महसूल कमी होईल.

संसाधनं, आरोग्य आणि शिक्षणासारख्या गोष्टी मिळाल्या नाही तर लोक अजून गरीब होत जातील  आणि देश अधोगतीला जाईल, असं तज्ज्ञ सांगतात. 

चौथं कारण देशात ऊर्जेची कमी असणं

विकसनशील देश असल्यामुळे आजही बांगलादेश ऊर्जा निर्मितीसाठी कोळसा आणि इंधनांवर अवलंबून आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती बघितली तर या दोन्ही घटकांचे भाव आकाशाला भिडलेत. अशात आजही ८५% ऊर्जेचं उत्पादन याच घटकांनी होत असल्याने बांगलादेश ते अफोर्ड करू शकणार नाही.

याला पर्याय म्हणून सोलर एनर्जी आणि विंड एनर्जी फायद्याचे ठरतात मात्र बांगलादेश अजूनही त्याकडे लक्ष देत नाहीये. म्हणून आजही बांगलादेश ऊर्जा निर्मितीसाठी इतर देशांवर निर्भर आहे आणि या स्थितीमुळे लवकरच त्यांच्यावर श्रीलंकेप्रमाणे स्थिती उद्भवू शकते. सध्या त्याची सुरुवात झाल्याचं देखील दिसत आहे.

पाचवं कारण आहे बांग्लादेशच्या चलनाचं मूल्य कमी होत जाणं

बांगलादेशच्या चलनाला ‘टका’ असं म्हणतात. २०१७ मध्ये एका टक्याचं मूल्य ७८ रुपये होते ते २०२२ मध्ये ९४ रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. यामुळे आयात अजून महाग होतीये, ज्याचा परिणाम व्यापारी तूट अजून असंतुलित करणं आणि फॉरेक्स रिझर्व कमी होण्यावर होत आहे.

श्रीलंकेचा इतिहास पुनरावृत्त होत असल्याचं दिसतंय. फेब्रुवारी २०२७ मध्ये श्रीलंकेच्या रुपयांचं मूल्य १४० होतं ते २०२२ ला २०० वर पोहोचलं होतं. यामुळे त्यांचा व्यापार अचानक ठप्प झाला होता. जर बांगलादेशने याकडे लक्ष दिलं नाही तर त्यांच्याही व्यापारावर असाच परिणाम होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सहावं कारण – देशावर असणारं बाह्य कर्ज वाढत जाणं

२०२१ मध्ये बांगलादेशवर ९०.७९ बिलियन डॉलर कर्ज होतं. २०२० च्या तुलनेत यात २४ टक्क्यांनी वाढ झाली होती.

देशातील गरज भागवण्यासाठी बांगलादेश सरकार बाह्य कर्ज घेत आहे. मात्र त्याची भरपाई करण्यासाठी देशाकडे महसूल असणं गरजेचं आहे. हा महसूल तेव्हा येईल जेव्हा सरकार या कर्जाच्या पैशातून विकास करतील असेल उद्योग उभारेल. मात्र ज्याकडे सरकार लक्ष देत नाहीये. 

एक कर्ज भरून काढायला अजून कर्ज घ्यावं लागेल अशाने कर्जाचा डोंगर बांगलादेश सरकारवर वाढत जाईल, असं स्पष्ट आहे.

बांगलादेशला भविष्यात येणाऱ्या अडचणींना टाळण्यासाठीच आताच या ६ गोष्टींवर काम करावं लागणार आहे. नाहीतर त्यांचा ‘श्रीलंका’ व्हायला जास्त वेळ लागणार नाही. शिवाय भारताने देखील या गोष्टींवरून धडा घेत आवश्यक पावलं आताच उचलणं महत्वाचं आहे, असंही अब्यासक सांगतात.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.