खऱ्या जमीनदाराला जमीनदार म्हणून पिक्चरमध्ये घेण्याच्या आयडियामुळं सेटवर राडा झाला होता

सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेला कधी कधी अनपेक्षितपणे उद्भवलेल्या समस्यांना देखील मोठ्या चलाखीने तोंड द्यावे लागते. शिताफीने  या समस्येतून बाहेर पडावे लागते नसता त्यातून पुढे मोठे प्रश्न निर्माण होत असतात. असाच काहीसा प्रकार गीतकार शैलेंद्र यांना त्यांच्या ‘तिसरी कसम’ या चित्रपटाच्या वेळी अनुभवायला मिळाला.

‘तिसरी कसम’ हा चित्रपट गीतकार शैलेंद्र यांचा पहिलाच चित्रपट.

या सिनेमाचे दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचा देखील हा पहिलाच चित्रपट. बजेट कमी होते. त्यामुळे या चित्रपटात प्रमुख कलावंतांच्या व्यतिरिक्त जे सहकलाकार काम करणार होते ते नवीनच घ्यावेत असे ठरले.

नवीन कलाकार निवडताना शक्यतो ते ज्या पेशाचे आहेत त्याच भूमिका त्यांना द्याव्यात असेही ठरले. म्हणजे सिनेमात चहावाला हा रोल असेल तर असेल तर वास्तव जीवनातील चहावाला घ्यावा जमीनदार असेल तर वास्तविक जीवनातील जमीनदार घ्यावा. 

या सिनेमाचे बरेचसे चित्रीकरण झांसी च्या जवळ होणार होते. एकदा लोकेशन पाहण्यासाठी शैलेंद्र आणि बासू भट्टाचार्य तिथे गेले. तिथे त्यांची मुलाखत एका जमीनदारांसोबत झाली. ते त्या गावातील मोठं प्रस्थ होतं. शैलेंद्र ने सहजपणे त्या जमीनदाराला विचारले ,” क्या  आप हमारी फिल्म मे काम करोगे?” हे ऐकून जमीनदार प्रचंड खुश झाला आणि त्याने होकार दिला.

पुढे शैलेंद्र आणि बासूदा मुंबईत आले आणि त्यांनी चित्रपटावर काम सुरू केले. आपल्या वितरकांना बोलून त्यांनी सिनेमातील  सहकलाकारां बद्दल ची त्यांची योजना  सांगितली. त्यावर  सर्व वितरकांनी विरोध करीत एकच सूर आळवला ,”  हा असला काही प्रकार करू नका.

चित्रपट जर यशस्वी करायचा असेल तर तुम्ही प्रस्थापित कलावंतच चित्रपटात घ्या” त्यामुळे अर्थातच नवीन कलाकार घेण्याची आयडिया मागे पडली सिनेमाचे काम सुरू झाले. ‘स्क्रीन’ या साप्ताहिकात सिनेमाची मोठी जाहिरात देखील प्रसिद्ध झाली.

राजकपूर आणि वहिदा रहमान प्रमुख भूमिकांमध्ये होते.

चित्रपटाला संगीत शंकर जयकिशन यांची होते. बजेट कमी असल्यामुळे चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बनणार होता. ‘स्क्रीन’ या साप्ताहिकातील जाहिरात पाहून झांशी चा ‘तो’ जमीनदार आपल्या आठ-दहा लठ्ठ्या समर्थकांसोबत मुंबईला आला आणि शैलेंद्रच्या ‘रिमझिम’ या बंगल्यात जाऊन पोहोचला.

जमीनदार आणि त्याच्या सोबतचे आडदांड आठ दहा  साथीदार पाहून  शैलेंद्र बिचारा घाबरला. जमीनदाराने आल्या आल्या विचारले ,” साब, हमारी शूटिंग कब शुरू कर रहे हो?” तोवर शैलेंद्रने त्या जमीनदाराला झांसी मध्ये दिलेले वचन स्वतःच विसरून गेला होता!  प्रसंग मोठा बाका होता.सोबत आठ दहा गुंड होते. काय करायचे? त्याने त्या सर्वांना त्यांच्या  दुसऱ्या बंगल्यात ‘पार्वती सदन’ मध्ये पाठवले. “ तुम्ही आता आराम करा मी उद्या तुम्हाला सांगतो!” असे सांगितले. 

शैलेंद्रचा एक पत्रकार मित्र होता रामकृष्ण नावाचा. त्याच्यासोबत शैलेंद्रने ही समस्या शेअर केली. त्या पत्रकार मित्राने एक आयडिया शैलेंद्र ला सांगितली. त्याने सांगितले “आपण खोटं खोटं शूटिंग करू या!” त्याप्रमाणे दोन दिवसांनी एका स्टुडिओमध्ये त्या जमीनदाराला नेण्यात आलं. त्याचा व्यवस्थित मेकअप करण्यात आला. 

कॅमेरा, लाईट्स सर्व रेडी ठेवले. त्या जमीनदाराला त्याची भूमिका सांगितली. 

वहिदा रहमान त्याला पान खाऊ घालते असा प्रसंग होता. शॉट सुरु झाला. जमीनदार खुशीत होता. त्यांचे पंटर तर जोशात होते! प्रसंगा प्रमाणे  त्याप्रमाणे वहिदाने विड्याचे पान त्या जमीनदाराच्या तोंडात घातले तिकडे दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांनी ‘कट’ ‘कट’  म्हटले! 

‘कट’ ऐकल्या ऐकल्या  तिकडे त्या जमीनदाराने वहिदाचे बोट आपल्या दाताने चावले! वहीदा किंचाळली… दिग्दर्शकांना विचारले “हा काय प्रकार आहे?” त्यावेळी तो जमीनदाराचे पंटर  हसत म्हणाले “आपने अभी ‘कट’ कहा ना, तो हमारे शेठजी ने मॅडम की उंगली काट ली…” सर्वांना हसावे की रडावे काही कळत नव्हते. 

वहिदा मात्र वेदनेनं कळवळत होती. अशा प्रकारे ते खोटं खोटे शूटिंग संपलं! आणि शैलेंद्रने जमीनदारांना सांगितले ,” बस आपका अभी का काम तो हो गया दुबारा आपकी जरूरत पडी तो आपको इतल्ला करूँगा” असे म्हणून त्याची झाशीला रवानगी केली आणि एका मोठ्या संकटातून आपल्या स्वतःची सुटका करून घेतली!

पुढे हीच जमीन दाराची भूमिका चित्रपटात इफ्तेकार या कलाकाराला दिली आणि त्याने अतिशय अप्रतिम रित्या ती भूमिका साकारली. पुढे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्या झांशीच्या  जमीनदाराची काय प्रतिक्रिया होती ते मात्र समजले नाही!

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.