ना धड कोच, ना धड स्पॉन्सर्स तरीही अफगाणिस्तानची टीम लढतीये…

अफगाणिस्तान. एक काळ होता जेव्हा ही टीम क्रिकेटमधली लिंबू-टिंबू टीम म्हणून ओळखली जायची. शुक्रवारी मात्र याच अफगाणी टीमनं ऑस्ट्रेलियाला जवळपास हरवलंच होतं. सध्याचे विश्वविजेते असणारी ऑस्ट्रेलियन टीम त्यांच्याच होम ग्राउंडवर खेळतीये. त्यांच्या टीममधली बडी बडी नावं ऐकली तरी एखाद्याला धडकी भरु शकते.

पण तरीही अफगाणिस्ताननं अशक्य वाटणारी मॅच जवळपास खेचून आणलीच होती, शेवटच्या ओव्हरमध्ये २२ रन्स हवे असताना अफगाणिस्तान फक्त ४ रन्सनं हरलं.

भले अफगाणी टीम हरली पण ही पोरं खऱ्या अर्थानं लढली, त्यांची ही लढाई फक्त २० ओव्हर्सपुरती नाही, तर गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. एशिया कपमध्ये आणि आता वर्ल्डकपमध्ये थोडक्यात हरले असले, तरी अफगाणिस्तानच्या टीमचं लढणं महत्त्वाचं आहे.

एका वर्षापूर्वी तालिबाननं अफगाणिस्तान पुन्हा आपल्या ताब्यात घेतलं. तिथं सत्ता स्थापन केली, नियम बदलले. ही नवी राजवट अफगाणिस्तानच्या नागरिकांच्या मानवी हक्कांवर गदा आणणारी ठरली. महिलांनी टीव्हीवर दिसायचं नाही, एकटं फिरायचं नाही असे अनेक फतवे तालिबाननं काढले. अनेक परदेशी विद्यार्थी, नागरिक, अधिकारी, खेळाडू यांनी अफगाणिस्तान सोडलं. काही जण मायदेशात परतले, तर काही जणांनी युएई गाठलं.

अफगाणिस्तानच्या महिला फुटबॉल टीमच्या कॅप्टननं तर आपल्या खेळाडूंना जर्सी आणि किट जाळून टाकायला सांगितलं होतं.

या नव्या राजवटीच्या रडारवर क्रिकेटही आलं, पहिला घाला बसला तो महिला क्रिकेटवर. देशात जसं सत्तांतर झालं तसं अफगाणिस्तानमधलं महिला क्रिकेट बंद झालं. टी२० वर्ल्डकप तोंडावर होता, तेव्हा पुरुषांच्या क्रिकेट टीमला परवानगी मिळाली. देशातल्या परिस्थितीवर मात करत ही टीम वर्ल्डकपमध्ये खेळली. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या देशांचे दौरे केले, अंडर-१९ टीमही स्पर्धांमध्ये उतरली.

त्यामुळं वरवर पाहिलं तर आपल्याला अफगाणी क्रिकेट निवांत वाटत असलं, तरी त्यांच्यापुढं असलेल्या अडचणी काय संपलेल्या नाहीत.

सगळ्यात पहिला मुद्दा येतो प्लेअर्सच्या सुरक्षेचा…

अफगाणिस्तानचा स्टार प्लेअर राशिद खान सत्तांतराच्या आधी एका मुलाखतीत म्हणाला होता, ‘मी जेव्हा अफगाणिस्तानमध्ये येतो किंवा दौऱ्यासाठी बाहेर जातो तेव्हा प्रचंड गुप्तता पाळावी लागते. माझ्या घरच्यांनाही काळजी असते की माझ्या सुरक्षेला धोका पोहोचायला नको. मागच्या ५ वर्षात मी मोजून २५ दिवस घरी राहिलोय.’

थोडक्यात या खेळाडूंना आधीपासूनच भीती होती. त्यात अफगाणिस्तानमध्ये नवं सरकार आल्यानंतर कित्येक खेळाडूंनी युएईमध्ये स्थायिक होण्याचा पर्याय निवडला. कॅप्टन मोहम्मद नबी, राशिद खान हे प्लेअर्स आपल्या अफगाणिस्तानमधल्या घरी न जाता, युएईमध्येच थांबलेत.

कारण काय ? 

तर एकदा तिकडे गेल्यावर व्हिसा मिळेल का ? आणि आपल्या जीवाची खात्री राहील का ? या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळत नाहीत.

दुसऱ्या बाजूला राशिद, नबी आणि मुजीब उर रेहमानसारखे खेळाडू जगभरातल्या वेगवेगळ्या टी२० लिग्समध्ये खेळताना दिसतात. मात्र त्यांना मायदेशी होणाऱ्या अफगाणिस्तानच्या नॅशनल कॅम्पमध्ये सहभागी होता येत नाही. तरीही हे प्लेअर्स अफगाणिस्तानसाठी गरजेचे आहेत, कारण या टी२० लिग्समधून त्यांना जो अनुभव मिळतो, तो सगळ्या टीमला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये महत्त्वाचा ठरतो.

राशिद आणि नबीसोबतच जवळपास २५ अफगाणी प्लेअर्स युएईमध्ये राहतात… ज्यांच्यासाठी आता साधं स्वतःच्या घरी जाणं ही सुद्धा अवघड गोष्ट बनली आहे.

दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे पैसा…

अफगाणिस्तानमध्ये सत्तापालट झाल्यावर अनेक इंटरनॅशनल कंपन्यांनी तिथून माघार घेतली. बँकिंग आणि फॉरेन एक्स्चेंजमध्ये अडचणी येणं स्वाभाविक होतं. त्यामुळं अनेक कॉर्पोरेट स्पॉन्सर्सनं अफगाणिस्तानच्या टीमची स्पॉन्सरशिपच काढून घेतली. पैसे मिळवण्याचा सोपा मार्ग असणाऱ्या या स्पॉन्सरशिप रद्द झाल्यामुळं अफगाणिस्तानला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागली.

स्पॉन्सरशिप सोबतच पैशांचे आणखी दोन मुख्य स्रोत असतात, पहिला म्हणजे आयसीसीकडून येणारं फंडिंग. मात्र नव्या राजवटीनंतर आयसीसीनं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचं डायरेक्ट फंडिंग बंद केलं. त्यामुळं पैसा येणंच कमी झालं. 

दुसरा स्रोत म्हणजे मॅचेसच्या आयोजनातून मिळणारा पैसा. उदाहरण म्हणून सांगायचं झालं, तर आर्थिक संकटात असणाऱ्या श्रीलंकेनं जून महिन्यात मायदेशी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजमधून जवळपास २.५ मिलियन यूएस डॉलर्सची कमाई केली. यामुळं श्रीलंकेच्या इकॉनॉमीला तर बूस्ट मिळालाच पण सोबतच क्रिकेट बोर्डालाही आपली आर्थिक बाजू भक्कम करता आली.

मात्र नवी राजवट आल्यापासून अफगाणिस्तानमध्ये जाऊन क्रिकेट खेळायला कोणत्याच देशाची क्रिकेट टीम तयार नाही. अफगाणिस्तानमध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा या भारतीय खेळाडूंची प्रचंड मोठी फॅनफॉलोईंग आहे. जर हे प्लेअर्स अफगाणिस्तानमध्ये खेळायला गेले, तर साहजिकच मॅच बघायला प्रचंड गर्दी होईल आणि कमाईही. पण हे प्रत्यक्षात घडण्याची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. 

या अडचणीमुळे अफगाणिस्तानला आपलं होम ग्राउंड म्हणून कधी भारताचा तर कधी युएईचा आधार घ्यावा लागतो, पण ज्या देशात त्यांचं क्रिकेट उभं राहिलं, तिथं खेळणं मात्र त्यांच्याही नशिबात नाही.

तिसरा मुद्दा आहे कोचेसचा

२०१९ पासून अफगाणिस्ताननं एकूण ५ हेड कोच बदलले. या ५ पैकी एकही हेड कोच कधीच अफगाणिस्तानला गेला नाही. त्यांनी कायम जिथं सिरीज किंवा स्पर्धा असेल तिथंच जाऊन कोचिंग केलं. आता कुठल्याही हेड कोचचं काम असतं की प्लेअर्स कसे घडतात, त्यांचं ग्रूमिंग कसं होतं हे पाहणं मात्र अफगाणिस्तानचे हेडकोच त्यांच्या देशातच जात नाहीत आणि टीम घडवण्याची जबाबदारीही प्लेअर्सच पार पाडतात.

चौथा मुद्दा आहे डोमेस्टिक क्रिकेटचा

मागच्या वर्षभरात अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड तिथल्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. अहमदशहा अब्दाली फोर डे टूर्नामेंट, श्पागीझा क्रिकेट लीग या डोमेस्टिक टूर्नामेंटचं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं यशस्वीपणे आयोजन करुन दाखवलं. राजधानी काबुलमध्ये क्रिकेटर्ससाठी हाय परफॉर्मन्स सेंटरही उभं राहतंय. अफगाणिस्तानच्या इतर भागातही क्रिकेटचा प्रसार व्हावा यासाठी एसीबीकडून प्रयत्न सुरु आहेत, पण या सगळ्याला आर्थिक आणि राजकीय मर्यादा प्रचंड आहेत.

वुमन्स टीम नसल्यानं आयसीसी अफगाणिस्तानचा फुल मेम्बरचा दर्जा कधीही काढून घेऊ शकतं. त्यात मॅच प्रॅक्टिस फार कमी मिळते. साध्या सुविधा मिळवण्यासाठीही त्यांना युएई किंवा भारतावर अवलंबून राहावं लागतं. 

बरं असंही नाही की अफगाणिस्ताननं एखाद्या मोठ्या टूर्नामेंटमध्ये विजय मिळवला तर त्यांच्या अडचणी झटक्यात संपतील, तरीही हे खेळाडू कोच, स्पॉन्सर नसताना मैदानात कडवी झुंज देतात, एशिया कपमध्ये श्रीलंका, बांगलादेशला तर त्यांनी हरवलंच, पण पाकिस्तानलाही सहजासहजी जिंकून दिलं नाही. वर्ल्डकपमध्येही ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य टीमला शेवटच्या ओव्हरपर्यंत झुंजवलं.

कारण अफगाणी प्लेअर्सला एक गोष्ट माहिती आहे, आपलं जिंकणं परिस्थिती बदलू शकत नसलं, तरी आपल्या मायदेशातल्या लोकांना काही क्षणांसाठी का होईना आशेचा किरण नक्कीच दाखवू शकतं.

म्हणूनच स्टोईनिसच्या लास्ट ओव्हरपेक्षा रशिद खानची छकडे मारायची जिगर भारी आहे. 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.