धार्मिक परंपरा म्हणून आजही या देशात मानवी मांस खाल्ल जातं…

हॉटेलमध्ये खायला जाण्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा व्हेज खायचं की नॉनव्हेज या मुद्द्यावरून अनेक जण भांडत असतात. काही भिडू चवीने मटण चिकन हाणतात तर काही भिडूंना फक्त आणि फक्त व्हेज हवं असतं.

हा झाला आपल्या दैनंदिन आहाराचा मुद्दा पण जगात असाही एक देश आहे जिथले आदिवासी चिकन मटणाच्या पलीकडे जाऊन थेट माणसाचं मांस खातात. 

सामान्य व्यक्ती माणसाचं मांस खाण्याची कल्पना करू शकत नाही. कारण माणसाचं मांस खाण्याची पद्धत कोणत्याच मानवी समाजात बघायला मिळत नाही. पण पापुआ न्यू गिनी देशात असलेल्या कोरोवाई जमातीचे लोकं अजूनही मानवी मांस खातात. आता यावर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे मात्र यासाठी कोणतीही कठोर शिक्षा दिली जात नाही त्यामुळे अजूनही ही परंपरा पाळली जाते.

भिडूंनो हे सगळं वाचून तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, ही असली कसली विचित्र  परंपरा ज्याच्यावर कायद्याने बंदी घातलीय पण शिक्षा दिली जात नाही.

तर याचं कारण आहे या परंपरेची अंधश्रद्धा. पापुआ न्यू गिनी आणि इंडोनेशिया या दोन देशांमध्ये विभागलेल्या पापुआ बेटावर या कोरोवाई आदिवासी जमातीचे लोकं राहतात. या बेटावर घनदाट जंगलं आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो. त्यामुळे हे आदिवासी लाकडं आणि फांद्यांचा वापर करून उंच झोपड्या बांधतात आणि तिथे राहतात.

पावसामुळे या भागात डास आणि जंतूंचे प्रमाण जास्त आहे. या डासांमुळे मलेरिया, टायफाईड असे आजार होतात आणि लोकांचा मृत्यू होतो. पण आजारांमुळे मृत्यू होतो हे आदिवासींना माहीतच नाही. 

कोरोवाई मानतात की, ‘माणसाच्या मृत्यूला खाखुआ नावाची चेटकीण जबाबदार असते. ती माणसाच्या जवळ येते आणि त्याच्या हृदयावर बाण चालवते. तिच्या हल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू होतो. त्यानंतर ती खाखुआ त्याच्या शरीरात शिरते.’  

खाखुआ शरीरात गेल्यानंतर ती त्याच्या शरीराच्या आतला भाग खायला लागते आणि अधिक पावरफुल होते. त्यामुळे तिला रोखण्यासाठी जमातीमधील लोकं  मेलेल्या माणसाचा मांस स्वतःच खाऊन टाकतात.

जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या परिवारातील लोकं त्याला ओढत बाहेर आणतात आणि ओढ्याच्या किनाऱ्यावरील एका झाडाला बांधून ठेवतात. त्यानंतर एक दोन दिवसांचा काळ जाऊ दिला जातो. जेव्हा मांस सडण्याची प्रक्रिया चालू होते तेव्हा तो मऊ होतो. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या पद्धतीने शिजवून खाल्लं जातं.

यात लोकांचा सगळ्यात आवडता भाग असतो तो म्हणजे मेंदू..!!

मेंदूला लोकं आवडीने खातात आणि त्याची कवटी आठवणीसाठी सांभाळून ठेवतात. तर केस, नखं, हाडं, दात आणि लिंग या गोष्टी खाल्ल्या जात नाहीत. सगळ्या प्रेतातील मांस खाल्ल्यानंतर त्याची हाडं एकत्र करून ठेवली जातात आणि ज्या झाडावर प्रेत बांधून ठेवण्यात आलं  होतं त्या झाडाला काही दिवसापर्यंत झाडाच्या फांद्यांनी फटके मारले जातात.

फटके मारल्यामुळे प्रेताच्या शरीरात असलेली खाखुआ आणि इतर दुसऱ्या खाखुआ घाबरतात. तसेच त्या पुन्हा कुणाला मारत नाहीत असं आदिवासींना वाटतं. 

नैसर्गिक मृत्युसोबत जर एखाद्या व्यक्तीच्या अंगात खाखुआ शिरलेली आहे अशी शंका आल्यास लोकं त्याला स्वतःहून मारतात. याबद्दल आदिवासी भागात भेट देणारे पॉल राफेल यांनी त्यांच्या लेखात एक प्रसंग सांगितलाय. 

“बेलोम नावाच्या व्यक्तीने त्याचा चुलत भाऊ असलेल्या याफुफ्ला नावाच्या खाखुआला मारलं होतं. याफुफ्ला हा स्वतःमध्ये खाखुआ शिरलेली आहे असं बडबडत होता. त्यामुळे बेलोमने त्याला पकडलं आणि सगळे मिळून त्याला ओढ्यावर घेऊन गेले. आणि झाडाच्या बुंध्याला बांधून त्याच्यावर बाण चालवायला सुरुवात केली.” 

बाण लागल्यावर तो ओरडायला लागला आणि त्याच्यात खाखुआ नाहीय असं सांगून वाचवण्याची विनंती करत होता. मात्र सगळ्यांनी बाण मारून त्याची हत्या केली. मग बेलोमने दगडाच्या कुऱ्हाडीने त्याचं डोकं कापलं आणि जोराने धक्का देऊन बाजूला केलं.

तर इतरांनी मंत्रांचा जप करत त्याच्या शरीराचे तुकडे केले. त्यानंतर सगळं मांस घेऊन ते गावात आले आणि ते मांस शिजवून खाल्लं. 

आदिवासी याबद्दल सांगतांना या अंधश्रद्धेला सोडून दुसऱ्या कोणालाही मारून खात नाहीत असं सांगतात. मात्र १९७० च्या दशकात जेव्हा बाहेरील लोकांचा या आदिवासींबरोबर संपर्क आलाय तेव्हापासून अनेक लोकं या भागात कायमचेच बेपत्ता झालेत. 

त्यामुळे २०१२ मध्ये पापुआ न्यू गिनी सरकारने या परंपरेवर कायदेशीर बंदी घातलीय. पण कायद्यात फार कठोर शिक्षा ठोठावण्यात आलेली नाहीय. केवळ २५ किनचा दंड भरून यातून सुटका होते. त्यामुळे कोरवाई अजूनही या परंपरेचं पालन करत आहेत असे सांगितले जाते. परंतु नागरी समाजातील लोकांच्या संपर्कामुळे आता या परंपरेत बदल होत आहे. मानव मांस खाण्याऱ्यांची संख्या कमी होत आहे. 

त्यामुळे कायद्याच्या धाकापेक्षा लोकांच्या संपर्कात येऊन अंधश्रद्धा दूर झाल्यास ही परंपरा नष्ट होईल असे मानववंश शस्त्राचे अभ्यासक सांगतात.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.