वय वाढलं, शरीराला बँडेज लागले; पण झुलन गोस्वामी २० वर्ष क्रिकेटच्या मैदानात झुंजत राहिली…

साल होतं १९९७, कोलकात्यामधलं ईडन गार्डन्सवर वर्ल्डकप फायनलची मॅच होती. वर्ल्डकप फायनल असली, तरी ईडन्सवर म्हणावी तशी गर्दी नव्हती. कारण पोरी लय भारी क्रिकेट खेळू शकतात हे लोकांच्या मनावर पक्कं बसणं बाकी होतं. पण बाऊंड्री लाईनच्या बाहेर एक पोरगी होती, जिच्या डोळ्यांत स्वप्न भरायचं काम या मॅचनं केलं.

तो वर्ल्डकप ऑस्ट्रेलियानं जिंकला आणि आपल्या देशाचा झेंडा हाती घेऊन मैदानाला विजयी फेरी मारली. ती फेरी पाहणाऱ्या एका पोरीनं त्याच दिवशी मनाशी पक्कं केलं, ‘एक दिवस आपल्या देशाला वर्ल्डकप जिंकवून द्यायचा.’

फायनलवेळी बाऊंड्री लाईनबाहेर बसणाऱ्या त्या पोरीचं काम होतं, की बाऊंड्रीबाहेर गेलेले बॉल आतमध्ये टाकायचे. कारण, त्यावेळी ती होती फक्त एक बॉलगर्ल.

झुलन निशित गोस्वामी. हे नाव १९९७ मध्ये लोकांना माहीतही नव्हतं. आजच्या घडीला हे नाव लोकांना माहितीये, ते वुमन्स वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी प्लेयर म्हणून. भारतातल्याच नाही, तर जगातल्या महिला खेळाडूंची आदर्श म्हणून. बाऊंड्रीलाईनच्या पलीकडून बॉलिंग टाकण्याच्या मार्कपर्यंतचा झुलनचा प्रवास सोपा नव्हता.

पण भारी माणसं खडतर प्रवासानीच तर घडतात.

कोलकात्यातल्या तिच्या घरापासून प्रॅक्टिसचं ठिकाण बरंच लांब होतं. त्यात झुलनच्या कोचचा एक नियम होता, की आठ वाजताच्या प्रॅक्टिसला आठ वाजता पोहोचलो नाही, तर त्यादिवशी प्रॅक्टिस करता येणार नाही. साहजिकच झुलन सकाळी चार वाजता उठून, पाच वाजून पाच मिनिटांची ट्रेन पकडायची आणि अडीच तासांचा प्रवास करून स्टेडियम गाठायची. प्रॅक्टिस झाली की परत. हा अडीच तासांचा प्रवास असायचाच.

आपल्या मुलीनं शिक्षणाकडं लक्ष द्यावं, तिला खेळताना दुखापत झाली तर तिच्या लग्नाचं कसं होईल हा प्रश्न तिच्या घरच्यांना पडायचा. त्यामुळं झुलनला बऱ्याचदा बोलणीही खावी लागायची. 

पण तिची आजी तिच्या पाठीशी ठाम उभी राहिली. 

एका मुलाखतीत झुलन म्हणते, ‘माझी आजी पहिल्यापासून माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. तिचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात झाला होता, तिनं फाळणीच्या वेदना अनुभवल्या होत्या. त्यामुळं आजीला स्वातंत्र्य म्हणजे काय हे पक्कं माहीत होतं.’

झुलन सराव करत राहिली, तिच्या कोचच्या मते, ‘झुलनसारखी बॉलिंग ॲक्शन त्यांनी कधीच पाहिली नव्हती.’ एक एक पाऊल पुढं टाकत झुलनचा प्रवास सुरू राहिला आणि जानेवारी २००२ मध्ये तिनं पहिल्यांदा भारताची जर्सी अंगात घातली.

आता तेव्हापासून वनडे मॅचेस असतील, टेस्ट मॅचेस असतील किंवा टी२० असेल असा फॉरमॅट नाही जिथं झुलननं मैदान गाजवलं नाही.

जवळपास २० वर्ष, झुलन क्रिकेटच्या मैदानावर होती. कधीकाळी सेकंड क्लास ट्रेनमधून प्रवास करणारा महिला संघ विमानानं फिरू लागला, महिला क्रिकेटला स्पॉनर्स मिळू लागले, लय काय काय बदललं, फक्त हा सगळा प्रवास अनुभवणाऱ्या झुलन गोस्वामीला सोडून.

आजच्या घडीला रेकॉर्ड्सच्या लिस्टमध्ये झुलनचं नाव टॉपला आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक २५५, टी२० इंटरनॅशनल्समध्ये ५६ आणि टेस्ट क्रिकेटमध्ये ४४ अशा एकूण ३५४ इंटरनॅशनल विकेट्स तिच्या नावावर आहेत. महिला क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठं करिअर असणाऱ्या लिस्टमध्ये ती दुसऱ्या नंबरला आहे…

आणि भारतातल्या गल्लीबोळातल्या पोरींनी क्रिकेटर होण्याचं स्वप्न बघण्याचं कारण ठरण्यात एक नंबरला!

गौरव कपूरला दिलेल्या मुलाखतीत झुलननं सांगितलं होतं, ”आजही मॅचच्या दिवशी मला टेपिंगसाठी म्हणजे बँडेज लावण्यासाठी जावं लागतं. माझे दोन्ही घोटे, खांदे, कोपरे, पाठ अशा अनेक ठिकाणी बँडेज लावण्यात किमान पाऊण तास जातो आणि मग मी मैदानात उतरते.”

काल इंग्लंडविरुद्ध क्रिकेटची पंढरी असणाऱ्या लॉर्ड्सवर, झुलननं आपल्या करिअरमधला शेवटचा सामना खेळला. इंग्लिश प्लेअर्सनं तिला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. आपल्या शेवटच्या मॅचमध्ये झुलन पहिल्या बॉलवर आऊट झाली, पण यामुळं तिचं कर्तृत्व छोटं झालं नाही.

वय ३९ वर्ष झालं, दुखापती झाल्या; पण ९७ च्या वर्ल्डकप फायनलवेळी जी आग ‘बॉलगर्ल झुलन’च्या डोळ्यांत होती, ती कालही टीमच्या लाडक्या ‘झुलन दी’च्या डोळ्यांमध्ये होती.

फक्त भारतीय प्लेअर्सच नाही, तर प्रत्येकानं झुलनचं कौतुक केलं. झुलनबद्दल सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे, तिनं एक स्वप्न पाहिलंय की, “मला इंडियन वुमन्स टीमला वर्ल्डकप जिंकताना पाहायचंय, भले मी टीममध्ये असेल किंवा नसेल.”

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.