कुलीच्या दुर्घटनेनंतर अमिताभनं अर्धवट राहिलेले पिक्चर शूट केले, अपवाद फक्त ‘खबरदार’

जुन्या गाजलेल्या चित्रपटांचे रिमेक बॉलिवूडमध्ये कायम होत असतात. १९७१साली प्रदर्शित झालेल्या ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ या चित्रपटाने, सिनेमाच्या  इतिहासात एक आगळे वेगळे स्थान मिळवले आहे. आज पन्नास वर्षानंतरही हा सिनेमा ‘cult classic’ म्हणून समजल्या जातो. याच चित्रपटाचा फार्मेट घेऊन त्यात थोडाफार बदल करून १९८४ साली दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक टी रामा राव एक चित्रपट बनवत होते. 

‘खबरदार’ असे या चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटात नायक एका असाध्य अशा आजाराने व्यथीत असतो. या आजारामुळे त्याला प्रचंड वेदना होत असतात. या आजारातून बरे होण्याची सुतराम शक्यता नसते. अशा या रुग्णाला ‘इच्छा मरण’ हवे असते.

“मरणाने सुटका केली जगण्याने छळले होते” अशी सुरेश भटांच्या कवितेसारखी अवस्था त्या नायकाची झालेली असते.

त्याच्यावर उपचार करणारा डॉक्टर मात्र या सगळ्या घडामोडींकडे ‘डोळस’ पणे पाहत असतो. पण एक क्षण असा येतो कि त्या वेळी त्यांना तो कटू निर्णय घ्यावा लागतो आणि डॉक्टर त्या रुग्णाला एक इंजेक्शन देऊन त्याची जीवनयात्रा संपवतात. किंबहुना त्याच्या दुःखद जीवनातून त्याची सुटका करतात. 

लक्षात घ्या, आपल्या देशात आज देखील इच्छा मरणाला कायदेशीर अधिकार प्राप्त झालेला नाही. त्यावर दोन्ही बाजूने उलट-सुलट अशा चर्चा चालू आहेत. काही व्यक्तींनी तर थेट राष्ट्रपतींकडे या करिता परवानगी मागितली आहे. बॉलीवूड करता हा विषय सर्वथा नवीन होता. 

या चित्रपटात असह्य आजाराने त्रस्त असलेल्या नायकाची भूमिका ‘कमल हसन’करत होते तर डॉक्टरच्या भूमिकेमध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन होते. या दोघांचा हा पहिलाच चित्रपट होता. सोबतीला श्रीदेवी आणि जयाप्रदा या अभिनेत्री होत्या. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले काही रिळे तयार झाली. पण अमिताभ बच्चन या चित्रपटाच्या ‘क्लायमॅक्स’ बाबत साशंक होते. त्यांची साशंकता दोन गोष्टींमुळे होती. 

एक तर भारतीय समाज अशा कथानकाला स्वीकारेल का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमिताभ यांनी साकारलेली व्यक्तिरेखा नकारात्मक बनवून एक वेगळा संदेश प्रेक्षकांपर्यंत जाऊन कमल हसन या पात्राला सहानुभूती मिळेल! ‘आनंद’ व ‘नमक हराम’ या दोन्ही चित्रपटांमध्ये शेवटी राजेश खन्नाचा मृत्यू होतो आणि प्रेक्षकांची सगळी सहानुभूती त्या व्यक्तीरेखेला मिळाली हिती हे अमिताभ जाणून होता. 

अमिताभ बच्चन यांना हा धोका कदाचित लवकर लक्षात आला आणि त्यांनी क्लायमॅक्स बदलावा याचा आग्रह निर्मात्याकडे झाला. 

याच वेळी आणखी एक घटना घडली. १९८३ साली अमिताभ बच्चन यांचा दुसरा एक चित्रपट फ्लोअर वर होता. मनमोहन देसाई यांचा ‘कुली’! या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान बेंगलोरला फाईट सीन मध्ये अभिनेता पुनीत इस्सार यांचा एक ठोसा अमिताभला लागून अमिताभ कोसळतो आणि टेबलाचा कोपरा त्यांच्या पोटाला जखम करून गेल्यामुळे अमिताभ जखमी  होतो.

पुढे अमिताभचे दुखणे इतके वाढते की त्याला मृत्युच्या दारापर्यंत पोहोचवते. पण यातून तो सहीसलामत बाहेर येतो. यानंतर अमिताभने त्याचे अर्धवट राहिलेले चित्रपट पूर्ण करण्याचा सपाटा लावला. पण ‘खबरदार’ या चित्रपटाकडे मात्र तो ढुंकूनही पाहिले नाही. एक तर ‘कुली’ च्या आजारपणानंतर अमिताभची ‘नेशन वाईड’ झालेली ‘इमेज’ त्याला ‘खबरदार’चा क्लायमॅक्स ‘नको करू’ असे सांगत असते. अशा प्रकारे हा चित्रपट डब्यात जातो.

ए पूर्णचंद्र राव या  निर्मात्याचे नुकसान होऊ नये म्हणून अमिताभ त्यांच्या ‘आखरी रास्ता’ या चित्रपटात एक पैसाही न घेता काम केले अशी बातमी त्या काळात आली होती. यातला किती भाग खरा हे सांगणे आजच्या घडीला अवघड आहे. 

‘इन्कलाब’,‘अंधा कानून’ या चित्रपटानंतर टी रामा राव यांचा ‘खबरदार’ हा तिसरा चित्रपट येणार होता. या चित्रपटात पहिल्यांदाच बॉलीवूडचा सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन एकत्र येणार होते.

प्रेक्षकांना देखील एक वेगळी जुगलबंदी यातून पाहायला मिळाली असती.

पण दुर्दैवाने हा चित्रपट पूर्ण झालाच नाही आणि कायमचा डब्यात गेला. पुढे १९८५ साली अमिताभ बच्चन, कमल हसन रजनीकांत हे तिघे ‘गिरफ्तार’ या चित्रपटातून एकत्र आले. आज इतक्या वर्षानंतर तब्बल पस्तीस-चाळीस वर्षांनंतर जेव्हा आपण या घटनेकडे एका त्रयस्थ नजरेतून पाहू लागतो त्या वेळेला असे वाटते कि अमिताभ ने  हे धाडस करायला हवं होतं किंबहुना काही जाणकारांच्या असे म्हणणे आहे आज देखील अमिताभ आणि कमल हसन यांनी या चित्रपटाचा क्लायमॅक्स शूट केला तर प्रेक्षकांना एक आगळा-वेगळा चित्रपट पाहता येईल. 

ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ ची प्रेरणा घेऊन तयार झालेला हा चित्रपट सर्वार्थाने वेगळा झाला असेल याची खात्री वाटते. आपण प्रेक्षक फक्त कल्पनेतच या चित्रपटातील अमिताभ आणि कमलहसन यांच्या अभिनयाचा विचार करू शकतो.

तर अशी हि अमिताभच्या दुसऱ्या बाबू मोशाय ची पडद्यावर न आलेली कहाणी.

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.