अमिताभ बच्चनचा रोल कापून शशी कपूरने त्याच्यावर उपकारच केले

एखाद्याचं यश डोळ्यात खुपणारी अनेक माणसं झगमगत्या इंडस्ट्रीत बघायला मिळतात. एकएक सिनेमा मिळवण्यासाठी असलेली स्पर्धा इतकी वाढत चालली आहे की, एकमेकांचे पाय ओढणारे आणि दुसऱ्याला नाउमेद करणारी असंख्य माणसं या इंडस्ट्रीत पाहायला मिळतात.

परंतु भिडूंनो, अशीही काही माणसं बॉलिवुडमध्ये होती जी एकमेकांची प्रशंसा करायचे. खुल्या दिलाने आणि मोकळ्या मनाने एकमेकांच्या कामाचं कौतुक करायचे. दुसऱ्याचं नेहमी चांगलं व्हावं, अशी त्यांची कायम इच्छा असायची.

असाच एक माणूस बॉलिवुडमध्ये होऊन गेला तो म्हणजे शशी कपूर.

मग इतक्या चांगल्या माणसाने अमिताभ बच्चनचा रोल कापायला का लावला? नेमकं झालं काय होतं?

वडिल पृथ्वीराज कपूर यांच्या अभिनयाचा वारसा कपूर भावंडं पुढे चालवत होते. राज, शम्मी नंतर आलेला काहीसा वेगळा, मनस्वी असा शशी कपूर.

इंग्रजीमध्ये एक शब्द आहे जन्टलमेन. एकदम सुसंस्कृत, व्यवस्थित राहणारा, नीट वागणारा , बोलणारा. ज्याचं व्यक्तिमत्त्व चार – चौघांमध्ये उठून दिसेल असा जन्टलमेन माणूस. शशी कपूर हे राहणीमान आणि स्वभाव दोन्ही गोष्टींमध्ये जन्टलमेन होते.

शशी कपूर हळूहळू सिनेमात स्थिरावत होते. केवळ बॉलिवुड नव्हे तर परदेशी सिनेमांमध्ये सुद्धा झळकत होते.

दुसऱ्या बाजूला अमिताभ बच्चन हिंदी सिनेमांमध्ये काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करत होते. अमिताभचा ‘सात हिंदुस्तानी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यादरम्यान अमिताभची शशी कपूर सोबत ओळख झाली. दोघांमध्ये हळूहळू मैत्री वाढत होती.

शशी कपूर जिथे शूटिंग करत असेल तिथे काम मिळण्याच्या आशेने अमिताभ रोज शशी कपूरला भेटायला जायचे.

शशी सुद्धा अमिताभची विचारपूस करायचा. त्याच्यासोबत गप्पा मारायच्या. या दोघांच्या हळूहळू वाढत जाणाऱ्या मैत्रीमध्ये एक समान धागा होता तो म्हणजे दोघांच्या वडिलांचा. कारण पृथ्वीराज कपूर आणि हरिवंशराय बच्चन हे एकमेकांचे हितचिंतक होते. त्यामुळे या दोघांच्या मुलांमध्ये सुद्धा मैत्री वाढत होती.

अमिताभ काम मिळवण्यासाठी इथे तिथे फिरायचा.

वय वाढत जात असताना घरी पैसे मागणं हे आपल्याला काहीसं विचित्र वाटतं. अमिताभचं सुद्धा तसंच काहीसं झालं होतं. त्यामुळे शूटिंगच्या ठिकाणी जाऊन काही काम मिळालं तर थोडेफार पैसे सुटतील, अशी अमिताभची भावना होती.

एकदा अमिताभ नेहमीप्रमाणे शशी कपूरला भेटण्यासाठी एका ठिकाणी शूटिंगला गेला. शशी त्यावेळी इस्माईल मर्चंट यांच्या एका सिनेमाचं शूटींग करत होते. सीन करायचा असल्याने अमिताभ भेटायला आलाय, हे त्यांच्या लक्षात आलं नाही.

एका श्रद्धांजली सभेचा शॉट सुरू होता. दिग्दर्शकाला लोकांची गर्दी आवश्यक होती. या गर्दीमध्ये उभ्या असणाऱ्या लोकांना थोडेफार पैसे सुद्धा देण्यात येणार होते.

अमिताभला हे कळताच कोणताही विचार न करता तो गर्दीत जाऊन उभा राहिला.

सिनची सर्व तयारी झाली. इतक्यात शशी कपूर यांची नजर गर्दीत उभे असलेल्या अमिताभवर गेली. शशी कपूर यांनी चालू असलेला सीन थांबवला. अमिताभजवळ जाताच शशी जवळजवळ अमिताभला ओरडला,

“अमित, काय करतोयस तू. ही अशी कामं करणं तुझ्या करियरसाठी धोक्याचं आहे. तू अशा गर्दीत उभा राहू नकोस.”

अमिताभने ‘मला सध्या पैशांची गरज आहे. त्यामुळे मला हा सीन करण्यात कोणतीही लाज वाटत नाहीय’, असं शशीला सांगितलं.

“हे बघ अमित, पैसे हवे असतील तर माझ्याकडे माग. पण असं काम करू नकोस. तुला खूप पुढे जायचं आहे.”

शशीने अमिताभला समजवायचा प्रयत्न केला. परंतु अमिताभ स्वाभिमानापोटी स्वतःच्या म्हणण्यावर अडून राहिला. अखेर शशीने हार मानली.

अमिताभ त्या सिनमध्ये गर्दीत जाऊन उभा राहिला.

सीन संपल्यावर अमिताभला त्याचे काही पैसे मिळाले. ते पैसे घेऊन अमिताभ निघून गेला. शशी कपूरला अमिताभच्या क्षमतेविषयी खात्री होती. आणि पैशांसाठी असे रोल करून अमिताभ स्वतःचं करियर धोक्यात घालतोय, हे सुद्धा शशी कपूर जाणून होता. अमिताभ गेल्यावर शशी कपूर सिनेमाच्या दिग्दर्शकाजवळ आले म्हणाले,

“तो जो मुलगा मगाशी या सिनमध्ये गर्दीत उभा होता त्याचा रोल तुम्ही एडिटिंग मध्ये कापा. सिनेमात त्या गर्दीत तो दिसता कामा नये.”

शशी कपूर तेव्हाचे स्टार असल्याने दिग्दर्शकांनी त्यांचं म्हणणं मान्य केलं.

अमिताभला त्यावेळेस शशी कपूर यांचं म्हणणं कळालं नाही. पण कालांतराने ‘शशी कपूर त्यावेळी तसं काम करू देण्यास मला का मनाई करत होते’, याची जाणीव अमिताभला झाली. पुढे या शशी – अमिताभ या दोघांच्या जोडीने ‘शान’, ‘दिवार’ यांसारखे अनेक हिट सिनेमे बॉलीवूडला दिले.

स्ट्रगलच्या काळात शशी कपूरने केलेली मदत आणि दिलेली शिकवण अमिताभ बच्चन विसरले नाहीत.

अमिताभला खूप पुढे जायचं आहे, हे त्यावेळी ओळखून वेळोवेळी मोठ्या भावासारखे त्याच्या पाठीशी उभे असणारे शशी कपूर खरंच ग्रेट होते. कारण जिथे क्षणाक्षणाला स्पर्धा असते, अशा वातावरणात दुसऱ्याचं चांगलं व्हावं, अशी भावना बाळगणारे शशी कपूर सारखे कलाकार सापडणं दुर्मिळ.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.