संजय शिरसाटांना तत्काळ एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला आणलंय; पण सामान्यांना ती परवडते का ?

कधी एखाद्या राजकीय किंवा प्रसिद्ध व्यक्तीच्या प्रकृतीची बातमी येते तेव्हा त्यांना एअर ॲम्ब्युलन्सद्वारे एका शहरातून दुसऱ्या शहरात हलवण्यात आल्याचे ऐकायला मिळते. आज सकाळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला.

त्यानंतर संजय शिरसाट यांना औरंगाबादहून एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

त्याआधी सुद्धा आपण बऱ्याचदा एअर अ‍ॅम्ब्युलन्स बद्दल ऐकल असेल, तीन महिन्यांपूर्वी आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्ली एम्समध्ये रुग्णालयात नेण्यात आले होते.

अशात ही एअर ॲम्ब्युलन्स म्हणजे काय आणि अल्पावधीत रुग्णाला एका शहरातून दुसऱ्या शहरात कसे हलवले जाते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मग ही एअर ॲम्ब्युलन्स सर्व सामान्यांना परवडणारी आहे का ? तिची बुकिंग कशी होते, यासाठी सरकारी कंपन्या आहेत की खासगी कंपन्यांच्या माध्यमातूनही बुकिंग करता येते ? हे जाणून घेऊयात…

एअर ॲम्ब्युलन्स काय असते

प्राथमिक वैद्यकीय सुविधा असलेले विमान किंवा हेलिकॉप्टर एका शहरातून दुसऱ्या शहरातील रुग्णालयात कमीत कमी वेळेत नेण्यासाठी वापरले जाते, याला एअर अ‍ॅम्ब्युलन्स असे म्हणतात. म्हणजेच एअर ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णाला विमान किंवा हेलिकॉप्टरद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवले जाते. यासोबतच विशेष बाब म्हणजे या प्रकारच्या ॲम्ब्युलन्समध्येही विशेष तंत्रज्ञान असून रुग्णाबाबत अशा अनेक सुविधा आहेत, ज्यामुळे रुग्णाला शेवटच्या क्षणी सुद्धा वाचवता येते.

एअर ॲम्ब्युलन्समध्ये आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला वाचवण्यासाठी अनेक तंत्रे असतात. ऑक्सिजन, रक्त पातळ करणाऱ्या उपकरणांची सुद्द्धा सोय त्यात असते. एअर ॲम्ब्युलन्समध्ये श्वास घेण्यास त्रास झाल्यास रुग्णाला श्वसनाची यंत्रे दिली जातात. यात पेसमेकर, ऑक्सिजन, ब्लड थिनर, मॉनिटरिंग या सिस्टिमचा देखील समावेश असतो. याशिवाय गरज भासल्यास रुग्णाच्या अनुषंगाने इतर उपकरणे जोडता येतात आणि ती रुग्णालयाच्या वॉर्डाप्रमाणे काम करतात.
त्याची बुकिंग कशी करतात

एअर ॲम्ब्युलन्स अनेक प्रकारे बुक केले जाऊ शकते.

बर्‍याच एअरलाईन्स  जश्या की इंडिगो, एअर इंडिया ही सुविधा देतात आणि तुम्ही फ्लाइटमध्ये असलेल्या पेशंटसाठी ती बुक करू शकता, ज्यामध्ये तशा सुविधा दिलेल्या असतात. यासाठी अनेक कंपन्या आहेत ज्या एअर ॲम्ब्युलन्स बुक करण्याचे काम करतात. यासाठी तुम्ही या कंपन्यांशी संपर्क साधू शकता, जे रुग्णाची त्यावेळची स्थिती लक्षात घेऊन एअर ॲम्ब्युलन्स बुक करतात.

यामध्ये खासगी स्तरावरही बुकिंग करता येऊ शकते. त्याचबरोबर सरकारी एअर ॲम्ब्युलन्स बुक करायची असेल तर त्यासाठी हॉस्पिटल आणि जिल्ह्याच्या कलेक्टरशी बोलावे लागते. त्यांच्याशी बोलल्यानंतर सद्यस्थितीच्या आधारे रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. याशिवाय डोंगराळ भागात किंवा दुर्गम भागात कुठेतरी नैसर्गिक अपघात झाला, तर त्या परीस्थितीत सुद्धा सरकारकडून एअर ॲम्ब्युलन्स बुक केल्या जातात.

एअर ॲम्ब्युलन्सच्या बुकिंगच्या स्टेप्स कोणत्या असतात.

सगळ्यात आधी एअर ॲम्ब्युलन्सचे हॉस्पिटल किंवा कंपनी यांच्या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधायचा. त्यांच्या कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हला रुग्णाच्या आजाराची आणि सध्य स्थितीची संपूर्ण माहिती द्यावी लागते, जेणेकरून ते लवकरात लवकर आपल्यापर्यंत सेवा पोहचवू शकतील.

त्यांची एक टिम आपण सांगितलेल्या परिस्थितीचे विश्लेषण करेल आणि सेवेच्या किंमतीसह काही आवश्यक माहिती देईल. ती टीम आपत्कालीन व्यवस्थापन युनिटला अलर्ट पाठवेल आणि एअर अ‍ॅम्ब्युलन्स पाठवण्यास सांगेल. शेवटी एअर अ‍ॅम्ब्युलन्स लवकरात लवकर रुग्णापर्यंत पोहोचेल आणि रुग्णाला रुग्णालयात दाखल करेल.

साधारण ५-६ लाखांच्या घरात खर्च जातो

एअर ॲम्ब्युलन्सची किंमत अनेक गोष्टींवर अवलंबून असते. एअर ॲम्ब्युलन्स बुक करण्यासाठी साधारणता ५-६ लाख किंवा त्याहूनही अधिक खर्च येतो. पण आपण कोणत्या प्रकारची सुविधा घेतोय आणि आपल्याला किती लवकर सुविधा पाहिजे आहे आणि घर ते रुग्णालय यामध्ये किती अंतरासाठी रुग्णवाहिका पाहिजे आहे, यावर तो खर्च अवलंबून असतो.

मात्र हा ५-६ लाखां खर्च देखील नियंत्रणात आणता युई शकतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या आरोग्य विम्याच्या कव्हरमध्ये ॲम्ब्युलन्सचा समावेश आहे का हे बघून तो ऍड करू शकता. दुसरं म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमच्या घरात कोणी आजारी आहे आणि त्याला कधीही ॲम्ब्युलन्सची गरज लागू शकते असं वाटत असेल तर तुम्ही बुक एअर ॲम्ब्युलन्ससारख्या या वेबसाइटवरून वर्षाला ३०,००० ते फॅमिलीसाठी ६०,०००च्या आसपास जाणार सब्स्क्रिप्शन देखील घेऊ शकता.

नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी मार्च 2022 मध्ये लोकसभेत दिलेल्या माहिती नुसार देशात महाराष्ट्रात ५ एअर ॲम्ब्युलन्स आहेत. एअर ॲम्ब्युलन्सच्या सर्वात जास्त उपयोग हा अपघातानंतर किंवा हृदयविकाराचा झटका आला नंतर ‘गोल्डन हावर’ यामध्ये रुग्णाला इस्पितळात पोहचवण्यासाठी अतिशय उपयोगी ठरतो त्यामुळे अशा ॲम्ब्युलन्सच्या जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी जाणकारांकडून केली जाते.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.