दोन सरकारी विभागांमधला वाद थांबला असता, तर कदाचित रिषभ पंतचा अपघात झाला नसता

भारताचा क्रिकेटर रिषभ पंतचा फोर व्हीलरनं देहराडूनला जाताना अपघात झाला, या अपघातात त्याची कार जळून खाक झाली आणि रिषभचा जीव अगदी थोडक्यात वाचला. या अपघातानंतर रिषभवर देहराडूनमधल्याच मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते, मात्र आता आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर त्याला एअर ऍम्ब्युलन्सनं मुंबईच्या कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं.

पंत आता धोक्याबाहेर असल्याचंही जाहीर झालंय, पण चर्चा रंगतीये ती पंतच्या अपघाताच्या कारणांची.

सुरुवातीला एक कारण पुढं आलं ते म्हणजे, पंतला गाडी चालवताना झोप लागल्यानं त्याचा ऍक्सीडेन्ट झाला. दुसरं कारण पुढं आलं की खड्डा चुकवण्याच्या नादात पंतची गाडी डिव्हाईडरवर चढली. एका बाजूला अशी सगळी कारणं कानावर येत असताना, आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

जर दोन सरकारी विभागांमध्ये असलेला वाद संपुष्टात आला असता, तर कदाचित रिषभ पंतचा अपघात झालाच नसता, असा दावा स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात येतोय. इरिगेशन डिपार्टमेंटचा एक छोटा कॅनल पंतच्या अपघाताचं निमित्त ठरला असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

पंतचा अपघात झाला NH58 वर. पण जिथं अपघात झाला तो भाग होता हरिद्वार जिल्ह्यातल्या मंगलोर कोतवाली भागात नरसन पोलिस स्टेशनच्या समोर. असं सांगण्यात येतं की बाकीच्या हायवेपेक्षा या विशिष्ट भागातल्या रस्त्याची रुंदी काहीशी कमी आहे आणि यामागचं कारण म्हणजे इथं असलेला कॅनल. हा कॅनल हायवेमध्ये २ मीटरनं आत आहे, त्यामुळं इतर ठिकाणी असलेली हायवेची २० मीटर रुंदी या स्पॉटला मात्र कमी होते.

जेव्हा दिल्लीतून मोठ्या हायवेची सवय झालेले ड्रायव्हर्स या स्पॉट वर येतात तेव्हा त्यांना अरुंद जागा आणि स्पीडमुळं गाडी कंट्रोल करणं अवघड जातं आणि अपघात होतात.

पंतही याच स्पॉटवर जोरात आला आणि समोर असलेला मातीचा ढिगारा चुकवायला गेला, मात्र या स्पॉटची रुंदी आणि गाडीचा स्पीड हे गणित जुळून आलं नाही आणि पंतची गाडी डिव्हाईडर वर चढली.

याआधीही याच स्पॉटवर अनेक अपघात झाले आणि पाटबंधारे विभाग आणि नॅशनल हायवेज ऑथॉरीटी ऑफ इंडिया (एनएचएआय) या दोन सरकारी विभागांमधला वाद त्यासाठी जबाबदार आहे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

पण नेमका हा वाद काय आहे आणि पंतच्या अपघाताला कोणता विभाग जबाबदार आहे ?

हायवेच्या बांधकामाची जबाबदारी असते ‘एनएचएआय’वर. एनएचआयचे टेक्निकल विंग ऑफिसर राघव त्रिपाठी माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘हायवेचं बांधकाम सुरु होण्यापासून पूर्ण होईपर्यंत प्रत्येकवेळी पाटबंधारे विभागासोबत कॅनल शिफ्ट करण्याबाबत चर्चा झाली होती, पत्रव्यवहारही झाला होता मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. पाटबंधारे विभागानं हे गंभीरपणे घेतलं नाही, त्यामुळेच रस्ता छोटा राहिला आणि अपघातासारख्या घटना घडल्या.’

पण हेच दुसऱ्या बाजूला एनएचएआय वरही टीका होत आहे. 

स्वतः रिषभ पंतनं आपण अपघाताआधी खड्डा चुकवायचा प्रयत्न केला अशी माहिती दिली. तर त्याच्या अपघातानंतर एनएचएआयनं त्या स्पॉटवरचे खड्डे बुजवले आणि सोबतच रस्त्याला रिफ्लेक्टरही लावले. त्यामुळं जर कॅनलमुळं अपघात झाला असला, तर अपघाताआधी खड्डे का बुजवण्यात आले नव्हते आणि रिफ्लेक्टर्स का लावण्यात आले नव्हते असा सवाल आता नागरिकांकडून केला जातोय.

याआधीही याच स्पॉटवर अनेक अपघात घडले असून, कित्येकांना आपला जीवही गमवावा लागला आहे अशी माहिती स्थानिकांनी माध्यमांशी बोलताना दिली. सुदैवानं रिषभ पंतचा जीव वाचला असला, तरी जर जबाबदारी ढकलण्याऐवजी पाटबंधारे विभाग आणि एनएचएआय यांच्यात समन्वय असता तर त्याचा आणि त्याच्या आधीही अनेकांचा अपघात झाला नसता आणि कित्येक जीवही वाचले असते, अशी चर्चा सध्या आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.