सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या तपासाचं काय झालं ?

वी वॉन्ट जस्टीस, रेस्ट इन पीस सुशांतसिंग राजपूत. हे शब्द आणि अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा फोटो, असे बॅनर्स शनिवारी सकाळी मुंबईत अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. या बॅनरची चर्चा झाली, ती बॅनर लावायच्या टायमिंगमुळे.

एका बाजूला मुंबईत ठाकरे गटाकडून पालिकेवरच्या मोर्चाची जोरदार तयारी सुरु होती, शाखांना ऍक्टिव्हेट करण्यापासून भाजपविरोधात काटेकोर रणनीती आखणं सुरु होतं, हे सगळं घडत होतं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात.

मात्र त्याचवेळी चर्चेत आले, सुशांतसिंगला न्याय द्या म्हणणारे बॅनर. पुन्हा एकदा डोकं वर काढलं सुशांत सिंगच्या मृत्यूच्या प्रकरणानं, ज्यात सहभागी असल्याचे आरोप आदित्य ठाकरेंवर आजही होतात.

मुंबईत निघणाऱ्या मोर्चाची वातावरण निर्मिती सुरु असतानाच, सुशांतसिंग प्रकरणाचा मुद्दा चर्चेत आला तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीनंतर. 

रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी, ‘सुशांतसिंग प्रकरणात महत्त्वाचे पुरावे हाती लागले असून त्यांची विश्वासहर्ता तपासली जात आहे.’ असं विधान केलं. सोबतच सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सॅलियनच्या मृत्यूप्रकरणातही जवाब नोंदवले जात आहेत असं सांगितलं.

त्यानंतर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनीही, ‘आदित्य ठाकरेंना माहीत आहे आपला उद्याचा मुक्काम जेलमध्ये असणार आहे.’ असं विधान केलं आणि साहजिकच सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं.

पण सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या तपासाचं नेमकं काय झालंय ? या केसमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव कसं काय आलं ?

१४ जून २०२० ला आपल्या वांद्रे इथल्या घरात सुशांत सिंग राजपूत मृतावस्थेत आढळला होता. तेव्हा स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत, बॉलिवूड स्टार्स, निर्माते, दिग्दर्शक यांचे स्टेटमेंट्स नोंदवले. २४ जून २०२० ला आलेल्या तेव्हाच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार ही आत्महत्या असल्याचा खुलासा झाला होता. मात्र सुशांतच्या मेव्हण्यानं हत्येचा संशय व्यक्त केल्यानं पोलिसांकडून चौकशी सुरुच होती.

सोशल मीडियावरही #justiceforSSR असे ट्रेंड्स सुरु करत, सुशांतला न्याय मिळावा अशी मागणी त्याच्या चाहत्यांकडून केली जात होती.

त्यानंतर २८ जुलैला सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली, ईडीनंही रियावर मनी लॉन्डरिंगची केस दाखल केली. त्यानंतर बिहार सरकारनं या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी अशी मागणी केंद्राकडे केली, जी केंद्रानं मान्यही केली आणि तेव्हा या प्रकरणात एंट्री झाली ती सीबीआयची.

सीबीआयनं रियाला मुख्य आरोपी करत गुन्हा दाखल केला, रियानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली, पण सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाच्या तपासाचा चार्ज मुंबई पोलिसांकडून काढत सीबीआयकडे दिला. या सगळ्यात एनसीबीही आली आणि ड्रग्स प्रकरणात त्यांनी रियाला अटक केली. मात्र या प्रकरणाला कलाटणी मिळाली, ती ३ ऑक्टोबर २०२० ला.

कारण दिल्ली एम्सच्या फॉरेन्सिक टीमनं, ‘सुशांतच्या मृतदेहावर कुठल्याच खुणा किंवा जखमा आढळल्या नाहीत, सुशांतचा मृत्यू ही आत्महत्येचीच घटना आहे,’ असं स्पष्ट केलं.

सुशांतच्या मृत्यूसोबतच तपास यंत्रणा, त्याची एक्स मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या मृत्यू प्रकरणाचाही तपास करत होत्या. दिशाचा मृत्यू ८ जून २०२० म्हणजेच सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच झाला होता. पण मुंबई पोलिसांनी दिशा सॅलियनचा दारूच्या नशेत उंचावरुन तोल गेल्यानं मृत्यू झाला असं  स्पष्ट केलं होतं. ईडी, एनसीसीबी आणि सीबीआय अशा तीन तपास यंत्रणांवर सुशांतच्या मृत्यूच्या चौकशीची जबाबदार होती. यात ईडीला मनी लॉन्डरिंग प्रकरणात काहीच सापडलं नाही. एनसीबीनं एकूण ३३ जणांवर चार्ज फ्रेम करत त्यांच्याविरोधात १२ हजार पानांचं चार्जशीट दाखल केलं होतं, मात्र त्यांनाही ठोस पुरावे सापडले नाहीत.

यात सगळ्यात जास्त लक्ष होतं, सीबीआय तपासात काय समोर येतंय याकडे.

पण सीबीआयनं आतापर्यंत सुशांतसिंग राजपूत प्रकरणात कुणालाही अटक केलेली नाही, इतकंच नाही तर सीबीआयनं या प्रकरणात चार्जशीटही दाखल केलेली नाही. २०२१ मध्ये सीबीआयनं या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला आहे याचा खुलासा करावा म्हणून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती,  कोर्टानं ही याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्यानं गरज असल्यास हायकोर्टात दाद मागावी असे निर्देश दिले.

थोडक्यात सुशांतच्या मृत्यूला ३ वर्ष उलटून गेली तरी सीबीआयनं ना चार्जशीट दाखल केली आहे आणि ना केस क्लोज केली आहे. लेटेस्ट माहिती द्यायची झाली तर, सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘सुशांतनं डिलीट केलेल्या ईमेल आणि चॅट्सचे डिटेल्स आम्ही गुगल आणि फेसबुक या कंपन्यांकडे मागितले आहेत. त्यांच्याकडून आलेल्या टेक्निकल पुराव्यांच्या आधारे तपास केला जाईल.’

डिसेंबर २०२२ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणात एसआयटी स्थापन करणार असल्याचे आदेश दिले. 

आतापर्यंत ईडी, एनसीबी आणि सीबीआय या तिन्ही तपास यंत्रणांनी केलेल्या तपासात एकदाही आदित्य ठाकरे यांचा उल्लेख झालेला नाही, मग तरीही सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा उल्लेख झाला की आदित्य ठाकरेंचं नाव कसं काय पुढं येतं ?

या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला आणखी एक टाइमलाईन बघावी लागेल, ती या प्रकरणात आदित्य ठाकरेंवर होणाऱ्या आरोपांची.

आदित्य ठाकरेंचं नाव या प्रकरणात चर्चेत आलं ते सोशल मीडियावरुन. सुशांतच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी त्याच्या घरात पार्टी झाली होती, त्या पार्टीला एका मिनिस्टरचा मुलगा उपस्थित होता. पार्टीत त्याची आणि सुशांतची बाचाबाची झाली आणि नेमके त्याचवेळी सीसीटीव्ही बंद करण्यात आले होते, असे दावे सोशल मीडियावरुन करण्यात आले. सोबतच दिशाच्या मृत्यूची माहिती सुशांतला होती, तिची हत्या कुणी केली हे समोर येऊ नये म्हणून सुशांतचा खून करण्यात आला, अशा थेअरीजही सोशल मीडियावर आल्या.

रिया चक्रवर्तीनं सुशांतच्या मृत्यूनंतर ‘AU’ नावानं सेव्ह असलेल्या कॉन्टॅक्टला ४४ वेळा फोन केला अशी माहितीही समोर आली. हे AU कनेक्शन आदित्य ठाकरेंशी जोडण्यात आलं. अभिनेत्री कंगना राणावतच्या टीमकडूनही सोशल मीडियावर सुशांत आणि दिशाच्या मृत्यूमागे आदित्य ठाकरे आहेत, अशी टीका त्यांचं नाव न घेता सोशल मीडियावरून करण्यात आली.

एका बाजूला आदित्य ठाकरेंवर सोशल मीडियावरून आरोप होत होते आणि दुसऱ्या बाजूला भाजप नेत्यांकडून.

ज्याची सुरुवात झाली आमदार नितेश राणे यांच्यापासून.

नितेश राणेंनी दिशा सॅलियनचा मृत्यू कसा झाला हे आपल्याला माहीत आहे, ती ज्या पार्टीत सहभागी झाली होती त्या पार्टीत एक मोठा नेताही सहभागी झाला होता. दिशाच्या होणाऱ्या पतीलाही याबाबत माहीत आहे, मग तरीही तो गप्प का असा सवाल केला होता.

तर नारायण राणेंनी ४ ऑगस्ट २०२० ला पत्रकार परिषद घेत, सुशांत सिंगचा मृत्यू ही आत्महत्या नसून, हत्या आहे. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकार कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका केली. 

आदित्य ठाकरेंवर राज्यातल्या नेत्यांकडून आरोप व्हायला लागले, तेव्हा बिहार भाजपच्या नेत्यांनीही आदित्य ठाकरे यांनी मौन का बाळगलं आहे ? असा सवाल केला. आदित्य ठाकरेंनी आपला या प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचं ट्विट करून सांगितलं, तेव्हा नितेश राणेंनी आदित्य ठाकरे हिटविकेट झाल्याचा आरोप केला.

पण खरं घमासान झालं नोव्हेंबर २०२१ मध्ये, जेव्हा नारायण राणेंनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली.

ज्यात ते म्हणाले, ‘सुशांतसिंग राजपूतला त्याच्या बाथरुममध्ये मारण्यात आलं, याबद्दलचा पुरावा मी स्वतः दिलाय, यात कुणाचा सहभाग आहे त्या व्यक्तीचं नावही मी सांगितलंय. मात्र त्या संदर्भात कोणतीही अटक केली जात नाहीये कारण ते मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत.’ साहजिकच त्यांनी थेट आदित्य ठाकरेंनाच फैलावर घेतलं. ज्यामुळं सुशांतसिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव वारंवार घेतलं जाऊ लागलं. पण दिल्ली एम्सच्या फॉरेन्सिक रिपोर्टनंतर सीबीआयच्या तपासावर मर्यादा आल्या होत्या.

त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि आदित्य ठाकरेंचं मंत्रीपद गेलं. 

पण शिंदे-फडणवीस सरकारनं २०२२ च्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सुशांत सिंग राजपुत आणि दिशा सॅलियन केसचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा सीबीआय तपास कुठवर आला असा सवाल केला, त्यानंतर शिंदे गट आणि भाजपच्या खासदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ‘Au कौन है’ असे फलक घेऊन आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन केलं.

त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत आणि दिशाच्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होईल आणि त्यानंतर सत्य बाहेर येईल अशी घोषणा केली.

या सगळ्यात सुशांतचे वडील केके राजपूत यांनी २४ डिसेंबर २०२२ ला सुशांतच्या मृत्यूप्रकरणात उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांचा सहभाग आहे. आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी केली.

थेट सुशांतच्या वडिलांनीच नाव घेतल्यानं या प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं. सोबतच आमदार नितेश राणे यांनी दिशा आणि सुशांतची प्रकरणं इंटरलिंक आहेत, यातले तपास अधिकारी का बदलण्यात आलेत असे सवाल करत आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी केली. या सगळ्या चर्चांना बळ मिळालं ते २६ डिसेंबर २०२२ ला. सुशांतच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करताना उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्यानं सुशांतच्या अंगावर जखमा होत्या आणि त्या पोस्टमार्टमचं रेकॉर्डिंग झालं नव्हतं असा आरोप केला होता.

थोडक्यात सोशल मीडियावर झालेल्या चर्चा, AU नावाचा एक कॉन्टॅक्ट आणि राणे कुटुंबीय आणि सुशांतसिंगच्या वडिलांनी केलेले आरोप यामुळं आदित्य ठाकरेंचं नाव या प्रकरणात चर्चेत आलं. त्यात मुंबईत तपासासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांनी लॉकडाऊनच्या नियमांनुसार क्वारंटाईन करण्यावरुनही तेव्हा विरोधात असलेल्या भाजपनं महाविकास आघाडीला घेरलं होतं. उद्धव ठाकरेंनी सत्तेचा वापर करुन आपल्या मुलाला खुनाच्या आरोपात पाठीशी घातलं असा आरोपही करण्यात आला होता. 

आदित्य ठाकरेंची बॉलिवूडशी असलेली मैत्री, त्यांचं पेज थ्री नेतृत्व या गोष्टी हायलाईट करुन ठाकरेंना अडकवत इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून झाला, ज्यामुळं आदित्य ठाकरेंविरोधात पर्सेप्शन बिल्ड होण्यात मदत झाली, असं सांगितलं जातं. मात्र या प्रकरणात कुठल्याच तपास यंत्रणांकडून आदित्य ठाकरेंचं नाव आजवर पुढं आलं नाही, हे सुद्धा सत्य आहे. 

आता शिंदे-फडणवीस सरकारनं ग्रीन सिग्नल दिलेल्या एसआयटीच्या तपासात काय पुढं येणार, यावर सुशांतसिंग प्रकरण आणि त्यात आदित्य ठाकरेंचा सहभाग आहे की नाही याचा खुलासा होणं अपेक्षित आहे.

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.