मध्यधुंद माणसाकडून लघुशंका, मुख्यमंत्र्यांची माफी, मध्यप्रदेशचं पूर्ण प्रकरण असंय…

मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओत एक मुजोर व्यक्ती एका आदिवासी मजूरावर लघुशंका करताना दिसत होती. सोशल मीडियातून या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. राजकारणही तापलं, अगदी काँग्रेस नेते राहुल गांधींनीही या प्रकरणावरुन मध्यप्रदेश सरकारला धारेवर धरलं.

मग मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्या व्हिडिओची दखल घेतली आणि कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. ज्या व्यक्तीच्या अंगावर, चेहऱ्यावर, डोक्यावर लघुशंका करण्यात आली त्या व्यक्तीला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या घरी बोलावलं. त्याला हार घातला, त्याची आरती केली, त्याचे पाय धुतले, त्याच्यासोबत नाष्ताही केला आणि वृक्षारोपणही केलं.

दुसरीकडे ज्या व्यक्तीनं हे घाणेरडं कृत्य केलं, त्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आली, पण हे संपूर्ण प्रकरण आहे काय ? हेच जाणून घेऊयात.

नेमकं काय घडलं ? आणि कसं घडलं ?

आदिवासी समाजातील पीडित दशमत रावत हा सीधी जिल्ह्यातील कुबरी बाजार या परिसरातील रहिवासी… २ मुलं, १ मुलगी आणि पत्नी असं दशमतचं कुटुंब. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दशमत बाजारात पोते उचलायचा, मजूरीचं काम करायचा.

४ जुलै २०२३ ला दररोजप्रमाणे दशमत आपल्या घरातून कामासाठी बाहेर पडला. पण त्या रात्री तो घरीच आला नाही, उलट ४ जुलैच्या दुपारपर्यंत एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यात एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत दशमतच्या चेहऱ्यावर लघुशंका करताना दिसत होती.

या व्हिडिओवर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. आपल्या कामासाठी घराबाहेर पडलेल्या दशमतला मात्र याची खबर नव्हती. अखेर दुपारी ४ वाजता पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची दखल घेतली.

४ जुलैच्या संध्याकाळीच पोलिसांनी पीडित दशमतला ताब्यात घेतलं. दशमतला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दशमतच्या पत्नीला कळल्यानंतर ती घाबरली. तिकडे पोलिसांनी दशमतचा जबाब नोंदवून घेतला. तोपर्यंत दशमतच्या चेहऱ्यावर लघुशंका करणारा आरोपी प्रवेश शुक्ला हा भाजपचा सक्रिय कार्यकर्ता तसंच सीधीचे आमदार केदारनाथ शुक्ला यांचा निकटवर्तीय असल्याचं समोर आलं. त्याच रात्री पोलिसांनी आरोपी प्रवेश शुक्लाला अटक केली आणि त्यालाही पोलिस ठाण्यात आणलं.

दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ जुलैला पीडित दशमतला प्रशासनाच्या देखरेखीतच ठेवण्यात आलं. तिकडे दशमतची पत्नी व मुलं दशमत घरी न आल्याने घाबरली होती. आरोपी प्रवेश शुक्लाच्या घरावर अधिकाऱ्यांनी सकाळीच बुलडोझर नेला. प्रवेश शुक्लाच्या घराचं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं.

प्रवेश शुक्लावर एनएसए कायद्यांतर्गत तसंच एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आलीये.

दशमतसोबत घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि लगेचच यावरुन राजकारण पेटलं…

पीडित दशमत हा आदिवासी समाजातील असल्याने व आरोपी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याने हे प्रकरण चिघळलं होतं. देशातील विरोधी पक्षातल्या मोठ्या नेत्यांनी मध्य प्रदेश सरकारला या प्रकरणावरून धारेवर धरलं. काँगेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी व बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी या प्रकरणावरुन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर टीका केली.

तर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ शिवराजसिंह चौहान यांच्यावर टीका करताना म्हणाले, ‘‘सत्तेचा नशा भाजप नेत्यांना इतका चढलाय की ते माणसाला माणूस समजत नाहीयेत, ही घटना आदिवासींच्या अस्मितेवर प्रहार करणारी आहे.’ यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी तात्काळ कारवाईचे आदेश तर दिलेच, पण सोबतच दशमतला भेटण्याची इच्छाही व्यक्त केली.

४ आणि ५ जुलैचा पुर्ण दिवस दशमत प्रशासनाच्या देखरेखीतच होता. ५ जुलैच्या रात्री दशमतला भोपाळला नेण्यात आलं. सीधी ते भोपाळ असा ६०० किमीचा प्रवास करत दशमत अखेर मुख्यमंत्र्याच्या घरी पोहोचला.

६ जुलैच्या सकाळी दशमत मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचला तेव्हा स्वतः मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे दशमतच्या स्वागतासाठी दारात आले.

त्यांनी दशमतला हार घातला तसंच शाल व श्रीफळ देऊन त्याचं स्वागत केलं. त्याचे पाय धुतले व त्याची आरतीही केली. दशमतसोबत नाष्ता केला. या सगळ्याचं व्हिडिओ रेकोर्डिंगही करण्यात आलं.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘झालेल्या घटनेनं मी दुःखी आहे. माझ्यासाठी जनता ईश्वर आहे. दशमतला सुदामा संबोधत आतापासून तो माझा मित्र आहे,’ असं म्हणत त्यांनी दशमतची माफी मागितली. ‘राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळतोय का?’ असंही त्यांनी दशमतला विचारलं. दशमतच्या पत्नीला फोन लावून त्यांनी तिचीही विचारपूस केली. दशमतच्या खात्यात रक्कम टाकत असल्याचं शिवराज सिंह चौहान यांनी दशमतच्या पत्नीला सांगितलं.

तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, ‘आम्हाला पैशांचा मोह नाही. माझे पती तीन दिवसांपासून घरी नाहीत. तुम्ही त्यांना लवकर घरी पाठवा. माझ्यासमोर आणा’

खरंतर दोन दिवसांपासून दशमत घरी न आल्याने त्याच्या पत्नीचा जीव कासावीस होत होता. राज्यात प्रकरण चांगलंच गाजलं होतं. काँग्रेसचे नेते दशमतच्या घरी ठाण मांडून बसले होते. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा धीर ते दशमतच्या पत्नीला देत होते.

पण ‘माझ्या पतीला लवकर घरी आणा’, एवढंच दशमतची पत्नी काँग्रेसच्या नेत्यांना आणि मीडियाला सांगत होती.

त्यातच भाजपचे आमदार केदारनाथ शुक्ला हे दशमतच्या पत्नीला भेटायला गेले. त्यांना तिथे असलेल्या महिलांनी चप्पल दाखवली. तिकडे मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि तब्बल ७२ तासांनंतर दशमत घरी पोहोचला. 

पण या सगळ्या प्रकरणाचा भाजपला राजकीय फटका बसू शकतो अशी चर्चा आहे…

दशमत सोबत हे घाणेरडं कृत्य करणारा व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता आणि भाजप आमदाराचा निकटवर्तिय आहे. ज्यामुळं भाजपला आगामी निवडणुकीत नुकसान होऊ शकतं. मध्य प्रदेशात विधानसभेच्या ४७ जागा आदिवासींसाठी राखीव आहेत. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत या ४७ जागांपैकी काँग्रेसला ३१ तर भाजपला फक्त १६ जागा जिंकता आल्या होत्या. राज्यातील आदिवासी समाज यामुळे साहजिकच नाराज होऊ  शकतो.

या प्रकरणामुळं मध्यप्रदेशमध्ये आदिवासी समाजावर होणाऱ्या अत्याचारांची आकडेवारीही चर्चेत आली आहे…

एनसीआरबीच्या अहवालानुसार अनुसुचित जाती व जमातींवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण मध्य प्रदेशात वाढलंय. एनसीआरबीच्या २०२० च्या अहवालानुसार आदिवासी व अनुसुचित जाती व जमातींवर अत्याचाराची एकूण २४०१ प्रकरणं समोर आलीयेत. आदिवासींवरील अत्याचाराच्या बाबतीत मध्य प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

त्यामुळं प्रश्न एकट्या प्रवेश शुक्लाला शिक्षा करुन सुटणार नाही, तर हे अत्याचार रोखण्यासाठी मध्यप्रदेश सरकारला ठोस पावलंही उचलावी लागणार आहेत.

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.