ठाकरे सरकारच्या काळात एकनाथ शिंदेंवर जादूटोण्याचा प्रयोग झाला होता ?

जादूगाराच्या विविध जादूच्या प्रयोगांची जशी चर्चा असते अगदी तशीच गेले काही दिवस राज्यात जादूटोण्याच्या प्रयोगांची चर्चा चांगलीच रंगली आहे. थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच जादूटोणा केल्याचा संशय सामनाच्या अग्रलेखातून हायलाईट करण्यात आला आहे.

खरंतर जून २०२२ मध्ये शिंदेंच्या नेतृत्वात राज्यात झालेलं सत्तापालट हे एखाद्या जादूच्या प्रयोगाला लाजवेल असंच होतं. पण शिंदे सरकारला सत्तेत येऊन सहा महिने पूर्ण झाल्यानंतर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मुख्यमंत्र्यांवर शंका उपस्थित करण्यात येत आहे.

आपल्या राजकीय विरोधकांवर शिंदेंचे जादूटोणा सरकार लिंबू-मिरची फिरवत आहे का, असा प्रश्न या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या गटाचे आमदार गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या मंदिरात गेले तिथे त्यांनी जादुटोण्याचे विधी केले, रेडा बळी दिल्याचेही बोलले जाते. सुप्रिया सुळेंच्या साडीने पेट घेतला. अजित पवार लिफ्ट अपघातातून बचावले. थोरात नागपूर अधिवेशनात जखमी झाले, धनंजय मुंडेंचा अपघात झाला, उद्धव ठाकरेंना वर्षा वरील अखेरच्या काळात जीवघेण्या शस्त्रक्रियेला सामोरं जावे लागले.म्हणजे महाराष्ट्रातील करणी टोळीचे अघोरी प्रयोग आधीपासून सुरू होते, असं सामनात म्हटले आहे.

या सर्व प्रकारामुळे राजकीय टोमण्यांचा हा प्रवास आता जादूटोण्यापर्यंत येऊन पोहोचला असल्याचे सध्या बोलले जात आहे. पण ज्या मुख्यमंत्री शिंदेंवर जादूटोण्यासारख्या विक्षिप्त कृत्यांचे आरोप करण्यात येत आहेत, त्या मुख्यमंत्री शिंदेंवरच महाविकास आघाडी सरकारच्या काळात जादूटोणा करण्यात आल्याची घटना घडली होती, अशी चर्चाही सुरु आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे हे राज्याचे नगरविकास मंत्री होते. माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तानुसार डिसेंबर २०२० मध्ये पालघर जिल्ह्यातील कऱ्हे तलावली भागात एकनाथ शिंदेंच्या विरोधात अघोरी पूजा करण्यात आल्याचं समोर आलं होतं.

एकनाथ शिंदे यांचा फोटो तांदळात ठेऊन त्या फोटोसमोर लॉटमध्ये उदबत्त्या जाळून, त्यावर हळद कुंकू वाहून लिंबू आणि कोंबड्याचा वापर करुन जादूटोणा करण्यात आल्याची घटना घडल्याची माहिती माध्यमांनी दिली होती. 

या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. याप्रकरणी कृष्णा बाळू कुरकुटे आणि संतोष मगरु वारडी या दोन आरोपींना जव्हार पोलिसांनी अटकही केली होती. 

या घटनेबाबत शिंदे प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की, ‘या अशा कृत्यांबाबत लोकांमध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे. जादूटोण्यासारख्या अघोरी प्रकारच्या कृत्यांनी काहीही घडत नसतं. त्यामुळे जो प्रकार घडला आहे, त्यावर पोलिस योग्य ती कारवाई करतील. त्यामुळे अशा प्रकारच्या कृत्यांवर कोणीही विश्वास ठेवण्याची गरज नाही.’

या घटनेला आता दोन वर्ष होऊन गेली आहेत. आताही असाच प्रकार घडल्याचे आरोप होते असले तरी ज्यांच्यावर जादूटोणा करण्यात आला होता, त्यांनाच आता या जादूटोणा नाट्याचे नाटककार म्हणलं जात असल्याची चर्चा आहे.  

जादूटोण्यासारख्या अघोरी कृत्यांना आळा घालण्यासाठी राज्यात कठोर कायदे आहेत. त्यामुळे सामनामधून अशा प्रकारच्या कृत्यांचे समर्थन करण्यात येत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होतोय, तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपला असल्या प्रकारांवर विश्वास नसल्याचं सांगितलंय.

त्यामुळं आता जादूटोण्याच्या प्रयोगांची ही चर्चा किती काळ रंगणार? आणि यामुळे राज्याच्या राजकारणात अजून कोणती नवी जादू पहायला मिळणार का ? हे सर्व देवी कामाख्यालाच ठाऊक…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.