रामभाऊ म्हाळगी : जनसंघाची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत जाणारे ते पहिले आमदार होते.

सत्तरच्या दशकातला काळ. जनसंघाचे चारच आमदार विधानसभेत होते. तेव्हाचे जनसंघ म्हणजे आजचे भाजप. त्यांचे नेते होते रामभाऊ म्हाळगी. त्याकाळात विधानसभा म्हणजे आजच्या प्रमाणे लढाईचा आखाडा नसायचा. एखादा आमदार बोलू लागला की बाकीचे त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायचे. सत्ताधारी हे विरोधीपक्षांना बोलू द्यायचे.

जनसंघचे संख्याबळ कमी असले तरी पुण्याहून निवडून गेलेल्या रामभाऊ म्हाळगी यांच्या अभ्यासू भाषणाचा सभागृहात दबदबा होता.

रामभाऊ म्हाळगी यांची जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत झाली. पारतंत्र्याच्या काळात केरळ येथे संघ प्रचारकाचे काम केले. १९४८ साली गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली. तेव्हा त्यांनी भूमिगत राहून या अन्यायाविरुद्ध आंदोलन केले.

जनसंघाची स्थापना झाल्यावर महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जाणारे ते पहिले आमदार होते. पुढे जनसंघचे प्रदेशाध्यक्ष बनले. महाराष्ट्रात संघाची विचारसरणी रुजवण्यात रामभाऊ म्हाळगींचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या अभ्यासूवृत्ती, सुसंस्कृतपणा, साधेपणामुळे जनसंघ, भाजप यांचे द्रोणाचार्य अशी ओळख त्यांनी मिळवली.

एकदिवस विधानसभेमध्ये रामभाऊ म्हाळगी कोणत्या तरी महत्त्वाच्या विषयावर बोलायला उभे राहिले. टाचणी पडेल तरी आवाज होईल इतकी शांतता होती. बराच वेळ भाषण चालले. अखेर सभापतींनी रामभाऊंना सांगितलं,

“रामभाऊ नियमानुसार तुम्हाला दिलेली वेळ संपली आहे. आता पुढच्या वक्त्याला बोलू द्या. “

खरं तर या नंतरचा नंबर मृणाल गोरे यांचा होता. मृणाल गोरे या हाडाच्या समाजवादी. जनसंघ आणि समाजवादी विचारसरणी हे सुरवातीपासून एकमेकांचे कट्टर विरोधक. तरीही मृणाल गोरे म्हणाल्या,

“रामभाऊ मांडत असलेला विषय महत्त्वाचा आहे माझा वेळ त्यांना द्या. माझे म्हणणे त्यांच्याहून काही वेगळे नाही.”

 सगळ्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 

राजकारणातला हा एकेकाळचा खिलाडूपणा, अभ्यासू वृत्ती आजकाल कमी होत चालली आहे. अर्थकारण आणि घराणेशाही यावर निवडणुका जिंकल्या जात आहेत. त्यामुळे बऱ्याच तरुणांना इच्छा असूनही राजकारणात प्रवेश घेता येत नाही. तरुणांच्यामधील नेतृत्वक्षमता विकसित करणे हे आपल्या सध्याच्या शिक्षणव्यवस्थेला जमलेलं नाही.

लोकशाहीमध्ये सर्वसामान्य जनता आणि राजकारण यामधले अंतर कमी व्हावे यासाठी काही तरी करावे हा विचार त्यांनी मांडला. यातूनच एका नेतृत्वविकास संस्थेची संकल्पना पुढे आली. दीनदयाळ उपाध्याय यांच्या या स्वप्नाच्या दिशेने पहिले पाउल पडायच्या आधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यानंतर ही जबाबदारी उचलली रामभाऊ म्हाळगी यांनी.

दीनदयाळ उपाध्याय यांना अभिप्रेत असणाऱ्या संस्थेची उभारणीची तयारी रामभाऊ म्हाळगी यांच्या काळात झाली. तेव्हा ते ठाणे येथून लोकसभेवर निवडून गेले होते. १९८२ साली जेव्हा ही संस्था उभी राहिली ती पाहण्याचं भाग्य रामभाऊ यांच्या नशिबातही नव्हत. तोवर त्यांचाही मृत्यू झाला होता.

रामभाऊ यांच्या स्मृतींना वंदन म्हणून या प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचे नाव देण्यात आले रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी. 

प्रमोद महाजन यांच्या काळात या संस्थेने बारसे धरले. दक्षिण मुंबईमधल्या छोट्याशा ऑफिसमधून ही संस्था भायंदर इथल्या १५ एकरच्या जागेत स्थलांतरीत झाली. त्यांच्या व्हिजनरी आणि आधुनिकतेचा कास धरलेल्या नेतृत्वामुळे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी एक अांतरराष्ट्रीय दर्जाची संस्था बनली. भारतीय जनता पार्टी पक्षाच्या विचारांची गंगोत्री म्हणून या संस्थेला ओळखलं जाऊ लागलं.

रिसर्च पासून ते प्रॅक्टिकल ट्रेनिंगपर्यंत ज्ञानप्राप्तीच्या सर्व सोयीं त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यांचे चौदा हजार ग्रंथांनी सुसज्ज असे ग्रंथालय म्हणजे राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यासाठी मेजवानीच. संघाच्या हिंदुत्त्ववादी विचारांबरोबरच डावे विचार आणि विचारसरणीशी संबंधित संदर्भाचे स्वतंत्र दालन आहे. इथे चालणाऱ्या नेतृत्व विकासाच्या प्रोग्रामसाठी सर्वच पक्षाचे तरुण प्रशिक्षण घेण्यासाठी येतात.

फक्त एवढेच नव्हे तर रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेच्या माध्यमातून सर्वच विचारधारेचे वक्त्यांना बोलण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल जातं. वेगवेगळे परिसंवाद, पेपर प्रेझेन्टेशन अशा अनेक अॅक्टिव्हीटी येथे चालतात.

लोकप्रतिनिधीच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून लोकशाहीच्या संबंधात वैशिष्टय़पूर्ण काम करणारी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही दक्षिण आशियातील पहिली आणि एकमेव संस्था असल्याचा दावा केला जातो.

तीन वर्षापूर्वी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला मुंबई विद्यापीठाने ‘राज्यशास्त्र’ या विषयाकरिता संशोधन केंद्राचा दर्जा दिला आहे. त्यामुळे, आता प्रबोधिनीमार्फत राज्यशास्त्रात पीएचडी आणि संशोधनाच्या माध्यमातून एमए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाची पदवी मिळविता येणार आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.