असा होता थरार, साडेपाच लाखांच्या खजिना लुटीचा..

१४ एप्रिल १९४४ रोजी सातारा प्रतिसरकारच्या बहाद्दर क्रांतिविरांनी भारतातल्या ब्रिटीश साम्राज्या सत्तेला सणसणीत चपराक लगावली. बलाढय ब्रिटीश सत्तेचा साडेपाच लाख रुपयाचा खजिना धुळे जिल्हयात दिवसा ढवळया हस्तगत करुन, भारतीय स्वातंत्र्य लढयातील सोनेरी पान लिहीले. त्या घटनेला नुकतीच ७५ वर्षे झाली.

या निमित्ताने या ऐतिहासीक घटनेचा मागोवा घण्याचा हा छोटासा प्रयत्न.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सातारा प्रतिसरकारचं योगदान खुप महत्त्वाचे आहे. ज्या भूमीवर छत्रपती शिवरायांनी सामान्य माणसाला बरोबर घेवून इथल्या कडेकपारीत राहणा-या, चेहरा नसलेल्या, स्वत:ची वेगळी ओळख नसलेल्या लंगोटधारी मावळयांना बरोबर घेवून, त्यांच्यामध्ये स्वत:चे राज्य निर्माण करण्याची इच्छा निर्माण केली. त्यांच्यामध्ये स्वराज्याची भावना निर्माण केली आणि त्यांच्या सहाय्याने बलाढय आदिलशाही, मोंगली सत्तेच्या विरुध्द लढण्यास सज्ज केले. स्वत:चे स्वाभिमानी स्वराज्य निर्माण केले. सर्वसामान्य जनतेला विश्वास दिला की, हे नवे स्वराज्य सर्वस्वी इथल्या सर्वसामान्य जनतेचे असल, नेमकी तीच भावना, ३००/३५० वर्षानंतर सातारच्या या क्रांतिकारकांनी इथल्या खेडयापाडयातील सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण केली.

८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईतील गवालियाँ टंक मैदानावर म.गांधी या अवलीयाने कॉंग्रसच्या अधिवेशनामध्ये ब्रिटीशांना या देशातून ‘चले जाव’ चा आदेश दिला. इथल्या जनतेला सांगितले की ‘करा किवा मरा’ या आदेशाने ब्रिटीश सत्ता चवताळलीच, ब्रिटीश सरकारने एका रात्रीतच काँग्रेसच्या सर्व महत्त्वाच्या पुढा-यांना अटक करुन तुरुंगात टाकले. पण परिणाम उलटाच झाला. सर्व देशभर आदोलनाला उधान आलं. निर्णायकी झालेल्या जनतेने, त्यांना सुचेल त्या प्रमाणे आपला असंतोष प्रकट करायला सुरवात केली.

त्यामुळे पुढे ५/६ महिने तालुका, मामलेदार कचेरीवर मोर्चे काढणे, रेल्वे  उखाडणे, रेल्वे पाडणे, डाक बंगले जाळणे, टेलिफोनच्या तारा तोडणे अशा असंतोषाला उधाण आले पण थोड्याच दिवसात ब्रिटीश सरकारने आपले सर्व पाश आवळायला सुरवात केली. फोडा झोडा निती आणि पाशवी दमन शक्तीच्या सहाय्याने भारतीय जनशक्तीचे आंदोलन दडपून टाकण्यात यश मिळवले. सर्व भारतभराचा विचार केला तर १९४३ सुरवातीस बंगालमधील मिधनापूर उत्तर भागातील बालिया आणि मुंबई प्रांतातील सातारा एवढ्याच ठिकाणातील शूर क्रांन्तीकारकांनी आपल्या स्वातंत्र चळवळीचा लढा जिवंत ठेवलेला दिसून येत होते. त्यातही १९४३ अखेरपर्यन्त ब्रिटीश सत्तेने बालिया आणि मिदनापूर येथील क्रांन्तीकारकांचा प्रतिसरकारचा प्रयोग मोडून काढण्यात यश मिळवले. संपुर्ण देशामध्ये सातारामधील क्रान्तीकारकांनी सुरू केलेल्या प्रतिसरकारची चळवळ मोडून काढण्यात मात्र ब्रिटीश सत्तेला यश येत नव्हते.

सातारा प्रतिसरकारची चळवळ मोडणेमध्ये ब्रिटीश सत्तेला का यश आले नाही?

कारण सातारा प्रतिसरकारची निर्मिती किंबहूना ही चळवळ काही प्रासंगिक प्रयोग किंवा आकस्मिक उदयाला आलेली चळवळ नव्हती. ज्यांच्या नावाने हे सरकार ओळखले जाते त्या क्रांन्तीसिहं नाना पाटील यांनी १९२० सालापासून या सातारी जनतेमध्ये मिसळून स्वातंत्र आंदोलनासाठी भूमी तयार केली होती. सारा सातारा परिसर त्यांनी प्रत्येक गावी जावून शिवरायांच्या विचारांचा जागर केला होता. याच विभागाला महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराजांचा सत्यशोधक विचारांच्या चळवळीने ढवळून काढले होते. भाऊराव पाटलांच्या शैक्षणिक चळवळीने समाज जागा केला होता. शोषकाविरोधात सामाजिक चळवळीने हा सगळा भाग ढवळून काढला होता. या घुसळणीतून या भागातील तरुण वर्गामध्ये नव्या जाणिवा निर्माण झाल्या होत्या. त्यांच्या स्वाभीमानाला स्वातंत्र्याच्या उर्मीची जाणिव झाली होती.

स्वत: क्रांन्तीसिंह नाना पाटील यांनी संसाराचे सर्व पाश तोडून या आंदोलनामध्ये सर्वस्वी झोकून दिले होते. १९३२-४२ या कालावधीमध्ये ते तब्बल नऊ वेळा ब्रिटीश सत्तेशी संघर्ष करुन तुरुंगात जावून आलेले होेते. तावून सुलाखून निघालेल्या त्यांच्या व्यक्तीमत्वाभोवती तरुणांचे मोहोळच तयार झाले होते. त्यामुळे स्वातंत्र आंदोलनासाठी सातारची ही भूमी वैचारिकदृष्ट्या योग्य प्रकारे तयार झाली होती. नेमके याच वेळी भारतीय स्वातंत्र आंदोलनातील अखेरच्या पर्वास मुंबईच्या ‘चले जाव’ आदेशाचा आणि “करा किवा मरा’ हा मंत्र मिळताच सातारा प्रतिसरकारचे पीक तरारून आले. मुंबईच्या काँग्रेस अधिवेशनानंतर सातारा जिल्ह्यामध्ये तहसील कचेरीवर मोर्चा काढण्याच्या पर्वास सुरवात झाली. पाटण तहसील कचेरीवर बुक मावशीकर यांच्या नेतृत्वाखाली पहिला मोर्चा निघाला. या मोर्चास खूप मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर कराड तहसील कचेरीवर मोर्चा काढला.

आंदोलनास खरी धार आली ती तासगाव तहसील कचेरीवरील मोर्चाने या मोर्चाने एक नवा इतिहासच रचला.

३ सप्टेंबर १९४२ रोजी १० हजार लोकांचा जनसमुदाय हातात लाटया-काठ्या घेवून अत्यंत शिस्तबध्दपणे ७/८ किलोमीटर पायी चालत येतो. तहसील कचेरीला वेढा घालतो. मामलेदार यांना बाहेर बोलावतो. त्याच्या डोक्यावरील हॅट काढायला लावतो. मामलेदारला गांधी टोपी घालायाला भाग पाडतो. सरकारी कचेरीवरील ‘युनियन जॅक’  खाली उतरायला लावून चरखाधारी तिरंगा कचेरीवर फडकवायला लावतो. त्या तिरंगी झंडयाला मामलेंदारला सॅल्यूट करायला लावतो. या सर्व प्रकारात ब्रिटीश सत्तेची मस्ती उतरायला लावल्याची एक प्रकारची उमी सर्व क्रांतिकारकांमध्ये निर्माण होते. त्याचीच पुनरावृत्ती तासगावच्या न्यायालयाच्या आवारामध्ये होते. यामुळे या सर्व क्रांतिकारकांची मानसिकताच बदलून त्यांचे मध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला.

पण यामुळे ब्रिटीश सरकारचे पित्त खवळले. पुढे वडूज आणि इस्लामपूर इथल्या मोर्चावर सरकारने बेछूट गोळीबार केला. त्यामध्ये ९ आणि २ मोर्चेकरी शहीद झाले. सरकारच्या या कृतीमूळे सातारा क्रांतिकारकांनीही विचार करुन सरकारी पोलीसापूढे निशस्त्र सामान्य जनतेचा बळी नाहक दयायचा नाही असे ठरवून त्यांनी आपले सर्व लढातंत्रच बदलून टाकले, यानंतर सर्वांनी विचार करुन आपले प्रतिसरकार निर्माण करण्याचा निर्णय घेतला. आपण स्वतंत्र आहोत. ब्रिटीशांची सत्ता मानायची नाही, आपले स्वत:चे वेगळे सरकार असेल, त्यासाठी त्यांनी स्वत:ची घटना तयार केली. आपली स्वतंत्र न्यायव्यवस्था निर्माण केली. आपली स्वतंत्र पोलिस यंत्रणा तुफान सेनेच्या रुपाने तयार केली. लष्करी तळ तयार केले. या सर्वांचा पाया त्याने शुध्द नैतिक चारित्र्य ठेवला स्त्रियांचा सन्मान शिवरायांच्या नंतर सातारा प्रतिसरकारच्या काळाइतका केल्याचे दुसरे उदाहरण नाही.

सरकार चालवायचे तर पैसा पाहिजे. लष्कर निर्माण करायचे तर शस्त्रे पाहिजेत, त्यासाठी पैसा हा पाहिजेच या क्रांतिकारकांनी पक्के ठरवले होते, सरकार चालविण्यासाठी लागणारा पैसा कोणाही खाजगी व्यक्तीकडून, सावकाराकडून, शेठ कडून घ्यायचा नाही.

वैयक्तिक मिंदेपण ठेवायचे नाही. सामान्या मानसाला वेठीला धरुन त्याच्याकडूनही वसूली करायची नाही. मग हा पैसा आणायचा कोठून? सातारा क्रांतिकारकांनी सर्वकष विचार करुन निर्णय घेतला होता की, ब्रिटीशांकडे जमा होणारी संपत्ती ही या देशातील सामान्य माणसांचीच आहे. इथल्या सामान्य माणसांचे शोषण करुन ब्रिटीश आंम्हाला लूटतात आणि ही लूट इंग्लंडला पाठवतात. तेव्हा सरकारने लूटलेला पैसा हस्तगत करुन इथल्या स्वातंत्र्य आंदोलनासाठी वापरायचा. एकदा निर्णय घेतल्यानंतर हा सरकारी खजिना कसा हस्तगत करायचा याच्या योजना इथल्या कल्पक क्रांतिकारकांनी तयार केल्या.

क्रांतिअग्रणी जी.डी.लाड आणि क्रांतिवीर नागनाथ आण्णा यांनी कुंडल येथे असलेली सरकारी बैंक लूटण्याचा निर्णय घेतला. एकेदिवशी कुंडल बँक लूटली. पण त्यातून हाती फारसे काही लागले नाही. यानंतर कुंडल ग्रुपच्या या धाडसी क्रांतिकारकांनी जी डी. बापू लाड आणि नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कल्पक योजनेतून ७ जून १९४३ रोजी ब्रिटीश सत्तेच्या नोकरांचा पगार करणारी पे स्पेशल ट्रेन शेनोलीच्या खिंडीत आडवून ब्रिटीश सत्तेचा खजिना हस्तगत केला.

यातूनही त्यांना त्यावेळी १९ हजार रुपये मिळाले. ही रक्कम मोठया प्रमाणात शस्त्र घेण्यास व सरकार चालवण्यास पुरेशी नव्हती. पण काम चालू करण्यास सुरवात करण्यास उपयोगात येणारी होती. त्याप्रमाणे तिचा वापर करण्यास सुरवात केली.

सरकारच्या स्थापनेस सुरवात करुन कामकाजही करण्यास सुरवात झाली होती. पण आर्थिक तंगी पावलोपावली जाणवत होती. त्यामुळे ही मंडळी वेगळ्या विचारात होती. त्यातही ‘पे स्पेशल’ च्या प्रकरणामूळे सरकार अत्यंत सावध झाले होते. इथल्या क्रांतिकारकांवर सतत पाळत ठेवण्याचा प्रयत्न करत होते. पण क्रांतिकारक सरकारला सापडत नव्हते. क्रांतिकारकही सावध झाले होते.

क्रान्तीसिंह नाना पाटील आटपाडी येथे भूमिगत होते. आटपाडीमध्ये खादीग्रामोद्योग मंडळाचे कार्यालय होते. त्या कार्यालयामध्ये खानदेशातील ठाकरे बंधू खादी भांडार चालवत होते. त्यांनी नाना पाटलांना माहिती दिली की धुळ्याकडे सरकारी खजिना एका ठिकाणाहून दूसरीकडे खाजगी सर्व्हिस गाड्यातून घेवून जातात. नाना पाटलांनी हि माहिती नाथाजी लाड, जी.डी.बापू, नागनाथ नायकवडी यांना दिली.

त्या सर्वांनी विचार विनिमय करुन धुळ्याच्या ठिकाणी सरकारी खजिना हस्तगत करण्याचा बेत आखला.

एकदा बेत निश्चित केल्यावर सातारा प्रतिसरकाच्या कुंडल ग्रुपमधील जी.डी.बापू लाड, नागनाथ आण्णा नायकवडी, रावसाहेब कळके, धोंडीराम माळी, आप्पा पाटील साखराळकर, किसन मास्तर गोंदीकर, ज्ञानोबा जाधव वस्ताद, अण्णा चंदु ऐडके (सावळा) गोविंद जोशी, शंकर माळी आणि राजूताई पाटील बिरनाळे या मंडळींनी खानदेशाकडे कूच केली. खानदेशमध्ये धुळ्याचे डॉ. उत्तमराव पाटील हे त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. त्यांनी खानदेशातील व्यंकटराव धोबी, शंकरराव माळी हे सहकारी मिळून सरकारी कार्यालयामध्ये तसेच पोलिसांमध्येही क्रान्तीकारकांनी आपले खबरे पेरले होतेच. ते या क्रानत्तीकारकांना शासकीय कार्यालयातील बित्तम बातमी देत असत.

असेच दिनांक १३ एप्रिल १९४४ रोजी पोलीस खात्यात जमादार असलेले दयाराम जमादार यांनीच डॉ. उत्तमराव पाटील आणि जी.डी बापू  यांना एक सरकारी हुकूम दाखवला. धुळ्याहून नंदूरबारकडे साडेपाच लाखाचा सरकारी खजिना न्यावयाचा आहे. त्यांच्या संरक्षणासाठी दोन हत्यारी पोलिस देण्याबद्दल दयाराम जमादार यांनी दिलेला तो हुकूम होता. त्यानुसार १४ एप्रिल १९४४ रोजी नंदूरबारला जाणारा तो सरकारी खजिना काहीही करुन हस्तगत करायवयाचा असा बेत या क्रान्तीकारकांनी नक्की केला. साखरी तालुक्यातील चिमठाणा ही जागा निश्चित केली. नैसर्गिकरित्या ही जागा योग्य वाटली. रहदारीपासून दुस नैसर्गिक चढण असलेली जागा होती.

त्या काळी या सर्वीस गाड्या कोळशाच्या इंजिनवर चालत असत. त्यामुळे चढण लागली की या गाड्यांचा वेग आपोआप कमी होत असे. गाडीचा वेग कमी झाल्यावर गाडी थांबवणे सोपे होणार होते. त्या ठिकाणावर चार जण थांबले होते. धुळ्यातून खजिन्याचीच गाडी सुटल्यावर त्या गाडीतून चार जणांनी यायचे नियोजन केले. चिमठाण्याच्या ठिकाणावर जी.डी.बापू आणि नागनाथअण्णा यांनी खानदेशातील खेडूताचा वेश धारण केला होता.

त्या दोघांनी दारू पिऊन रस्त्यावर एकमेकांशी खोटे खोटेच पण पाहणाऱ्या खरं खरं वाटणार भांडण सुरू करायचे त्यांच्या भांडणामुळे ड्रायव्हरला गाडी थांबवण भाग पडावं त्याच वेळी गाडीतून येणाऱ्या सहकाऱ्यांनी गाडीत असलेले पोलिस आणि त्यांच्या बंदूकांचा ताबा घ्यायचा असा सर्व बेत नक्की केला. प्रत्येकाला आपआपली जबाबदारी नक्की करुन दिली. त्याप्रमाणे नागनाथअण्णा आणि जी.डी.बापू यांनी त्यांनी चिमठाण्याच्या रस्त्यावर दारूड्यांच्या भांडणाचे नाटक सुरू केले. त्यांच्या जोडीला खोटखोटं भांडण खोटखोटं सोडवण्यासाठी रावसाहेब कळके आणि धोंडीराम माळी होते. सकाळपासून आठ-नऊ गाड्या आल्या आणि गेल्या पण त्यात काय खजिन्याचा पत्ता नव्हता. तरिही या सर्व गाड्यांपुढे अण्णा व बापूंचे खोटे भांडण सुरू होई. पण पदरी निराशाच येत राहिली.

शेवटी साडेअकराच्या दरम्यान खजिन्याची गाडी आली.

त्यामध्ये डॉ. उत्तमराव पाटील, शंकरराव माळी आणि दोन सहकारी होते. नियोजित ठिकाणावर गाडी येताच. गाडीतील त्या क्रांन्तीकारकांनी गाडीमधील पोलीस व त्यांच्या बंदूकांचा अचानक ताबा घेतला. रस्त्यावर आण्णा-बापूंचे भांडण चालू होतेच. चढावर गाडीचा वेग कमी झाला पण गाडीतील एकूण हालचालीमुळे ड्रायव्हरला संशय आल्याने तो गाडी तशीच पुढे चालवण्याचा प्रयत्न करु लागला. आण्णा-बापूंना परिस्थितीची कल्पना चटकन आली.

दोघेही वेगाने थोडे बाजूला होवून, आण्णा ड्रायव्हरच्या बाजूनेच चालत्या गाडीत वर चढून त्याला गाडी थांबवण्यास सांगू लागले. पण ड्रायव्हर ऐकायला तयार होईना. तेव्हा शेवटी नाईलाजाने आण्णांनी हातातील पिस्तुल चालवली. गोळी वर्मी लागली. ड्रायव्हरने गाडीच्या चाकावरच मान टाकली. आण्णांनी गाडी थांबवली. गाडीतील क्रांन्तीकारकांनी सर्व प्रवाशांना खाली उतरिवले. पोलिसांनाही खाली उतरविले. रस्त्याच्या कडेला उभे केले. खजिन्याची पेटी रस्त्यावर घेतली. दगडाने पेटीचे कुलूप फोडले. नोटांची बंडले बाहेर काढली. नेसूची धोतरे सोडली. बंडले बांधून चार गाठोडी तयार केली. चिल्लर पन्नास हजार रुपयांची होती. ती प्रवाशांना द्यायचा प्रयत्न केला पण कोणी घ्यायला तयार नव्हते. तेव्हा ती चिल्लर रस्त्यावर तशीच उधळून क्रान्तीकारकांनी तेथून पोबारा केला.

हे सर्व घडत होते भर दुपारी १२ वाजनेच्या सुमारास खानदेशातील ऐन एप्रिल मधील उन्हाळा, डोक्यावर खजिन्याची गाठोडी, हातात बंदुका या सोन्यामुळे त्यांच्या पळण्याला मर्यादा येत होती. हे सगळे घडत असताना, सरकार गप्प बसणे कसे शक्य आहे? बातमी तासाभरातच पोलिसांत गेली. पोलिसांची, सरकारी यंत्रणेची धावाधाव सुरु झालीच होती. पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली. सायंकाळी दिवसा मावळायच्या सुमारास पोलिसांच्या दृष्टिस हे क्रांतिकारक पडले. पोलिसांनी गोळीबार सुरु केला. आण्णा–बापू यांनीही उलट गोळीबार सुरु करुन पोलिसांना दूरवर रोखण्याचा प्रयत्न केला, झाडी, झुडपे, ओढे यामुळेही पोलिसांनाही नक्की परिस्थिती लक्षात येत नव्हती. क्रांतिकारकांनी आपल्या ४/५ सहका-यांच्या डोक्यावर नोटांची गाठोडी देवून त्यांना योग्य दिशा व सुचना देवून पुढे पाठवून दिले.

डॉ. उत्तमराव पाटील, नागनाथअण्णा आणि जी डी. बापू यांनी पोलिसांशी संघर्ष चाल ठेवला. संध्याकाळ झाली होती. आकाशाच रुपातर संधी प्रकाशात झाले होते यातच एक गोळी आली ती नागनाथअण्णांच्या उजव्या खांदयाच्या बाजूला लागून खाली पडली. गोळीबारातील अंतर जास्त असल्यामुळे आणि गोळीची रेंज संपल्याने मोठी जखम झाली नाही. पण खांदा सुजला आणि वेदना सूरु झाल्या. तेवढयात दुसरी गोळी आली ती जी डी. बापू यांची पेंडरी फोडून बाहेर पडली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. तशाही अवस्थेत बापूनी उलट गोळीबार चालवून पोलिसांना लांबवरच थांबविणेत यश मिळवले. अंगावरची कपडे फाडून जखम बांधली. यावेळी पर्यंत सुर्यास्त होवून आंधार गडद व्हायला लागला होता. पोलिसांना परिस्थितीचा अंदाज येईना त्यामुळे त्यांनी गोळीबार थांबवून माघार घेतली व परत निघून गेले. त्यामुळे या क्रांतिकारकांना उसंत मिळाली.

गोळीने फुटलेल्या पींढरीची जखम घेवून बापू लाड, व गोळी लागून सूजलेला खांदा घेवून नागनाथअण्णा तशाही आवस्थेत डॉ. उत्तमराव पाटलांच्या सोबत चालत राहिले. मध्यान रात्रीच्या दरम्यान डॉ. उत्तमराव पाटील यांच्या पाहूण्यांच्या घरी आसरा घेतला. काही दिवस खानदेशातच एका गावातून दुस-या गावात मुक्काम हालवत बापुंच्या पायाच्या जखमेला मलमपट्टी करत, आणि महत्वाचे म्हणजे ज्यासाठी हा सगळा आटापिटा केला होता त्या पाच लाख रुपयांची योग्य ती व्यवस्था करुन कुंडलचे क्रांतिकारक वेश पालटत नाशिक, मुंबई, हैद्राबाद, पंढरपूर असे करत सुकरुपपणे आपल्या आड्डयावर महिनाभरातच परत आले.

हस्तगत केलेल्या सरकारी खजिन्यातील एक लाख रुपये खानदेशातील क्रान्तीकार्यासाठी देण्यात आले. क्रान्तीवीर अच्युतराव पटवर्धन यांच्याकडे मध्यवर्ती प्रतिसरकार कार्यासाठी देण्यात आले. काही रक्कम ज्या शेतात पुरून ठेवली होती. त्या ठिकाणीच राहून गेली. थोडीफार रक्कम खानदेशमध्ये क्रान्तीकारकाच्या व्यवस्थेसाठी खर्च झाली होती. राहिलेली सर्व रक्कम अथावकाश राधूताई पाटील या क्रांन्तीवीरांगणेने मोठी जोखीम पत्करुन कुंडलपर्यन्त व्यवस्थित पोहच केली.

या सर्व खजिना रकमेचा जमा खर्च सातारा क्रान्तीकारकांनी मुंबई मुक्कामी पंडित जवाहरलाल नेहरू आणि आप्पासाहेब पंतप्रतिनिधी तसेच तत्कालिन कॉंग्रेस अध्यक्ष मौलान अबुल कलाम आझाद यांना सादर केला होता.

या सर्व घडामोडीमध्ये ब्रिटीश सरकारला मोठी चपराक बसली होती. सरकार चवताळून गेले होते. या क्रान्तीकारकांना पकडण्यासाठी आणि खजिन्याचा शोध लावण्याचा चंग सरकारने बांधला होता. सरकारने जंगजंग पछाडून सुद्धा सरकारला वर्षभरानंतर खानदेशातील श्री शंकरमाळी आणि व्यकटराव धोबी यांना पकडण्यात यश आले. पण त्याच्याकडून खजिन्याबद्दल किंवा त्यामध्ये सहभागी क्रान्तीकारकांबद्दलं अधिक माहिती सरकार या क्रान्तीकारकांकडून भयानक छळ करुन ही मिळवू शकले नाहीत. या दोन क्रांन्तीकारकांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

लवकरच स्वातंत्र मिळाले. आणि दोन वर्षातच त्यांची सुटका झाली. यातील एक महत्वाचे क्रांन्तीवीर डॉ. उत्तमराव पाटील यांना पोलिसांनी पकडले पंरतु पंढरपुर मधूनच उत्तमरावांनी मोठ्या शिताफीने आपली सुटका करुन घेतली. व ते कुंडल ग्रुपमध्ये सहभागी झाले. ते पुन्हा सरकारला सापडले नाहीत.

कुंडल ग्रुपमधील अत्यंत महत्वाचे क्रांन्तीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांना हिंदूमहासभेच्या दोन खबऱ्यांनी पकडवून दिले.

पण नागनाथअण्णांनी अवघ्या ४५ दिवसात सातारा मध्यवर्ती कारागृहातून स्वत:ची सुटका करुन घेतली. ते पुन्हा सरकारला सापडले नाहीत. या सहभागाातील आणखी एक क्रान्तीकारक धोंडीराम माळी हे कुपवाड सांगली भागात कार्यरत असताना, दोन वर्षांनी पोलिसांना सापडले. सांगली संस्थानी न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली. पण लवकरच स्वातंत्र मिळाले आणि त्यांची सुटका झाली.

सातारा क्रांन्तीकारकांनी धुळे जिल्ह्यातील चिमठाणा येथे ब्रिटीश सरकारचा साडेपाच लाखाचा खजिना हस्तगत केला. हा सर्व पैसा आपल्या प्रतिसरकाच्या कार्यासाठी त्यांनी वापरला. या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र लढ्यात आणखी एका अशाच घटनेची आठवण येते. १९२३ च्या दरम्यान पंजाब, उत्तर भारत बिहार बंगाल या भागातील अत्यंत थोर क्रांन्तीकारक सचिद्रनाथ संन्याल, रामप्रसाद बिस्मिल, जोगेद्रचंद्र चॅटर्जी यासारखे क्रान्तीकारक एकत्र येवून संघटित होत होते. त्या संघटनामध्ये भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राजगुरू, शिववर्मा, भगवतीचरण व्होरा इत्यादी क्रान्तीकारकांची साथ मिळाली.

या सर्व क्रान्तीकारकांनी १९२४ मध्ये कानपूर येथे हिंदूस्थान रिपब्लिक असोसिएशन हि सशस्त्र क्रान्तीकारी संघटना स्थापन केली. त्यांच्या सशस्त्र दलाचे नावच होते हिंदूस्थान रिपब्लिक आर्मी. ब्रिटीश सरकार या देशातून क्रांन्तीच्या मार्गानेच घालून द्यायचे असा त्यांचा उद्देश होता. आपल्या क्रान्तीकार्यासाठी त्यांना क्रांन्तीसेना निर्माण करायची  होती. या क्रान्तीसेनेसाठी शस्त्रांची आवश्यकता होती. ही शस्त्रे घेण्यासाठी पुन्हा पैशाची गरज होती. या क्रान्तीकारकांनी त्यावेळी सरकारी खजिना हस्तगत करण्याचे नियोजन केले होते.

९ ऑगस्ट १९२५ रोजी लखनौ जवळ काकोरी स्टेशनजवळ 8 DOWN या रेल्वेतून जाणाऱ्या खजिन्याची लूट केली. यामध्ये अशफाक उल्ला, रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहेरी, रोशनसिंग, चंद्रशेखर आझाद, योगेश चॅटर्जी, इत्यादी क्रान्तीकारकांनी सहभाग घेतला होता. काकोरी कट यशस्वी झाला आहे असे वाटत असतानाचा सप्टें १९२५ ला यातील काही क्रान्तीकारकांना पकडण्यास पोलीसांना यश आले, त्यानंतर मात्र काकोरी कटातील या क्रान्तीकारकांची शोकांतिकाच सुरू झाली. भारतीय स्वातंत्रलढ्यात काकोरी कटाचा खटला याला अन्यसाधारण महत्व आहे.

यामध्ये अशफाकउल्ला रोशनसिंग ठाकूर, रामप्रसाद बिस्मिल राजेंद्र लाहिरी,  या क्रांन्ती फासी झाली. सचिन , चार जणांनी  काळया पाण्याची शिक्षा ठोठावली, तर आणखी १८ जणांना दिर्घ मुदतीचा कारावास ठोठावण्यात आला.. यातील आणखी एक प्रमुख क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद मात्र शंवटपर्यंत सरकारला सापडले नाहीत. मधल्या काळात चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यानी आपल्या या सहका-यांना तुरुंगातून सोडविण्याचे प्रयत्न केले परंतू दुदैवाने त्यांना यश येवू शकले नाही.

असा आहे भारतीय स्वातंत्र्य लढयातील ब्रिटीश सत्तेतील खजिना हस्तगत करण्याचा इतिहास या दोन्ही प्रकरणातील क्रांतिकारकांची उद्दिष्टये महान व समानच होती. भारतीय स्वातंत्र्यासाठी या क्रांतिकारकांनी जीवनातील सर्वोच्च त्याग केला हाता. सर्व ऐहिक सुखांचा त्याग केला होता. आपल्या घरादारावर तुळशीपत्रे ठेवली होती. यातील अनेकांनी हसत हसत फाशीचा दोर गळयात अडकवून घेतला तर अनेकजन अंदमानच्या अधार कोठडीत सडून मेले. परंतु त्यानी ब्रिटीश सरकारकडे दयेची भीक मागीतली नाही किंवा क्षमा याचना केली नाही.

आज स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर या सर्व क्रांतिकारकांच्या जीवनाकडे त्यांच्या सर्वोच्च मागाकडे पाहत असताना सहाजीकच प्रश्न उपस्थित होतो की, खरंच आजचे जे चित्र आहे त्यासाठीच क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाची बाजी लावली होती.

अॅड. सुभाष पाटील. (हमणंतवडिये) 

फोन नंबर : 9767434040

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.