पोराच्या लग्नावेळी सलीम खानला मौलवीच्या शिव्या खाव्या लागल्या होत्या.

तर विषय असा आहे की सलीम खानच्या पोराचं लग्न. थांबा थांबा लगेच चिडायचं कारण नाही.  सलमान खानच्या लग्नाबद्दल सांगत नाही.  ते म्हातार कधी का लग्न करेना आपल्याला काय?

तर सलीम खानला अजून दोन मुलं आहेत. सगळ्यांना माहिती आहे. दोघांची पण लग्नं झाली आहेत. हे पण सगळ्यांना माहिती आहे. त्यातल्या अरबाझचं मलाईका बरोबरचं लग्न मोडलं हे पण जनरल नॉलेज सगळ्यांकडे असते. पण दुसऱ्या सोहेलच्या लग्नाबद्दल कोणाला माहित नसतं.

तर झालं असं की सलमान लग्न करत नाही पण म्हणून त्याची भावंडंसुद्धा तुंबून रहावीत हे बरोबर नाही. दोघ वाट बघून बघून कंटाळली होती. सलमानच्या होम प्रोडक्शनतर्फे प्यार किया तो डरना क्या चं शुटींग चाललेलं. सलमानबरोबर काजोल धर्मेंद्र होते, शिवाय काजोलच्या भावाच्या डेंजर भूमिकेत अरबाझला चान्स दिला होता. या फिल्म चं डायरेक्शन सोहेल करणार होता.

सोहेलने यापूर्वी औजार या सिनेमाच्या निम्मितान डायरेक्शन मध्ये हात मारून बघितला होता. तो पर्यंत अलरेडी सुपरस्टार बनलेल्या सलमानला या आपल्या चोवीस पंचवीस वर्षाच्या भावाच्या दिग्दर्शन कौशल्यावर विश्वास बसला होता. लगेच पुढच्या वर्षी प्यार किया तो डरना क्या बनवायचा निर्णय सलमानने घेतला.

पिक्चरचं शुटींग चालेललं, त्यासोबतच सोहेलची लव्ह स्टोरीदेखील रंगत होती. तो सीमा सचदेव नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला होता. ती एक फशन डिझायनर होती आणि दिल्लीहून फिल्म इंडस्ट्रीमध्ये ट्राय करायचं म्हणून आली. कशी तर सोहेलची आणि तिची ओळख झाली. दोघांच जुळल पण त्यात काही अडथळे होते. एक म्हणजे सोहेल सगळ्यात धाकटा होता, अजून मोठ्या दोन्ही भावांची लग्न व्हायची होती शिवाय हिंदी सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे पूर्वापारचा हिंदू मुसलमान प्रॉब्लेम.

सलमानच्या घरात नाही, प्रॉब्लेम होता सीमाच्या घरातून. त्यांना या फिल्मइंडस्ट्रीसारख्या बेभरवशाच्या करीयरवाला मुसलमान मुलगा नको होता. अखेर काय करायचं कळेना. सोहेलने आपल्या दोन्ही भावांची परवानगी घेतली. त्यांनी ग्रीन सिग्नल दिला.  फक्त पिक्चर रिलीज होऊ दे तो पर्यंत थांब असा सल्ला दिला.

२७ मार्च १९९८, प्यार किया तो डरना क्या रिलीज झाला.

maxresdefault 2

पिक्चरला पहिल्या दिवशीच प्रतिसाद चांगला आला. ते बघून सोहेलच्या अंगावर दहा हत्तीचे बळ आले. आता प्यार किया तो डरना क्या असं म्हणून त्यान मनाशी काही ठरवलं. त्याने आपल्या चार मित्रांना घेतले आणि फिल्मी स्टाईलमध्ये सीमाला डायरेक्ट पळवून आणले. मुंबईच्या आर्य समाज मंदिरमध्ये दोघांनी एकमेकाला माळा घातल्या.

एवढ झालं तरी अजून दोघांच्या घरी काही ठाऊक नव्हते. रात्री सोहेल दबकत बांद्र्याच्या गॅलेक्सी या अपार्टमेंटमध्ये आला. आधी तर वडीलाना भेटायचं त्याच धाडस होईना. अखेर सलमानने सलीम खानच्या कानात काही तरी सांगितले.

सोहेल खाली मान घालून आत आला. त्यान आपली पूर्ण लव्ह स्टोरी बाबाला सांगितली. सलीम खाननी पोरगी कुठाय विचारलं. सीमा बाहेर उभी होती, तिला सुद्धा आत बोलवलं. सलीम खाननी सगळी चौकशी केली, शेवटी हो म्हणून सांगितलं आणि मुस्लीम पद्धतीने सुद्धा निकाह उरका म्हणून आदेश दिला.

1513662294

लगेच रात्री तयारी करण्यात आली. सोहेलच्या मित्रांनी बांद्रयामधल्याच एका मौलवीला उचलून आणल. ते म्हातार मौलवी आधीच मध्यरात्रीची झोपमोड झाली म्हणून वैतागल होतं. त्यात बळजबरीने आणले म्हणून जास्तचं गुस्श्यात होतं. पण कसबस सगळ्यांनी समजावून त्याला तयार केला. तो निकाह पढणार इतक्यात त्याला नवऱ्या मुलाचे पप्पा दिसले, सलीम खान. मग तर तो जास्तच भडकला.

सलीम खानना कळेना काय झालं? मुल्लासाहेब काही बोलेचना. खूप हातापाया पडल्यावर त्यान सांगितलं.

“ये सिर्फ तुम्हारे बेटे कर सकते है!!”

सलीम खान समजावून सांगू लागले,

“अरे वो एक दुसरे को बहुत प्यार करते है. “

मुल्ला म्हणाला,

“वो बात नही. ३५ साल पहिले तुम्हारे दोस्तोने भी मुझे ऐसेही किडनॅप करके लाया था और मुझे तुम्हारा निकाह पढना पडा था.”

तेव्हा मात्र सगळे हसू लागले. खरोखर ३५ वर्षापूर्वी सलीम खाननी सुशीला चरक नावाच्या एका मराठी मुलीसोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. तेव्हा सुद्धा याच मौलवीला लग्न लावून देण्यासाठी उचलून आणण्यात आलं होतं. आईवडिलांच्या लग्नाचा योगायोग सोहेल खानच्या लग्नात देखील जुळून आला होता. त्याच मुल्लाने रडतखडत का होईना सोहेल खान आणि सीमा सचदेव यांचं लग्न लावून दिलं.

टीप- हा किस्सा कॉफी विथ करण या शो मध्ये खुद्द सोहेल खान आणि सलमान खान यांनी सांगितला आहे. तुम्हाला काही शंका असतील, अजून काही टिप्स हव्या असतील तर त्यांना भेटा.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.