अझरला शिक्षा होऊ नये म्हणून चंद्राबाबू वाजपेयी सरकार पाडणार होते?

साल होतं २०००. भारतीय क्रिकेट एका वेगळ्याच वादळाला सामोर जात होतं, मॅच फिक्सिंग. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन हॅॅॅन्सी क्रोनिए सापडला तिथून ही गटार उघडली गेली. त्याने यात अनेक जणांची नावे समोर आली यात सगळ्यात मुख्य नाव होते मोहम्मद अझरूद्दीन.

क्रोनिए म्हणालं होता की १९९६ साली अझरनेचं त्याची ओळख बुकींशी करून दिली होती आणि पैसे घेऊन सामना निश्चित करायला सांगितलं होतं. तेव्हा सगळ्यांचेच धाबे दणाणले. एकामागोमाग एक नावे बाहेर येऊ लागली. जुनी प्रकरणे बाहेर येत होती. 

यातच होते मनोज प्रभाकर प्रकरण. १९९७ साली एका मॅगझीनमध्ये लिहिलेल्या कॉलममध्ये माजी क्रिकेटर प्रभाकरने आपल्याला एका खेळाडूने मॅच फिक्स करण्यासाठी पैसे ऑफर केले होते असा बॉम्ब टाकला होता. त्याने नाव घेतले नव्हते. पण त्याचा इशारा कपिल देव कडे होता.

त्यावेळी निवृत्त चीफ जस्टीस यशवंत चन्द्रचूड यांची समिती नेमण्यात आली. त्यावेळी अनेकांची चौकशी करण्यात आली. सचिन तेंडूलकर, अझर पासून ते अजित वाडेकर, कपिल देव अशा सगळ्यांच्या साक्षी घेण्यात आल्या. पण सिद्ध काहीच झालं नाही. असं म्हटल गेलं की चंद्रचूड यांनी सखोल प्रश्न विचारले नाहीत. काही दिवसांनी सगळा धुरळा खाली बसला.

पण हॅन्सी क्रोनिए सापडल्यावर सगळ्यांची कुंडली परत बाहेर निघाली. ज्यांची निघाली नाही त्यांची काढायच्या मोहिमेवर निघाला मनोज प्रभाकर. 

झालं असं होतं की तरुण तेजपाल आणि अनिरुद्ध बहल नावाच्या दोन कडमड्या पत्रकारांनी तेहलका नावाची वेबसाईट सुरु केली होती. त्यांनी मनोज प्रभाकरशी संपर्क केला. त्यांच ऐकून मनोज प्रभाकरने अनेक क्रिकेटर्स क्रिकेट ओफिशियल्स आशांच स्टिंग ऑपरेशन केलं. सुनील गावस्कर, रवी शास्त्री, सिद्धू, बिशनसिंग बेदी, पोलीस कमिशनर राकेश मारिया, बीसीसीआयचे अधिकारी जयवंत लेले असे अनेक जण यात होते.

संध्याकाळच्या निवांतवेळी मनोज प्रभाकर त्यांना भेटायला जायचा. जाताना छुपे कॅमेरे वगैरे घेऊन जायचा. त्यांच्याशी गोड बोलून सगळ उकळवून काढायला बघायचा. प्रभाकरचं मेन टार्गेट होते दोघे. कपिल देव आणि मोहम्मद अझरूद्दीन. त्यांच्याशी रिलेटेड प्रश्न जास्त होते. यात सगळ्यांच्या चर्चेत अझरबद्दल स्पष्ट शंका होती पण कोणीही पुढे येऊन साक्ष देण्यास तयार नव्हत.

यात होते टीम फिजिओ अली इराणी. बरीच वर्षे ते भारतीय टीमचे फिजिओ म्हणून काम करत होते. अनेक ड्रेसिंग रूम सिक्रेट त्यांना माहित असण साहजिक होतं. अली इराणीनी ते सहज प्रभाकरशी शेअर केले. कसे अझर फिक्स करायचा, जडेजा त्याला मदत करायचा, कधीकधी जडेजा त्याच्याकडून पैसे घेऊन अझरलाचं डबल क्रॉस करायचा वगैरे विषय चर्चेत आले.

यातच हा मुद्धा आला की अझरूद्दीनवर एवढी वर्षे टीका झाली पण कधी सिरीयस चौकशी का झाली नसेल. यावर अली इराणीने एक सिक्रेट सांगितले. त्याच म्हणण होतं की,

आंध्रप्रदेशमध्ये अझरचे पोलिटिकल वजन भरपूर आहे. जर त्याच्यावर काही कारवाई झाली तर तेलगु देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू केंद्रात असलेल्या वाजपेयी सरकारचा पाठींबा काढून घेतील. अझर जेल मध्ये जाने म्हणजे दिल्लीतील वाजपेयी पंतप्रधान पदावरून खाली.

अली इराणीच्या या बोलण्यामध्ये तथ्यही होते. अझरूद्दीनचे अनेक राजकीय पक्षांशी हितसंबंध होते. यात तेलगु देसम पार्टी सुद्धा होती. असे म्हणतात की अझर त्यांना पक्ष निधी गोळा करण्यासाठी मदत केली होती. सहाजिकचं या उपकाराच्या बदल्यात काही तरी रिटर्न त्याला अपेक्षितच असणार होते.

त्याकाळचे वाजपेयी सरकार अनेक पक्षांच्या टेकुने उभे होते. दरवेळी त्यांना वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांच्या ब्लकमेलला सामोरे जावे लागत होते. यातून एकदोनदा त्यांचे सरकार कोसळले देखील होते. म्हणूनच ते या पक्षांशी मिळतेजुळते घेऊन कारभार करायचे. त्यांच्या एनडीए आघाडीमध्ये चंद्राबाबूंच्या पक्षात भाजपच्या खालोखाल दोन नंबरचे खासदार होते.  शिवाय चंद्राबाबूचा मुख्यमंत्री म्हणून सुवर्ण काळ सुरु होता. हैद्राबादला आयटीसिटी म्हणून मोठ केल्यावर अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा भारतात आल्यावर त्यांची भेट घेतल्याशिवाय जात नव्हता. एवढ सगळ असल्यामुळे त्यांच म्हणण केंद्र सरकारला विचारात घ्यावच लागणार होतं.

आणि घडलंही तसच.

ही मॅच फिक्सिंगची केस सीबीआयकडे हँडओव्हर करण्यात आली. त्यांनी पुरावे म्हणून प्रभाकरच्या स्टिंग ऑपरेशनला ही ग्राह्य मानले. यात अझरूद्दीन दोषी सापडला. त्याच्याबरोबर जडेजा, नयन मोंगिया यांच्यावर आजीवन क्रिकेट खेळण्यापासून बंदी घालण्यात आली. जनतेमध्ये या खेळाडूंबद्दल प्रचंड रोष होता पण त्यांना अटक झाली नाही.

अझरूद्दीन क्रिकेटपासून दूर झाला. त्याला घर वगैरे विकायला लागले. उच्चभ्रू लाइफस्टाइल कमी झाली. त्याकाळात त्याच्यासोबत नाव जोडले जाणे देखील एखादा गुन्हा असल्याप्रमाणे झाले होते. अशातच एकदिवस अझरूद्दीन आणि चंद्राबाबू नायडू एका इफ्तार पार्टीमध्ये एकत्र दिसले. जोरदार टीका झाली. मग चंद्राबाबूनी हात झटकले. अझरूद्दीनला आंध्र सरकारकडून बक्षीस म्हणून देण्यात आलेला प्लॉट काढून घेणारं का या प्रश्नाला सुद्धा त्यांनी बगल दिला.

पुढे दोनच वर्षात सरकारे बदलली गेली. कॉंग्रेस सरकार राज्यात आणि केंद्रात सत्तेत आले. अझरूद्दीनचा शाळकरी मित्र या पक्षात होता. त्याने अझरला कॉंग्रेसमध्ये आणले. काही वर्षात उच्च न्यायलयाने ठोस पुराव्याभावी अझरूद्दीनवरचे सगळे आरोप फेटाळून लावले. अझरवरची बंदी उठली. तो उत्तरप्रदेश मधून खासदार सुद्धा बनला. आज तो तेलंगणा कॉंग्रेसचा प्रभारी अध्यक्ष आहे.

ज्याच्या मॅचफिक्सिंगमध्ये हात असल्याबद्दल जुने क्रिकेटर्स छातीठोकपणे सांगत होते तो आज अझर टीव्ही चनलवर  त्यांच्याच शेजारी बसून सध्याच्या वर्ल्ड कप बद्दल गप्पा मारत आहे. उजळमाथ्याने सगळीकडे फिरत आहे. त्याच्या सुटकेमागे बरेच मोठे राजकीय लागेबांधे होते असच म्हटल जातंय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.