कपिल देव का रडला होता, पडद्यामागची गोष्ट करण थापर यांच्याच शब्दात.
बीबीसी चा फेस टू फेस कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी बीबीसीने क्रिकेटपटूंच्या मुलाखती करण्यासाठी सांगितलं होतं. या कार्यक्रमात मुलाखत घेण्याची जबाबदारी होती जेष्ठ पत्रकार करण थापर यांच्याकडे. त्यांनी कपिल देवची मुलाखत घेतली. लोकांनी कपिल देवला रडताना पाहिलं. साल २००४ हि गोष्ट. कपिला का रडला तर त्याच्यावर मॅचफिक्सिंगचा आरोप होता. कपिलने एक मॅच हरण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप तहलकाने केला होता. याच प्रश्नावर कपिलदेवची विकेट पडली आणि तो रडू लागला. पत्रकार करण थापर यांच्यावर देखील अनेकांनी असंवेदनशीलतेचे आरोप केले.
एकंदरीत हे प्रकरण काय होतं याबद्दल खुद्द करण थापर यांनीच आपले पुस्तक डेव्हिल्स अॅडव्होकेट मध्ये लिहलं आहे.
ते लिहतात,
मी जर कपिल रडला या कथेपासून सुरवात केली तर तो कपिलवर अन्याय ठरेल. आणि त्याची वेगळीच प्रतिमा तुमच्यासमोर उभा राहिल, त्यामुळे आपण मी जेव्हा LWT मध्ये नवखा पत्रकार होतो तिथपासून सुरवात करुया.
सन १९८३ मध्ये मी पहिल्यांदा कपिलला भेटलो. भारताने विश्वचषक जिंकला होता त्याच्या दूसऱ्याच दिवशी त्याची अन् माझी भेट झाली. हॉटेलच्या व्हरांड्यातून खाली उतरताना मी जेव्हा कपिलला मुलाखतीविषयी विचारलं, तेव्हा त्याने आनंदाने होकार दिला. माझ्यासह त्याला ५० हून अधिक पत्रकार भेटले असतील तो प्रत्येकाला होकार देत होता. तो माझ्या कटकटीला दूर करण्यासाठी होकार देत आहे अस मला वाटलं म्हणून मी शक्य ते फोन नंबर मिळवून त्याला पुन्हा पुन्हा विचारू लागलो.
अखेर कपिल देव फोनवर म्हणाला हां यार आपण उद्या सकाळी नऊ वाजता भेटू.
करण थापर यांनी कपिल देवची घेतलेली ती पहिली मुलाखत. त्यानंतर २००० च्या मार्च महिन्यात BBC साठी करण थापर यांना सौरव गांगुलीची मुलाखत घ्यायची होती. फरिदाबाद य़ेथे दक्षिण आफ्रिकेविरोधात भारताचा सामना होता आणि सामन्याच्या आदल्या दिवशीची वेळ गांगुलीने करण थापर यांना दिली होती.
करण थापर आपल्या टिमसह त्यांची हॉटेलवर वाट पहात होते पण सौरव गांगुलीला वेळ होतं होता. अचानक त्यांना कपिलदेवचा फोन आला आणि कपिलने सौरव माझ्यासोबत असून त्यांना आपल्या ऑफिसवर येण्यास सुचवलं.
करण थापर पोहचल्यानंतर त्यांना समजलं की हॉटेलवरची गर्दीमुळे सौरवला मुलाखत देणं शक्य नव्हतं. मुलाखत व्हावी म्हणून कपिलने सौरवला आपल्या ऑफिसवर आणून त्याला फ्रेश व्हायला लावलं व मुलाखतीसाठी तयार केलं. ठरल्याप्रमाणे हि मुलाखत पार पडली.
कपिल देव बद्दलच्या या दोन आठवणी सांगून करण थापर पुढे लिहतात की,
बीबीसीच्या फेस टू फेस या माजी क्रिकेटरबद्दल असणाऱ्या मुलाखतीच्या कार्यक्रमाच्या संदर्भातून मी कपिल देव यांना फोन केला. कपिल मुलाखतीसाठी तयार झाला. मुलाखती काही दिवस अगोदर संपर्क केल्यानंतर तो कपिल देव म्हणाला,
“ सुनो यार, हम प्रॉपर इंटरव्यू करेंग. तुम्हें जो पूछना है, वो तुम पुछो और उसपे मुझे जो कहना है, वो मे कहूंगा. “
करण थापर लिहतात तो या वाक्यातून जे सुचवू पाहत होता ते एका क्षणात माझ्या लक्षात आले. नुकताच मॅच हरण्यासाठी त्याने २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. अशा वेळी त्याला एक हार्डटॉक मुलाखत द्यायची होती.
ठरलेल्या दिवशी मुलाखतीसाठी कपिल देव आला. मुलाखतीत कंबरेपासून वरचाच भाग दिसणार आहे म्हणून तो शॉर्ट वरतीच आला होता. वरती एक फॉर्मल शर्ट आणि जॅकेट असा व खाली शार्ट असा त्याचा पेहराव होता. करण थापर लिहतात की, तुम्ही ती मुलाखत निट पाहिली तर त्यांचे शॉर्ट आणि फॉर्मल शर्टच्या खाली त्यांचे केसाळ पाय देखील तुम्हाला दिसतील.
सुरवातीपासून हि मुलाखत त्याच्या आरोपावर केंद्रित करुनच करण्यात आली होती. पहिले दहा मिनीट पार पडल्यानंतर करण थापर म्हणाले,
भारताच्या विश्वविजेता क्रिकेट संघाचा कर्णधार, सर्वात जास्त फलंदाजांना तंबूत पाठवणारा गोलंदाज आणि त्याचबरोबर ज्याच्यावर एका सामन्यामध्ये पराभूत होण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे असा एक आरोपी म्हणून इतिहासत नोंद होईल याची भिती वाटते का?
हे ऐकल्यावर कपिलदेवचा बांध फुटला व त्याच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या.
कपिल देव रडताना पाहून करण थापर यांना नेमकं काय वाटलं याबद्दल ते लिहतात की,
दूरचित्रवाणीच्या विश्वात चमत्कार घडवणारे काही क्षण आपल्या हाती लागले आहेत, याची जाणिव मला झाली. हर्षोउल्हासानं खिदळणारी मुलं आणि भावना अनावर झालेली प्रौढ या दूरचित्रवाणीवरील प्रेक्षकांची सर्वात जास्त पकड घेणाऱ्या गोष्टी आहेत, अस मला अनेक वर्षांपुर्वी सांगण्यात आलं होतं.
करण थापर लिहतात मुलाखत संपण्यासाठी पंधरा मिनटाचा अवकाश होता. त्या वेळी माझ्या मनात पहिला विचार हाच आला की, यादरम्यान कपिलच्या डोळ्यातील अश्रू जर पुसले गेले आणि तो पुन्हा सामान्य परिस्थितीत आला, तर मुलाखतीचा शेवट काही फार चांगला होणार नाही. मुलाखत संपेपर्यन्त त्याच रडण सुरूचं राहावं, अस मला वाटतं होतं. त्याचबरोबर कपिलच्या भावनांशी खेळून त्याला दु:खी केल असतं तर ते वाईट दिसलं असतं. मी माझ्या प्रश्नातून काळजी आणि सहानभूती दाखवण्याचा प्रयत्न केला आणि प्रश्नांच्या फैरी चालू ठेवल्या. कपिल त्याची उत्तरे देत राहिला आणि त्याच्या अश्रूधारा देखील वाहत होत्या.
या मुलाखतीनंतर बीबीसीने एका कंपनीसोबत करार केलेल्या मार्केटिंग हेडचा कर्मचारी तिथेच होता. त्याने कपिल रडतानाचे फोटो घेतले आणि हिंदूस्तान टाईम्सला विशेष वृत्त प्रसिद्ध केले. तोपर्यन्त मुलाखत प्रसिद्ध झाली नव्हती. इतर माध्यमांनी हि मुलाखत मांडण्याचा प्रयत्न केला. आऊटलूकने त्यावर खास कव्हरस्टोरी केली.
हे ही वाच भिडू.
- मोदींप्रमाणेच बेनझीर भुट्टो आणि बच्चनला देखील करण थापर यांनी घाम फोडला होता.
- कपिल दा जवाब नही हे वाक्य तेंव्हा परवलीचे झाले होते..
- क्रिकेट मध्ये खेळाडुंचा जर्सी नंबर कोण आणि कस ठरवतं ?