१९७२ पासून मानव चंद्रावर गेला नाही कारण,

संपुर्ण जगभरात मानवाने चंद्रावर  पहिलं पाऊल टाकण्याच्या घटनेचा सुवर्णमहोत्सव साजरा होत आहे. १९ जुलै १९६९ रोजी अपोलो ११ या अंतराळयानातून निल आर्मस्ट्रॉंग आणि बझ अॅन्ड्रीन यांनी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला तर २० जुलै रोजी निल आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पाऊल ठेवलं.

निल आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पाऊल टाकताना म्हणाला होता, 

“मानवाचं हे छोटसं पाऊल पुर्ण मानवजातीसाठी एक मोठ्ठी  झेप सिद्ध होईल.” 

आत्ता तुम्ही म्हणाल, चंद्रावर ऐकायला कोण होतं. पुरावा दाखवा. अमेरिकेच्या नासानं हे अभियान हाती घेतलं असल्यामुळे त्यांच्याकडे सगळे पुरावे होते. चंद्रावर उतरण्याचा हा कार्यक्रम व्हिडीओमधून सर्वांनीच पाहिला आहे. 

असो, तर अपोलो ११ नंतर पुढच्या तीन वर्षात नासा तर्फे सात मिशन राबवण्यात आले. या सात पैकी सहा मिशन मध्ये माणूस चंद्राच्या जमिनीवर पोहचला. आजवर १२ अंतराळवीर चंद्रावर पोहचले. मात्र १९७२ पासून मानवरहित मिशनच राबवण्यात आले. 

१९७२ पासून  चंद्रावर एकाही अंतराळवीरांने पाऊल ठेवलं नाही. 

युजीन सेरनन हे चंद्रावर जाणारे शेवटचे अंतराळवीर होते. त्यांच्यानंतर मात्र चंद्रावर कोणीच गेले नाही. याच मुख्य कारण हे चंद्रावर माणूस पाठवण्याच्या योजनेतच लपलेले आहे. 

मुळात चंद्रावर माणूस पाठवण्याची योजना हि दोन देशांच्या स्पर्धेमधून घेण्यात आली होती. तत्कालीन USSR आणि अमेरिकेतल्या राजकिय स्पर्धेचा परिणाम म्हणजे अमेरिकेचं चंद्रावर ठेवलेलं पाऊल होतं. 

चंद्रावर मानव पाठवण्याची योजनाच अतार्किक होती.

सर्वात मोठ्ठी गोष्ट होती ती यासाठी लागणारी अवाजवी रक्कम. अस सांगितलं जात की, चंद्रावर माणूस पाठवण्यासाठी त्या काळी अमेरिकेने आपल्या एकूण बजेट पैकी पाच टक्के रक्कम वापरली होती.

इतक्या मोठ्या रक्कमेचा वापर करुन नासा मार्फत माणूस चंद्राच्या जमिनीवर पाठवण्यात आला पण त्यातून हाती केळं मिळालं. 

फक्त व्हिडीओ गवगवा यापलिकडे नासाच्या हाती जास्त काही घावलं नाही.

मानवरहित यान पाठवून ज्या गोष्टी करणं शक्य होतं तितक्या गोष्टी या मिशनमधून साध्य झाल्या. मात्र USSR सारख्या देशाला कमीपणा दाखवणं आणि जगात आपणच सर्वश्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी अमेरिकेने हे मिशन पुर्ण करुन दाखवलं. 

त्यानंतर अशा मिशनवर इतका पैसा खर्च करणं मुर्खपणा ठरतो हे अमेरिकेच्या लक्षात आलं आणि १९७२ सालापासून नासामार्फत मानवरहित अभियानच राबवण्यात येवू लागले. दूसऱ्या देशांनी देखील प्रतिस्पर्धा म्हणून मानव पाठवून स्वत:चा खिसा मोकळा करण्याचा उद्योग केला नाही. 

पण हे कुठवर तर जॉर्ज बुश येण्यापर्यन्त.

ते आले त्या दरम्यान तेल, खनिज, तालिबान हे सगळे प्रकरण सुरू झालेलेच. त्यात चीन सारखे देश आत्ता चंद्रावर आम्ही जाणार म्हणून नटून बसू लागले होते. त्यावेळी जॉर्ज बुश यांनी पुन्हा माणसांना घेवून चंद्रावर जाण्यासाठी प्रस्ताव दाखल केला. त्याचं बजेटच १,०४,००० मिलीयन अमेरिकन डॉलर इतकं होतं. इतका पैसा म्हणल्यानंतर अमेरिकेने परत एकदा कच खाल्ली आणि पुढच्या टर्मला बघू म्हणून सांगितलं. 

आत्ता आले ट्रम्प तात्या.

आपल्या स्वभावाप्रमाणे सिनेटच  #ट न ऐकता त्यांनी डिसेंबर २०१७ मध्ये सह्या केल्या. आत्ता अमेरिका परत एकदा चंद्रावर माणूस पाठवण्याच्या तयारीत आहे. तर तिकडे रशिया देखील २०३१ पर्यन्त चंद्रावर माणूस पाठवण्याच्या तयारीत आहेत. चीन चंद्रावर मानव वस्ती करण्याच्या तयारीत आहे. आपण पण त्याच दिशेने चाललोय. काही टेन्शन नाही.

असो तर १९७२ पासून माणूस चंद्रावर गेला नाही त्याच एकमेव कारण म्हणजे पैसा घालवून हाताला काहीच घावत नाही हेच आहे, हे आपणास आत्तापर्यन्त कळालच असेल. 

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.