त्याच्या खऱ्या आयुष्यातदेखील तो हिरोचा कमनशिबी मित्रचं आहे.

भारतीय सिनेमामध्ये हिरो म्हणजे सर्वश्रेष्ठ असतोय ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेष. काय पण होऊ दे, पूर्ण पिक्चरभर मार का खाईना पण शेवटी जिंकणार म्हणजे हिरो. जिंकणार हिरो मग हरायला व्हिलन पाहिजे. या जिंकण्याच्या लढाईत सोबतीला कधी कधी झाडाभोवती नाचायला कधी कधी किडनॅप व्हायला हिरोईन पण असते, दुखी बिचारी मां असते. हे सगळ सोडून आणखी एक कॅरेकटर असत, दोस्त.

हे दोस्त प्रकरण हिंदी सिनेमामध्ये जरा कमी सिरीयस घेतलेलं असत. पूर्वीच्या काळी ही दोस्तमंडळी कॉमेडी करायला असायची. अजागळ राहणारा, हिरोच्या रगिंगचा शिकार असणारा हा लल्लू दोस्त के लिये जानभी देण्यासाठी रेडी असायचा.

ही परिस्थिती बदलली नव्वदच्या दशकात. तेही एका नटामूळ. त्याच नाव दीपक तिजोरी.

बदलली म्हणजे काय फक्त हिरोच्या दोस्ताचं हिरोला मदत करण्याचं , त्याच्यासाठी आपला जीव चंदनाप्रमाणे झिजवण्याचं कमनशिबी काम बंद झालं नाही. दीपक तिजोरीमुळे हिरोचा दोस्तसुद्धा देखणा असू शकतो एवढाच बदल झाला.

दीपक तिजोरीच्या आयुष्याची स्टोरी एका सिनेमापेक्षा कमी  नाही. पण दुर्दैव म्हणजे या सिनेमामध्ये सुद्धा तो हिरो नाही.

जन्म मुंबईमध्ये झाला. घरची परिस्थिती बऱ्यापैकी उत्तमपण सिनेमाच कोणतही बकग्राउंड नाही. शिकायला विलेपार्ले मध्ये असलेल्या नरसीमुंजी महाविद्यालयात. तिथे बऱ्यापैकी नाटकाच वगैरे वातावरण होतं. दीपकला जाणवलं आपल्यात सुद्धा अभिनयाच टलेंट की काय म्हणतात ते आहे. त्याने कॉलेजच्या नाटकात काम करायला सुरवात केली.

नरसी मुंजीचे आजी माजी विद्यार्थी म्हणजे परेश रावल, आशुतोष गोवारीकर, आमीर खान यांचा एक थिएटर ग्रुप होता. या सगळ्या मंडळीचं त्याकाळात नाटकाच्या सर्कलमध्ये चांगलच नाव होतं. या सगळ्यानी होली या केतन मेहताच्या आर्ट सिनेमात काम केलं होतं. दीपकने त्यांना जॉईन केलं. त्यांच्या सोबत काम करू लागला.

तिथे दीपकचं देखील अभिनयाबद्दल कौतुक झालं. कोणीतरी त्याला म्हणल देखील,

“अच्छा काम करते हो. दिखनेमै भी  स्मार्ट हो. हिरो क्यू नही बनते?”

गडी खुश झाला. अॅक्टिंगबद्दल सिरीयस झाला. त्यानं ठरवलं आता यातच करीयर करायचं. हिरो बनायचं.

आमीर खानसारखा त्याचा मित्र वडिलां आणि काकांच्या कृपेने सिनेमात हिरो झाला देखील. पण दीपकचं नशीब एवढ जोरावर नव्हत. हातात आपल्या फोटोचा अल्बम घेऊन स्टुडियोच्या दारोदार फिरू लागला. रात्री एका हॉटेल मध्ये मनेजरची नोकरी करायची आणि दिवसभर निर्माते दिग्दर्शकांच्या ऑफिस बाहेर बैठक मारायची हाच त्याचा दिनक्रम होता.

अशातूनच काही सिनेमात फुटकळ रोल मिळाले, पण त्याने ते सोडले नाहीत. करत राहिला. त्याच्या स्ट्रगलचं चीज झालं. एकदिवस महेश भट्ट यांच्या ऑफिसमधून फोन आला की एका म्युजीकल सिनेमासाठी तुला साईन केलंय.

दीपकसाठी आभाळ ठेंगण झालं होतं. खुद्द महेश भट्टसारख्या दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात आपण हिरो होणार. सगळ्यांना नाचून नाचून त्याने बातमी सांगितली. खर तर सिनेमाची स्टोरी रेडी नव्हती, स्टारकास्ट तयार नव्हती, बाकी काही तयार नव्हत, फक्त गाणी तयार होती. नदीम श्रवण या संगीतकारांनी टीसिरीज साठी एक कसेट बनवली होती त्यावरच महेश भट्ट यांना सिनेमा बनवायचा होता. त्याच नाव सुद्धा ठरवलं होतं,

“आशिकी”

शुटींगची डेट जवळ येत चालली. दीपकने सुद्धा जोरदार तयारी केली होती. एकदिवस महेश भट्टनी त्याला ऑफिसला बोलवून घेतलं. तो खुश होऊन गेला पण तिथ गेल्यावर भट्टसाबनी त्याला सांगितलं,

“देखो बच्चे. ये जो हिरो का रोल था ना अब ये एक नये लडके को दे रहा हु.”

दीपक सुन्न झाला. आयुष्यातून एकदाच येणारा मौका देखील हुकला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. महेश भट्टना माहित होतं की त्याची काय स्थिती झाली असेल पण तेही काही करू शकत नव्हते. त्यांना त्यांच्या ओळखीच्या असलेल्या इंदिरा रॉयचा मुलगा या रोल साठी दीपकपेक्षाही परफेक्ट वाटत होता. त्यांनी कोम्प्लीमेंट्री म्हणून दीपकला हिरोच्या मित्राचा रोल देऊ केला.

आता होय म्हणण्याशिवाय त्याच्यापुढे कोणताच पर्याय नव्हता. दिपकने कसेबसे स्वतःला सावरले आणि ठरवले की जीव तोडून अॅक्टिंग करायची आणि प्रुव्ह करून दाखवायचं.

जेव्हा आशिकीची स्टोरी लिहिली गेली तेव्हा महेश भट्टनी खास लक्ष देऊन दीपकचा रोल लिहिला. पिक्चर त्यातल्या म्युजिक मूळ तुफान गाजला. मख्ख चेहऱ्याचा हिरो राहुल रॉयचं विशेष कौतुक झालं नाही पण त्याचा मित्र झालेला दीपक तिजोरी खुप जणांना आवडला. समीक्षकांनी देखील त्याच कौतुक केलं. दीपकला वाटलं आता आपल्या दारासमोर सिनेमाच्या ऑफरची लाईन लागेल. ती खरोखर लागली पण सगळे रोल हिरोच्या मित्राचे होते.

महेश भट्ट यांच्या दिल है की मानता नही मध्ये गळ्यात साखळी सोन्याची या गाण्यापुरता तो दिसला. त्यांच्याच सडक मध्ये संजय दत्त बरोबर चांगला रोल मिळाला होता. त्याच्याबरोबरचे रेहने को घर नही हे गाणे जबरदस्त गाजले.

१९९२ हे वर्ष त्याच्यासाठी महत्वाचे ठरले. अक्षयकुमारच्या पदार्पणातला “खिलाडी” या थ्रिलर सिनेमात तो त्याचा दोस्त झाला. तर त्याचा रियल लाइफ दोस्त असलेल्या आमीर खानच्या घरच्या जो जीत वही सिकंदरमध्ये व्हिलन टाईपचा रोल केला. खर तर आधी हा रोल मिलिंद सोमण करणार होता पण ऐनवेळी त्याने नकार दिल्यामुळे दीपकच्या पदरात ही भूमिका आली. दोन्ही सिनेमे गाजले. विशेषतः खिलाडीमध्ये दीपकच्या कामाची चर्चा झाली.

याची परिणीती झाली की तो हिरोचा मित्र म्हणूनच शोभतो यावर शिक्कामोर्तब झालं.

दीपकने हा गैरसमज तोडून काढायचा खूप प्रयत्न केला. त्याने आपला जुना मित्र आशुतोष गोवारीकरच्या मागे लागून त्याच्या पहिल्या सिनेमात हिरोचा रोल पटकावला. असं म्हणतात की हा सिनेमा बनवण्यासाठी पैसे सुद्धा दीपकने लावले होते. खूप गाजावाजा झालेला पेहला नशा हा सिनेमा तिकीटखिडकीवर साफ आपटला. या सिनेमाच्या एका सीनसाठी शाहरुख, आमीर खान मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा आणि शेवटच एकत्र दिसले. फक्त एवढ्यासाठी पहेला नशाला ओळखलं जात.

मग काय दीपकने देखील सत्य स्विकारल आणि गप्प गुमान मित्राची तर मित्राची भूमिका स्वीकारली. शाहरुख बरोबरच्या अंजाम आणि कभी हा कभी ना या दोन सिनेमात मात्र दीपक त्याचा मित्र झालाय पण मुख्य हिरोईन त्यालाच मिळते. त्याच्या फिल्मी आयुष्यातली हीच काय ती सांगण्यासारखी गोष्ट.

बाकी त्याने नव्वदच्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमात काम केलं. बच्चन पासून ते सलमान खान पर्यंत अनेकांबरोबर तो दिसला. संजय दत्तसोबतच्या वास्तवमधला मित्र म्हणून त्याचा सर्वोत्तम रोल असेल.

पुढे त्याने दिग्दर्शनात हात मारून बघितला. उप्स, फरेब, टॉम डिक हॅरी असे काही सिनेमे बनवले पण ते काही चालले नाहीत. त्यातल्या अश्लील कन्टेटमुळे त्याला शिव्या मात्र भरपूर खाव्या लागल्या. दिग्दर्शनाच करीयर गंडल. बिग बॉसच्या पहिल्या सिझनमध्ये देखील तो झळकला. सरळच होतं, आता हिरोचा दोस्त म्हणून सुद्धा रिटायरमेंट आली होती.

पुढे अनेक वर्षांनी संजय दत्तच्या डिपार्टमेंट आणि महेश भट्ट यांचा भाचा इम्रान हाश्मीच्या मि.नटवरलालमध्ये त्याने कमबक केला पण वजन वाढलेल्या, चाळीशीत पोहचलेल्या दीपकला नव्वदीच्या आठवणीत रमणाऱ्या पब्लिकने स्वीकारलं नाही. 

हे सगळ झालं याशिवाय वैयक्तिक आयुष्यात त्याची कहाणी आणखीन दर्दभरी होती. त्याची बायको शिवानीने पंचवीसवर्षाच्या संसारानंतर दीपककडे घटस्फोट मागितला. तिच्या मते दीपक तिला दुसऱ्या मुलींसाठी फसवत होता. पण कोर्टात गेल्यावर कळाल की दीपकचं आणि शिवानीचं लग्नच अवैध होत कारण तीच यापूर्वी एका व्यक्तीबरोबर लग्न झालं होत आणि त्यातून शिवानीने सोडचिठ्ठी घेतलीच नव्हती.

हे असल गुंतागुंतीच आणि कमनशिबी आयुष्य दीपक तिजोरीच्या वाट्याला आल आहे. बिचाऱ्याने एवढी वर्ष फिल्मइंडस्ट्रीमध्ये काढली पण कधी मोठे अवार्ड त्याला मिळाले नाहीत. पण त्याच्यासाठी ते महत्वाच देखील नाही. एका सच्चा मित्राप्रमाणे पडती बाजू घेऊन सिनेमाबरोबरचं आपलं रिलेशन तो अजूनही सांभाळून आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.