जेव्हा शाहरुख खान सनी पाजीच्या हातचा मार खाता खाता वाचला होता.

गरमधरम धर्मेंद्र यांचा थोरला लेक सनी म्हणजे एकदम साधा,सरळ, लाजाळू. त्याच्यात भरपूर पोटन्शियल होतं पण कधी इंडस्ट्रीने त्याला सुपरस्टार म्हणून मान्यता दिली नाही. मोठ्या बॅनरच्या सिनेमात काम करणाऱ्या हिरोंना सुपरस्टार समजल जायचं. दारू असते म्हणून पार्ट्यांना न जाणारा सनी अभिनय चांगला करत असूनही नंबर वनच्या स्पर्धेतून मागे पडला. त्याची जागा धूर्त अभिनेत्यांनी घेतली.

यश चोप्रा तेव्हा मोठे डायरेक्टर होते. अमिताभचा दिवार,त्रिशूल, सिलसिला वगैरे सुपरहिट सिनेमे त्यांनी बनवले होते. त्यांचं यशराज बॅनर तेव्हाही सर्वात मोठे समजलं जायचं. चांदणी , लम्हे वगैरे सिनेमे बनवून यशजीनी दाखवून दिल होतं की बदलत्या युगाबरोबर त्यांनी स्वतःमध्येही बदल घडवला आहे.

साल होत १९९३. यश चोप्रा नव्या सिनेमाची तयारी करत होते. त्यांचा धाकटा मुलगा उदय आणि त्याचा मित्र ह्रितिक रोशन यांनी एक इंग्लिश सिनेमा बघितला होता त्याच नाव डेड क्लेम. या दोघांमुळे यशजीनी त्या सिनेमाच्या स्टोरीवर सिनेमा बनवायचा ठरवलेलं. सिनेमाच नाव सुद्धा ह्रितिक रोशनने सुचवलेलं. डर !!

हा एक सायकोलॉजीकल थ्रिलर सिनेमा होता. यातला व्हिलन एक माथेफिरू स्टॉकर असतो जो एका नेव्ही कमांडो (हिरो)च्या बायको(हिरोईन)च्या मागे हाथ धुवून लागलेला असतो. तर गंमत अशी होती की सिनेमाच्या स्टोरीमध्ये व्हिलनचा रोल जरा प्रेक्षकांची जास्त सहानुभूती मिळवणारा होता.

हिरोचा रोल ऋषी कपूर ,जॅकी श्रॉफ मिथुन चक्रवर्ती यांनी नकार दिल्यावर आपल्या साध्या भोळ्या सन्नी पाजीला मिळाला. हिरोईन जुही चावला झाली. व्हिलनच्या रोल साठी मात्र खूप मोठा राडा झाला.

सगळ्यात आधी आमीर खान हा रोल करणार होता. पण यश चोप्रा आणि त्याच्यात परंपरा या सिनेमावेळी काही तरी खटके उडाले होते म्हणून त्याने डर मध्ये काम करायला नकार दिला. मग संजय दत्त, अजय देवगन, सुदेश बेरी(सुराग वाला) अशा अनेकांनी काही ना काही कारणाने हा रोल सोडून दिला. कारणे काहीही असोत पण एकदा निगेटिव्ह रोल केला की आपल्यावर तोच शिक्का बसेल म्हणून त्यांनी हे रोल सोडले होते.

संजू बाबा खलनायकचं शुटींग करत होता. सिनेमा गुंडाळावा लागतो की काय याचे टेन्शन यश चोप्रांना आले. अखेर त्यांनी नवख्या शाहरुखला साईन केले. त्याला पॉझीटीव्ह निगेटिव्ह विचार करणे परवडणारे नव्हते. यश चोप्रांचा सिनेमा म्हणून शाहरुखने डोळे झाकून होकार कळवला. त्याच्या आणखी एका सिनेमाच शुटींग चालू होत. त्यातही तो व्हिलन होता. नाव बाजीगर !!

का कुणास ठाऊक यश चोप्रांना हा बडबड्या शाहरुख खान खूप आवडला. त्यांचा थोरला मुलगा आदित्य चोप्रा हा त्यांना असिस्टंट होता. त्याचे आणि शाहरुखचे सूर चांगलेच जुळले. शाहरुख या दोघांना गंमतीत सारखं म्हणायचा

“यार आप दोनो मुझे व्हिलन बनाके छोडोगे !!”

पण यश चोप्रानी त्याला सांगितलेलं ,

“पुत्तर ये राहुल मेहरा का रोल तेरी जिंदगी बदल देगा.”

शुटींग सुरु झालं. यश चोप्रांनी शाहरुख च्या रोल कडे थोडी जास्त मेहनत घ्यायला सुरवात केली. सनीला हे लक्षात यायला वेळ लागला नाही. पण तो सुरवातीला काही बोलला नाही. शाहरुखने गोड बोलून चोप्रा पितापुत्रांना गुंडाळलय हे सरळ सरळ दिसत होत. हिरो सन्नी असूनही शाहरुख जुही वर “तू मेरे सामने” आणि “जादू तेरी नजर” सारखे नितांत सुंदर गाणे चित्रित झाले होते.

पण शेवटी मात्र हँडपंप उखडणाऱ्या सनीपाजीला गुस्सा आलाचं.

झालं काय होतं की सनी आणि शाहरुखच्या क्लायमॅक्सच्या फायटिंगचा सिक्वेन्स होता. शुटींगच्या वेळी यशजी त्या दोघांना सीन समजावून सांगत होते. सनीने तो सीन ऐकला आणि त्याचा चेहरा रागाने लाल झाला. त्यात सनीला शाहरुख खूप मारत असतो. सनीचे म्हणणे असे होते की हिरो हा एका नेव्हीचा कमांडो आहे अंगापिंडाने मजबूत आहे आणि त्याच्या समोर हा व्हिलन म्हणजे एखदया झुरळासारखा आहे तरी तो शाहरुखकडून मार का खाईल??

पण यश चोप्रा आपलंचं म्हणण त्याला सांगत होती. सनीचा पारा चढत होता. यश चोप्रा त्याच्या वडिलांच्या वयाचे होते. त्यामुळे त्यांच्याशी जोरात बोलता ही येत नव्हत. आपल्या हातून काही चूक होऊ नये म्हणून सनीने दोन्ही हात जीन्सच्या खिशात घातलेले होती. पण जसं जस वातावरण तापल तसं खिशातच त्याच्या मुठी आवळल्या गेल्या. आता त्याचा ढाई किलोचा हात त्या बिचाऱ्या जीन्सच्या खिशाला सहन होईना.

सनीचा राग एवढा वाढला की त्याचा हात आपल्या पँटचे खिसे फाडून बाहेर आला.

सनी देओलचा हा जमदग्नीवाला अवतार बघितल्यावर सेटवर एकच गोंधळ उडाला. शाहरुख आदित्य चोप्रा वगैरे सगळी मंडळी सनीचा मार खायला लागू नये म्हणून पळून गेली. सनीला स्वतःला कळाले नाही आपल्याला नेमके काय झाले आहे. कसबस त्याची समजूत काढून यशजीनी सिनेमाच शुटींग पूर्ण केलं.

डर रिलीज झाल्यावर सुपरहिट झाला. त्याची गाणी खूप गाजली. अपेक्षेप्रमाणे शाहरुख सनी देओल पेक्षा जास्त भाव खाऊन गेला. त्याचा क क क किरण हा डायलॉग सुद्धा फेमस झाला. शाहरुखला या रोल साठी फिल्मफेअर देखील मिळाला. त्याच्या पुढे सिनेमाचे हिरो, हिरोईन दोघेही झाकोळून गेले.

यश चोप्रांनी ठरवलं आतापासून आपल्या सिनेमाचा हिरो शाहरुखचं असणार. दिल तो पागल है, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, मोहोबत्ते ते जब तक है जान पर्यंत शाहरुख यश चोप्रा बॅनरचा मेन हिरो होता. खरोखर त्याच आयुष्य त्या डरच्या रोलने बदलवून टाकले. आजही हा रोल सोडल्या बद्दल तो आमीर संजय दत्त, अजय देवगन यांचे आभार मानतो.

पण हा सनी देओलचा यश चोप्रा, आदित्य चोप्रा शाहरुख खान यांच्या बरोबरच शेवटचा सिनेमा ठरला. त्याने परत या लोकांबरोबर काम करायचे नाही असं मनोमन ठरवलं आणि आयुष्यभर ते पाळल.

(स्वतः सनी देओलने हा किस्सा आप की अदालत या कार्यक्रमातल्या मुलाखती मध्ये सांगितलं आहे.)

हे ही वाच भिडू.