भारताचा ओपनर कोण हा निर्णय लोकशाही पद्धतीने झाला होता.

काल सगळीकडे बातमी आली येत्या फेब्रुवारीमध्ये सचिन आणि सेहवाग परत ओपनिंग करताना दिसणार आहेत. निवृत्त खेळाडूंची ही एक प्रदर्शनीय ट्वेंटी ट्वेंटी मॅॅॅच असणार आहे. अनेक जुने खेळाडू यात दिसतील पण सगळ्यात जास्त उत्सुकता सचिन सेहवागच्या ओपनिंग ची आहे.

आपल्या अनेक आठवणी या जोडीशी जोडल्या गेलेल्या आहेत. सचिन आणि सेहवाग मैदानात उतरले तर आता फक्त फटकेबाजी पाहायला मिळणार हे त्याकाळच गणित होतं. सुरवातीच्या ओव्हर टाकणाऱ्या बॉलर्सची फाटायची. शोएब अख्तर सारख्या तुफानाची त्यांनी केलेली वाताहत सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेली.

 कोणी तरी म्हटल आहे,

“वो दो शेर थे. विरू जवानीवाला शेर था. पहेले बॉलसे झपट जाता था. मगर सचिन मन्जा हुआ शेर था. वो अपने शिकार को दबोचता था, उसके बाद खरोचता था, आराम से बैठके बॉलरका मजा लेता था.  “

या दोघांची अशी दहशत होती. यापूर्वी हीच दहशत सचिन गांगुलीची होती. त्यांना तर आतापर्यंतचा सर्वात बेस्ट ओपनिंग पेअर मानले जाते. मग अस काय घडल कि सचिन आणि सेहवाग ओपनिंग करू लागले.

नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात उजवा सचिन आणि डावखुरा गांगुली यांची ओपनिंग सेट झाली होती. अनेकवेळा शतकी पार्टनरशिप त्यांनी केल्या. मध्यंतरी सचिनचं पाठीच मोठ ऑपरेशन झालं. त्याला आपल्या खेळाची स्टाईल बदलावी लागली. जड बॅट सोडून द्यावी लागली. सिक्सर मारण्याच प्रमाण हि त्याने कमी केल. खर तर सचिन हा मधल्या फळीतला खेळाडू, टीमची गरज म्हणून तो ओपनिंगला खेळू लागला होता. पण त्यानंतर त्याची रवानगी ४थ्या नंबरला केली गेली.

सेहवाग आल्यावर त्याची हवा झाली. दिसायला अगदी सचिनची दुसरी कॉपी, उंची सेम, खेळताना सुद्धा जुन्या सचिनची आठवण यावी असाच वाटायचा.

त्याचा स्फोटक खेळ बघून त्याला गांगुली बरोबर ओपनिंग करायला लावल. काही वेळा सचिन आणि सेहवाग असाही प्रयत्न करून झाला पण दोघेही राईट हँडवाले बॅटसमन होते. त्यापेक्षा विरोधी टीमला अडचण व्हावी म्हणून उजवा-डावा हेच कोम्बीनेशन ओपनिंगला पाठवण सोयीस्कर असत. फिल्डिंग रेस्ट्रीक्शन मुळे सेहवागसारख्या फटकेबाजाला सलामीला पाठवणेच योग्य होते. म्हणून गांगुली आणि सेहवाग हेच सलामी साठी फायनल झाले.

२००३च्या वर्ल्ड कप पूर्वी भारताचा न्यूझीलंड दौरा झाला. भारताला ५-२ असा प्रचंड मोठा पराभव स्वीकारावा लागला. सेहवाग सोडून इतर सगळ्या फलंदाजांची न्यूझीलंडमध्ये दैना उडाली होती. सचिनचा तर सलग तीन सामन्यात स्कोर ०, ०, १ असा झाला होता. 

न्यूझीलंडमधल्या हाराकिरी नंतर भारतीय टीम थेट दक्षिण आफ्रिकेत वर्ल्डकप साठी आली. तिथेही पहिल्या दोन सराव सामन्यात सचिनची कामगिरी चांगली झाली नाही. सचिन जर फोर्ममध्ये नसला तर भारत वर्ल्ड कप कशी जिंकणार. त्याने फ्री होऊन खेळणे गरजेचे होते. सगळ्यानाच टेन्शन आल होत.

शेवटी भारताचा कोच जॉन राईट तेंडूलकरला भेटायला आला. त्याने सचिनला विचारलं कि तुला कोणत्या नंबरवर खेळायच आहे? सचिन म्हणाला,

” ज्या नंबरवर टीमला आवश्यकता आहे तिथे मी खेळायला तयार आहे. “

पण जॉनच या उत्तरावर समाधान झालं नाही. त्याने खूप खोदून खोदून विचारल्यावर सचिन म्हणाला,

“मला ओपनिंगला खेळायला आवडेल”

जॉन राईटने ठरवल कि सचिन गांगुली ओपनिंग करणार. वर्ल्डकप चे पहिले दोन सामने दोघे सलामीला आले. पण दुर्दैवाने गांगुली दोन्ही मॅच मध्ये फेल गेला. सचिनने दोन्ही वेळी बरा खेळला होता. त्याने एक अर्धशतकमारल होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅच मध्ये तर अख्खी टीम १२५ मध्ये गारद झाली होती. पुढचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होता.

करो या मरो अशी स्थिती होती. जॉन राईटने टीम मिटिंग बोलवली. सगळ्या खेळाडूना सांगितल कि 

“आपण लोकशाही पद्धतीने ठरवू कि भारताची ओपनिंग पार्टनरशिप कोण असेल? प्रत्येकाने आपआपल मत एका चिठ्ठीत लिहा आणि मला द्या. “

पंधरा जणांपैकी १४ जणानी सचिन सेहवागला पसंती दिली. एकच मत गांगुली सचिनला मिळाले होते. ते मत स्वतः कप्तान दादाचेच असण्याची शक्यता दाट होती. कोचने सेहवाग सचिनवर शिक्कामोर्तब केल. गांगुली ला खालच्या नंबरवर ढकलण्यात आल. पुढे त्या वर्ल्डकपमध्ये सचिन सेहवागने कोणाला निराश केल नाही. त्यांनी प्रत्येक सामन्यात तडाखेबाज ओपनिंग केली आणि हीच जोडी पुढे कायम साठी भारताची ओपनर पार्टनर बनली.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.