कोचने सेहवागला कानफटात मारली आणि गांगुली भडकला.
गोष्ट आहे २००२ सालची. इंग्लंड मध्ये नटवेस्ट सिरीज सुरु होती. गांगुलीच्या अग्रेसिव्ह कॅप्टनसी खाली नव्याने भारतीय टीम उभी राहिली होती. त्यात सचिन, द्रविड सारख्या सिनियर खेळाडूंच्या सोबतीला सेहवाग युवराज, कैफ, झहीर असे नव्या दमाचे प्लेअर्स आले होते. कोणत्याही टीमला फाईट देण्याचे स्पिरीट त्यांच्यात होते.
या टीमसाठी नवी गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच जॉन राईटच्या रुपात भारताला फॉरेनचा कोच मिळाला होता.
न्यूझीलंडचा ऑलराउंडर जॉन राईट परफेक्शनिस्ट होता. त्याने टीम बांधायला गांगुली एवढीच मेहनत घेतली होती. त्याच्यामुळेच भारतीय क्रिकेटसंघाचा अप्रोच प्रोफेशनल झाला होता. फिल्डिंग, रनिंग बिटवीन दी विकेट्स मध्ये सुधारणा झाली होती. जॉनचे सगळ्या खेळाडूंबरोबर चांगला रॅपो जुळला होता.
तर झालं असं होत की वीरेंदर सेहवाग तेव्हा चांगल्या फॉर्म मध्ये होता. जॉन राईटचा तो लाडका खेळाडू. त्याला सचिनच्या जागी गांगुलीसोबत ओपनिंगला पाठवण्याची आयडिया जॉनचीच. सुरवातीपासून धुव्वादार बॅटिंग करण्याच्या सेहवागच्या बोल्ड अॅटीट्युडवर अख्खी टीम फिदा होती.
पण गेले काही मॅच झाले सेहवाग बेजबाबदार शॉट मारून आउट होत होता. जॉनने त्याला बऱ्याचवेळा समजावून सांगितले होते की पहिले काही ओव्हर्स थोड स्वतःला आवर घाल, बॉल बघून खेळ. नंतर तुला कोणी अडवू देखील शकणार नाही. सेहवाग मुंडी हलवायचा पण मैदानात जाऊन स्वतःला हवे तेच करायचा.
आता महत्वाची नेटवेस्ट ट्राय सिरीज सुरु होती. समोर होती होम टीम इंग्लंड. त्यांनी नुकताच भारतात भारताला हरवून आपला अपमान केला होता. सगळी टीम त्याचा बदला घेण्यासाठी खेळत होती. पहिल्या मॅच मध्ये सेहवागने इंग्लंड विरुद्ध हाफ सेंच्युरी मारली तरी आउट होताना फालतू बॉलवर आउट झाला. पुढची मॅच ओव्हल मैदानात श्रीलंकेविरुद्ध होणार होती.
जयसूर्याने टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली. झहीर खान आणि आगरकरने केलेल्या जबरदस्त बॉलिंगमुळे श्रीलंकेचा डाव २०२ धावात आटोपला. भारताला जिंकायला २०३ रनांचे त्यामानाने सोपे टार्गेट मिळाले होते. कोणतीही गडबड न करता विकेट राखून खेळल तर भारत मॅच सहज जिंकणार याची खात्री होती.
आपली इनिंग सुरु झाली. गांगुली आणि सेहवाग मैदानात उतरले. पहिल्याच बॉलला गांगुलीच्या बटचा इनसाईड एज लागून बाउन्ड्री गेली. एका सेकंदासाठी गांगुलीचे हार्टबीट थाब्ले होते. त्यानंतर मात्र त्याने ठरलेल्या स्ट्रटेजी प्रमाणे शिस्तीत खेळ केला. पण अखेर चामिंडा वासने त्याला आपल्या जाळ्यात पकडलेच. इकडे विरू आपल्या धुंधीत खेळत होता. त्याने निवांत दोन बाउंड्री मारली . कोच जॉन राईट ड्रेसिंग रूम मध्ये बसला होता. तो म्हणाला,
” कमीतकमी आज तरी विरूला शांत खेळायला पाहिजे. आता जर तो खराब बॉलला आउट झाला तर मात्र मी त्याला धडा शिकवेन.”
आणि घडलंही तसच.
चामिंडा वासच्या एका बॉलला सिक्स मारायच्या प्रयत्नात असलेल्या सेहवागने जयसूर्याच्या हातात अगदी सोपा कच दिला. भारताची अवस्था २ बाद २६ अशी झाली. दोन्ही महत्वाचे बॅट्समन आउट झाले होते. सेहवाग पव्हेलीयन मध्ये परतला पण त्याच्या चेहऱ्यावर आपली चूक झाली असे काही एक्सप्रेशन नव्हते, नेहमी प्रमाणे निवांत गाणं गुणगुणत शिटी मारत तो कपडे बदलायला गेला.
जॉन राईटचं टाळकचं सटकल.
तो भडकला आणि तणतणत ड्रेसिंग रूममध्ये आत गेला. सगळ्यांना कळाल आता काही मोठा मॅटर होणार आहे. सिनियर प्लेअर्स धावत आत गेले तोवर दिसलं जॉन राईटने सेहवागची गचांडी धरली आहे आणि फाडफाड इंग्लिश मध्ये शिव्या घालत आहे. सगळ्यांनी मिळून त्याला बाजूला केलं.
तेव्हा टीमचे मॅनेजर होते राजीव शुक्ला. ते बाल्कनीमध्ये बसून मॅच बघत होते. कप्तन गांगुली रागारागात तिथे आला आणि त्याने सांगितले की जॉन राईटने सेहवागला मारलय आणि विरू रडत बसला आहे. राजीव शुक्ला काय झालंय ते पाहायला आला. विरू खरोखर रडत होता आणि जॉन राईट शेजारच्या रूममध्ये टेन्शन मध्ये सिगरेट ओढत उभा होता.
तिकडे मॅच सुरूच होती. सचिन आणि दिनेश मोंगिया ने डाव सावरला होता. कसबस ड्रेसिंग रूममधली मॅच शांत करण्यात आली. गांगुली म्हणत होता की जॉन राईटने विरूची सगळ्यासमक्ष माफी मागितली पाहिजे नाही तर आमच्या पैकी कोणीही ग्राउंड मधून बाहेर पडणार नाही.
तोवर सचिन देखील ४९ रनावर आउट होऊन आला. मॅच बऱ्यापैकी आपल्या हातात आली होती. युवराज, कैफने उरलेले सोपस्कार पूर्ण केले. भारताने मॅच जिंकली होती.
राजीव शुक्ला सांगतात त्याप्रमाणे सचिन आणि कुंबळेने जॉन राईटशी चर्चा केली. जॉनने भावनेच्या भरात जी कृती केली ती नक्कीच चूक होती पण त्यामागे वीरूच्या खेळाबद्दलची काळजीच होती. सचिनचं मत होतं की कितीही झालं तरी जॉन हा कोच आहे आणि त्याने इतर खेळाडूंसमोर विरूची माफी मागणे ठीक नाही.
अखेर मॅटर संपवण्यात आला. पुढे अनेक दिवस न्यूज चॅनलनी भारतीय टीममध्ये कशी भांडणे आहेत याब्ब्द्ल तिखटमीठ लावून बातम्या लावल्या. पण जेव्हा टीमने फायनल जिंकली आणि गांगुली ने लॉर्डसवर शर्ट काढून फिरवला तेव्हा सगळ्या बातम्या बंद झाल्या आणि चर्चा फक्त गांगुलीच्या शर्टची उरली.
लोक सेहवागचा इन्सीडन्ट विसरून देखील गेले. सेहवाग देखील ती घटना आणि जॉनचा सल्ला विसरून गेला. कोणाचा बाप जरी आला तरी मी बदलणार नाही याच अटीट्युडमध्ये तो आयुष्यभर खेळला. अगदी तीनशेच्या जवळ असताना देखील सिक्स मारायला जाऊन आउट होण्याचा विक्रम त्याने केलाय.
पण भारताचा कोच होण्याच अवघड शिवधनुष्य उचलणाऱ्या जॉन राईटने कधीच ही घटना विसरली नाही. आपल्या आत्मचरित्रातही या कटू प्रसंगाचाचा उल्लेख त्याने केला आहे.
हे ही वाच भिडू.
- सेहवागने लक्ष्मणला सांगितलं होतं, “तुम्हाला जमलं नाही पण भारताकडून पहिलं त्रिशतक मी मारणार”
- अंपायर आउट देऊ नये म्हणून सेहवाग आधीच त्याच्याजवळ आपली सेटिंग लावायचा.
- हरभजनसिंगच पाक खेळाडू बरोबर भांडण झालं तरी सचिन ते सोडवायला गेला नाही.
bolbhidu need to have a whatssapp group
मस्तच