मी पुन्हा येईल हे वाक्य फक्त कुमार सानूने सिद्ध करुन दाखवलं..

नव्वदच दशक म्हणजे कुमार सानूचा काळ होता. सलग पाच वर्ष फिल्मफेअर त्याने खिशात टाकली होती. नदीम श्रवण, अन्नू मलिक पासून ते नव्या पिढीच्या जतीन ललित पर्यंत प्रत्येकाला त्याचा आवाज आपल्या सिनेमात हवा असायचा. याचा अर्थ असा नव्हता की तो काही उच्चकोटीचा सिंगर होता. त्याच्या आवाजातही काही गुणदोष होते. चढला की त्याचा आवाज थरथरायचा. शास्त्रीय संगीत वगैरेशी त्याने संबंध तोडून टाकला होता.

हे सगळ असूनही पब्लिकचा तो जाम लाडका होता. 

साजन, बाजीगर, दिवाना, धडकन, परदेस जिकडे बघेल तिकडे कुमार सानूचा आवाज घुमत असायचा. तो ज्याला हात लावेल त्याच सोन होत होतं. कुमार सानू म्हणजे गाण डोळे झाकून सुपरहिट असच गणित होतं. प्रत्येक हिरोला आपला आवाज म्हणून कुमार सानू हवा असायचा. त्याकाळात त्याची हजारो गाणी रेकॉर्ड झाली असतील. उदित नारायण सोबतची त्याची रायव्हलरी गाजली.

हळूहळू काळाच घड्याळ पुढ सरकलं. दोन हजार सालानंतर आलेलं नव सहस्त्रक इंग्रजी पॉप गाणी ऐकणार्या तरुणाईच होतं. सानूच्या आवाजातून चढत जाणाऱ्या मेलडीवाल्या गाण्याची निवांत चव घ्यायला त्यांना वेळ नव्हता. अदनान सामी पासून कैलाश खेर पर्यंत वेगवेगळ्या आवाजातल्या गायकांची चलती सुरु झाली. नाकातून सूर ओढणाऱ्या हिमेशला पण लोकांनी डोक्यावर घेतल होतं.

सानू मागे पडत गेला.

फक्त सानूच नाही त्याला मोठे करणारे नदीम श्रवण, अन्नू मलिक सारखे संगीतकार ही इंडस्ट्रीमधून गायब झाले. उदित नारायणच करीयर सानू नंतर दोन चार वर्ष जास्त चालल पण काही वर्षांनी तोसुद्धा दुर्मिळ झाला. एकेकाळी ज्यांच्या शिवाय पानही हलायचं नाही असे हे फिल्मी दुनियातील दिग्गज लोक. सुपरस्टार पद अनुभवलेलं. पण आता काम नाही म्हणून घरीच बसून असायचे.

बराच काळ लोटला. २०१५ साल उजाडलं. कुमार सानूला एक फोन आला. अन्नू मलिक फोन वर होता. इंडियन अॉयडलचा जज वगैरे त्याची कामे चालू होती. तुरळक एखाद्या लो बजेट सिनेमात एखाद गाण देखील तो बनवत होता. त्याने सानूला घरी भेटायला बोलवलं. इतक्या दिवसांनी अन्नू मलिकने आपली आठवण काढली म्हणून सानुला खूप आश्चर्य वाटलं. पण तरी तो गेला.

अन्नू मलिकच्या घरी गेल्यावर दोघे गप्पा मारत बसले. आपल्या काळातली गाणी आठवत उगाच नॉस्टॅल्जिक होत त्यांच्या गप्पा चाललेल्या.

अन्नू त्याला “राहो में उनसे मुलाकात होगयी जिसे डरते थे वही बात हो गई” वगैरे गाणी गायला लावत होता. बेत अगदी उत्तम जमून आला होता पण सानूला राहून राहून वाटत होतं की अन्नू मलिकच नेमक काम काय आहे? विनाकारण गाणी म्हणायला तर तो आपल्याला बोलवणार नाही.

शेवटी त्याने विचारलंच,”बात क्या है?”अन्नू मलिक म्हणाला,

“मुझे एक नई फिल्म मिली है. तुम्हे ऊस में एक गाना गाना है.”

कुमार सानू म्हणाला नो प्रॉब्लेम. पण पुढचं वाक्य ऐकून तो उडालाच,

“फिल्म यशराज बॅनर की है. “

यशराज म्हणजे भारतातील सर्वात मोठा बॅनर. खूप पूर्वी सानूने त्यांच्याकडे “तुझे देखा तो ये जाना सनम” सारखी गाणी गायली होती पण त्यानंतर वीस वर्षे त्याचा आणि यशराजचा  काही संबंध उरला नव्हता. अन्नू मलिकने तर आयुष्यात त्यांच्याकडे कधी संगीतही दिल नव्ह्त. तो ही बरिच वर्षे गायब होता. मग ऐकतोय हे खर की खोटं हे सानुला कळत नव्हत. पण अन्नू मलिक खूप कॉन्फीडंट वाटत होता. त्याची बडबड सुरूच होती.

“सानू देख, इस बार हमे फाडणा होगा. नाईनटीज के जमाने मै जैसा लाइव्ह ऑर्केस्ट्रा होगा. सौ म्युजीशियन्स, सिक्स्टी वायोलीन्स होगे. तू करेगा नां?”

सानूने मान डोलावली. पण तो मनातल्या मनात खूप घाबरला होता. त्याला माहित होतं की आजकालची म्युजिक इंडस्ट्री कशी चालते. एकच गाण चार पाच गायकांकडून म्हणून घेतल जात आणि फायनली पडद्यावर कोणाच दिसेल सांगता ही येत नाही. अन्नू मलिक किती फेकाडा आहे त्याला सुद्धा माहित असावं.

अखेर तो दिवस उजाडला.

यशराजच्या अत्याधुनिक स्टुडीओमध्ये रेकोर्डिंग होणार होतं. अन्नू मलिकने जुन्या स्टाईल प्रमाणे मोठा ऑर्केस्ट्रा तयार केला होता. माईकसमोर कित्येक वर्षांनी  कुमार सानू गाण्यासाठी उभा राहिला. पण का कुणास ठाऊक एकेकाळचा हा सुपरस्टार गायक अचानक थरथर कापू लागला. अन्नू मलिकने ही गोळा केलेलं उसण अवसान गळून पडलं. त्याचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती.

राज्य गमावलेल्या राजाने अखेरच्या लढाईला निघावं अशी दोघांची स्थिती झाली होती.

तरी अन्नू मलिकने स्वतःला सावरल. त्याने कुमार सानुलाही समजावलं.

“शानू सिर्फ तू अकेलाही ये गाना गानेवाला है. तेरे सिवा ये गाना दुसरा कोई गा ही नही सकता. तू कुमार सानू है, तेरे जैसा दुसरा कोई भी नही.”

हे ऐकल्यावर कुमार सानूच्या जीवात जीव आला. दोघांनी परत आपल्या काळाची उजळणी केली. थोड्यावेळाने दोघेही शांत झाले. जुन्या आठवणीने जोश चढलेला कुमार सानूने जोरदार आलाप घेतला,

“तू…….. तू मेरी है प्रेम की भाषा”

आयुष्यमान खुराना आणि भूमी पेडणेकरचा “दम लगाके हैशा” हा अख्खा सिनेमा कुमार सानूच्या आवाजाभोवती फिरतो. त्याचा आवाज हे त्या सिनेमातलं एक कॅरेक्टर आहे. नव्वदच दशक या सिनेमामध्ये अन्नू मलिकने उभं केलं. आदित्य चोप्रांनी त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिल होतं.

सिनेमा सुरु होतो तेव्हा यशराजचा लोगो येतो त्यावेळी कायम लता दीदींचा आवाजातली धून असते, मात्र या सिनेमावेळी त्यांनी लता दीदींच्या ऐवजी कुमार सानूचा आवाज वापरला होता. अख्ख्या थिएटरमध्ये पब्लिकने अंगावर काटा उभा राहणे म्हणजे काय असते याचा अनुभव घेत0ला. कुमार सानू आणि अन्नू मलिकचा पुनर्जन्म झाला होता. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.