आजी-माजी गृहमंत्र्यांच्या पुढच्या पिढीने नेमके कोणते उद्योग करून ठेवलेत?

काही दिवसांपूर्वी जय अमितभाई शाह यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सेक्रेटरीपदी निवड झाली. तेव्हा मिडियामध्ये अनेक उलटसुलट चर्चा झाल्या. जय शाह बसले आहेत आणि बीसीसीआयचे आजी माजी अध्यक्ष गांगुली, श्रीनिवासन वगैरे त्यांच्या शेजारी उभे आहेत हे फोटो पण व्हायरल झाले.

याच काळात जय शाह यांना झोंबणारा टोमणा एका ट्विटरवरच्या व्यक्तीने मारला. त्याची सगळ्या भारतात न्यूज झाली. त्याच नाव कार्ती चिदंबरम.

तर विषय असा आहे की जय शहा आणि कार्ती चिदंबरम हे दोन्ही ही भारताच्या गृहमंत्र्याचे वारसदार. दोघांच्यातही एक अलिखित युद्ध आहे हे नक्की.

आधी जाणून घेऊ कोण आहेत हे दोघे.

सुरवात करू कार्ती चिदंबरम यांच्या पासून.

तामिळनाडूमध्ये नागर्थर म्हणून एक समाज आहे. बिझनेसमन लोकांचा समाज. म्हणजे साधेसुधे नाहीत तर बँका वगैरेची मालकी असणारे अतिश्रीमंत व अतिहुशार लोक या कम्युनिटीमधून येतात. त्यांना चेट्टीयार असही म्हणतात. चिदम्बरमची फॅमिलीसुद्धा अशीच. त्याचे पणजोबा अण्णा मलई यांच्या नावाचं विद्यापीठ देखील आहे. असो.

कार्ती यांचं बहुतांश शिक्षण परदेशात झालं. त्यांनी कायद्याची पदवी तर केब्रीज विद्यापीठात मिळवली आहे. वडिलांच्या पावलावर पाउल ठेवून त्यानेही वकिलीची प्रक्टीस सुरु केली. पी चिदंबरम यांचं दिल्लीमध्ये खूप नाव होतं. त्यांच्या राजकारणाच्या वेळात कार्तीच सगळे केसेस सांभाळायचा.

पी चिदंबरम यांनी जेव्हा कॉंग्रेस सोडून स्वतःचा पक्ष सुरु केला होता तेव्हा त्यांना मदत म्हणून कार्ती राजकारणात आले. बाकी जय शाह बीसीसीआयचा जसा सेक्रेटरी आहे तसच कार्ती भारतीय टेनिस असोसिएशनचा सेक्रेटरी आहे. २०१४ साली चिदंबरम यांच्या जागी त्याने खासदारकीची निवडणूक लढवून सक्रीय राजकारणात प्रवेश केला. पण त्या वर्षी त्याचा पराभव झाला.

पुढची पाच वर्षे त्याच्यासाठी एखाद्या दुःखद स्वप्नाप्रमाणे होती.

याकाळात कार्तीच्या भोवती अनेक वाद देखील आहेत. यातील सगळे वाद त्याच्या संपत्तीवरून आहेत. गेल्या काही वर्षापासून गाजत असलेले इडी उर्फ सकटवसुली संचनालय पहिल्यांदा चर्चेत आलं कार्तीची चौकशी केल्यापासूनच.तर प्रश्न येतो कार्तीची नेमकी संपत्ती आहे तरी किती?

२०१४ सालच्या निवडणुकीच्या शपथपत्रात त्याने आपली संपत्ती ५९ कोटी इतकी दाखवली होती तर २०१९ साली ७९ कोटी. म्हणजे पाच वर्षात २० कोटींची वाढ, हा अधिकृत आकडा झाला. पण त्याच्या संपत्तीचे घोळ वेगळेच आहेत.

भाजपचा आरोप आहे की कार्तीने वडिलांच्या पदाचा गैरवापर करून बरीच बेहोशोबी मालमत्ता गोळा केली आहे.

अस म्हणतात की चिदंबरम मंत्री असताना कार्तीने अॅडव्हान्टेज स्ट्रेटेजी कन्सल्टन्सी प्रायवेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली आणि त्याच्यामार्फत तुमची कामे करून देतो नावाखाली अफाट पैसा गोळा केला.

तस बघितल तर कार्ती किंवा चिदंबरम यांचे कोणतेही नातेवाईक या कंपनीचे भागीदार किंवा संचालक नाहीत पण तिचा कारभार चिदंबरम पितापुत्राच्या इशाऱ्यावर चालतो असा सीबीआयचा आरोप आहे. युपीएची सत्ता असताना या कंपनीच्या संपत्तीत प्रचंड वाढ झालेली दिसून येते.

याच ASCPL कंपनीमार्फत एयरसेल आणि मॅक्झीम कंपनीच्या व्यवहारासाठी दहा लाख रुपयाची लाच स्वीकारली असा आरोप आयएनएक्स मिडियाच्या इंद्राणी मुखर्जीने केला आणि चिदम्बरम पितापुत्रांना अटक झाली. सध्या जामीन मिळाल्या मुळे कार्ती बाहेर आहेत. शिवाय मागच्यावेळी हरूनही यावेळी शिवगंगाच्या जनतेने प्रचंड बहुमताने त्यांना खासदार बनवलेलं आहे.

आपले दुसरे मेम्बर आहेत जय शाह

जय शाह हे सुद्धा चिदंबरम यांच्या प्रमाणे श्रीमंत बिझनेसमन कम्युनिटी मधून येतात. त्यांचे शिक्षण अहमदाबादमध्येच झाले. ते निरमा विद्यापीठातून इंजिनियरिंग पास आउट आहेत. जेव्हा गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी आमित शाह यांची नियुक्ती गृहराज्यमंत्री पदी केली होती. तेव्हा अमित शहा यांच्या घरच्या पीव्हीसी पाईपच्या बिझनेसमधून जय शाहनी एन्ट्री केली. पुढे शेअरमार्केटची उलाढाल सुरु केली.

जय शाह यांच्या बाबतीतही वादविवाद काय कमी नाहीत.

२००४ साली त्यांनी एका कंपनीची स्थापना केली होती. नाव होतं टेंपल एन्टरप्राईज प्रायव्हेट लिमिटेड. या कंपनीच काम ट्रेडिंग होतं. द वायर या वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार २०१४ पर्यंत या कंपनीच्या नवे कोणतेही मालमत्ता नव्हती, त्यांनी इन्कम टक्सच मुळी पाच हजाराचा भरलेला.

पण २०१४ नंतर अचानक या कंपनीचे अच्छे दिन आले.

म्हणजे काय तर पहिल्यांदा ५० हजाराची कमाई केली. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे २०१५-१६ वर्षात तब्बल ८० कोटी रुपये कमवले. म्हणजेच त्यांच्या उत्पन्नात तब्बल १६ लाख पट वाढ झाली आहे. असंच जय शाह यांची मालकी असलेल्या प्रत्येक कंपनीच्या बाबतीत झालं आहे. कुसुम फिन्सर्व्ह नावाच्या कंपनीत २०१४ साली ७९ लाख नफा होता तो २०१७ साली १४७ कोटींच्या घरात जाऊन पोहचला.

कॉंग्रेसचे काही नेते म्हणतात की नोटबंदी अमित शाहच्या मुलाच्या फायद्यासाठीच केली होती.

आता हे आरोप प्रत्यारोप होतच राहतात.  सध्या तरी जय शाह राजकारणात नाहीत किंवा त्यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही त्यामुळे त्यांची अधिकृत संपत्ती किती हे माहित नाही. पण त्यांच्या वडिलांची म्हणजेच अमित शाह यांची २०१२ साली संपत्ती होती ५ कोटी ती आता २०१९ पर्यंत ४० कोटी झाली आहे.

unnamed

ही आहे आपल्या गृहमंत्र्यांची पुढची पिढी.

एकेकाळी कार्ती चिदम्बरम यांचे दिवस होते आता जय शाह यांचे आहेत. पी चिदंबरम यांच्या गृहमंत्री पदाच्या कालावधीमध्ये अमित शाह यांच्यावर कारवाई झाली, त्यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं.  त्याचंच उट्टे काढण्यासाठी अमित शाहनी चिदंबरम आणि त्यांच्या मुलाविरुद्धचे फास आवळले अस म्हणतात. पुढे जेव्हा त्यांचं सरकार जाईल तेव्हा चिदंबरम परत आले तर ते परत सेम असच करतील अस म्हणतात.

हे चक्र सुरूच राहिलं असच वाटत आहे.

हे आजी माजी गृहमंत्र्याचं युद्ध पुढच्या पिढीपर्यंत पोहचलेल आहे. ते तसच बरेच वर्ष चालू राहणार यात शंका नाही. फक्त या युद्धात त्यांची संपत्ती ज्या वेगात वाढत आहेत त्याच्या 1 टक्के जरी जनतेची वाढली तर भारताची प्रचंड प्रगती होईल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.