५० जण मेले, मुख्य अभिनेत्यावर ७३ ऑपरेशन झाले तरी टिपू सुलतान दूरदर्शनवर आला.

नव्वदीच्या दशकातील गोष्ट आहे. तेव्हा एकच टीव्ही चनल लागायचं. दूरदर्शन. त्यावर काही ठराविक सिरीयल लागायचे पण त्या सिरीयलनी अख्ख्या भारताला वेड लावलेलं. रामायण, महाभारत नुकतेच संपलेले. दूरदर्शन आता नवीन काय घेऊन येणार याची उत्सुकता होती. त्यातच एका सिरीयलची जाहिरात झळकू लागली.

द स्वोर्ड ऑफ टिपू सुलतान.

रामायण, महाभारतसारख्या पौराणिक सिरीयलच्या यशामुळे टिपू सुलतानसारख्या ऐतिहासिक विषयावर बिग बजेट सिरीयल बनवायचं दूरदर्शनने धाडस केलेलं. पण खरं शिवधनुष्य उचललं होतं, फिल्मस्टार संजय खानने.

संजय खान म्हणजे सुपरस्टार फिरोज खानचा धाकटा भाऊ. अफगाणिस्तानमधून आलेले पठाण पण बालपण गेलेलं बंगलोरमध्ये. तिथे शाळेत त्यांना टिपू सुलतानचे धडे होते. तेव्हापासून त्याला टिपू सुलतानने झपाटल होतं. पुढे त्याचा भाऊ सिनेमात गेला म्हणून हा पण सिनेमात आला. फिरोज खान एवढ यश त्याला मिळाल नाही. मग त्याने दिग्दर्शनात हात चालवून बघितला. राज कपूरना घेऊन बनवलेला अब्दुल्ला थोडाफार चालला.

संजय खानचे पिक्चर गाजत नव्हते पण झीनत अमान सोबतच त्याच अफेअर जोरदार गाजलं.

त्यात त्याने आणि त्याच्या बायकोने झीनतची ताज हॉटेलमध्ये केलेली धुलाई सगळ्या पेपर मध्ये छापुन आली. संजय खानबद्दल लोकांचं मत एकदम खराब झालं होतं. त्याच करीयर संपल्यात जमा होतं.

काय करून आपलं करीयर सावरता येईल याच्या विचारात संजय खान होता, तेव्हा त्याला शाळेत वाचलेला टिपू सुलतान आठवला. भगवान गिडवानी यांची टिपू वरची कादम्बरी त्याला वाचायला मिळाली. मग त्याने ठरवलं  त्या कादंबरीवर सिनेमा बनवायचा. पण ती कथा 3 तासाच्या सिनेमात मावणारी नव्हती.

अखेर टीव्ही सिरीयल करायचं फायनल झालं. भगवान गिडवानीच सिरीयलची स्टोरी लिहिणार होते.

मोठमोठ्या  कलाकारांना साईन करण्यात आल. भारतीय टीव्ही इतिहासात सर्वात भव्य सिरीयल बनवायचं संजय खानच स्वप्न होतं, 

म्हैसूरमध्ये टिपूच्या राजवाड्याचा प्रचंड मोठा सेट उभारण्यात आला. त्याकाळचे कपडे, तेव्हाची बोली याचा अभ्यास करून बारीक सारीक डिटेल बरोबर असतील याची काळजी घेण्यात आली. शुटींग सुरु झालं.  कोट्यावधी रुपये खर्च करून बनत असलेली ही सिरीयल तुफान गाजणार याची सगळ्यांना खात्री होती.

८ फेब्रुवारी १९८९. टिपूच्या लग्नाचं शुटींग सुरु होतं.

त्यावेळी आतिषबाजी करत असताना कुठला तरी फटाका सेटवर येऊन पडला. आणि बघता बघता टिपू सुलतानच्या सेटने पेट घेतला. ठिकठिकाणी ठेवलेले शुटींगचे साहित्य पेटून बॉम्ब प्रमाणे फुटत होते. वरून खांब खाली पडत होते. कोणालाही कळत नव्हते काय होतंय. धावाधाव सुरु झाली.

स्टुडीओमधून बाहेर जायला दोन दरवाजे होते. एक छोटा दरवाजा उघडा होता मात्र दुसरा मोठा दरवाजा हा लॉक झाला होता. धावपळ करणाऱ्या लोकांच्यात चेंगराचेंगरी सुरु झाली. बंदिस्त स्टुडियोचे तापमान वाढतच होते. आग विझवायचे साधन नसल्यामुळे तुफान राडा झाला. स्वतः संजय खान सुद्धा आगीत सापडला होता.

कशीबशी आग विझवण्यात आली पण तोपर्यंत पन्नासच्यावर लोक मृत्यूमुखी पडले होते.

स्वतः संजय खान ६५% जखमी झाला होता. तो वाचला कसा हे आश्चर्यच मानल गेल. जवळपास १३ महिने तो हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होता. त्याच्यावर तब्बल ७३ ऑपरेशन करण्यात आले. पण तरी तो परत आला.

संजय खानचा चेहरा ओळखू येऊ नये इतका विद्रूप झाला होता. प्रचंड नुकसान तर झालं होतंच पण जिवाभावाची माणस देखील मृत्यूमुखी पडली होती, ते नुकसान कधीच भरून न येणार होतं.

भारताच्या नाही तर जगातल्या सिनेमा इंडस्ट्रीमधला हा सर्वात मोठा अपघात होता.

टीमचा कप्तान या नात्याने त्याने संपूर्ण घटनेची जबाबदारी स्वीकारली. शुटींगच्या सेटवर आगप्रतिबंधक उपकरणे ठेवणे कम्पल्सरी करण्यात आले. संजय खानने जमेल तेवढी नुकसान भरपाई जखमींना व मृत्युमुखी पडलेल्या कलाकारांच्या घरच्यांना दिली.

लोकांना वाटले आता टिपू सुलतान सिरीयल डब्ब्यात जाईल. असही म्हटल जात होतं की एका फकिराने संजय खानला टिपूच्या लग्नाचं शुटींग करू नको, संकट येईल ही भविष्यवाणी केलेली पण हट्टी संजयने ते ऐकल नव्हत. 

पण याच हट्टीपणामुळे संजय खानने डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध जात आपल्या जळलेल्या चेहऱ्याला मेकअप लावून कॅमेऱ्यासमोर उभा झाला.

जमेल तशा पद्धतीने त्याने बजेट उभा केलं आणि टिपू सुलतान बनवण्याच आपलं स्वप्न पूर्ण केलं. 

टिपू सुलतान सिरीयल टीव्हीवर आली, अपेक्षेप्रमाणे या सिरीयलने छोट्या पडद्यावर धुमाकूळ घातला. सिरीयलच्या टायटलच्या आधी उडणाऱ्या तोफा, मग वाजत राहणार घनगंभीर संगीत आणि हत्तीवरून डुलत डुलत आलेला गोल मुंडासे घातलेला संजय खानचा टिपू सुलतान  आजही आपल्यापैकी अनेकांनां आठवत राहतो.

टिपू सुलतान चांगला होता की वाईट होता, त्या सिरियलमध्ये खरं दाखवलं आहे की खोटं हे सगळ कळण्याच आपलं वय नव्हत, पण जे पडद्यावर दिसत होतं ती गोष्ट तो टिपू सुलतान आपल्याला आवडला होता. त्याच्या मागचं कष्ट जेव्हा कळाल तेव्हा तो जास्त आवडू लागला हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.