आजही रेणुका शहाणेची ओळख सुरभीमधल्या गोड स्माईलमुळे आहे.

साल असावं १९९०. व्हीपी सिंग नुकतच पंतप्रधान बनले होते. दूरदर्शनवरील निर्बंध कमी करून त्यांना वेगवेगळे प्रयोग करण्याची संधी देण्यात यावी  असा निर्णय त्यांनी घेतला होता. तेव्हा एक मंत्रीमहोदयांनी आपल्या नाटकवाल्या मित्राला सिद्धार्थ काकला सरकारचा हा नवा निर्णय सांगितला.

सिद्धार्थ काक खुश झाले. त्यांच्या डोक्यात खूप दिवस भारताची सांस्कृतिक विविधता दाखवणारी एक डॉक्युमेंटरी बनवायचं चालल होतं. याचं काही होईल का हे बघायसाठी ते दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांना भेटायला गेले. मंत्र्यांनी पाठवलंय म्हटल्यावर अधिकाऱ्यांनी देखील काक यांची व्यवस्थित विचारपूस केली, सगळ सहकार्य केल. याच अधिकाऱ्यापैकी एकजण कोणी तरी त्यांना म्हणाला,

“तुमची कन्सेप्ट चांगली आहे. फक्त तुम्ही तिची सिरीयल बनवा. एका एपिसोडमध्ये भारताच्या वेगवेगळ्या भागाची, तिथल्या लोककलांची, संस्कृतींची माहिती द्या. तुमचा शो एखाद्या इंद्रधनुष्याप्रमाणे सजेल आणि लोकांनाही तो आवडेल.”

हीच होती सिद्धार्थ काक यांच्या दहा वर्ष प्रत्येक भारतीय घरात पोहचलेल्या सुरभी टीव्ही सिरीयलची सुरवात.

एवढ्या सहज आपल्याला सिरीयल करायची संधी मिळेल याचा काक यांना देखील विश्वास नव्हता. दूरदर्शन तेव्हा एकमेव आणि सर्वदूर पोहचलेले चॅनल होते. नुकताच महाभारत रामायण या कार्यक्रमांनी जागितिक विक्रम केला होता. तोच दर्जा सिद्धार्थ यांना टिकवायचा होता. त्यांनी सुरभीची तयारी सुरु केली. वेगवेगळी माहिती मिळवायला रिसर्च टीम नेमली.
या शोची अँकरिंग स्वतः सिद्धार्थ काक करणार होते. पण त्यांना वाटत होतं की,

” आपला शो हा इन्फॉरमेटिव्ह आहे, आपल्या सारख्या चाळीशीत पोहचलेल्या माणसाची बोअरिंग बडबड तासभर कोण ऐकेल?  “

मग जोडीला एखादा फ्रेश सुंदर चेहरा मिळतो का हा शोध सुरु झाला. ऑडीशनसाठी बऱ्याच मुली आल्या. पण एक तर मॉडेल्स होत्या नाही तर बातम्या सांगितल्याप्रमाणे मख्ख चेहरा ठेवून पाठांतर म्हणणाऱ्या मुली होत्या. सिद्धार्थना कोणीही पसंत पडत नव्हत. अशातच त्यांना कोणी तरी सांगितलं की शांता गोखलेची मुलगी नाटकात काम करते तिला विचारा.

शांता गोखले म्हणजे मराठीतील सुप्रसिद्ध लेखिका. त्यांची मुलगी रेणुका हौशी नाटकात काम करायची, सायकोलोजीमध्ये पोस्टग्रॅज्यूएट झाली होती. तिच्या एका सिरीयलच शुटींगसुद्धा नुकतच पूर्ण झालं होतं. तिला ऑडीशनची स्क्रिप्ट पाठवली.

बृहन्नडेश्वर मंदिराबद्दल अतिशय अवघड हिंदीत लिहिलेली ३-४ पाने रेणुकाने पाठ केली आणि ऑडीशनला आली.

त्याकाळी ऑडीशनवेळी प्रचंड स्पर्धा आणि उगाच ओढून आणलेला व्यावसायिकतेचा बुरखा नसायचा. अगदी वयाच्या विशीत असणारी उत्साहाने ओसंडून वाहणारी रेणुका ऑडीशनला आली. पण स्क्रिप्ट म्हणून दाखवायला सांगितल्यावर पहिल्या चार ओळीतच तिचं पाठांतर विसरलं गेलं. तिच तिलाच याच हसू आलं.  खो खो हसत सॉरी सॉरी म्हणत तिने परत स्क्रिप्ट म्हणायला सुरु केलं. असं बऱ्याचवेळा झालं.

तिला वाटल की आपला चान्स गेला. पण सिद्धार्थ काक यांची बायको गीता त्या ऑडीशनला परीक्षक म्हणून होती. ती सुद्धा मराठीच होती. ती रेणुकाला म्हणायची, चुकू दे तू ऑडीशन पूर्ण कर.

चार पानाची स्क्रिप्ट म्हणून दाखवायला रेणुकाला तीन तास गेले. पण गीताने शेवटी सिद्धार्थना सांगितलं,

” हीच मुलगी तुमच्या सोबत सुरभीची अँकर असेल.”

रेणुकाची स्माईल, तिचा सहज सोपा वावर सिरीयलच्या बोरिंग फॉर्मअॅटला एकदम फ्रेश बनवेल असं तीच म्हणन होतं. जे काम विश्वसुंदरीला जमणार नाही ते तिच्या एका स्माईलने होणार होतं. तिचा अवखळवपना हाच तिचा युएसपी होता.

पण बिचाऱ्या रेणुकाला ठाऊक नव्हत. जो रोल आपल्याला मिळणार नाही असं वाटत होत तो  मिळाला म्हटल्यावर मग मात्र ती सिरीयस झाली. पहिले चार एपिसोड एकदम गंभीरपणे तिने अँकरिंग केली. शेवटी तिला सिद्धार्थनी सांगितलं की

“तू तुझ्या नॅचरल पद्धतीने बोल, उगाच ओढून ताणून डायलॉग म्हणायची गरज नाही.”

मग मात्र रेणुका आणि सुरभी आपल्या खऱ्या रंगात आली.

रात्री लेट नाईट ही सिरीयल लागायची. टायटलला वाजणारं एस. सुब्रमण्यम यांनी दिलेलं संगीत चिरपरिचित झालं. त्यानंतर दिसायचे भारतीय बैठकीत मांडी घालून बसलेले सिद्धार्थ काक व रेणुका शहाणे. मागे ठळक अक्षरात सुरभी लिहिलेलं असायचं. भारतीय संस्कृतीच प्रतिनिधित्व करणारी एक छोटीशी मुर्ती ठेवलेली असायची.

रेणुका आणि सिद्धार्थ हसतमुखाने एका सुरात नमस्कार म्हणायचे आणि कार्यक्रमाला सुरवात व्हायची. 

कार्यक्रम कसला हा एक माहितीचा जंजाळ होता. भारतात इंटरनेट येण्यापूर्वी अभ्यासपूर्ण माहितीचा महासागर टीव्हीवर पहिल्यांदाच दाखवला जात होता. एवढा विविधता असणारा आपला देश आपली वैविध्यपूर्ण संस्कृती आपल्यालाच ठाऊक नव्हती. भारतीयांना भारताची ओळख करून देणारी ही सिरीयल अगदी थोड्याच दिवसात गाजली.

सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे यांची केमिस्ट्री त्यांची कितीही क्लिष्ट असू दे अगदी सहज सोप्या भाषेत सांगण्याची हातोटी यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातल्या खेड्यात लोक संध्याकाळी न चुकता ही सिरीयल बघू लागले. आदिवासी नृत्यापासून ते शास्त्रीय संगीतापर्यंत, भारतातल्या पुरातन मंदिरापासून ते मुघलकालीन किल्ल्या पर्यंत प्रत्येकाची माहिती दिली जायची.

पुढे जाऊन सुपरस्टार झालेल्या एआर रेहमानला अगदी लहान असताना सुरभीमधूनच देशभरात पोहचवल होतं. 

सिद्धार्थ काक यांना आपण किती फेमस आहोत याची आधी कल्पना नव्हती. पण एकदिवस ते अंदमान मध्ये गेले असता तिथल्या एका स्थानिक बाईने त्यांना बघून सुरभी सुरभी अशी आरोळी मारली तेव्हा मात्र त्यांना धक्का बसला. कार्यक्रमाची लोकप्रियता एवढा तळागाळात पोहचली आहे ते पाहून खुश तर झाले पण आपल्यावरच्या जबाबदारीची त्यांना जाणीव झाली.

या सिरीयलमध्ये मार्केटिंगचे नवे प्रयोग देखील केले गेले.

कार्यक्रमाच्या शेवटी एक प्रश्न विचारला जायचा. ज्याच उत्तर प्रेक्षक पत्रातून पाठवायचे. त्यातून रेणुका किंवा सिद्धार्थ एक पत्र उचलायचे व त्यांच उत्तर बरोबर असेल तर त्या पत्त्यावर एक छोटस गिफ्ट पाठवल जायचं.

ही आयडिया हिट झाली. थोड्याच दिवसात पत्रांचा ढिगारा येऊन सुरभीच्या ऑफिस मध्ये पडू लागला. पहिलीत जाणाऱ्या मुलापासून ते जख्ख म्हाताऱ्या झालेल्या आज्जी पर्यंतअख्ख कुटुंब उत्सुकतेने या स्पर्धेत भाग घेऊ लागलं. नंतर नंतर तर अशी वेळ आली की सुरभीच्या एपिसोडमध्ये सिद्धार्थ आणि रेणुका यांना पत्राच्या ढिगार्यातून बसायला जागा नव्हती.

EFaYGLSUEAAKH8

भारतीय पोस्ट खात्याला या सुरभीमुळे खास स्पर्धेसाठीच नवीन टपाल बनवावं लागलं. लिम्का बुक मध्ये या सिरीयलची नोंद झाली.

गुजरातची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमूलने त्यांना स्पॉन्सरशिप दिली. त्यांचे वर्गीस कुरियन लवकर झोपत असल्यामुळे त्यांनी कधी हा शो बघत नव्हते, पण एकदा सिद्धार्थ काक स्वतः गेले आणि त्यांनी हट्टाने त्यांना तो शो दाखवळा. कुरियन यांना तो एवढा आवडला की त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगून ठेवलं की सुरभीला काहीही कमी पडू द्यायचं नाही. सुरभीच नावच अमूल सुरभी असं झालं.

भारतात अनेकांनी आपल्या मुलीच नाव सुरभी ठेवलं. रेणुकाची हेअरस्टाईल, तिची ड्रेसिंग स्टाईल मुली कॉपी करत होत्या. तीच तर आयुष्य या सिरीयलमूळ बदललं.

या सिरीयलबरोबरच तिची आधी शुटींग झालेली शाहरुख खान सोबत नायिका असलेली सर्कस सिरीयल रिलीज झाली. पुढे हम आपके है कौन सारखा सूपरहिट सिनेमा तिला मिळाला. फिल्म इंडस्ट्रीमध्येही तिला चांगल यश मिळालं. आशुतोष राणा सोबत लग्न करून ती आता सुखाचा संसार करत आहे.

इतकी वर्ष झाली लोकांच्या मनातून सुरभीची जादू उतरली नाही. तिची आजही ओळख सुरभीमध्ये गोड हसणारी रेणुका शहाणे अशीच आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.