या देवाला प्रसाद म्हणून दारू ‘चढवावी’ लागते आणि तो ती खरोखर पितो.

तर भिडू ३१ डिसेंबर उतरला कि नाही. काल रात्री काय काय केलं? पिऊन दंगा केला? नशेत एक्स गर्लफ्रेंडला फोन केला? हट्टाने गाडी चालवायला घेतली आणि पोलीस मामांना  सापडला? तुम्ही काय आणि आम्ही काय ३१ डिसेंबरच्या रात्री जे केलं ते त्याच रात्री विसरून नवीन वर्षात जायचं म्हणत असतो.

पण ये कम्बख्त दुनिया भूलने नही देती. मग न्यू ईयरची सुरवात शिव्या खाण्याने होते. कोण बापाच्या शिव्या खातो कोण बायकोच्या. दारू न पिण्याचे फायदे सांगितले जातात. आधीच हँग ओव्हर मुळे डोकं दिसत असतं. त्यात संस्कृती रक्षक लेक्चर ऐकावं लागतं ,

दारू नको दूध प्या, नवीन वर्षाची सुरवात देवदर्शनाने करा

अशा भिडूंसाठी खास एक देव आहे जिथं तुम्ही निवांत दर्शनासाठी जाऊ शकताय. उज्जैनचा कालभैरव.

वैशिष्ट्य काय म्हणालं तर हा देव प्रसादाला दारू पितो. म्हणजे फक्त प्रसाद चढवला जात नाही तर या देवाची मूर्ती खरोखर दारूची बाटली रिकामी करते.

“हा प्रसाद खरोखर चढतो !”

खोटं वाटतंय ना? पण हि गोष्ट खरी आहे. 

हजारो वर्षांपासून भारतात उज्जैन हे एक पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे. अगदी पुराणातही या शहरातल्या मंदिरांचा इथल्या आश्रमांचा उल्लेख आढळतो. काशीला तीर्थयात्रेला जाणारे अनेकजण उज्जैनवरून जातात. याच उज्जैनच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे कालभैरव मंदिर.

कालभैरव म्हणजे भगवान भोलेनाथांच्या अवतारापैकी एक. तांत्रिक सिद्धी करणाऱ्यांचा हा देव मानला जातो. पापकर्म करणाऱ्यांना दंड करणारी हि उग्रदेवता शक्तिपीठाची रक्षक देखील आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते, असे सांगितले जाते.

लोभ, हाव, क्रोध यावर विजय मिळवण्या साठी या देवतेची अर्चना केली जाते.

उज्जैन मध्ये कालभैरवाचे मंदिर भद्रसेन नावाच्या राजाने बांधलं असं स्कन्द पुराणात लिहिलेलं आहे. कालौघात मूळ मंदिर गडप झाले. आता जे मंदिर आहे ते मराठा स्थापत्य शैलीतील आहे. बाहेर दीपमाळ, दिंडी दरवाजा, डोक्यावर शिंदेशाही पगडी घातलेली काल भैरवाची मूर्ती.

असं सांगितलं जातं ,पानिपत युद्धात झालेल्या पराभवातुन वाचलेल्या महादजी शिंदेनी या कालभैरवाच्या पायावर आपली  पगडी ठेवली आणि मराठा साम्राज्याचा अपमानाचा बदल घेण्याची शपथ घेतली होती.

काही वर्षातच त्यांनी आपले शब्द खरे केले. दिल्लीची सूत्रे देखील महादजी शिंदेंच्या शब्दावर हालत होती. संपूर्ण भारतावर मराठ्यांचं वर्चस्व निर्माण झालं.

इतका मोठा इतिहास असणाऱ्या या मंदिरात दारूची परंपरा कधी पासून सुरु झाली याच उत्तर मात्र मिळत नाही.

इथले पुजारी सांगतात कि कालभैरव तांत्रिक देवता असल्यामुळे या देवाला पाच प्रकारचा भोग चढवला जातो. मद्य,मांस,मत्स्य,मुद्रा आणि मैथुन. पूर्वी इथे बकऱ्याचे बळी दिले जात होते. मात्र काळाच्या ओघात बाकीचे चार प्रसाद प्रतीकात्मक उरले आहेत फक्त मद्याची परंपरा आजही सुरु आहे.

इथे मंदिराच्या बाहेर पूजेच्या सामानाबरोबर दारूची देखील खुली विक्री होते.

काही वर्षांपूर्वी शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने इथे प्रसादाच्या दारूसाठी सरकारी दुकानेदेखील सुरु केली. म्हणजे काय नारळ फुलं खडीसाखर असलेल्या टोपलीत एक छोटा खंबा घेऊन तो देवाला ‘चढवायचा.’

आता मगाशी सांगितल्याप्रमाणे हा प्रसाद फक्त प्रतीकात्मक नाही. मंदिराचा पुजारी दारूची बाटली उघडतो, ती आपल्या थाळीत उतरवतो आणि ती थाळी देवाच्या ओठाला लावतो. आश्चर्य म्हणजे काही सेकंदात ती थाळी रिकामी होते. बाटलीत थोडीशी शिल्लक राहिलेली दारू आपल्याला प्रसाद म्हणून दिली जाते.

देव खरंच दारू पितो का? कि गणपती दूध पिल्या प्रमाणे यामागे काही वैज्ञानिक कारण आहे हे अजूनही सापडले नाही.

या दगडाची मूर्ती पोकळ नाही. आपल्यासमोरच प्रसाद चढवला जात असल्यामुळे यात पुजाऱ्यांची हातचलाखी असण्याचं देखील कारण दिसत नाही. गेली अनेक वर्ष अनेकजण याच रहस्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ते अजूनही उलगडलेलं नाही.

देशभरातून भाविक मात्र भक्तिभावाने आपल्या ऐपती प्रमाणे रम, व्हिस्की,संत्रा देवाला चढवत राहतात. अख्ख्या उज्जैन मध्ये दारूबंदी असली तरी या मंदिरा बाहेर ची दारू विक्री सुरू ठेवण्यास सरकारने खास परवानगी दिलेली असते.

तर भिडुनो आहे कि नाही भारी देव. पण एक आहे, तो फक्त ३१ तारखेला दारू पित नाही रोज पितो आणि भक्तांनी किती जरी पाजली तरी दंगा करत नाही. गप्प पितो आणि शांत बसून राहतो. मग कधी जाताय दर्शनाला?

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.