आणि या मोदींना हरवून रतन टाटा हे टाटा समूहाचे अध्यक्ष बनले..

स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून मोदी घराण्याचा भारतीय उद्योग क्षेत्रात दबदबा होता. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल म्हणत नाही. ते मोदी पारसी होते.

होमी मोदी म्हणजे टेक्स्टाईल उद्योगातील एक मोठे नाव. ते राजकारणात देखील सक्रीय होते. मुंबई चे महापौर पासून ते व्हाईसरॉयच्या मंत्रीमंडळात मंत्री अशी मोठी मजल त्यांनी मारली होती.

होमी मोदी यांना तीन मुले. रुस्तम मोदी, फिलू मोदी,आणि काली मोदी. फिलू मोदी यांनी वडिलांचा राजकारणाचा वारसा समर्थपणे चालवला. तर काली मोदी यांची ओळख म्हणजे भारतात पहिल्यांदा क्रेडीट कार्ड आणणारे अशी आहे.

पण ही स्टोरी आहे रुस्तम उर्फ रूसी मोदी यांची  

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या रूसी मोदींचं शिक्षण इंग्लंडमधल्या सुप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापिठात झाले. ते नेहमी गर्वाने सांगायचे की,

 “जेव्हा अल्बर्ट आईनस्टाईन ऑक्सफर्डच्या स्टेजवर पियानो वाजवत होता तेव्हा मी त्याच्याबरोबर व्हायोलीन वाजवत होतो. “

इंग्लंडमधून इतिहासाची डिग्री घेऊन परत आलेल्या रूसीला नोकरी कुठे करायची हा प्रश्न पडला. मुंबईत तेव्हा टाटाचा उद्योग बहरत चालला होता. त्यांच्याशी मोदी परिवाराचा घरोबा होता.

रूसी त्यांच्याकडे नोकरी मागायला गेला. त्याला पाहून टाटांनी थेट त्याच्या वडिलाना फोन केला. होमी मोदी टाटांना म्हणाले,

“तुमच्या कारखान्यात जी सर्वात छोटी नोकरी आहे ती रूसीला द्या. आयत काही देऊ नका.”

ऑक्सफर्डमध्ये शिकून आलेल्या रूसी मोदींना फोरमन म्हणून नोकरी मिळाली. पुढच्या ५३ वर्षानंतर ते जेव्हा रिटायर झाले तेव्हा ते टाटा स्टीलचे चेअरमन होते.

फोरमन ते चेअरमन प्रवास

जमशेदजी टाटांच स्वप्न असणाऱ्या टाटा स्टील उर्फ टिस्कोला मोठ करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याकाळात टाटा समुहाचं नेतृत्व होतं जेआरडी टाटांच्या कडे. रूसी मोदी आणि जेआरडी चांगले मित्र होते.

टिस्को, टेल्को अशा कंपन्या या त्याकाळात टाटा समूहाच्या प्रमुख संस्था होत्या. जेआरडीनी त्यांची जबाबदारी अनुभवी व्यक्तींकडे दिली होती आणि त्यांच्या कारभारात जेआरडी कधीच ढवळाढवळ करत नसत.

ऐंशीच्या दशकात जेआरडी टाटांना निवृत्तीचे वेध लागले होते. खर तर हा राष्ट्रीय प्रश्न बनला होता कि टाटांचे उत्तराधिकारी कोण?

जेआरडी यांच्या पुढे एकमेव नाव होतं रूसी मोदी.

तेव्हा मोदींचा दबदबा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचला होता. त्यांची धडाडी, व्यवस्थापनकौशल्य याबद्दल कोणालाही शंका नव्हती. जमशेदपूरमध्ये त्यांचं राज्य चालायचं. नरसिंहराव, लालू प्रसाद यादव असे मोठे नेते त्यांचे खास मित्र होते. दरवर्षी बेस्ट बिझनेसमन ऑफ इयरचे सर्व पुरस्कार न चुकता रूसी मोदींना मिळत होते.

जेआरडीनी त्यांना आपल्या जागी टिस्कोच चेअरमन करून भविष्यात आपले उत्तराधिकारी कोण याचे संकेत दिले. या पाठोपाठ टेल्कोचही अध्यक्षपद त्यांना द्यावे अशी त्यांची इच्छा होती.

टेल्को म्हणजे टाटा मोटर्स ही सुद्धा टाटाची बलाढ्य ग्रुप कंपनी. जस टिस्को मोठी करण्यात रूसी मोदींचा हात होता तसच टेल्को वाढवलेली सुमंत मुळगावकर यांनी. मात्र आता त्यांचं वय झाल होतं, प्रकृती साथ देत नव्हती. त्याच प्रमाणे गेल्या काही वर्षात टेल्कोची प्रकृतीदेखील खालावलेली होती. नफा घटत चालला होता.

टेल्कोमध्ये आलेली मंदी ही फक्त टाटांसाठी नाही तर भारतसरकारसाठी देखील चिंतेचा विषय बनला होता.

यासाठी कठोर उपाय म्हणून टेल्कोमध्ये रूसी मोदींना आणायचा जेआरडींचा विचार होता. पण मुळगावकरांना आपल्या डोक्यावर रूसी मोदी नको होते. त्यांनी ठणकावून याला विरोध केला. यातून मध्यममार्ग म्हणून एका नवीन उपाध्य्क्षाची नेमणूक करण्यात आली.

त्याच नाव म्हणजे रतन टाटा.

टाटा घराण्यातला तरुणतुर्क. जेआरडींचा लाडका पुतण्या. पण फक्त टाटांचे नाव हे त्याच कर्तुत्व नव्हतं. अमेरिकेतून शिक्षण घेऊन आलेला मात्र रूसी मोदींच्या प्रमाणेच रतन टाटाने पहिल्यांदा कारखान्यात हात काळे करून घेण्यापासून सुरवात केली. मुंबईमधली गिरणी यशस्वी चालवून दाखवली आणि आपल्या कष्टाने कर्तुत्व सिद्ध केलं.

सुमंत मुळगावकर यांच्या आग्रहाखातर रतन टाटा टेल्कोमध्ये आले. त्यांनी टाटा मोटर्सची जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यावर घेतली. मुळगावकर त्यांच्या मार्गदर्शनासाठी होतेच. 

टेल्को तो पर्यंत पांढरा हत्ती बनून गेला होता. पसारा मोठा झालेला. कामगारांची संख्या वाढली होती. त्यांचे पगार व इतर खर्च टेल्कोला झेपणे अशक्य होऊन बसले होते. कामगार संघटनांच्या मागण्या वाढतच चालल्या होत्या.

रतन टाटांकडे सूत्रे आली आणि त्याच वर्षी कामगारांचा मोठा संप झाला. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा संप होता. तोपर्यंत रूसी मोदी हे टाटा समुहात कामगारप्रश्न हाताळण्यातील तज्ञ समजले जायचे. त्यांनी जमशेदपूर मध्ये एकदाही संप होऊ दिला नाही अशी त्यांची कीर्ती होती.

टेल्कोचा संप मिटवण्यासाठी त्यांनाच बोलवावे लागेल अस वाटत होतं मात्र रतन टाटांनी ही वेळ येऊ दिली नाही.

त्यांनी कामगारांच्या अवास्तव मागण्यांपुढे झुकण्यास नकार दिला. आतापर्यंत शांत समजल्या जाणाऱ्या रतन टाटांनी तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मदतीने हा संप मोडून काढला.  ही लढाई रतन टाटांसाठी परीक्षा ठरली आणि त्यात ते यशस्वी ठरले होते.

संप होऊनही त्यांनी टेल्कोला नफ्यात आणले. एवढच नाही टाटांची सर्वात मोठी कंपनी टिस्कोलाही  मागे टाकलं.त्याच दिवशी रूसी मोदींना जाणवल कि आपल टाटासमुहाचा अध्यक्ष व्हायचं स्वप्न हे स्वप्नच राहणार.

काही वर्षातच जेआरडी टाटांनी आपला उत्तराधिकारी म्हणून रतन टाटांची निवड केली. ते वर्ष होतं १९९१. 

याच वर्षी भारतात पंतप्रधान नरसिंहराव यांनी क्रांतिकारी जागतिकीकरण आणले. स्वतंत्र कंपनी कायदा मंडळाची स्थापना केली. हे दोन्ही निर्णय टाटांच्या विशेषतः रतन टाटांच्यासाठी एक शुभसंकेत होता.

रूसी मोदींना कालचा छोकरा रतन टाटा आपल्या मागून येऊन टाटा समुहाचा अध्यक्ष होतो हे न पटणार होतं. त्यांनी याविरुद्ध बंड केले. वर्तमानपत्रातील मुलाखतीमधून त्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. रतन टाटाना आपण व आपली टाटा स्टील सहकार्य करणार नाही याचे सुतोवाच त्यांनी दिलेले.

 रतन टाटा व उपाध्यक्ष जे जे इराणी हे टाटा स्टीलची वाट लावत आहेत असे गंभीर आरोप त्यांनी केले.

रतन टाटांनी यावर संयत प्रतिक्रिया दिली. त्यांच्या शांततेला रूसी मोदी दुबळेपणा समजले आणि याच अतिआत्मविश्वासातून त्यांनी जे.जे.इराणी यांना काढून त्या जागी आपले विश्वासू सहकारी आदित्य कश्यप यांना नेमल. यासाठी टाटा समुहातील इतर कोणाशीच सल्ला मसलत केली नाही.

आदित्य कश्यप हे रूसी मोदी यांच्या अतिजवळचे मानले जायचे. त्याकाळात अशी चर्चा होती कि हे दोघे एकत्र राहतात आणि त्यांचे संबंध हा टिंगलीचा विषय बनला होता. याच आदित्य कश्यपला त्यांनी टाटास्टीलचे सगळे अधिकार दिले व ते युरोपला सुट्टीला निघून गेले.

संधीची वाट पहात असलेल्या रतन टाटांनी आपला अखेरचा वार केला.

मोदींनी कंपनी नियमाचा भंग केला आहे यावर बोट ठेवून सरळ रूसी मोदींना टाटा स्टीलच्या पदावरून काढून टाकायचा निर्णय घेतला. बेसावध राहिलेल्या मोदींनी आपल्या मित्राला बढती देऊन चूक केली आणि त्यांना हा मोठा झटका बसला.

एकेकाळी सर्वशक्तिमान असणारे रूसी मोदी मदतीसाठी अनेकांचे दार ठोठावत होते मात्र टाटांच्या कोणत्याही संचालकाने त्यांची बाजू घेतली नाही. त्यांचे खास मित्र असलेले पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव देखील यात काही करू शकत नव्हते.

रूसी मोदींनी ज्या टाटा स्टीलला मोठे करण्यात आयुष्य घालवल तिथे त्यांना अपमानास्प्दरित्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी रतन टाटा आले.

टाटामध्ये नवे युग सुरु झाले होते, रतन टाटा युग.

रूसी मोदी टाटामधून बाहेर पडल्यावर नरसिंहराव यांनी त्यांच्या कडे एयर इंडियाची जबाबदारी दिली. पण हळूहळू त्यांनी सर्व सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली. पुढे त्यांनी मान्य केले कि टाटाशी पंगा घेणे ही आपली चूक होती.

कालौघात सर्व वाद वाहून गेले. भारतीय उद्योगाच्या इतिहासात ही लढाई कायम ओळखली जाईल. रतन टाटांनी देखील नंतर आपण हे प्रकरण जास्त ग्रेसफुली हाताळले नाही याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.