शंभर वर्षापूर्वी टाटांनी भारताच्या पहिल्या स्मार्ट सिटीची आखणी केली होती.

१०० वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नुकतेच पहिले महायुद्ध संपले होते. इंग्लंडच्या नेतृत्वाखालच्या दोस्त राष्ट्रांनी जर्मनी वगैरे देशावर मोठा विजय मिळवला होता. हा विजय साजरा करण्यासाठी भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल व्हायसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड बिहारच्या एका छोट्या खेड्यात साक्ची मध्ये आले होते.

२ जानेवारी १९१९ रोजी चेम्सफोर्ड भाषण देतांना म्हटले की,

“मी विचारही करू शकत नाही की जर इथे बनलेल्या स्टील रेल्स आम्हाला मिळाली नसती तर महायुद्ध्याच्या चार वर्षात काय घडले असते. या युद्धाच्या विजयामध्ये टाटा स्टीलने जे योगदान दिले आहे त्यासाठी धन्यवाद म्हणायला मी इथे आलो आहे.”

१९०७ मध्ये  जेव्हा टाटा आयर्न एंड स्टील कंपनी  (TISCO) स्थापना झाली तेव्हा साक्ची हे केवळ झुडपांचे जंगल होते. पुढच्या दहा वर्षात तिथे  ५०,००० रहिवासी असणारे इंडस्ट्रीयल टाउनशीप उभे राहिले होते. हे गाव म्हणजे जमशेदजी टाटा यांनी पाहिलेलं स्वप्न होत.

व्हायसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड यांनी त्या दिवशी जाहीर केलं आज पासून साक्ची या गावचं नाव जमशेदपूर!! 

जमशेदजी टाटा हे पाश्चात्य आधुनिक उद्योगधंद्याशी जुळवून घेतलेल्या भारताच्या पहिल्या पिढीच्या व्यापाऱ्यापैकी एक. त्यांना काहीतरी वेगळ करायचं होतं. आधीच चीनला जाऊन त्यांनी कापसाचे महत्व जाणले होते, त्याचा उद्योग ही त्यांनी सुरु केला होता. पण जमशेदजीनां त्यापेक्षाही काहीतरी मोठे करायचे होते आणि त्याच्याच शोधात जगभर फिरण चालेलं होत.

ते जेव्हा इंग्लंडची कापडनगरी मॅंचेस्टरला गेले होते तेव्हा त्यांनी थॉमस कार्लाईलला एका भाषणात बोलताना ऐकलं. तो म्हणत होता,

“जो देश पोलाद आणि स्टीलवर पकड मिळवतो तो देश काहीच काळात सोन्यावर ही अधिपत्य गाजवतो. “

या वाक्याने जमशेदजींच्या आयुष्यावर खोलवर परिणाम केला. स्टील उद्योगचं येणाऱ्या शतकावर राज्य करणार हे त्यांनी ओळखलं. त्या दिवशीच ठरवल की आपण भारतात स्टील वर काम करायचे आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची.

विसाव्या शतकाच्या सुरवातीला चार्लेस पेज पेरील नावच्या  भूगर्भशास्त्रज्ञयाला स्टील प्लॅन्ट साठी साईट सुचवण्यास सांगितले. मध्यप्रदेश मध्ये लोखंडाच्या खाणीचा शोध सुरु झाला.

याच काळात ओरिसाच्या मयूरभंज संस्थानच्या राजाने जीओलॉजी सर्वे ऑफ इंडिया मधून रिटायर झालेले पी.एन. बोस यांना आपल्या राज्याम्धल्या सर्व्हे साठी अपॉइन्ट केले होते. त्यांना शोध लागला की गोरुम्हीसानी इथे लोखंड मिळू शकते. बोस यांनी तत्काळ जमशेदजींना याबद्दल पत्र लिहिले

त्यांच्याच आग्रहामुळे जमशेदजीनी छोटा नागपूर पठाराच्या जवळ स्टील  प्लॅन्ट लावायचे ठरवले. जमशेदजींचे चिरंजीव दोराबजी टाटा, त्यांचा भाचा शापूरजी साक्त्वाला हे सगळे झारखंडच्या जंगलात स्टील प्लटसाठी जागा शोधू लागले. तो शोध संपला साक्ची येथे. सुबर्णरेखा आणि खारकाई नदीच्या संगमावरची जागा ही टाटा स्टिल प्लँटसाठी योग्य होती.

स्टील प्लान्टचे स्वप्नाची जमशेदजीनी अनेक वर्ष वाट पहली होती पण जेव्हा हा प्रकल्प आकार घेऊ लागला तेव्हा  दुर्दैवाने जमशेदजी आजारी पडले. त्यानंतर सर्व गोष्टी त्यांच्या मुलांनी हाताळल्या.

जमशेदजींच्या आयुष्याची चार ध्येय होती एक हायड्रो पॉवर प्लांट, एक सर्वोत्कृष्ट शैक्षेणिक संस्था, देशातील पहिले पंच तारांकित हॉटेल आणि एक मोठी स्टील ची कंपनी. यापैकी एक स्वप्न म्हणजे ताज महाल हॉटेल च्या रूपाने त्यांच्या हयातीत पूर्ण झाले. बाकी तिन्ही गोष्टी नंतरच्या उत्तराधिकाऱ्यांनी पूर्ण केल्या.

जमशेदजी टाटा  १९०४ ला जरी वारले असले तरी यांच्या डोक्यात साक्ची च्या  पुढील पन्नास वर्षाचा आराखडा जणू तयारच होता. जमशेदजी टाटा यांनी एक आधुनिक शहर बनवण्याचे ठरवले. तिथे रहाणाऱ्या प्रत्येक नागरीकाला हे शहर एक सुखद अनुभव देईल असे व्हिजन जमशेदजी यांचे होते.

रस्ते बनवत असताना जमशेदजी टाटा आजारी होते त्यामुळे ते साक्चीला जाऊ शकत नव्हते पण त्यांनी पत्र लिहून मुलगा दोराबजी याला काही विशेष सूचना दिल्या होत्या. जसं की रस्ते बनवत असताना दोन्ही बाजूला चांगली सावली देणारी झाडे लावा. शहरामध्ये गार्डन ,लॉन साठी भरपूर जागा सोडा ,फुटबॉल ,हॉकी साठी मोठी मैदाने सोडा असे निर्देश त्यांनी दिले होते. हिंदूंच्या मंदिरासाठी, मुस्लिमांच्या मस्जिदीसाठी आणि ख्रिश्चन लोकांच्या चर्च साठी योग्य जागा निवडा असे ही त्यांनी सांगितले होते.

दोराबजी यांनी ही वडिलांची प्रत्येक सूचना अमलात आणली आणि काळाच्या ओघात एक सुदर शहर तयार होत गेलं. जगाची आयर्नसिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या पिट्सबर्ग मधील ज्युलिअन केनडी सहलीन कंपनीने या शहराचं डिझाईन बनवलं होतं.

१६ फेब्रुवारी १९१२ रोजी पहिला स्टील रॉड टाटा कंपनीमधून बाहेर पडला. हा ऐतिहासिक दिवस होता. पारतंत्र्याच्या जोखडात असलेल्या गरीब देशामध्ये तिथल्या एका कंपनीने स्वतःची स्टील निर्मिती सुरु केली होती. जमशेदजीचे दृष्टी आणि दोरबजी यांचे कष्ट यामुळे हे शहर उभे राहू शकले होते.

हळूहळू कामगार वाढू लागले आर्थिक सामाजिक विकास सुरु झाला तसं बाजापेठ तयार झाली. अनेक कंपन्या येऊ लागल्या रोजगार उपलब्ध झाला

१९३०च्य दशकात महात्मा गांधी याचं जमशेदपूरला दोन वेळेस जाण झालं. गांधी भांडवलशाहीचे प्रखर विरोधक होते. पण तरीही दोराबजी यांची इच्छा होती की त्यांनी एकदा तरी हे शहर पाहावं. आणि गांधीजींना खरोखर इथली प्रगती आवडली. इथे कामाबरोबरच कंपनी कामगार आणि त्यांच्या कुटुंबाची ही  सर्वार्थाने काळजी घेत होती. हे बघून गांधीनी या शहराचे आणि पर्यायाने टाटांचे कौतुक केले.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला टाटांच्या कारखान्याबद्दल सहानुभूती होती.

जेव्हा टिस्कोमध्ये पहिला कामगारांचा संप झाला तेव्हा तो मिटवायला खुद्द सुभाषचंद्र बोस आले होते. सुभाषबाबूंच्या एका भाषणाने जमशेदपूरमधले कामगार आपला संप मिटवून कारखान्यात हजर झाले. पुढे अनेक वर्ष तिथल्या कामगारांच्या असोशिएश्नचं नेतृत्व सुभाषबाबुन्कडे होते.

आज घडीला तिथे जुबली पार्क ,दल्मा अभयारण्य ,टाटा स्टील झुओलोजीकाल  पार्क ,जे.आर. डी .क्रीडा संकुल,टेल्को चा थीम पार्क, हाय टेक सिटी पार्क, एयरपोर्ट, गोल्फ ग्राउंड,अत्याधुनिक दवाखाने अशा सर्व गोष्टी तिथे आहेत.

या गोष्टींमुळे या शहराने आधुनिकता अंगीकारली पण स्वतःचे सौंदर्य गमावले  नाहीच पण उलट हे शहर अजूनच बहरलंय. जमशेदपुरमध्ये अनेक दर्जेदार शैक्षणिक संस्था ही आज आहेत. महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेज, नॉशनल स्कूल ऑफ टेक्नोलॉजी, राष्ट्रीय धातू संशोधन लॅबोरेटरी , कौन्सिल ऑफ सायंटिफिक अंड इंडस्ट्रियल रिसर्च. इतर अनेक शैक्षणिक संस्था तिथे तयार झाल्या आहेत.

आज या शहराच्या प्रगती मुळे झारखंड सारख्या मागास राज्यामध्ये ही विकास साधता आला. जमशेदपूरला आज अनेक नावानी ओळखले जाते टाटा नगर, स्टील सिटी ,ग्रीन सिटी. अजूनही हे शहर भारतीय उद्योगधंद्याचा कणा म्हणूनचं ओळखले जाते.

आज जेव्हा स्मार्टसिटीबद्दल फक्त चर्चा होत असते पण जमशेदजी सारख्या द्रष्ट्या उद्योजकाने शंभर वर्षापूर्वी स्मार्टसिटीची आखणी केली होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.