आसेतु हिमाचल कोणी विचारही केला नव्हता तेव्हा महाराजांनी आरमार उभारून समुद्र काबीज केला

सतरावं शतक हे अंधकाराने भरलेलं होतं. उत्तरेत जुलमी औरंगजेब, दक्षिणेत अन्यायी आदिलीशाही निजामशाही राज्य करत होती. अशावेळी फक्त महाराष्ट्रच नव्हे तर अख्ख्या भारताला प्रकाशाच्या दिशेने नेण्यासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली होती. एका छोट्याशा जहागिरीतून मोठं साम्राज्य निर्माण केलं.

मुघल, आदिलशाह, निजाम शहा यांच्या सोबतच सातासमुद्रापारहून आलेले इंग्रज,पोर्तुगीज,डच यांच्यावर देखील वचक बसवणे गरजेचं होतं. महाराजांनी यासाठीच स्वराज्याचा पश्चिम किनारा भक्कम करायचं ठरवल.

तेव्हा जंजिरा किल्ल्यामुळ आफ्रिकन हबशी सिद्धीच अरबी समुद्रावर वर्चस्व होतं. ते सर्वात आधी मोडून काढण गरजेचं होत.

यासाठीच सन १६५६ मध्ये महाराजांनी एक महत्वाचा निर्णय घेतला, “स्वराज्याचं आरमार उभा करणे”

जावळी ताब्यात आल्यापासून मराठी सेना कोकणात उतरू लागली होती. जंजिऱ्याच्या सिद्दीशी अनेकदा संघर्ष उभा राहात होता. १६५७ साली ऐन दिवाळीत छ.शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडीची मोहीम हाती घेतली. कोकणचा मोठा प्रांत आपल्या ताब्यात घेतला. धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच २४ ऑक्टोबर १६५७ रोजी जहाज बांधणी कारखान्याची सुरवात केली.

फक्त महाराष्ट्रातीलच नाही अख्ख्या भारताच्या पहिल्या आरमाराची ही पायाभरणी होती.

वसईला जहाज बांधणारे कुशल पोर्तुगीज कारागीर होते. रुय लैताव व्हीयेगस व त्याचा मुलगा फेर्नाव व्हीयेगस यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी वीस लढाऊ गलबते बांधण्यास सुरुवात केली.

ही जहाजे आपण सिद्धीच्याविरोधात लढण्यासाठी बांधीत आहोत, असा शिवाजी महाराजांनी बनाव केला. त्या शिवाय पोर्तुगीज या जहाजांना कल्याण-भिवंडीच्या खाडीतून बाहेर समुद्रात पडू देणे शक्य नव्हते.

तब्बल तीन वर्षे हे जहाज बांधणीच काम चाललं होतं. हजारो लोक राबत होते.

भारतात गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदाच एका राज्याच स्वतःच सार्वभौम शक्तिशाली आरमार उभं रहात होतं.

त्या काळात जगातली २३% अर्थव्यवस्था भारताकड होती. औरंगजेब बादशहा सर्वात शक्तिशाली बादशहा होता मात्र तरीही त्याच्याकडे सुसज्ज आरमार नव्हते. तो पोर्तुगिजांना १२०० अश्रफी मक्याला जाण्यासाठी द्यायचा. सागरी सुरक्षिततेच महत्व त्याच्या लक्षातच आलं नव्हत.

सन १६६१ मध्ये मराठा आरमार बांधून तयार झाले.

तोपर्यंत सिद्धीच्या ताब्यात असलेले कल्याण भिवंडीचे किल्ले आपल्या ताब्यात आले होते. यामुळे आपल्या आरमाराची पहिली ठिकाणी तरती सहज पणे केली. पोर्तुगीज दफ्तरातील अस लिहला आहे की

“आदिलशाहीचा सरदार शहाजीच्या मुलाने वसई व चौल कडील प्रदेश काबीज केला असून तो बलिष्ठ झाला आहे.त्याने काही लढाऊ गलबते कल्याण,भिवंडी,पनवेल या वसई तालुक्याच्या बंदरामध्ये बांधिली आहेत.त्यामुळे आम्हांस सावध राहणे भाग झाले आहे.ही गलबते समुद्रात फिरकू न द्यावी म्हणून (पोर्तुगीज)कॅप्टन ला आम्ही आज्ञा केली आहे की,त्याने सदर गलबते बंदरातून बाहेर येउच देऊ नये.”

त्यांनीं प्रथम गुराबा, तरांडी, गलबतें, शिबाडें, पगार, मचवे अशीं निरनिराळया प्रकारचीं जलवाहनें तयार केलीं. नंतर शिवाजी महाराजांनीं कोंकणवर चाल करून वाडीकर सांवतांपैकीं तानाजी सांबत व रामदळवी यांस आपल्या आरमारावर अधिकारी नेमलें. इ. स. १६६४ मध्यें सिंधुदुर्ग हा जलदुर्ग बांधला व कुलाबा, सुवर्णदुर्ग व विजयदुर्ग हे किल्ले मजबूत करून तेथेही जहाजें बांधण्यास सुरुवात केली.

इ. स. १६६५ मध्यें महाराजांनी पार कारवारपर्यंत कोंकण किनारा आपल्या आरमाराच्या जोरावर जिंकून घेतला.  कारवार मधील बसरूरमध्ये त्यांनी शिवाप्पा नाईक याला मात दिली.

महाराजांच्या नौदलाने केलेल हे पहिल नाविक युद्ध होत. तब्बल सहाशे वर्षांनी अस युद्ध पश्चिम किनारपट्टीवर झाल असेल.

सुरवातीला मराठ्यांनी बांधलेले जहाज,गलबत,गुराब ही इंग्लिश बनावटीपेक्षा चांगली नसत व त्याची इंग्रज अधिकारी थट्टा उडवत.  महाराजांनी आरमार उभे केले त्यावेळी लहान लहान जहाजांवर भर दिला होता. याकाळात मराठा आरमारांत फ्रिगेट्स” म्हणजे ३० पासून १५० टन वजनाचीं व एक डोलकाठीचीं जहाजें ८५ होती. तीन डोलकाठयांची मोठालीं जहाजें तीन होती.

दिवसेंदिवस मराठा आरमार वाढत गेलें. डच अधिकार्यांची मदत घेऊन मोठ्या मोठ्या युद्धनौका महाराजांनी उभारल्या. ह्यानंतर १६७३ मध्यें मोठीं लढाऊ गलबतें ५७ झालीं व इ. स. १६७९ मध्यें ती ८६ पर्यंत वाढलीं.

सुरुवातीला हसणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यानी इंग्लंडला पाठवलेल्या १ नोव्हेंबर १६७९ च्या पत्रात लिहिलंय की,

“त्या लहान होड्या आम्हाला चकवा देतात. आम्हाला तसल्या होड्या मिळाल्या तर आम्हाला मदत मिळेल.

या एका पत्रावरून मराठा नौदलाच्या ताकदीचा आणि महाराजांच्या दूरदृष्टीचा अंदाज येईल.  

मराठी आरमारावर मुख्य अधिकारी इब्राहिमखान, दौलतखान, दर्यासारंग, मायनाक भंडारी वगैरे होते. त्यांनीं आरमाराचें काम उत्तम प्रकारें करून मराठयांचें नांव दर्यायुध्दामध्यें गाजवून सोडले.

खांदेरीच्या सुप्रसिद्ध युद्धात मराठयानी इंग्रज आणि सिद्दी या दोन्ही मातब्बर आरमाराना एकाचवेळी झुंजवले. या लढाईत इंग्रज नौदलाची फार मोठी हानी झाली.  मराठ्यांच्या हाताला त्यांची ‘डव्ह’ नावाची एक नौका लागली. या नौकेवरील सर्व खलाशांना सागरगडावर डांबण्यात आलं.

ही डव्ह युद्धनौका मराठा आरमाराच्या सामर्थ्याचे प्रतिक म्हणून पिढ्यानपिढ्या ओळखली गेली.

शिवरायांच्या नंतर संभाजी महाराजांनी देखील पोर्तुगीज, इंग्रजांना याच आरमाराच्या जोरावर टापेखाली ठेवले. त्यानंतर राजाराम महाराजांच्या काळात कान्होजी आन्ग्रेनी मराठा आरमाराची कीर्ती दिगंतात पोहचवली. रामचंद्रपंत अमात्य यांनी देखील आपल्या आज्ञापत्रात या आरमाराचे महत्व सांगितले आहे.

पुढे पेशवाईच्या काळात आंग्रे डोईजड होत आहेत असा समज करून घेऊन पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने मराठा आरमार समुद्रात बुडवून टाकले. ही भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक असेल. अस म्हणतात की,

“अत्यंत पराक्रमी आणि दर्यावर्दी असणाऱ्या मराठयांचें आरमार असतांना कोकण पट्टीवर आपला अंमल बसविण्याची इंग्रजांनां छाती झाली नाहीं. हे आरमार बुडाले आणि इंग्रजांना भारतावर पकड मजबूत करण्यास मदत झाली “

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.