मराठा आरमाराच्या दहशतीच्या कथा आजही ब्रिटीश रॉयल नेव्ही मध्ये चर्चिल्या जातात.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्यावर समुद्रातून आक्रमण होऊ शकते हे हेरले होते. भविष्यात झाले ही तसंच महाराजानंतर जी काही आक्रमणं झाली ती पश्चिम किनारपट्टीवर झाली. पुढे जे काही लोक आले ते ब्रिटीश,डच,पोर्तुगीस,फ्रेंच सर्वच्या सर्व  पश्चिम किनारपट्टीवर स्थिरावले . हा धोका ओळखूनच महाराजांनी वसई पासून वेंगुर्ल्यापर्यंत सरासरी वीस किलोमीटर वर एक किल्ला तयार केला होता. एखादं जहाज जर समुद्रात आलं तर एका किल्ल्याच्या नजरेच्या टप्प्यातून निघेपर्यंत ते जहाज दुसर्या किल्ल्याच्या नजरेच्या टप्प्यात आलेलं असतं.

महाराजांनी अत्यंत धूर्तपणे ही सीमा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हे सर्व किल्ले तयार केले होते. हे किल्ले फक्त पहारा  आणि सुरक्षितते साठीच नव्हते तर त्या भागातून होणऱ्या  व्यापार आणि उलाढाली स्थैर्य देण्यासाठी होते. कारण त्या काळात घाटमाथ्याला चालणारा व्यापार मोठा होता. दाभोळ, रत्नागिरी, चौल सारख्या महत्वाच्या बंदरांवरून हा व्यापार चालायचा. त्यामुळे या भागात स्थैर्य रहाणे अत्यंत गरजेचे होते.

भविष्यात झाले ही तसेच अनेक आक्रमण या किनारपट्टीवर झाली त्यामुळे स्वराज्य धोक्यात आले असते पण मराठा साम्राजाचे आरमार प्रमुख सरलेख कान्होजी आंग्रे यांनी ते होऊ दिले नाही.

कान्होजीचा जन्म १६६९ मध्ये आंग्रेवाडी या गावात झाला. वडील तुकोजी रत्नागिरीतील श्रावणदुर्ग किल्ल्यावर तैनात होते. कान्होजी तिथेच वाढले. त्यांच्या बालपणातील मोठा काळ त्यांनी कोळी नाविकांबरोबर घालवला. इथेच त्यांच्या समुद्र,नौका ,हल्ले ,तटबंदी ,बंदरांना सुरक्षा पुरवणे या सर्व गोष्टींचे सखोल ज्ञान त्यांना मिळाले.

538614382

शिवरायांच्या नंतर संभाजी महराजांनी मराठी आरमाराची ताकद अजून वाढवली. पोर्तुगीजांना अनेकदा धडा शिकवला. पण त्यांच्या मृत्यू नंतर स्वराज्यावर मोठेच संकट आले. छत्रपती राजाराम महाराजांना जीव वाचवण्यासाठी दक्षिणेत जिंजीचा आधार घ्यावा लागला. पण या काळातही महाराष्ट्रात ज्या सरदारांनी स्वराज्याची ज्योत तेवत ठेवली यात कान्होजींचा समावेश होता. यामुळेच खुश होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना सरखेल ही उपाधी दिली.

सरखेल या शब्दाचा अर्थ आरमार प्रमुख असा होतो. ते  मराठा आरमाराचे प्रमुख होते. ज्यांनी आपले अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवले.

त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्यासाठी परकीय शक्तींकडून अनेक आक्रमणं होत होती. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून परकीय शक्तींना त्यांचा वापर आपल्या मायदेशी व्यापारासाठी करायचा होता. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठीकाणी सागरी किल्ले काबीज करणेही आवश्यक होते. आंग्रे यांनी या सर्व शत्रूंशी धैर्याने लढा तर दिलाच पण दुसऱ्या बाजूला मराठा साम्राजाचे आरमार ही मजबूत केले.

अनेक आपल्या ताब्यात नसलेले किल्ले त्यांनी मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली आणले. परकीय सत्तांनी त्यांच्यावर ते समुद्री चाचे असल्याचा आरोप केला होता. इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नानंतरही, मरेपर्यंत कान्होजी आंग्रे यांनी  मराठा आरमार अजिंक्यच ठेवले.

१६९८ मध्ये साताराच्या छत्रपतींनी त्यांना “दर्यासारंग” अशी पदवी देऊन, मुंबई पासून वेंगुर्ला पर्यंतच्या किनारपट्टीची जबाबदारी सोपवली. सिद्दी जोहरच्या ताब्यातले जंजिरा मात्र मुघलांकडेच राहिला. कान्होजींनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनींच्या व्यापारी जहाजांवर हल्ला चढवून केली. अनेक प्रयत्नांनंतरही कान्होजींच्या आरमाराचा पराभव करण्यात अपयश आल्याने ब्रिटिशांनी कोकण किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व मान्य करत अखेर चाणाक्ष इंग्रजांनी त्यांच्याशी शांततेचा तह केला.

कान्होजींनी आपल्या कारकीर्दीत ब्रिटिश आणि पोर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले. ४ नोव्हेंबर १७१२ मध्ये  कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राउन लढाईत मारला गेला. त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले. १७१२ मध्ये कान्होजी आणि इंग्रजांत तह होऊन तीस हजाराच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले. या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला.

१७१५ मध्ये चार्लस बून यांची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक झाली होती. त्यांनी कान्होजींना कंठस्नान घालायचेच ठरवले होते. आंग्रे यांनी इंग्रजांची  तीन व्यापारी जहाजे पकडली. इंग्रजांनी कान्होजींना समुद्री चाचे म्हणून घोषित केले. कान्होजींनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करुन ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाची खंडणी वसूल केली. या नंतर इंग्रज चांगलेच खचले.

१७२० मध्ये इंग्रजांनी विजयदुर्ग किल्यावर आक्रमक हल्ला चढविला. त्यांनी किल्यावर तोफांचा जोरदार मारा केला, पण विजयदुर्गाची तटबंदी ते भेदू शकले नाही. हा हल्ला पूर्णपणे अपयशी ठरला व इंग्रजांनी पुनश्च मुंबईला माघार घेतली. २९ नोव्हेंबर १७२१ मध्ये व्हॉईसरॉय फ्रॅंसिस्को जोस डी सॅंपीयो इ कॅस्ट्रो यांच्या पोर्तुगीज आरमाराने आणि जनरल रॉबर्ट कोवान यांच्या इंग्रज आरमाराने, कमांडर थॉमस मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखाली ६००० सैनिकांसह आणि ४ जंगी जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली.

मेधाजी भाटकर आणि मैनक भंडारी या आपल्या अत्यंत कुशल आणि शूर सरदारांच्या सहाय्याने कान्होजींनी हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. या अपयशानंतर डिसेंबर १७२३ मध्ये इंग्लंडला परतले. त्यांच्यावर देशद्रोहाचा आणि चाच्यांशी संधान बांधण्याचा आरोप ठेऊन खटला चालविण्यात आला. याच दरम्यान गव्हर्नर बूनही इंग्लंडला परतले. बून मायदेशी परतल्यानंतर कान्होजींच्या मृत्यूपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यावर शांतता राहिली.

४ जुलै १७२९ मध्ये कान्होजी आंग्रेंचा मृत्यू झाला. पुढच्या काळात या सागरी शक्तीकडे मराठ्यांचे दुर्लक्ष झाले आणि ब्रिटिशांनी संधी साधून हळूहळू आपले पाय कोकण किनारी पसरवण्यास सुरूवात केली. १७५६ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांच्या मदतीने घेरियावर (आताचा विजयदुर्ग) हल्ला करून कान्होजींचा शेवटचा वंशज तुळाजीला पकडले, आणि कान्होजींचे आरमार संपवले. फक्त महाराष्ट्राचे नाही तर अखंड भारताचे यामुळे प्रचंड नुकसान झाले. अलिबागला त्यांची समाधी उभारली आहे.

कोकणाचे राजे म्हणून ओळखल्या गेलेल्या कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाचा सन्मान म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर १५ सप्टेंबर १९५१ रोजी भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे नामकरण आय. एन. एस आंग्रे असे करण्यात आले. खांदेरी बेटावरील ओल्ड केनेरी दीपगृहाचे कान्होजी आंग्रे दीपगृह असे करण्यात आले आहे.

Sumbhajee Angria on board

आजही त्यांची दहशतीच्या कथा ब्रिटीश रॉयल नेव्हीमध्ये चर्चिल्या जातात. काही वर्षापूर्वी आलेल्या पायरेट्स ऑफ कॅरीबियन सिनेमामध्ये कान्होजी आंग्रे यांच्या सुपुत्रावरून प्रेरित झालेले श्री संभाजी अन्ग्रिया हे कॅरेकटर होते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.