पंतप्रधानांनी आवाहन केलं म्हणून अख्ख्या देशाने एकवेळचा उपवास केला होता.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यू नंतर त्यांच्या खुर्चीवर कोण बसणार हा प्रश्न निर्माण झाला होता. स्वातंत्र्यलढ्यापासून अनेक दिग्गज नेते काँग्रेस मध्ये होते. पण स्वच्छ चारित्र्य,लोकसंग्रह, कामाचा धडाका, सर्वांना पुढे घेऊन जाण्याची वृत्ती

हा वारसा सांभाळेल असा एकमेव नेता होता तो म्हणजे,

लालबहादूर शास्त्री

शास्त्रीजी पंतप्रधान बनले पण तो काळ संघर्षाचा होता. पाकिस्तानच्या कुरापती सुरूच होत्या. कधीही युद्धाला तोंड फुटेल अशी परिस्थिती होती. पण नुकताच झालेल्या चीनच्या युद्धात देशाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं होतं. अनेक वर्षांनी देश मागे पडला होता.

उद्योगधंदे हेलकावत होते. बेरोजगारीच प्रमाण वाढलं होतं. सर्वात महत्वाच म्हणजे अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा पडू लागला होता. याचे सलग पडत असलेला दुष्काळ हे एक कारण होते पण सोबतच पंचवार्षिक योजनांमध्ये शेतीकडे झालेले दुर्लक्ष याचाही आपल्याला तोटा झाला होता.

प्रचंड वेगाने वाढत असलेल्या लोकसंख्येला पुरेल एवढे अन्नधान्य उपलब्ध करून देणे हे शास्त्रीजींसमोरचा मुख्य आव्हान होता.

यासाठी अमेरिकेकडून गहू व इतर धान्याची मदत घेणे हा एक उपाय त्यांच्या समोर होता. पण त्यासाठी अमेरिकेच्या जाचक अटी स्वीकारण्याची त्यांची तयारी नव्हती.

तो काळ अमेरिका आणि रशिया यांच्यातील शितयुद्धाचा होता. यातील कोणाचीही बाजू घ्यायची नाही हे नेहरूंचे अलिप्ततावादाचे धोरण शास्त्रीजींनी देखील कठोरपणे पाळले होते.

अशातच भारताचा संयम हा दुबळेपणा अशी गैरसमजूत करून घेतलेल्या पाकिस्तानने कडेलोट केला. शास्त्रीजींनी त्यांना कठोर उत्तर द्यायचं ठरवलं.

1965 सालच्या भारत पाकिस्तान युद्धाला तोंड फुटले.

सुरवातीपासून अमेरिका हा पाकिस्तानचा पक्षपाती होता. त्यांनी पाकिस्तानला शस्त्रास्त्रांपासून सगळी मदत केली होती. या आणीबाणीच्या वेळेचा वापर त्यांनी भारतावर दबाव वाढवण्यासाठी केला.

भारताचा अन्नधान्याचा साठा वेगाने कमी होत होता. सीमेवर लढणाऱ्या जवानांना रसद कमी पडू नये याची काळजी घेतली जात होती. यावेळी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी घोषणा केली,

“जय जवान जय किसान

शास्त्रीजी ग्रामीण तळागाळातुन आलेले लोकनेते होते. ज्या प्रमाणे हातात बंदूक घेऊन आपले जवान शत्रूशी लढत आहेत त्याप्रमाणे शेतात राबणारा शेतकरी सुद्धा या आणीबाणीच्या काळात तितकाच महत्वाचा आहे हा संदेश पंतप्रधानांनी दिला होता.

सोबतच शास्त्रीजींनी आणखी एक महत्वाच व्रत सगळ्या जनतेला दिलं,

एक वेळ उपवास पाळण्याच व्रत

जवानांना अन्नधान्य पुरावे म्हणून त्यांच्यासाठी जनतेने आठवड्यातील एक दिवस उपवास ठेवावा असे त्यांनी आवाहन केलं होतं. लालबहादूर शास्त्री हे गांधीवादाचे कठोर पालन करणारे होते. त्यातूनच त्यांना ही कल्पना सुचली होती.

आपल्या भाषणात ते म्हणतात ,

‘हमें भारत का स्वाभिमान बनाए रखने के लिए देश के पास उपलब्ध अनाज से ही काम चलाना होगा. हम किसी भी देश के आगे हाथ नहीं फैला सकते. यदि हमने किसी देश द्वारा अनाज देने की पेशकश स्वीकार की तो यह देश के स्वाभिमान पर गहरी चोट होगी. इसलिए देशवासियों को सप्ताह में एक वक्त का उपवास करना चाहिए. इससे देश इतना अनाज बचा लेगा कि अगली फसल आने तक देश में अनाज की उपलब्धता बनी रहेगी.”

नुसत सांगितलं नाही तर याचे स्वतः पासून पालन केलं. पंतप्रधान निवासमध्ये एकवेळ च जेवण बनू लागले.

याचा परिणाम देशभरात झाला. शहर असो की छोटे खेडे प्रत्येक घरात सोमवारी किंवा मंगळवारी एक वेळच जेवण शिजल नाही.

आपलं रक्षण करण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी गोरगरीब असो की श्रीमंत प्रत्येकाने उपवास केला.

शास्त्रीजींच्या या अभिनव कल्पनेला हिंदीत अनाज यज्ञ म्हणून ओळखल जातं. आजही उत्तरेत अनेकजण हा उपवास करतात.

पण याचा अर्थ असा नव्हे की पंतप्रधानांनी फक्त अन्नधान्याच्या तुटवड्यावर हे व्रत हा एकमेव उपाय केला होता. त्यांनाही हे ठाऊक होतं की हा तत्कालीन उपाय व प्रतिकात्मक योजना आहे.

ही वेळ परत येऊ नये म्हणून हरितक्रांती व दुग्ध क्रांतीची दुरोगामी योजना शास्त्रीजींनी वेगाने अंमलात आणली ज्याची फळे आजही आपण चाखतो आहोत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.