कैलास मंदीर खरच ‘एलियन’ नी बांधल आहे का ?

बोल भिडू कार्यकर्ते कधी काय विचारतील याचा नेम नाही. आत्ता रिकाम्या डोक्यात काहीही प्रश्न येतात. असाच एक प्रश्न बोलभिडू कार्यकर्त्याच्या डोक्यात आला.

तो म्हणाला,

कैलास मंदीर एलियनी लोकांनी बांधलय.

पुरावा विचारला तर तो म्हणला, हे बघ हिस्टरी चॅनेलवर देखील हे दाखवण्यात आलय. संदर्भ म्हणून त्याने काही लिंक पाठवल्या. यामध्ये एकंदरीत मंदीराचे अनोखे बांधकाम दाखवून ही कलाकुसर आधुनिक काळात देखील शक्य नसल्याचं सांगण्यात आलं होतं.

त्यावर आधारित ऐलियनची थेअरी मांडण्याचे आली होती. 

हिस्ट्री चॅनेलवर एन्सिएंट एलियन नावाचा हा कार्यक्रम दाखवला जात असे. देश विदेशातील जूनी पुराणी मंदीर ज्या टेक्नॉलॉजीने तयार करण्यात आली ती कशाप्रकारे एलियनची असू शकते अशा प्रकारची थिएरी मांडण्यात येत असे.

इथं एक गोष्ट स्पष्टपणे माहित करुन घेतली पाहीजे,  

ती म्हणजे ही फक्त एक थेअरी आहे. थेअरीला पुरावे नसतात. फक्त अंदाज बांधला जातो. हा अंदाज पाहून अनेकांना गोष्टी खऱ्या वाटू लागतात.

ही गोष्ट खरी का खोटी यापूर्वी आपण कैलास मंदीराचा इतिहास पहायला हवा.

अंजिठा वेरुळ या लेणी परिसरातील वेरुळच्या लेण्यांमध्ये कैलास मंदीर स्थित आहे. इ.स.पुर्व ६०० ते इ.स.पुर्व १००० व्या शतकादरम्यान जैन, बौद्ध आणि हिंदू धर्मांच्या कलाकृती वेरूळ लेण्यांमध्ये आहेत.

वेरुळ याच परिसरात या लेण्या का आहेत? याचं उत्तर भौगोलिक विशेषता आणि तत्कालीन व्यापारी मार्गावर हा परिसर येत असल्याचे संदर्भ देण्यात येतात.

वेरुळ हा परिसर दोन किलोमीटरचा असून येथे १०० हून अधिक गुहा आहेत त्यापैकी ३४ गुहा सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी आहेत. त्यातीलच १६ व्या क्रमांकाच्या गुहेत कैलास मंदीर आहे.

या मंदीराच वैशिष्ट म्हणजे हे मंदीर कळसाकडून सुरवात करुन पायापर्यन्त कोरण्यात आलेलं आहे.

ज्याप्रमाणे एखाद्या दगडापासून नको असलेला भाग छिन्नी आणि हातोड्याने काढून मुर्ती तयार करण्यात येते त्याचप्रमाणे डोंगराच्या कड्यामधील नको असलेला भाग वरून खाली काढत जावून हे मंदीर साकारण्यात आलं.

हे मंदीर वैशिष्टपूर्ण का समजलं जातं तर अस सांगतात की,

नको असलेल्या दगडांचे वजन साधारणं दोन लाख टन इतके असू शकते. इतका मोठ्ठा भाग काढून मंदीराची भव्य कलाकृती करणं सहजासहजी शक्य नाही. आजच्या काळात देखील मशीन व तंत्राचा वापर करुन अशा प्रकारे मंदीर साकारणं अशक्य असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळेच अनेकजण मंदीराच्या दंतकथा रचतात.

या अनोख्या बांधकाम शैलीमुळेच मंदीराचे निर्माण एलियनच्या मदतीतून करण्यात आलं असल्याची थेअरी मांडण्यात येते.

१० व्या शतकात लिहण्यात आलेल्या कथा कल्पतरू नावाच्या ग्रॅंथात मंदीरासंबधीत एक लोककथा देण्यात आली आहे.

या लोककथेनुसार ८ व्या शतकातील राष्ट्रकुट राजा ऐलू च्या पत्नीने स्वप्नात एक शिवमंदीर पाहिले. तिला स्वप्नामध्ये फक्त शिवमंदीराचा कळस दिसला. अशा प्रकारचे मंदीर आपण आपल्या राजामार्फत साकार करावे म्हणून तीने अन्नत्याग केला.

आणि जोपर्यन्त मंदीर तयार होणार नाही, तोपर्यन्त आपण अन्न घेणार नाही अशी शपथ घेतली.

राजाने शिखरापासून सुरवात करण्यासाठी वेगवेगळ्या शिल्पकारांना आमंत्रित केलं मात्र अशा प्रकारचं मंदीर उभा करणं अशक्य असल्याचं प्रत्येकाने सांगितलं. त्यानंतर पैठण येथून काकोसा नावाच्या शिल्पकाराला बोलवण्यात आलं.

त्यांनीच दगडांमध्ये छिन्नी आणि हातोड्यामार्फत कोरीव काम करुन वरतून खालीपर्यन्त मंदीर उभा करण्याची कल्पना सांगितली.

राष्ट्रकुट राजा कृष्ण प्रथम याच्या कारकिर्दीत मंदीरच कोरण्यास सुरवात करण्यात आली.

इस ७५७ ते ७७३ च्या काळात मंदीरचा बराचसा भाग कोरून पुर्ण करण्यात आला. राष्ट्रकुट घराण्याची राजधानी गुलबर्गा असल्याने या मंदीरावर द्रविड कलेचा प्रभाव पडला.

दूसरी शक्यता अशी देखील सांगण्यात येते की,

मंदीर तयार करण्याची सुरवात इस ७३५ ते ७५७ या राष्ट्रकुटाच्या दंतिदुर्गा राजाच्या काळात बनवण्यात आला असेल. कारण मंदीर परिसरात दंतिदुर्गाचा एक शिलालेख देखील आढळला आहे.

मंदीर कोणत्या काळात बांधण्यात आलं याबद्दल वेगवेगळ्या शक्यता वर्तवण्यात येत असल्या तरी राष्ट्रकुटांच्या काळात हे मंदीर बांधण्यात आल्यावर ऐतिहासिक तज्ञ ठाम असतात.

आत्ता महत्वाचा मुद्दा म्हणजे कैलास मंदीर एलियनच्या मदतीने बांधण्यात आल्याची थेअरी का मांडण्यात येते.

याचं पुर्ण क्रेडिट हिस्ट्री चॅनेलवरुन प्रसारित होणाऱ्या एसियंट एलियन या कार्यक्रमालाच दिले जाते. मुळात हा कार्यक्रम कोणत्याही तथ्याला धरून नव्हता. कैलास मंदीराची अनोखी शैली मंदीराबाबत गुढ वाढवण्यास कारणीभूत ठरते. उदाहरणार्थ दाखलं मंदीराचे काही फोटो देण्यात आले आहेत.

या फोटोतील कोरीव काम आजच्या प्रगत तंत्रज्ञानाला देखील अशक्य आहे. त्यामुळेच हे कोरीव काम कसे केले असेल हा प्रश्न पडणं साहजिक आहे.

मात्र एलियन सारखी थेअरी मांडल्यामुळे आपणच आपल्या प्रगत तंत्रज्ञानावर आक्षेप नोंदवण्याचा गुन्हा करतो हे देखील तितकच खरं.

भारतातील अनेक मंदीराची शैली पहाता आपले तंत्रज्ञान प्रगत होते हेच स्पष्ट होते. वेगवेगळ्या काळात झालेल्या बांधकाम शैली या वैशिष्ट्यपूर्ण होत्या.

मंदीरावर असणारा द्रविडी कलेचा प्रभाव हा राष्ट्रकुट व दक्षिण भारतीय मंदीर शैलींच उदाहरण म्हणून देण्यात येतं.

त्यामुळे कैलास मंदीर आणि एलियन ही फक्त एक भाकडकथा आहे, ज्याला तथ्यांचा आधार नाही. कोणतेही संदर्भ नाहीत. फक्त मंदीराची विशिष्ट शैली पाहून त्यावर प्रश्नचिन्ह उभे करून ही थिअरी पुढे रेटण्यात आली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.