मॉरिशस देशामध्ये मराठी माणसांचं प्रमाण जास्त का आहे?

हिंदी महासागरात आफ्रिकेजवळ वसलेला टिकली एवढा देश म्हणजे मॉरिशस. लोकसंख्या असेल १०-१२ लाख म्हणजे आपल्या सोलापूर औरंगाबाद एवढी. आपल्या निसर्ग सुंदर बीच साठी फेमस असलेल्या बेटावर गेलं तर अनेक मराठी भाषिक लोक आपल्याला भेटू शकतील.

अनेकदा आपल्याला प्रश्न देखील पडतो की आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या या देशात एवढे मराठी भाषिक कसे?

त्यासाठी आपल्याला मॉरिशसचा इतिहास जाणून घ्यावे लागेल.

दीर्घ काळापर्यंत मनुष्यवस्ती नसलेले हे बेट प्रथम अरब, स्वाहिली व मलायी खलाशांनी आणि त्यानंतर पोर्तुगीज व इतर यूरोपीय खलाशांनी पाहिलेले होते.

भारतीय लोककथेनुसार प्रभू रामचंद्रांनी हल्ला केल्यावर मारीच राक्षसाने या देशात आश्रय घेतलेला म्हणून याच नाव मॉरिशस अस म्हणतात.

पण डचांची स्टोरी वेगळी आहे.

१५९८ मध्ये ॲडमिरल वॉरविज्क याच्या नेतृत्वाखाली डच लोक या बेटावर येईपर्यंत कुणाचेच या बेटाशी विशेष संबंध प्रस्थापित झाले नव्हते. तोपर्यंत तेथे मनुष्यवस्तीही नव्हती.

नॅसॉचा राज्यप्रमुख प्रिन्स मॉरिस याच्या नावावरून डचांनी या बेटाला मॉरिशस हे नाव दिले.

तो काळ साम्राज्यवादाचा होता.

प्रत्येक युरोपियन देश आपली वसाहत प्रस्थापित करण्याच्या मागे लागला होता. डच लोकांनी मॉरिशस मध्ये वसाहत स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते जमलं नाही. पुढे फ्रेंचांनी यावर विजय मिळवला व इथून इंग्रजांच्या भारतीय नाविक तळावर हल्ले करण्यास सुरुवात केली.

याला वैतागून अखेर इंग्रजांनी या बेटावर हल्ला केला व १८१० साली मॉरिशसवर इंग्लिश अंमल सुरू झाला. या हल्ल्यात ब्रिटिश सेनेमध्ये तब्बल ९००० भारतीय होते.

त्यांनी डच लोकांनी ठेवलेले मॉरिशस हे नावच कायम केले.

सुरुवातीला केवळ व्यापारी व लष्करी दृष्ट्या महत्त्व असलेले मॉरिशस हे बेट ब्रिटिशांच्या कारकीर्दीत मळ्याच्या शेतीचे व साखरनिर्मितीचे प्रमुख बेट बनले.

ब्रिटिश साम्राज्यकाळात गुलामगिरीची पद्धत नष्ट झाल्यामुळे ऊसमळ्यांत काम करणारे आफ्रिकन गुलाम इतर व्यवसायांकडे वळले, त्यामुळे मजुरांचा खूपच तुटवडा भासू लागला.

या शेतात काम करण्यासाठी इंग्रजांनी भारतातून शेत मजूर आणायचं ठरवलं.

एकतर भारतावर इंग्रजांच राज्य असल्यामुळे हे सहज शक्य होतं आणि शिवाय भारतीयांना शेतीचं पूर्वापार ज्ञान होत, भारतात ऊस लागवड सुरू झाल्यापासून तिथे काम करण्याचा अनुभव होता.

याच कारणामुळे १८३५ पासून मळेवाल्यांना भारतातून करारावर मजूर आणण्यास ग्रेट ब्रिटनने परवानगी दिली.

सुरवातीला बिहार, उत्तरप्रदेश, बंगाल या प्रांतातून येणाऱ्या शेतमजुरांची संख्या जास्त होती. पण तुरळक मराठी लोक सुद्धा यात होते.

१५ जून १८४२ रोजी मुंबई बंदरावरून पहिलं मराठी स्थलांतरित लोकांनी भरलेलं जहाज मॉरिशसला आलं.

या जहाजात १७३ पैकी १०० जण रत्नागिरी, मालवण, ठाणे या कोकणी भागाबरोबरच सातारा कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून आलेले होते.

वारंवार येणारे दुष्काळ, पूर, साथीचे रोग, दारिद्र्य यामुळे पिचलेले हे शेतकरी आपलं नशीब उजळण्यासाठी बायका पोरांना घेऊन या परमुलखात जात होते.

सह्याद्रीच्या रागांशी नाते सांगणारा पर्वतीय प्रदेश, कोकणाशी नाते सांगणारे समुद्रकिनारे यामुळे त्यांना हा प्रदेश आपलासा वाटला.

कित्येक जण मॉरिशसला आले ते इथलेच होऊन गेले.

साधारण विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत इथे शेकडो भारतीय लोक येऊन राहिले. पण सुवेझ कालव्याच्या निर्मितीनंतर या बेटाच महत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी झालं आणि येथील वर्दळ कमी झाली.

हिंदू धर्म हा मॉरिशसचा मुख्य धर्म आहे. कारण या बेटावर हिंदूंचं प्रमाण ५३ टक्के आहे. त्यांच्या खालोखाल ३२ टक्के ख्रिश्चन तर १४% मुस्लिम. इथे बोलल्या जाणाऱ्या क्रिओल या भाषेतही अनेक हिंदी मराठी शब्द आढळतात.

१२ मार्च १९६८ ला मॉरिशसच्या स्वातंत्र्याची पहिली पहाट उगवली.

या आधी तिथल्या स्वातंत्र्यलढ्यावर गांधी वादी वारसा सांगणाऱ्या मणीलाल यांचा मोठा ठसा होता. स्वातंत्र्यानंतरही भारतीयांनी इथल्या राजकारणावर व्यवस्थित पकड बनवलेली आहे.

मॉरिशसचे सध्याचे राष्ट्रपती पंतप्रधान भारतीय वंशाचे आहेत.

गेल्या दोन अडीचशे वर्षात मॉरिशस मधल्या अनेक पिढ्यानी आपली मूळ भाषा जपली. तिथे दिवाळी, गणेशचतुर्थी हे उत्सव साजरे होतात.

इकडच्या मराठी घरांमध्ये सणासुदीला मोदक, पुरणपोळी, अळूवडी, आमटी, करंजी हे प्रकार आवर्जून बनवले जातात.

हे पदार्थ दिसायला आपल्या पदार्थासारखे असले तरी बनवण्याची पद्धत आपल्यापेक्षा खूप वेगळी आहे, चवीतही बराच फरक आहे.

मराठी वंशीय लोकांची संख्या तिथे १८ % असेल. हाच वारसा येत्या पिढ्यांमध्येही पोहचावा म्हणून तिथे विद्यापीठामध्ये मराठी भाषा व मराठा इतिहास शिकवण्याची सोय व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शिवाय मराठी मंडळाच्या माध्यमातून मराठी संस्कृती जपण्यासाठी मराठी नाटके, साहित्य संमेलन व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

इतक्या वर्षातही तिथल्या मराठी लोकांनी आपल्या मराठी मातीशी, मराठी संस्कृतीशी नाळ तुटू दिली नाही हे विशेष.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.