अर्धांगवायूचा झटका आला तरी ते पुण्यात शेतकऱ्यांच मार्केट उभारण्यात झटत राहिले

शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी किल्ले बांधले. काळ बदलला, पुढे शाहू महाराजांनी विद्यार्थांसाठी होस्टेल बांधले, कर्मवीरांनी रयत बांधली तसेच महात्मा फुल्यांनी पुण्यातलं भाजी मार्केट बांधलं. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी बांधल्या.

या बांधणीत खऱ्या अर्थाने “महाराष्ट्राची बांधणी” झाली. 

अशीच एक गोष्ट पुण्याच्या माणसाने बांधली, ही गोष्ट बांधली ती शेतकऱ्यांसाठी. पुण्यासारख्या शहरात न्याट लावून शेतकऱ्यांसाठी दिडशे एकराची हक्काची जागा मिळवली व त्यावर हा राजमहल बांधण्यात आला.

या जागेचं नाव छत्रपती शिवाजी मार्केट पुणे,

आणि हे उभा करणाऱ्या माणसाचं नाव होतं अण्णासाहेब मगर. 

शेतकऱ्यांसाठी उभा राहिलेल्या १५० एकरात उभा राहणाऱ्या राजमहलाची ही गोष्ट. 

पुणे नगरपालिकेची स्थापना झाली ते साल होतं १८५७ चं. तेव्हाची मंडई ही शनिवार वाड्यासमोर भरत असे. मात्र उन वाऱ्यापासून मुक्त अशी बांधीव भाजीमंडई असावी असा विचार समोर आला तो १८७६ साली. पुढे नवीन मंडई बांधणीचा ठराव नगरपालिकेत मांडण्यात आला. १९८२ साली खासगीवाले यांच्याकडून शुक्रवार पेठेतील चार एकर जागा नगरपालिकेने ताब्यात घेतली. महात्मा जोतिबा फुले यांनी हे काम पूर्णत्वास नेले आणि १९८६ साली शेतकऱ्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी रे मार्केट बांधण्यात आले. 

पुढे १९३८ साली आचार्य अत्रेंनी रे मार्केटचे नाव बदलून महात्मा फुले मंडई असे केले. काळांतराने मंडई अपुरी पडू लागली तेव्हा नगरपालिकेने मिनर्व्हा टॉकिजसमोर ओटे तयार केले. 

१ मे १९५७ साली पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. मात्र प्रत्यक्षात हे काम सुरू होण्यास १९५९ हे वर्ष उजाडलं. गुळ या शेतमालापासून मार्केट ॲक्टची अंमलबजावणी करण्यास सुरवात करण्यात आली. 

काळ सरकू लागला. पुणे नगरपालिकेचं रुपांतर पुणे महानगरपालिकेत झालं. पुण्याच्या चारी कक्षा रुंदावू लागल्या. आजूबाजूच्या गावातल्या लोकांसोबत आत्ता जिल्ह्यातील शेतकरी पुण्यात शेतीमाल विक्रीसाठी येवू लागले. औद्योगिकरणाची लाट आली, पिंपरी चिंचवड कात टाकू लागले आणि पुण्यात आला नव्या प्रशस्त मार्केटची गरज भासू लागली. 

पुण्याचं नवीन मार्केट उभा करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने विचारात घ्यायला लागणार होती. ती म्हणजे पुण्याचं हे मार्केट येत्या १०० वर्षांसाठी पूरक ठरेल. यासाठी प्रचंड मोठ्या जागेची आवश्यकता भासणार होती. 

सुदैवाने तेव्हा पुण्याचं नेतृत्व करत होते ते अण्णासाहेब मगर. 

अण्णासाहेब मगर यांनीच पिपंरी चिंचवड सारख्या औद्योगिक शहराचा पाया रचला. पुण्याला खऱ्या अर्थाने महानगर बनवण्याचा मान त्यांनाच जातो. पुणे शहरात शेतकऱ्यांसाठी मार्केट असावं यासाठी अण्णासाहेब आग्रही होते. त्यासाठी त्यांनी ८० एकर जागा पाहून ठेवली होती. 

Screenshot 2020 07 13 at 2.39.24 PM

तेव्हा महाराष्ट्राचं नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांच्या हातात होतं. अण्णासाहेब मगर यांनी मार्केटसाठी पाहिलेल्या ८० एकर जागेची माहिती तत्कालिन जिल्हाधिकारी ए.यु. शेख यांनी यशवंतरावांना दिली. यशवंतराव चव्हाणांनी अण्णासाहेबांची भेट घेतली आणि ती ८० एकर जागा राज्यशासनाकडे द्यावी त्याबदली तूम्हाला १५० एकर प्रशस्त जागा एका महिन्याच्या आत देतो असे आश्वासन दिले. 

तेव्हाचे राजकारणी एकमेकांचा पाय ओढणाऱ्यातले नव्हते. यशवंतरावांनी एक महिन्याच्या आत अण्णासाहेबांनी नवी १५० एकर जागा सुचवली. 

ही जागा तेव्हाच्या पुण्यापासून बाहेरच होती. याची बरीच मालकी बिबवे कुटूंबाकडे होती. काही ठिकाणी बागायती शेती होती तर काही ठिकाणी पडके वाडे होते. विहरी आणि चिंचेची झाडी होती. मात्र ही जागा पुणे कोल्हापूर हायवेच्या नजीक होती. अण्णासाहेबांनी तत्काळ या जागेला पसंती दिली. 

जमिन संपादन करण्यात आली. जमिन संपादित करण्यात आल्यानंतर बाजार समितीमध्ये मार्केट बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला व त्यानंतर दिनांक १६ एप्रिल १९६४ रोजी मार्केटच्या जागेचं तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. 

अण्णासाहेबांनी किर्लोस्कर कन्सल्टंट यांना नकाशा बांधण्याचे काम दिले. एकूण संपादित करण्यात आलेल्या १७० एकर जागेपैकी ९० एकरांवर गुळ व भूसार मालासाठी राखीव ठेवण्यात आली. कांदे, बटाटे, फळभाजीसाठी वीस एकर, केळी साठी पाच एकर व जनावरे व कडब्यासाठी तीन एकर असे नियोजन करण्यात आले. 

शेतकरी, व्यापारी, तोलणार, कष्टकरी महिला, मजूर अशा प्रत्येक व्यक्तिचा विचार करत मार्कट उभारण्यात येत होते. बॅंका, पेट्रोलपंप, अग्निशामक दल, पोलीस चौकी यांचा विचार करण्यात आला. 

मार्कटयार्डाचे काम चालू असताना शेतकऱ्यांना समजवण्याचे धोरण चालूच होते. मंडईत किरकोळ आणि घावूक विक्रीची जागा एकच आहे. बाजार समितीच्या नियमानुसार व्यवहार होवून शेतकऱ्यांना हक्कांचे पैसे मिळायला हवेत. त्यामुळे दलाल मंडळी व व्यापारी मंडळी याला कडवा विरोध करणार हे ठावूक होते. आडत्यांनी देखील दंडेलशाही सुरू ठेवली होती.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला पुणे शहर व हवेली तालुक्याच्या बाहेरून येणाऱ्या शेतमालावर नियंत्रण ठेवता येणार नाही अशी भूमिका व्यापारी व अडत्यांनी घेतली होती. त्याविरोधात अण्णासाहेबांनी कंबर कसली. तालुक्याच्या बाहेरचा म्हणून शेतकऱ्यांवर अन्याय होवून द्यायचा ही गोष्ट कदापी मान्य करण्यासारखी नव्हती. 

या विरोधात कोर्टात जावून अडत्यांना समन्स देण्यात आले. तरिही अडती ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हते अशा वेळी अण्णासाहेबांनी हारळे तुपे कंपनी, ए.पी. घुले कंपनी, काका भालेराव आदी व्यक्तींना हाताला धरून यातून मार्ग काढण्याचे नियोजन आखले. 

Screenshot 2020 07 13 at 2.39.47 PM

सोबत मार्केट उभारणीचे काम जोरात सुरू होते. यासाठी २० लाख रुपये स्टेट बॅंकेकडून कर्ज म्हणून घेण्यात आले होते. वेगवेगळ्या ठिकाणाहून विकासनिधी मिळवण्यात येत होता पण प्रत्यक्षात काम पूर्ण करण्यासाठी अजूनही ३० लाखांचा निधी कमी पडत होता. यासाठी शासनाकडे अनुदानाची मागणी करण्यात आली. ती मंजूर झाली आणि मार्केटचे काम सुरू राहिले.

याच सोबत बाजार समितीसमोर व्यापारी गाळे बांधून ते ९९ वर्षांच्या कराराने देण्यात आले. 

मार्कट सोबत भू विकास बॅंकेची आवश्यकता होती म्हणून भू विकास बॅंकेला भूखंड देण्यात आला. माल साठवून ठेवण्यासाठी वेअर हाऊस बांधण्यात आले. 

मार्केटची कोनशिला बसवण्याचा कार्यक्रम तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व ना. यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. 

१९७५ च्या सुमारास काम सुरू असतानाच अण्णासाहेबांना अर्धांगवायूचा झटका आला. ते हॉस्पीटलमध्ये ॲडमीट झाले मात्र अशाही अवस्थेत ते चार दिवसांतून इथे येवून काम पाहू लागले. 

काळांतराने गुलटेकडी मार्केट सुरू झाले. मात्र इथे भाज्यांची आवक होत नव्हती. अशा वेळी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाण्याचे नियोजन करण्यात आले. शेतकऱ्यांनी अधिकाधिक भाज्यांचे उत्पादन करण्यासाठी आग्रह धरण्यात आला. 

उघड पद्धतीने सौदे होवू लागल्याने शेतकऱ्यांना मालाचा भाव कळू लागला. भाज्या, केळी, गुळ यांच्यापाठोपाठ फुलांच्या व्यापाराचे नियोजन आखण्यात आले. १९७५ च्या अधिसुचनेनुसार गुलटेकडी मार्केटयार्ड कापूस, तेलबिया, मसाल्याचे पदार्थ, गुरांचा बाजार इत्यादींचे मुख्य बाजार आवार म्हणून घोषीत करण्यात आले.

हळुहळु का होईना मार्केट सेट झाले छत्रपती शिवरायांच नाव मार्कटला देवून मार्केटच्या डोईवर मुकूट रचण्यात आला. दिडशे एकरांचा परिसर शेतकऱ्यांच्या आवाजाने घुमू लागला. हे सगळं काम एका माणसाने लावून धरल्याने पूर्णत्वास आले. 

हे ही वाच भिडू

1 Comment
  1. Aniruddha pawar says

    वरील लेखात काही तारखा लिहिण्यात आल्या आहेत त्यात काही विसंगत चुका आहेत त्या दुरुस्त कराव्यात

Leave A Reply

Your email address will not be published.