चिवड्याचादेखील ब्रँड असू शकतो हे पहिल्यांदा लक्ष्मीनारायण यांनी सिद्ध केलं.

पुणे तिथे काय उणे अस म्हणतात. पुणेकरांना प्रत्येक गोष्टीचा जाज्वल्य अभिमान असतो. इथल्या गल्लीबोळात इतिहास दडला आहे अस म्हणतात. प्रत्येक खाद्यपदार्थ ऐतिहासिक वारसा असलेला असतो. काही गोष्टी खरोखर अशा आहेत ज्यांनी पुण्याला जगाच्या नकाशावर ओळख मिळवून दिली आहे.

उदाहरणार्थ अमृततुल्य चहा, चितळेची बाकरवडी, बुधानी वेफर्स,सुजाता मस्तानी यातच आहे लक्ष्मीनारायण चिवडा 

पण लक्ष्मीनारायण चिवड्याची सुरवात कोणी पुणेकराने नाही केली.
गोष्ट आहे स्वातंत्र्यापूर्वीची. लक्ष्मीनारायण डाटा हे मुळचे हरियानाचे. तिथल्या एका रेल्वेस्टेशनवर समोसा कचोरी विकायचे.स्टेशनवर बरीच वर्दळ असायची. रेल्वेचे इंग्रज अधिकारी यांच्याशी दैनंदिन संबंध यायचा. खूपच चविष्ट असणारे समोसे काही दिवसातच फेमस झाले .धंदा तसा चांगला चालला होता. पैसे सुद्धा चांगले मिळत होते.

पण लक्ष्मीनारायण यांचा स्वभाव खूपच तापट होता.

बाहेरून आलेले इंग्रज आपल्या देशावर राज्य करतात, आपल्यावर अधिकार गाजवतात, दीनदलितावर क्रूर अत्याचार करतात हे पाहून त्यांची तळपायाची आग मस्तकाला पोहचायची. एकदा असच काही तरी झाल आणि लक्ष्मीनारायण डाटा यांच्या संयमाचा अंत झाला.
एका इंग्रज अधिकाऱ्याशी त्यांची भांडण झाली. त्याच्यावर त्यांनी हातसुद्धा उगारला. काही जण सांगतात कि लक्ष्मीनारायण यांनी त्या इंग्रज अधिकाऱ्याची धुलाई केली. जेव्हा इतर पोलीस त्याच्या मदतीला आले तोवर लक्ष्मीनारायण आपला कढई झारा घेऊन तिथून पळाले होते. नुसतेच पळाले नाहीत तर भूमिगत झाले.कुठे गेले कसे गेले कोणालाही पत्ता लागला नाही.

ते वर्ष होत १९२०. 

लक्ष्मीनारायण डाटा एक गावाहून दुसरे गाव भटकत राहिले. इंग्रज पोलीस मागावर होतेच. पण त्यांना सुगावा लागे पर्यंत लक्ष्मीनारायण जागा बदलायचे. अगदी भारत देश सोडून अफगाणिस्तानमधील काबुल कंदाहर पर्यंत प्रवास केला. तिथून निघाले ते बंगाल, बर्मा देशातील रंगूनपर्यंत पोचले. जवळपास पंधरा वर्षे ते भूम्ग्त होते.
या परागंदा झालेल्या अवस्थेत त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. प्रत्येक ठिकाणची खाद्यसंस्कृती, तिथली भाषा, तिथले आचारविचार लक्ष्मीनारायण पहात होते. असे फिरता फिरता ते महाराष्ट्रातील पुण्याला पोहचले. त्यांना हे छोट शहर प्रचंड आवडल. इथल वातावरण आल्हाददायक होत. त्यांना ओळखणारे कोणी नव्हते त्यामुळे पोलिसांची भीती नव्हती. याच शहरात राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

पुण्याच्याच मराठी मुलीशी त्यांनी लग्न केलं आणि भवानी पेठेतल्या छोटाशा घरात संसार थाटला.

पुण्याबाहेरून आले आणि पुणेकर झाले.

एवढ्या वर्षांच्या अनुभवातून, सर्वत्र फिरून पाहिलेल्या खाद्य संस्कृतीला एकत्र करून त्यांनी एक चिवडा बनवला होता. कुरमुरे, अफगाणी ड्रायफ्रुट्स, शेंगदाणे खास घरी बनवलेले मसाले यांचे मिश्रण करून हा चिवडा तयार झालेला. लक्ष्मीनारायण यांनी एका हातगाड्यावर हा चिवडा विकण्यास सुरवात केली.
पूर्वी लोक म्हणायचे चिवडा म्हणजे घरगुती पदार्थ, तो बाहेरून विकत कशाला आणायचा. पण हळूहळू पुणेकरांना या खास चिवड्याची चव पसंतीस उतरू लागली. काजू पिस्ता, बेदाणे घातले असल्यामुळे चिवडा एकदम राजेशाही होता.

लक्ष्मीनारायण यांनी चिवडा विकण्यासाठी अनेक क्लुर्प्त्या वापरल्या.

त्यांच्या छोट्या मुलाला म्हणजे बाबुलालला घेऊन ते रेल्वे स्टेशनवर जायचे.  रेल्वेच्या डब्यात एकेकाला कागदावर चिवडय़ाचा नमुना देत पुढे जायचे आणि परत फिरून त्याच डब्यात लोक घेतील तसा चिवडा विकायचा. नमुना चाखलेल्या व्यक्तीला या चिवड्याच्या स्वर्गीय चवीमुळे जीभ चाळवली जाई. फक्त स्वतःलाच नाही टर घरच्यांसाठी देखील किलो किलो चिवडा ते विकत घेऊ लागले.
लक्ष्मीनारायण यांनी भवानी पेठेत भवानी मंदिरासमोर एक दुकान सुरु केल. ते वर्ष होत १९४५. स्वातंत्र्यानंतर हा उद्योग वाढतच गेला. 

 

लक्ष्मीनारायण यांनी एक हुशारी केली त्यांनी लक्ष्मीनारायण चिवडा या नावाने ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनसाठी अर्ज केला.

काही दिवसात त्यांना तो मिळाला देखील. एक साधा चिवडा स्वतःचा ब्रांड तयार करायचा प्रयत्न करतो ही त्याकाळची मोठी घटना होती. पण लक्ष्मीनारायण यांना आपल्या चिवड्याच्या चवीवर विश्वास होता. फक्त माउथ पब्लिसिटीच्या जोरावर त्यांनी आपला चिवडा घराघरात पोहचवला.
पुण्यात शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांनी, नोकरीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांनी, इथल्या मिलिटरी कॅम्पमध्ये येणाऱ्या जवानांनी हा चिवडा देशभर नेला.
चिवडा खावा तर पुण्याच्या लक्ष्मीनारायणचा अशी प्रसिद्धी झाली.

 

१९७३ साली लक्ष्मीनारायण डाटा यांचे निधन झाले पण त्यांचे चिरंजीव बाबूलाल यांनी व त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी हा बिजनेस आणखी मोठा बनवला. खास अत्याधुनिक यंत्रे बनवून घेऊन लक्ष्मीनारायण चिवडा मॉडर्न बनवला पण चवी वर फरक पडू दिला नाही.

आधी कागदी पुढ्यात बांधून विकला जाणारा चिवडा आता प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये मिळू लागला. खास लालपिवळ्या पिशव्या ही त्याची ओळख बनली. गुलटेकडीच्या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु झाले. भारत भरातल्या मिठाई दुकानात,

एवढ काय तर मॉलमध्ये देखील लक्ष्मीनारायन चिवडा मिळतो.

पुण्यातून बाहेरच्या देशात जाणारा प्रत्येकजण आपल्या बगेतून लक्ष्मीनारायण चिवड्याच टिकाऊ पाकीट नेतो.  परदेशातले मित्र मैत्रिणी या चिवड्यावर तुटून पडतात. त्यानाही हा चिवडा पसंतीस पडला त्यामुळे आता बारा देशात हा चिवडा एक्स्पोर्ट केला जातो. त्यांची उलाढाल कोट्यावधी रुपयांची बनली आहे.

एकेकाळी फक्त दिवाळीला फराळासाठी बनणारा चिवडा फेमस ब्रांड होईल हे कोणी स्वप्नातही पाहिलं नव्हत पण लक्ष्मीनारायन यांच्या जिद्दीमुळे ते खर झालं. आज कितीही स्पर्धा वाढली तरी आपल्या पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवलेल्या खास चवीमुळे हा पुणेरी चिवडा जगात नंबर वन आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.