जर आज फ्रान्समध्ये राजेशाही आली तर हा भोपाळचा माणूस गादीवर बसेल

भोपाळ म्हणजे नवाबांचं गाव. इथं सैफ अली खान पासून ते पानपट्टीवाल्या पर्यंत सगळेचजण राजघराण्यातील आहेत. प्रत्येक गल्लीबोळात राजे राहतात.

यातच आहेत बालथझार नेपोलियन बरबन. यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे फ्रान्सच्या राजघराण्याचे वारसदार आहेत.

काय ऐकून चकित झालात ना? पण हे खरं आहे.

फ्रान्स म्हणजे गेली अनेक वर्षे युरोपमधला सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक. याच देशात आठराव्या शतकात घडलेल्या राज्यक्रांती मुळे स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्ये जगभरात रूढ झाली. लोकशाहीचा पाया रचला गेला. मध्ययुग संपले व आधुनिक युग सुरू झाले अस मानलं जातं.

फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये सोळाव्या लुई या सम्राटाचा खून ही जगभरातील राजेशाहीचा शेवट मानला जातो.

सोळाव्या लुईच्या आधी अनेक पिढ्यांपासून बरबन राजघराण्याने फ्रान्स, स्पेन या देशांवर शेकडो वर्षे राज्य केलं.

हे जगातील सर्वात शक्तिशाली राजघराणे मानले जात होते. इतकेच काय तर पोलंड इटली, ग्रीस अशा देशांवरही त्यांनी कधी ना कधी राज्य केलंय. अपार वैभव उपभोगलं आहे

मग या राजघराण्याचा वारस भारतात कसा काय या प्रश्नाचं उत्तर खूप इंटरेस्टिंग आहे.

साधारण सोळाव्या शतकात बरबन राजघराण्यातला एक राजकुमार जीन फिलिप बरबन याच दरबारातील एका सरदाराबरोबर भांडण झालं. रागाच्या भरात त्याने त्या सरदाराचा खून केला. तो सरदारसुद्धा राजघराण्यातील होता शिवाय बराच शक्तिशाली व लोकप्रिय होता.

चिडलेल्या जनतेने जीन फिलिप याला फासावर चढवण्याची मागणी केली.

जीन फिलिप स्वतःचा जीव वाचवून फ्रान्समधून पळाला. मागावर अनेकजण होते. पण त्याने सगळ्यांना हुलकावणी दिली.

परागंदा झालेला हा राजकुमार अनेक देशात विपन्नावस्थेत फिरला. कित्येकदा त्याच्यावर हल्ले झाले. कधी अपहरण झालं.

अनेक संकटावर मात करून सातासमुद्रापार तो भारतात मद्रासमध्ये येऊन पोहचला.

त्याच्या सोबत आणखी दोघे धर्मगुरू होते ते मात्र वाचले नाहीत. जीन फिलिप पहिल्यांदा बंगाल मग तिथून आग्र्याला जाऊन पोहचला.

भारतात तेव्हा मुघल बादशाह अकबराच राज्य होतं.

जीन फिलिप याला माहीत होतं की जगात अकबर हा एकमेव सम्राट आहे ज्याच्या आश्रयाखाली आपण सुरक्षित राहू शकतो.

अकबराने देखील या गोऱ्या राजकुमाराला आपल्या दरबारात ठेवून घेतले. त्याचं कर्तृत्व, पराक्रम पाहून सरदारकी दिली. आपल्या जनानखान्यातील ख्रिश्चन बेगमच्या बहिणीशी ज्युलियानाशी त्याच लग्न लावून दिलं.

Balthazar I of Bourbon Prime Minister of Bhopal scaled

पुढे अनेक वर्षे दिल्लीमध्ये मुघल दरबारात राजा शेरगर नावाने हे कुटुंब प्रसिद्ध होते.

पुढे नादिरशहाच्या आक्रमणानंतर मोगलाई लयाला गेली तेव्हा बरबन यांच्या वारसदारांनी पहिला ग्वाल्हेरचे शिंदे आणि नंतर भोपाळच्या नवाबाच्या दरबारात आपली जागा मिळवली.

भोपाळ संस्थानचे पंतप्रधानपद बरबन कुटूंबाला मिळाले.

१८८२ साली भोपाळ मध्ये बेगमच्या खालोखाल वजन ईसबेला बरबन हीच होतं. तिच्या मुलाने सेबस्तीयन याने शौकत महाल हा सर्वात सुंदर महाल बांधला. भोपाळ मध्ये त्याने काही चर्च देखील बांधले. अनेक वर्षांपर्यंत या संस्थानातील सर्वात शक्तिशाली फॅमिली म्हणून बरबन यांना ओळखलं गेलं.

SHoukat Palace the beautiful palace built by Prince Sebastian I Prime Minister of Bhopal

पुढे स्वातंत्र्यानंतर संस्थाने खालसा झाली. काही वर्षांनी इंदिरा गांधी यांनी त्यांचे तनखे देखील बंद करून टाकले.

आज बरबन कुटूंब एक मध्यमवर्गीय आयुष्य जगते. बालथझार नेपोलियन ४ बरबन हे त्यांचे कुटूंबप्रमुख आहेत.

ते पेशाने वकील आहेत. गेली चारशे वर्ष त्यांचं घराणं भारतात राहिल्यामुळे त्यांचा वर्ण, भाषा, वेशभूषा सगळं भारतीय बनलं आहे. एरव्ही गर्दीत स्कुटरवर कोर्टात जाणाऱ्या त्यांना कोणी ओळखणार देखील नाही. त्यांना एक मुलगी व एक मुलगा आहे.

Prince Adrian Princess Elisha Prince Balthazar IV and Princess Michelle scaled
Prince Adrian, Princess Elisha, Prince Balthazar IV and Princess Michelle.JPG

बालथझार नेपोलियन यांच्या वडिलांनी पुस्तके लिहून आपला इतिहास जपून ठेवला.

ग्रीसच्या प्रिन्स मायकल याने ही माहिती जगासमोर आणली. त्यांनीच दावा केला की भारतातील बरबन घराणे हे फ्रान्सच्या राजघराण्याचे अखेरचे वारसदार असून तिथल्या गादीचा मान बालथझार नेपोलियन यांना जातो.

यावरून जगभरात खळबळ उडाली. त्यांची डीएनए टेस्ट केले जावे, त्यांचा इतिहास पडताळला जावा अशी मागणी केली. पुढे अभ्यासाअंती मायकल यांचा दावा खरा ठरला.

फक्त फ्रान्सचं नाही तर इंग्लंडचे राजे सुद्धा बरबन यांचे नातेवाईक लागतात.

२२मे २०१३ रोजी फ्रान्सच्या भारतातील राजदूताने भोपाळला येऊन बरबन कुटूंबाची भेट देखील घेतली.

मध्यंतरी बालथझार नेपोलियन हे पॅरिसला गेले होते. तेथे व्हर्सायचा राजवाडा पाहायला गेले असता तो बंद होण्याची वेळ आली होती.

तिथल्या सिक्युरिटी गार्डला कोणीतरी सांगितलं की हे बरबन कुटूंबातील राजकुमार आहेत.

हे कळल्यावर तो सिक्युरिटीगार्ड भारावून गेला. त्याने त्यांची माफी मागितली. अदबीने राजवाड्यात नेले. त्यांना फिरवून दाखवलं.

जिथे बसून बरबन यांच्या कुटूंबाने निम्म्या युरोपवर सत्ता गाजवली ते स्थान अनुभवायला मिळालं.

बालथझार म्हणतात,

मला माझ्या फ्रान्समधल्या पूर्वजांच्या वैभवशाली इतिहासाचा अभिमानच आहे, तो मी जपून ठेवेनच. पण याचा अर्थ असा नाही की मी भारतीय नाही. मी जन्मलो या देशात, या देशाने माझ्या कुटूंबाला आधार दिला. जगातलं कोणतंही राजमुकुट मला माझ्या देशापासून तोडू शकत नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.