अशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं…

ओझर नाशिक जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील एक गाव. प्रत्येक गावाला एक ओळख असते, एखादी आख्यायिका असते. तशी या गावाला अनेक आख्यायिका आहेत. कोणे एकेकाळी या गावाला मल्हार ओझर म्हणून ओळखलं जायचं तर कधी तांबटांचं ओझर म्हणून.

गेल्या पन्नास वर्षांपासून या गावाला नवीन ओळख मिळाली आहे, ती म्हणजे मिग विमानांचे ओझर.

नाशिक पासून फक्त २० किलोमीटरवर बाणगंगेच्या तिरी हे गाव वसलं आहे. जुने लोक सांगतात की ओझर एका मोठ्या तळ्यावर वसलेलं आहे. इथे पूर्वी प्रत्येक घरात आड होती. आता काही वाड्यामध्ये अशी आड आजही पहायला मिळते. यावरूनच ओझर तळ्यावर वसलं असल्याची आख्यायिका पसरली. काही जण म्हणतात की अनेक झरे पोटात असणारे गाव म्हणून या गावाला ओझर म्हणतात.

रामायण काळात राम लक्ष्मण सीता येथे येऊन गेल्याचीही आख्यायिका सांगितली जाते. सीतेला तहान लागल्यावर रामाने बाण मारला आणि बाणगंगा नदी उगम पावली.

या गावाला सत्वशाली मल्हारी ओझर असंही म्हणतात. या मागची आख्यायिका म्हणजे  महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा जेव्हा बानुबाईसह जेजुरीतून चंदनपुरीला जाण्यासाठी निघाले होते तेव्हा प्रवासादरम्यान ते ओझर येथे मुक्कामी राहिले होते. याच कारणामुळे ओझरमध्ये येथे खंडोबाचे मंदिर पुरातन मंदिर उभे राहिले. या मंदिराचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे चंपाषष्ठी. या यात्रेत अश्वरथ ओढण्याचा मोठा सोहळा आयोजित केला जातो.

या उत्सवा वरून गावाचं नाव पडलं मल्हारी ओझर.

पूर्वीच्या काळी ओझर हे अहिल्याबाई होळकरांच्या संस्थानचा एक भाग होते. या गावाला चार वेशी होत्या अन् भक्कम कोटात गाव वसले होते. मारूती वेस, राजवाड्यातील वेस, बाजार वेस, अन् आणखी एक वेस गावाचे वैभव होते. पूर्वीच्या काळी प्रचंड लूटमार चालायची. शेकडो वर्षांपूर्वी गुजरातच्या नवाबांनी पासून जीव वाचवून पळालेले तांबट कारागीर महाराष्ट्रात आले. या गावाने त्यांना सुरक्षित निवारा दिला. ते इथेच वसले.

तांब्याची भांडी, वस्तू घडवणाऱ्या या तांबटांनी गावाला नवी ओळख मिळवून दिली.

दूरदूरवरून लोक तांब्याच्या वस्तू घेण्यासाठी ओझरला येत असत. एकदा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई या आपल्या सैन्यासह येथून जात होत्या. त्यांनी तांब्याच्या वस्तू बनविताना होणारा ठकठक असा आवाज ऐकला. हा नेमका कसला आवाज आहे हे पाहण्यासाठी त्या गावात आल्या.

तेव्हा त्यांनी ‘तांबटांचे ओझर’ असा नामोल्लेख केला. झाशीच्या राणीमुळे गावाला तांबटांचे ओझर म्हणण्यात येऊ लागले.

अगदी इंग्रजांच्या दफ्तरात देखील असाच उल्लेख आहे. इथे पूर्वी तांबट गल्लीत चालणारा तांबटांचा मोठा व्यवसाय मात्र कालांतराने मागे पडला. स्टीलच्या व ऍल्युमिनियमच्या भांड्याच्या आगमनानंतर तांबट गल्ली शांत होत गेली. मात्र आजही तुरळक तांबट कारागिरांमुळे ती ठकठक मंद स्वरात ऐकू येते.

या झाल्या ओझर गावच्या आख्यायिका. या गावाचं नाव मिग विमानाचं ओझर असं का पडलं या मागे मात्र एक गाजलेला किस्सा आहे.

गोष्ट आहे साठच्या दशकातली. यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले होते. मात्र १९६२च्या युद्धात चीनने भारताचा पराभव केला आणि निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती सावरण्यासाठी पंतप्रधान पंडित नेहरूंनी ‘यशवंतराव चव्हाण’ यांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत बोलविले.

मुख्यमंत्री असलेल्या यशवंतरावांना दिल्लीच्या तख्तावर विसावण्यासाठी खासदार होणे आवश्यक होते. त्यांची बिनविरोध निवड करण्यासाठी नाशिकने पुढाकार घेतला.

लोकसभा निवडणुकीत यशवंतरावांची बिनविरोध निवड झाल्यानंतर नाशिक येथील एका सभेत कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी यशवंतरावांविषयी

‘भूगोलात कृष्णा गोदावरीचा संगम नाही, पण या निवडणुकीने हा संगम इतिहासात घडवून आणला,’

नाशिकमधील याच सभेत यशवंतरावांनी ‘नाशिकचे ऋण फेडल्याशिवाय राहणार नाही,’ असे आश्वासन दिले होते.

चीनच्या युद्धानंतर यशवंतरावांच्या नेतृत्वाखाली भारतीय संरक्षण धोरण बदलण्यास सुरवात झाली. रशियाशी भारताचा मिकोयान मिग २१ ही विमाने खरेदीसाठी करार झालाच होता. रशियाने जुळणीसाठी लागणार्‍या तंत्रज्ञानाचे पूर्ण हस्तांतरण करण्याचे मान्य केले, याचाच अर्थ मिग विमानांची निर्मिती भारतात होणार होती.

यशंवतरावांनी हा मिग विमान कारखाना ओझरला सुरू करून नाशिककरांना दिलेलं आश्वासन पूर्ण केले. हिंदुस्थान एरॉनिटीक्स लिमिटेडतर्फे ओझर मध्ये ६५७ विमानांची निर्मिती करण्यात आली. भारताचे हे पहिले सुपरसॉनिक विमान ७१ चे बांगलादेश युद्ध असो किंवा ९९ कारगिल युद्ध प्रत्येक युद्धात पराक्रम गाजवून देशाची मान अभिमानाने उंचावली. या गौरवशाली इतिहास असलेल्या मिग २१ विमानांवरून ओझरचं नाव मिग विमानाचं ओझर हे नाव पडलं.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.