मुस्लिम अन्सारी समाजाने सुरु केलेला नाशिक ढोल हिंदू सणांची ओळख बनून राहिलाय.

शिवजयंती असो गणपती असो किंवा नवरात्री ढोल ताशांचा खणखणाट घुमू लागला की वातावरण भारावून जातं. जगातल्या भल्या भल्या ड्रमरना जमणार नाहीत असे बिट पकडून ढोल वादक बेधुंद वाजवत असतात आणि पब्लिक थरारून जाते. ढोल ताशांचा जल्लोष त्याची नशा ऐकणाऱ्याला चढत असते.

हे ढोलवादन ऐकायला सगळं जग महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात जाते. आपल्या इकडे दोन प्रकारचे ढोल ओळखले जातात एक म्हणजे पुणेरी ढोल आणि दुसरा नाशिक ढोल.

ज्ञान प्रबोधिनीच्या अप्पा पेंडसे यांनी पुणेरी ढोलची रुजवात घातली असं सांगितलं जातं . मात्र त्याच्याही आधी नाशिकचा बडा ढोल गणपतीमध्ये फेमस झाला होता.तो सुरू कसा झाला याची कथा देखील खूप इंटरेस्टिंग आहे.

ढोल हे वाद्य अस्सल भारतीय आहे.पूर्वापार पासून काश्मीर पासून ते तामिळनाडू पर्यंत वेगवेगळ्या राज्यात याच्या परंपरा आहेत. त्यातही विशेषतः पंजाबी ढोल, धनगरी ढोल असे अनेक प्रकारचे ढोल प्रसिद्ध आहेत.

पण नाशिक ढोल हा प्रकार काय? तो कधी सुरू झाला?

साधारण एकोणिसशे पन्नासच्या दशकात ढोल वादनास सुरवात झाली.

मोहरमच्या निमित्ताने नाशिकच्या मुलतानपुरा भागात अन्सारी कुटुंबातील काही तरुण डबेवादन करायचे. यातूनच वस्ताद खलीलभाई यांनी पत्र्याचा ढोल आणि ताशा बनवला. तो विशिष्ट पद्धतीने वाजवला तर जबरदस्त संगीत तयार होते हे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी बनवला होता त्याला बडा ढोल अस म्हटलं जाऊ लागलं.

हा बडा ढोल धनगरी ढोल प्रमाणे गळ्यात अडकवून वाजवला जायचा. खलीलभाई यांनी गल्लीतल्या मुलांना गोळा करून त्यांच्या गळ्यात हा ढोल अडकवला आणि नाशिक ढोलची सुरवात केली.

सुरुवातीला मोहरमच्या काळात अन्सार समाजाच प्रामुख्याने ढोल वाजवित असे. पुढे हे काम या समाजाने बंद केले आणि वेगवेगळ्या पथकांचा उदय झाला. फक्त मोहरम नाही तर गणपती, शिवजयंती याच्या मिरवणुकीतही बडा ढोल घुमू लागला.

खलीलभाई यांच्या पुढच्या पिढीने अब्दुल रहमान अन्सारी यांनी ढोलचे पथक बनवले. त्यांच्या पथकात आठव्या वर्षांपासून ढोल वाजवणार्या निसारभाई अन्सारी या मुलाने पुढे स्वतःच पथक बनवलं. पारंपरिक ढोलवादनात अडकून न राहता त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. त्यांच्या मुळेच नाशिकचा ढोल सर्वदूर पोहचला.

बादशाह अन्सारी यांनी या ढोल वादनाला ग्लॅमर आणून दिलं.

विशिष्ट ठेक्यात केलेलं ढोल वादन, याच बरोबर साहसी खेळ, मानवी मनोरे, त्यांचे गणवेश, वाढवलेले केस यांच्या मुळे नाशिकमध्ये ऐटीत वाजवणारे बडा ढोल वादक बॉलिवूड स्टार्सप्रमाणे फेमस झाले.

मनोजकुमारचा ‘गोरा और काला’ आणि सनी देओलचा ‘नरसिंहा’ या सिनेमामुळे नाशिक ढोल भारतभरात पोहचला.

गुजरात राजस्थान इथं पर्यंत त्यांना ढोलवादनाच्या सुपारी मिळतात. मुंबईतील चेंबूर भागातील सिंधी कॉलनी परिसरात गेल्या ३१ वर्षांपासून बडे ढोलवाले सातत्याने ढोलवादन करत आहेत.

गणेशोत्सवाची चाहूल लागताच दोन-तीन महिने अगोदर ढोल-ताशांचे आगाऊ बुकिंग झालेले असते. अलीकडच्या डीजे तसेच पाश्चात्त्य संगीताच्या जमान्यातही ‘नाशिक ढोल’मध्ये पारंपरिक पद्धतीने वाजवल्या जाणाऱ्या कावडी, धमाल, घोडा, राम-लखन यांसारख्या प्रकारावर ठेका धरण्यात गणेशभक्तांना वेगळीच मजा येते. त्यामुळे आजही या वाद्यांचे महत्त्व टिकून आहे.

नाशिक ढोल शिवाय गणपती विसर्जनाची कल्पनाही कोणी करू शकत नाही.

मुसलमान अन्सारी समाजातील मुलांनी सुरू केलेल्या या ढोलवादनाला महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख बनवलं. मोहरम असो किंवा गणपती जात धर्म बाजूला पडून ढोलताशाच्या ठेक्यात सगळे भेदभाव विरघळून जातात आणि उरतो तो फक्त ढोल वादकांचा नाद.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.