राबडी देवी ते रेणु देवी : बिहारच्या राजकारणाचा बदलता चेहरा

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपदी रेणु देवी यांची निवड झाल्याने त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. मागील ३० वर्षापासून त्या बिहारच्या आणि महिलांच्या प्रश्नांसाठी काम करत आहेत.

मात्र यामुळे २३ वर्षापुर्वी अल्पशिक्षीत आणि अनुभवशुन्य राबडी देवी यांच्या मुख्यमंत्रीपदानंतर आता बिहारच्या राजकारणाच्या मुख्य वर्तुळात पुन्हा एकदा उच्चशिक्षीत आणि अनुभवी महिलेची एन्ट्री झाली आहे.

१९९६ मध्ये लालू यादव यांचे चारा घोटाळ्यात अचानक नाव समोर आले तेव्हा चहुबाजूच्या दबावांनंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यातच मुलं लहान होती. आणि भाऊ वगैरे लालूंइतके लोकनेता नव्हते. त्यामुळे लालूंची राजकीय कारकीर्द आता ऑलमोस्ट संपल्याच सांगितले गेले.

पण राजकारण कोळून प्यायलेल्या लालूंनी आपल्या चौथी पास बायकोला स्वयंपाकघरातुन थेट मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवले. त्यांनी लावलेल्या मास्टर स्ट्रोकने सर्वांनाच धक्का बसला. विरोधकांनीच काय खुद्द राबडी देवी यांनी देखील कधी असा विचार केला नव्हता.

१९५६ मध्ये बिहारच्या गोपालगंजमध्ये जन्म झालेल्या राबडी देवी यांचं लालू प्रसाद यादवांशी १९७३ साली लग्न झालं तेव्हा त्या अवघ्या १४ वर्षांच्या होत्या. लालू तेव्हा विद्यार्थी आंदोलनांच्या माध्यमातुन राजकारणात आपला जम बसवत होते.

पुढे १९७७ साली लालू यांनी २९ व्या वर्षी खासदार होवून दिल्ली प्रवेश केला, १९९० साली बिहारचे मुख्यमंत्री झाले. तर त्यांच्या पत्नी राबडीदेवी गृहिणी झाल्या. नऊ मुलांच्या आई म्हणून त्या सर्वाचं पालनपोषण करण्यात व्यस्त होत्या. 

सगळं व्यवस्थित चालू होतं. १९९७ मध्ये अचानक चारा घोटाळ्याच्या आरोपात त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे पडले. आरोपांची तीव्रता वाढतच गेली न् दबावानंतर राजीनामा द्यावा लागला.

यानंतर लालुंनी जनता दलातुन बाहेर पडत स्वतःचा राष्ट्रीय जनता दल नावाचा नवा पक्ष काढला. पुढे बिहारच्याच काय देशाच्या ही राजकारणात झाले नव्हते अशी गोष्ट घडली. २५ जुलै १९९७ मध्ये एका रात्रीत निर्णय झाला आणि गृहीणी असलेल्या, शिक्षण केवळ चौथी पास बायकोला राबडी देवीला मुख्यमंत्री बनवण्यात आले.

त्या पुर्वी राबडी देवी यांना ग्रामपंचायत निवडणूकीचा देखील अनुभव नव्हता. मात्र तरीही त्या बिहारच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या.

दुसऱ्या बाजूला लालू प्रसाद यादव तुरुंगात राहून आपल्या बायकोचे सरकार चालवत असल्याचे बोलले जावू लागले. आरोपांनंतर आणि तुरुंगात राहुन देखील २००० च्या बिहार विधानसभांच्या निवडणूका राजदने जिंकल्या आणि राबडी देवी पुन्हा मुख्यमंत्री बनल्या.

भाऊ साधु यादव आणि सुभाष यादव यांच्या मदतीने त्यांनी जवळपास ६ वर्ष बिहारचा कारभार हाकला. २००५ च्या पराभवानंतर त्या सक्रिय राजकारणातुन दुर झाल्या आणि परत घर गृहस्थीमध्ये व्यस्त झाल्या. पण लालूंच्या सांगण्यावरुन २०१० मध्ये पुन्हा सक्रिय राजकारणात आल्या. दोन विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवली पण दोन्ही ठिकाणी पराभव झाला.

 

उच्च शिक्षीत आणि अनुभवी रेणू देवी

इकडे २०२० च्या नितीशकुमार यांच्या कॅबिनेटमध्ये भाजपच्या रेणू देवी पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. रेणू देवी या अतिमागासवर्गीस समजल्या जाणाऱ्या नोनिया समाजातील आहेत.

६२ वर्षीय रेणू देवी यांना राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. १९७७ साली मुजफ्फरपूर विवितून इंटर आणि बी.पास झालेल्या रेणू देवी या १९८८ पासून राजकारणात आहेत. त्यांच्यावर लहानपणापासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) मोठा प्रभाव दिसून येतो.

रेणू देवी यांनी दुर्गा वाहिनीसमवेत आपला राजकीय प्रवास केला. त्या बचतगटांच्या माध्यमातून महिलांमध्ये कार्यरत असतात. भाजपच्या महिला मोर्चामध्ये संघटनेतील कार्यकर्त्यापासून ते प्रदेशाध्यक्षापर्यंतच्या राज्यातील महिलांमध्येही त्यांची चांगली ओळख आहे.

१९८८ भाजपच्या दुर्गा वाहिनीच्या जिल्हा संयोजकपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर १९८९ मध्ये भाजपच्या जिल्हा महिला मोर्चाचे अध्यक्षपद दिले. ९० च्या दशकात राम मंदिर आंदोलनातही त्यांचा सहभाग होता. ५०० महिलांच्या सोबत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. १९९२ मध्ये जम्मू-काश्मीर तिरंगा यात्रेतही त्यांचा सहभाग होता.

१९९३ आणि १९९६ अशा दोन वेळा त्यांची बिहारच्या महिला मोर्चाचे अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. १९९५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यात पराभव झाला. २००० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत रेणू देवी यांना पहिल्यांदा विजय मिळाला होता.

त्यानंतर त्या २००५ मध्ये २ वेळा आमदार म्हणून निवडून आल्या. त्यावेळी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये त्यांनी खेळ, कला आणि सांस्कृतिक मंत्रीपदाची जबाबदारी दिली गेली. २०१० मध्ये ही त्या आमदार म्हणून निवडून आल्या. २०१५ साली मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

२०१४ मध्ये अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर रेणू देवी यांनी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आले.

राज्यपाल फागू चौहान यांचं बिहारमध्ये आगमन झाल्यानंतर रेणू देवी यांनी एक जातिनिहाय संमेलनही भरवलं होतं. या संमेलनाच्या माध्यमातून भाजपनं अतिमागास वर्गीयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वी याच मागासवर्गाचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी यांनी त्यांना ‘सायलेन्ट वोटर’ असं संबोधलं होतं.

अशा परिस्थितीत आता नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे.

इथे प्रश्न मुळातच पक्षाचा नाही. तर पदाचा आणि त्यावर बसलेल्या व्यक्तीचा आहे. मुख्यमंत्री सारख्या अतिमहत्वाच्या पदावर बसवताना लालूंनी सगळ्याच राजकीय संकेतांच्या मर्यादा गुंडाळून ठेवल्या होत्या. त्यामुळे लोकांचे प्रश्न, सार्वजनिक सहभाग यापासून कोसो दुर असलेल्या राबडी देवींचा मुख्यमंत्री पद संभाळताना झालेला गोंधळ संपुर्ण देशाने पाहिला होता.

तर भाजपने राजकारणाचा प्रदिर्घ अनुभव असलेल्या महिलेल्या उपमुख्यमंत्री पद देवून राजकीय फायदे आणि सुत्र लक्षात ठेवून का होईना पण कमीत कमी पात्र असलेल्या व्यक्तीला उपमुख्यमंत्री पदावर बसवलं आहे. त्यामुळे हरवलेल्या बिहारच्या राजकारणाचा बाज पुन्हा एकदा सुधारत आहे. घराणेशाहीचा शिक्का पुसण्यात थोड्या प्रमाणात का होईना बिहारच्या राजकारणाला यश आले असे म्हणायला वाव आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.