विद्यार्थी चळवळीतून हे नेते घडले !!

सध्या भारतात अनेक विद्यार्थी आंदोलने सुरु आहेत. कुठे नागरिकता सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलने सुरु आहेत तर कुठे फी वाढीमुळे निदर्शने दिली जात आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ तर गेल्या काही वर्षापासून विद्यार्थी आंदोलनामुळेच चर्चेत आल आहे.

ही आंदोलने बरोबर चुकीची, विद्यार्थ्यांची भूमिका बरोबर चूक ही गोष्ट वेगळी पण जगभरातला इतिहास काढून पाहिला तर अनेक विद्यार्थी चळवळीतल्या नेत्यांनी कोणताही राजकीय घराण्याचा वारसा नसताना राष्ट्रीय पातळीवर आपली छाप सोडली. यापैकीच काही नेते

१. ममता बॅनर्जी –

 ममता बॅनर्जीचा जन्म एका मध्यमवर्गीय बंगाली ब्राम्हण कुटुंबात झाला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना वयाच्या पंधराव्या वर्षी ती विदयार्थी चळवळीमधून  राजकारणात आली. कॉलेजमध्ये गेल्यावर छात्र परिषद युनियन नावाची काँग्रेसची विदयार्थी संघटना उभारली.

असं म्हणतात की एकदा जेष्ठ गांधीवादी नेते स्वातंत्र्यसेनानी आणि आणीबाणीच्या वेळी इंदिरा गांधीचे प्रखर विरोधक जयप्रकाश नारायण जेव्हा कलकत्ता विद्यापीठात व्याख्यानासाठी आले होते. त्यावेळी कॉंग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने त्यांची अॅम्बेसीडर कार अडवली होती.

यामध्ये सगळ्यात पुढे असलेल्या ममता बॅनर्जीने त्यांच्या कारच्या बॉनेटवर नाच केला होता.

तिची तडफ बघून छोट्या वयातच महिला काँग्रेसची सरचिटणीस बनवण्यात आलं .

१९८४ साली तिला जाधवपूर मतदार संघातून खासदारकीच तिकीट मिळालं. जाधवपूर म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते सोमनाथ चटर्जी येथून दोन वेळा खासदार होते. पण अवघ्या २९ वर्षाच्या ममता बॅनर्जीने त्यांना हरवलं. कमी वयात खासदार बनण्याचा विक्रम करणाऱ्या या मुलीची चर्चा पूर्ण देशभर झाली.

२. लालूप्रसाद यादव-

लालूप्रसाद यादव यांना अख्ख्या भारताच्या राजकारणात एक चमत्कारिक राजकारणी म्हणून ओळखल जातं. आपल्या बिहारी ठेक्यात असलेल त्यांचं बोलणं, धोतर बंडी घालून म्हैशीचा दुध काढतानां दिलेली मुलाखत, अडाणीपणाचा पांघरलेला बुरखा यामुळे खरे लालूप्रसाद यादव कोणाला कळतच नाहीत.

बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील एका शेतकरी परिवारात लालूप्रसाद यांचा जन्म झाला. त्यांच्या आईवडीलाना लालुना धरून ६ मुलंमुली. त्याकाळी बिहारला अशिक्षितता आणि दारिद्र्य यांचा शाप होता. पण गावातल्या जिल्हापरिषदेच्या शाळेत हुशार म्हणून गणल्या जाणाऱ्या  लालूला त्याच्या घरच्यांनी जिद्दीने पटन्याला पाठवून दिले. तिथे लॉ कॉलेजला त्याने प्रवेश घेतला.

पटना विद्यापीठात असताना लालूप्रसाद यादवच्या नेतृत्वगुणाला पैलू पडले. आपल्या खुमासदार भाषणांनी त्यांनी पटना युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांच्या हृदयात स्थान मिळवले.

सगळ्यात आधी कॉलेजचा जीएस मग पटना विद्यापीठाच्या विद्यार्थीपरिषदेचे महासचिव बनले. त्यांनी कायद्याच शिक्षण घेतल आहे शिवाय राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षणसुद्धा घेतल आहे.

१९७४ साली जेव्हा जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधींच्या हुकुमशाही वृत्तीविरुद्ध आंदोलन पुकारले तेव्हा लालूप्रसाद यादव आपल्या विद्यार्थी संघटनेच्या मित्रांसोबत सगळ्यात आघाडीवर होते. आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधी विरुद्ध बिहारमध्ये जनमत बनवण्यात लालूंचा सिंहाचा वाटा होता. या आंदोलनामुलेच त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली आणि १९७७ साली वयाच्या २९व्या वर्षी लालूप्रसाद यादव जनतापक्षाचे खासदार म्हणून निवडून आले.

३. अरुण जेटली.

अरुण जेटलींचा जन्म दिल्लीमध्ये सुखवस्तू कुटुंबात झाला. त्यांचे वडील महाराज किशन जेटली हे एक मोठे वकील होते. अरुण जेटली यांच्या घरातील वातावरण लहानपणापासूनच संघविचारांचं होतं. म्हणून अरुण जेटली आपल्या बी.कॉमच्या शिक्षणानिमित्त श्रीराम कॉलेजला आले तेव्हा त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामात सहभाग घ्यायला सुरवात केली.

जेटली यांचा धडाकेबाज वृत्ती, त्यांचे वक्तृत्व यामुळे काहीच दिवसात त्यांच्यावर एबीव्हीपीच्या मोठ्या जबाबदाऱ्या पडू लागल्या. त्यातूनच काही दिवसातच त्यांनी प्रतिष्ठेची दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि जिंकून देखील दाखवली.

आणीबाणीच्या काळात मोठमोठ्या नेत्यांच्याबरोबरीने विद्यार्थी नेता अरुण जेटली यांचं नाव घेतल जायचं.

जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात ते सर्वात आघाडीवर होते,  त्यांच्यावर इंदिरा गांधी सरकारच विशेष लक्ष होतं. दिल्ली विद्यापिठात आंदोलन उभा करणाऱ्या अरुण जेटली यांना आणीबाणी काळात जवळपास १९ महिने जेलमध्ये टाकण्यात आलं होतं.

पुढे भाजपची स्थापना झाल्यावर तिथल्या युवा मोर्चाच्या पहिल्या अध्यक्षपदाची जबाबदारी अरुण जेटलींनां देण्यात आली.

४.सीताराम येचुरी-

सीताराम येचुरी मुळचे आंध्रप्रदेशचे. त्यांचे वडील तिथल्या राज्य परिवहन मंडळात इंजिनियर होते. सीताराम येचुरी यांची घरची परिस्थिती देखील उत्तम होती. अगदी कॉनव्हेंट स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. तेव्हा हैदराबादमध्ये सुरु झालेल्या तेलंगणा राज्याच्या मागणीच्या आंदोलनामुळे त्यांची रवानगी दिल्लीला करण्यात आली. बारावीत असताना सीताराम येचुरी यांनी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत संपूर्ण भारतात पाहिला नंबर मिळवला.

सेंट स्टीफन्स कॉलेज दिल्लीमधून येचुरी यांनी अर्थशास्त्रात पदवी मिळवली आणि एमए साठी सुप्रतिष्ठित जेएनयु मध्ये प्रवेश मिळवला. तिथेच त्यांनी पीएचडी देखील मिळवली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मुक्त वातावरणामुळे त्यांचा डाव्या विचारसरणीकडे  ओढा निर्माण झाला. सुरवातीपासून ते तिथले स्टार स्टुडंट होते.

विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडता मांडता तिथल्या राजकारणात त्यांनी उडी घेतली. तिथल्या स्टुडंट युनियनचे ते सलग तीनवेळा अध्यक्ष बनले.

आणीबाणीच्या काळात जेएनयुचे विद्यार्थी त्यांच्या व प्रकाश करात यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधीच्या विरुद्ध आंदोलन करत होते. याकाळात येचुरी बरेच दिवस भूमिगत देखील राहिले. त्यांनां अटक देखील झाली. डाव्या पक्षांनां सीताराम येचुरीच्या रुपात नवीन तारा गवसला होता.

आणिबाणी नंतर जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान पदावरून पाय उतार झाल्या तेव्हा येचुरी यांनी त्यांना जेएनयुच्या कुलपती पदावरून राजीनामा द्यावा म्हणून आंदोलन केले. त्यांच्या घरासमोर झालेल्या या आंदोलनास इंदिरा गांधी स्वतः सामोऱ्या गेल्या. त्यांना येचुरींच्या मुळे राजीनामा देखील द्यावा लागला. विद्यार्थी आंदोलनाचा सर्वात मोठा विजय म्हणून त्या मोर्चाला ओळखले जाते.

५. शरद पवार-

शरद पवारांचे प्राथमिक शिक्षण बारामतीसारख्या छोट्या गावात झाले. त्यांच्या घरचे वातावरण सुरवातीपासून राजकीय होते. ब्राम्हणेतर चळवळीतील अनेक नेत्यांचा त्यांच्या घरात राबता असायचा. शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेतही पवारांचे थोरले बंधू सहभागी होते.

म्हणूनच शरद पवारांनां राजकीय व सामाजिक भान लवकर आले होते. म्हणूनच शाळकरी वयात त्यांनी पहिले गोवा मुक्ती आंदोलन केले होते.

मात्र शरद पवारांना पुण्यात शिक्षणासाठी पाठवण्यात आल्यावर त्यांच्यावर घरातील राजकिय विचारसरणीच्या विरुद्ध जाऊन यशवंतरावांच्या काँग्रेसी विचारांचा पगडा पडला.  त्यांनी पुण्यात विद्यार्थ्यांची संघटना बांधली. ग्रामीण भागातून आलेल्या या विद्यार्थ्यांच्या संघटनेमुळे पवारांच्या नेतृत्वाचा उदय झाला.

तेव्हा विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी केलेली छोटी मोठी आंदोलने असोत, कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार असो, यशवंतराव चव्हाणांच्या कानावर या तरुण विद्यार्थ्याची चर्चा गेली.

यशवंतराव चव्हाणांनी त्यांना पुणे जिल्हा युथ कॉंग्रेसची जबाबदारी दिली, तिथून पुढे त्यांचं संघटन कौशल्य बघून राज्य युथ कॉंग्रेसची जबाबदारी दिली. १९६७ साली अवघ्या २६ वर्षांचे शरद पवार बारामतीमधून राज्यातले सर्वात तरुण आमदार म्हणून निवडून आले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.