गर्लफ्रेंडची वाट बघत बाहेर उभे असलेले अमोल पालेकर नोकरी सोडून अभिनयात आले

अमोल पालेकर यांना ‘छोटी सी बात’ मध्ये पाहणं म्हणजे आपलंच प्रतिबिंब पाहणं असं वाटतं. मुलगी आवडते, पण कसं पटवायचं माहीत नाही. आपल्याला आवडणाऱ्या मुलीसोबत जास्त वेळ घालवणारा एक मुलगा समोर येतोच. लव्ह स्टोरी मध्ये असणारा एक मिठाचा खडा जणू. मग त्या मुलाला हटवून आपली सेटिंग कशी लावायची याचा विचार मनात सुरू होतो. अशावेळी अशोक कुमारांसारखा कोणी लव्ह गुरु सापडला तर जरा मदत होते. छोटी सी बात पाहताना अमोल पालेकर यांच्या जागी स्वतःला पाहण्याची एक सवयच लागली आहे.

अमोल पालेकर यांची खऱ्या आयुष्यातली लव्ह स्टोरी सुद्धा एकदम हटके होती.

तरुण वयात प्रेम होणं यात काही वावगं नाही. उलट प्रेम नाही झालं तर वावगं आहे. अमोल पालेकर यांना सुद्धा एका मुलीवर प्रेम झालं. तिलाही अमोल आवडायचे. गर्लफ्रेंड मुळे अमोल पालेकर यांना मात्र अभिनयाची आवड निर्माण झाली.

छोटी सी बात सारखा अशोक कुमार येथे नव्हता. तर अभिनयाचा मार्ग दाखवणारा पं‌. सत्यदेव दुबें सारखा दिग्गज रंगकर्मी अमोल पालेकर यांना लाभला. 

१९६० चा काळ. जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून अमोल पालेकर यांनी पदवी घेतली आणि ते चित्रकार झाले. चित्रकार झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या चित्रांची प्रदर्शनं सुद्धा भरवली. कला अंगी असली तरीही खूप जणांना पैसे कमावण्यासाठी नोकरीचा मार्ग स्वीकारावा लागतो. अमोल पालेकर यांनी सुद्धा बँकेत नोकरी करायला सुरुवात केली. याच दरम्यान त्यांची चित्रा शी भेट झाली.

चित्रा ही अमोल पालेकर यांच्या बहिणीची मैत्रीण होती. अमोल पालेकर सारख्या चित्रकाराची चित्राशी भेट होणं, हा योगायोग.

बहिणीची मैत्रीण आणल्याने सुरुवातीला फक्त एक छोटंसं स्माईल, आणि हस्तांदोलन इतकीच अमोल आणि चित्राची पहिली भेट. एखादी व्यक्ती आवडण्याचा क्षण एकदा जुळला, की त्या व्यक्ती विषयीची ओढ वाढते. अमोल आणि चित्रा दोघांच्या मनात सुद्धा एकमेकांविषयी तशीच भावना निर्माण झाली. दोघे परस्पर बाहेर भेटू लागले. एकमेकांसोबत सिनेमे पाहू लागले.

हाय, हॅलो पुरती असणारी सुरुवातीची ओळख आत्ता एक पाऊल पुढे गेली.

चित्रा एक अभिनेत्री असून ती थेटर करत होती. तिने अभिनयाला स्वतःचं करियर मानलं होतं. खूपदा चित्रा नाटकाच्या रिहर्सल मध्ये व्यस्त असायची. तेव्हा अमोल पालेकर रिहर्सल हॉल च्या बाहेर तिची वाट पाहत उभा असायचा. चित्राची रिहर्सल झाल्यावर दोघांचे एकत्र बरेच प्लॅन्स असायचे. दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर निर्माण झाला. नाटकाची तालीम कधीही वेळेवर सुटत नाही.

त्याचप्रमाणे चित्रा आतमध्ये अभिनयाचे धडे गिरवायची. तर अमोल जवळपास रोज रिहर्सल हॉल बाहेर उभे राहून चित्राची आतुरतेने वाट पाहायचे.

चित्रा सत्यदेव दुबें कडून रंगभूमी विषयी जाणून घेत होती. रोज हॉल बाहेर येऊन शांतपणे उभं असलेल्या अमोल कडे सत्यदेव दुबें ची नजर होती. एकदा त्यांनी अमोलला आतमध्ये बोलावून घेतले. अचानक थेट दुबेंनी बोलावल्यामुळे अमोल आदराने आत आले. त्या दिवशी त्या रिहर्सल हॉल मध्ये अमोल पालेकर यांनी घेतलेला प्रवेश त्यांना वेगळ्या वाटेने नेणारा ठरला.

चित्राने ठेवलेला विश्वास आणि सत्यदेव दुबें चं मार्गदर्शन यामुळे अमोल पालेकर यांनी नोकरी सोडून अभिनय क्षेत्र आपलेसे केले.

१९६८ साली, अमोल पालेकर मराठी रंगभूमीवर अभिनेता म्हणून स्वतःचा शोध घेत होते. त्यावेळी चित्राने संपूर्णपणे घराची जबाबदारी सांभाळली. अमोल पालेकर आणि चित्रा यांनी ३० वर्षांचा सहवास अनुभवला. परंतु नंतर त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. अमोल आणि चित्रा या दोघांचा इतक्या वर्षांनी घटस्फोट होणं, ही सर्वांसाठी धक्कादायक गोष्ट होती. परंतु दोघांनी समजूतदारपणे वेगळं होण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांनी अमोल पालेकर यांनी संध्या गोखलें सोबत दुसरं लग्न केलं

चित्रा आणि अमोल पालेकर या दोघांच्या नात्याचा शेवट काहीसा कटू असला तरी चित्रामुळे अमोल पालेकर यांना अभिनयाच्या वाटेवर मुक्तपणे वावरता आलं, यात शंका नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.