रोल्स रॉईस सारखी महागडी गाडी घेणारी नादिरा मृत्युसमयी एकटीच होती

बॉलिवुड मध्ये एकदा कलाकाराभोवती असलेलं प्रसिद्धीचं वलय ओसरलं, की असा कलाकार लोकांच्या स्मरणातून निघून जातो. मग अचानक एखादी बातमी येते की, अमुक तमुक कलाकार काळाच्या पडद्याआड. तेव्हा कुठे विस्मृतीत गेलेला कलाकार पुन्हा एकदा आठवतो. असे अनेक कलाकार अचानक गायब होतात.

ही कहाणी अशाच एका अभिनेत्रीची. या अभिनेत्रीने उत्तम भूमिका करून बॉलिवुड गाजवलं. पण तिच्या मृत्युसमयी आसपास जवळचं कोणी नव्हतं. ही अभिनेत्री म्हणजे नादिरा.

एका वाक्यात नादिरा ची ओळख सांगायची झाली तर.. ‘मुड मुड के ना देख मुड मुड के’ या गाण्यामुळे नादिरा लोकप्रिय झाली. आजही हे गाणं ऐकायला तितकीच मजा येते. नादिरा ने १९५० ते १९६० हे दशक तिच्या अभिनयाने गाजवलं. त्या काळात बोल्ड भूमिका करणारी अभिनेत्री म्हणून नादिराची विशेष ओळख होती.

नादिराचं मुळ नाव फरहात इझाकेल. फरहात पेक्षा फ्लॉरेन्स या नावाने नादिरा सुरुवातीच्या काळात ओळखली जायची.

बगदादी ज्यू फॅमिली मध्ये १९३२ साली नादिरा चा जन्म झाला. प्रसिद्ध दिग्दर्शक मेहबूब खान यांची पत्नी सरदार बेगम ही नादिराची मैत्रीण. तिच्याच आग्रहामुळे नादिरा १९ व्या वर्षी मुंबईत आली. मेहबूब खान यांनी १९५२ साली ‘आन’ या सिनेमात सहाय्यक अभिनेत्री च्या भूमिकेत नादिरा ला कास्ट केलं.आन या पहिल्याच सिनेमात नादिराने खलनायकी भूमिका रंगवली. त्यामुळे तिच्यावर या भूमिकेचा काहीसा शिक्का बसला.

६० च्या दशकात जे सिनेमे प्रदर्शित झाले, त्यापैकी बहुतांश सिनेमात एक दुष्ट, कजाग प्रवृत्तीच्या स्त्री व्यक्तिरेखा नादिराने साकारल्या.

१९५५ साली आलेल्या ‘श्री 420’ सिनेमातील ‘मुड मुड के ना देख मुड मुड के’ या गाण्यामुळे नादिराला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्या काळात तिने प्रचंड मेहनत करून कमावलेल्या पैशांनी रोल्स रॉइस ही महागडी गाडी विकत घेतली. इतकी आलिशान गाडी विकत घेणारी नादिरा ही भारतीय सिनेसृष्टीतील पहिली अभिनेत्री आहे.

यशाच्या वाटेवर असताना काही चुकीचे निर्णय घेतले की आयुष्याची दिशा भरकटते. नादिरा च्या बाबतीत सुद्धा तेच झालं.

करियर ऐन भरात असताना नादिरा एका व्यक्तीच्या प्रेमात पडली. परंतु तो माणूस गोड बोलून नादिरा ची मालमत्ता लुबाडून पसार झाला. या धक्क्यातून ती सावरतेय तोच एका श्रीमंत व्यक्तीच्या नादिरा प्रेमात पडली. श्रीमंतीचा आव आणणाऱ्या त्या व्यक्तीने लग्नाचा डाव मांडून नादिरा ची फसवणूक केली. एकामागोमाग एक असे हे दोन धक्के नादिराला आयुष्यात सहन करावे लागले. यामुळे ती काहीशी हतबल आणि एकटी पडली.

हळूहळू वय वाढत होतं. बॉलिवुड स्वत:च्या नखरेल अदांनी गाजवणाऱ्या नादिराला वयस्क माणसांच्या भूमिका कराव्या लागल्या. २००० साली आलेल्या शाहरुख च्या ‘जोश’ सिनेमात नादिराने शेवटची भूमिका केली.

आयुष्याच्या सांजपर्वात नादिरा मुंबईत एकटी राहत होती. तिचं कुटुंब इस्राईल ला स्थायिक झालं होतं. त्यामुळे मुंबईत तिच्या परिचयाचं असं कोणी नव्हतं. शेवटच्या तीन वर्षात नादिराचं घर सांभाळणारी आणि तिची देखभाल करणारी शोभा नावाची मोलकरीण नादिरा सोबत होती. वाढत्या वया सोबत शारीरिक दुखणी सुद्धा वाढू लागली.

९ फेब्रुवारी २००६ रोजी नादिराने जगाचा निरोप घेतला. एकेकाळी श्रीमंतीचा थाट असलेल्या नादिरा च्या शेवटच्या क्षणी एकाकी पडली. नादिराचं मुळ नाव होतं फरहात. फरहात या शब्दाचा अर्थ आहे आनंद. नादिरा आनंदी असली तरीही हे सुख साजरं करायला तिच्याकडे आपलं असं कोणी नव्हतं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.