मिर्झा गालिबची भूमिका मिळावी म्हणून नसीरने गुलझार यांच्या जवळ थाप मारली होती.
गुलजार हे उत्तम गीतकार आहेत हे ठाउक होतं. पण या प्रतिभासंपन्न लेखकाने सिनेमे सुद्धा दिग्दर्शित केले आहेत हे काहीसं उशिराच कळलं. प्रेमात असणारी तमाम माणसं गुलजार साब यांचे ‘इजाजत’ सारखा सिनेमा बनवल्याबद्दल आजन्म ऋणी असतील. इजाजत मध्ये नसीर ला कास्ट करून गुलजार साब यांनी अर्धी बाजी जिंकली होतीच.
यामध्ये कडी केली गुलजार यांनी लिहिलेल्या सुंदर कथेने. एखाद्या हळुवार कविते सारखा हा सिनेमा आपल्यासमोर उलगडत जातो. नसीर आणि गुलजार या जोडीने अनेक उत्तमोत्तम सिनेमे दिले आहेत.
परंतु एक वेळ अशी होती, की नसीर भाईंनी गुलजार साब ना पत्र लिहून एक रोल अक्षरशः मागून घेतला होता. काय होता का किस्सा..
ही गोष्ट साधारण १९७० – ८० साल ची. त्यावेळेस नसीरुद्दीन पुण्यातील FTII मध्ये शिकत होते. त्यांच्या कानावर अशी खबर आली की, गुलजार साब संजीव कुमार यांना घेऊन शायर मिर्झा गालिब वर सिनेमा करत आहेत. गुलजार आणि संजीव कुमार यांचं मैत्रीपूर्ण नातं जगजाहीर होतं. आंधी, परिचय, मौसम, अंगुर, कोशिश अशा गुलजार दिग्दर्शित अनेक सिनेमांमध्ये संजीव कुमार यांची प्रमुख भूमिका. त्यामुळे संजीव कुमार यांची मिर्झा गालिब सिनेमासाठी निवड होणं, यात कोणालाही आश्चर्य वाटण्याचं कारण नव्हतं. गुलजार यांनी अनेक मुलाखतीत सांगितलं आहे,
“संजीव माझा आवडता अभिनेता आहे”.
ही गोष्ट नसीर भाईंना खटकली. संजीव कुमार ग्रेट नट होतेच. परंतु मिर्झा गालिब साठी संजीव कुमार यांची निवड योग्य नाही, असं नसीर भाईंना वाटलं. गालिब यांचे शेर, गजल इतकं वाचलं नसूनही नसीर भाईंना आतून वाटतं होतं की,
“मिर्झा गालिब यांची भूमिका मी उत्तम साकारु शकेन.”
संजीव कुमार यांना या भूमिकेसाठी कास्ट करून गुलजार चूक करत आहेत, अशी नसीर भाईंना खात्री होती.
एके दिवशी त्यांना खबर मिळाली की, काही कारणामुळे संजीव कुमार यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. यामुळे मिर्झा गालिब चं शूटिंग लांबणीवर गेलं आहे. हे कळताच नसीर भाईंचा जीव हायसा झाला. विक्रम मल्होत्रा यांच्या मदतीने नसीर भाईंनी गुलजार साब चा पत्ता मिळवला. आणि थेट त्यांनी गुलजार यांना पत्र लिहिले.
“तुम्ही मिर्झा गालिब साठी जर उत्तम कलाकाराच्या शोधात असाल तर तो मी आहे.”
नसीर भाईंनी गुलजार यांना लिहिलं,
“मी मेरठ येथे राहणारा आहे. मिर्झा गालिब आणि मेरठ शहराचं फार जुनं नातं आहे. मी पुरानी दिल्ली येथील गली कासिम जान येथे राहत होतो. जिथे गालिब यांचं वास्तव्य होतं. मला अस्खलित पणे उर्दू लिहिता, बोलता आणि वाचता येते. मी मिर्झा गालिब यांच्या साहित्याचा अभ्यास केला असून मी एक उत्तम कलाकार आहे. तुम्ही जर मला या भूमिकेसाठी निवडलं तर तुम्हाला कधीही याची खंत वाटणार नाही.”
आत्ता या पत्रा मधील मजेशीर गोष्टी अशा.. नसीर भाईंनी पुरानी दिल्ली मधील ज्या जागेचा उल्लेख केला आहे तिथे ते राहत नव्हते. तर फक्त एक – दोन वेळा त्यांनी भेट दिली होती.
त्यांना उर्दू फक्त बोलता येत होतं. आणि गालिब यांच्या साहित्याचा त्यांनी अजिबात अभ्यास केला नव्हता. तरीही भूमिका मिळावी म्हणून जाणून बुजून त्यांनी पत्रात खोटं सांगितलं.
या पत्राचं गुलजार साब उत्तर देतील, याची नसीर भाईंना अपेक्षा नव्हती. या पत्राचा पुढे काय परिणाम होईल, याचाही त्यांनी विचार केला नव्हता. परंतु भूमिका मिळण्यासाठी एक शेवटचा प्रयत्न करावा म्हणून नसीर भाईंनी हे पत्र लिहिले होते.
पुढे नसिरुद्दीन शाह यांना बॉलिवुड मध्ये हळूहळू ओळख मिळू लागली. १९७५ साली ‘निशांत’ सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात नसीरुद्दीन शाह यांनी केलेल्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. खुद्द गुलजार यांनी नसीर ला पाली हील वरील त्यांच्या घरी बोलावून घेतलं. भेटीची वेळ ठरली. गुलजार यांना लिहिलेले पत्र नसीर विसरला नव्हता. नसीर च्या मनात थोडी धाकधूक होती.
गुलजार आणि नसीर दोघांची भेट झाली. नसीर ने निशांत मध्ये जो अभिनय केला होता, त्याची गुलजार यांनी खूप तारीफ केली. या भेटीत इतर कोणताही विषय निघाला नाही. किंवा आपल्याला यापुढे गुलजार साब सोबत काम करता येईल, याची सुद्धा शक्यता नसीर ला वाटली नाही. पुढे सुद्धा गुलजार आणि नसीर च्या भेटीगाठी होत राहिल्या.
परंतु आपण लिहिलेल्या पत्रा विषयी गुलजार साब यांना विचारण्याची नसीर ची कधी हिम्मत झाली नाही.
ज्या भूमिकेसाठी नसीर आशादायी होते ती भूमिका म्हणजे मिर्झा गालिब.
१९८८ साली गुलजार साब यांनी दूरदर्शन साठी मिर्झा गालिब मालिकेचा घाट घातला. लेखक – दिग्दर्शक स्वतः गुलजार. प्रमुख भूमिकेसाठी त्यांनी नसीर ला विचारले. ही भूमिका नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. इतक्या वर्षांपासून मनात नसीर भाईंनी जी इच्छा बाळगली होती, ती अखेर पूर्णत्वास आली.
एकदा मिर्झा गालिब च्या सेटवर हिम्मत करून नसीर ने गुलजार साब ना पत्राविषयी विचारले. नसीरने कडून सर्व हकीकत जाणून घेतल्यावर गुलजार यांना मोठी गंमत वाटली. सर्व ऐकून घेतल्यावर गुलजार म्हणाले, “मला असं कोणतंच पत्र मिळालं नाही.” नसीर ने लिहिलेलं पत्र गुलजार साब पर्यंत पोहोचलंच नव्हतं. जी भूमिका नसीर च्या नशिबात होती, ती मात्र त्याला मिळाली
(संदर्भ : And Then One Day – Nasiruddin Shah)
हे ही वाच भिडू.
- म्हणूनच भारत एक खोज सारखी मालिका पुन्हा निर्माण होऊ शकली नाही
- पोस्टर चिटकवणाऱ्या मुलाला रिक्षावाले विचारायचे हा आमिर खान कोण आहे ?
- राखी म्हणजे गुलजार साहेबांची अधुरी राहिलेली कविता..
- काळे कपडे घालायला लागतील म्हणून गुलजार ऑस्कर अवार्ड घेण्यासाठी गेले नाहीत.